Tuesday, April 26, 2016

SIX FLAGS

अमेरिकेत आल्यापासून शनिवार रविवार म्हणले कि एखादे म्युझियम , मॉल  आणि त्या उंच उंच इमारती पाहून खरेच खूप  कंटाळा आला होता , काहीतरी वेगळे करावे असे मनात होते पण हि थंडी !!!!!!!! पण या वसंत ऋतूच्या आगमनासमवेत नवरा बोलला कि आपण या रविवारी माझ्या ऑफिसच्या मित्रासोबत फिरायला जायचे. सिक्स  फ्लाग(six  flag ) आणि  अनिमल सफारी चा आपला प्लान आहे , हे सिक्स फ्लाग काय असते असे म्हणल्यावर नवरोबांनी त्याचे फोटो दाखवले ते पाहून मी उडालेच , ह्या हे काय आमची जत्रा !! म्हणून मी आपली लई खुश  , तर अहो म्हणतात कसे जत्रा कि " खतरा " कळेलच रविवारी !!! आणि इथे आल्यापासून आम्ही फक्त मराठी  लोक सोबत जाणार मग तर  दुधात साखर केशर सगळेच !!!!

कुठेही जायचे म्हणले कि हमखास उशिरा उठणारी मी यावेळी रविवार असून  देखील लवकर उठले ,  जत्रेत जायची हौस हो आणि त्यात दोन वर्षांनी जत्रा पाहायला मिळतीय म्हणल्यावर काय आमचे घोडे पुढेच पळत होते साधारण नऊच्या सुमारास आमचे प्रयाण सुरु झाले  तासा दीड तासाचा प्रवास , इथे प्रवास करताना आजूबाजूला उंच झाडे इमारती आणि मॉल दिसतात पण  लगेचच असे एखादे वळण येते कि आपण पाहतच राहतो …… तर अशा या झोकदार वळणानंतर आमचे ध्येय डोळ्यासमोर होते .
 आम्ही मोठे आठ जण आणि चिल्लीपिल्ली दोन असा लवाजमा घेऊन पावती फाडण्यासाठी गेलो , इथे सुरुवातीला पावती फाडली कि आत सगळे फोकट में ! पण पहिलीच पावती अव्वाच्या सव्वा असते पण आमचा ग्रुप होता आणि त्यात एका मैत्रिणीची कंपनी सवलत घेऊन मदतीला आली . सगळे सोपस्कार करून आत मध्ये गेल्या गेल्या फोटो फोटो करत मधमाशा कशा पोळ्याला येउन चिकटतात तसे सगळे मागे आणि परत त्याच फोटोचे पैसे उकळतात अर्थात आपण घेतले तर !!
 आम्ही पहिली जंगल भ्रमंती घेतली त्यासाठी तासभर रांगेत उभे राहून मग  ट्रक दिसला चलो पायपीट नाही म्हणून खुश वाघ सिंह असे प्राणी सोडले तर बाकी सगळे मोकळेच फिरत होते मजा वाटली , या भ्रमंती मध्ये एक छोटा थांबा होता जिराफाना  खायला घालण्यासाठी पण पैसे देऊन !! कुठे कसे पैसे उकळावेत ते न या लोकांकडून शिकावे …। 



इतक्या मोठ्या भ्रमंती नंतर सगळ्यांचाच भूक अग्नी प्रज्वलित झाला होता , पण शुध्द शाकाहारी म्हणले कि पिझ्झा , बर्गर आणि  sandwich  याशिवाय काही पर्याय नसतो , पिझ्झाची एक तुकडा पोटात गेल्यावर जरा उभारी आली आणि नव्या दमाने आमची ब्रिगेड सज्ज झाली खऱ्या  मजा मस्ती साठी ……. 

पहिली कोणती  राइड घ्यायची हे बघत बघत एका ठिकाणी येउन थांबलो आणि ठरवले आता श्रीगणेशा इथून त्या राइडचे नाव होते " एल टोरो " तिथे पोहचण्यासाठीही  आम्हला अर्धा पाउण तास वाट पहावी लागली तिथे  थोडे पुढे गेल्यावर एका कोंबडीचे चित्र दाखवून लिहिले होते " पळून जाण्यासाठी शेवटची संधी " !! असे करत आमची राईड मध्ये बसण्याची घटिका जवळ आली त्यावेळी पोटात सकाळी पाहिलेले सगळे प्राणी कत्थक करू लागले होते तसे या राईड मध्ये आपल्या सुरक्षितेची पूर्ण काळजी घेतली असते त्याच्या वेगामुळे …. अपवाद असतो तो आपल्या मनातील वेगाच्या भीतीचा !! 
राईडमध्ये बसल्यावर पहिला अगदी रेल्वेत बसल्यासारखे हळू हळू नंतर एक मोठा चढ जो को १७६ फुटावर जाऊन थांबत होता तिथे अगदी काही सेकंद थांबवले पण त्यानंतर १७६ फुटावरून खाली मुक्त पडणे ( free  fall )  तोही ७० मैल्स पर अवर (७० mph )  या वेगाने यावेळी मला ३३ कोटी देव सुद्धा आळवायला कमी पडले . 
हि राईड फक्त २ मिनिटे आणि ५ सेकंदची होती पण … ………  फक्त अनुभव !!!! 


खाली आल्यावर मी आहे न याची खात्री करून घेतली आणि कधी एकदा नवऱ्याचे तोंड पाहते असे झाले तो या अशा गोष्टींपासून दूरच असतो तसा !!! 
या नंतर एक छोटी राईड केली जी कि फन राईड होती . मग छोट्या मुलांच्या रेल्वेत मज मस्ती केली . यानंतर एका राईड कडे लक्ष होते निट्रो कि नायट्रो (nitro ) म्हणून होती त्यातही मी अगदी हौसेने बंसणार म्हणून गेले पण तिथे आपला नंबर यायची वाट पाहत असताना त्याचे सर्वोच्च टोक दिसले तो २३० फुटावर आणि तिथून खाली ८० मैल्स पर अवर या वेगाने !!!!!!!  त्या २३० फुटावर मला मघाशी जंगलात पाहिलेला रेडा यमाचा रेडा म्हणून दिसू लागला आणि माझ्या निश्चयाचा महामेरू ढासळला , त्यात नाही बसले यावरून टोमणे ऐकले पण  जान बची तो लाखो पाये !!!! 
  पण यानंतर मात्र एका राईड मध्ये बसायचे ठरवले होते ती म्हणजे वटवाघूळ(batman ) राईड त्यात आपण उलटे लटकून आपले पाय अधांतरीच याचे सर्वोच्च टोक १०५ फुटावर आणि वेग ५० मैल्स पर अवर यात इतके लटके झटके झाले माधुरीने सुद्धा आतापर्यंत कमी घेतले असतील ! त्यानंतर दोन दिवस मान हलवता येत नव्हती असे हाल  ,एकही राईड मध्ये डोळे उघडून  बघायची हिम्मत होत नव्हती आणि मी तर जाताना नवऱ्याला सांगून जात होते कि " जगले वाचले तर भेटू परत " !!! आणि सगळ्या राईडस २ मिनिटापेक्षा कमी होत्या पण  खतरा  राईडस होत्या या  ……. 




यानंतर मात्र छोट्या छोट्या म्हणजे कार डाशिंग  उर्फ दे धक्का  यात मात्र माझी कार जास्त वेळ स्वतः भोवती गोलगोल फिरत होती !!! आणि मला आवडलेली राईड sky screamer २४२ फुटावर फक्त गोलगोल  फिरून आजूबाजूचा सुंदर परिसर पाहणे आणि खास म्हणजे यात आम्ही सूर्य मावळतीला जात असताना बसलो होतो ती सांजवेळ आणि दिव्यांची उघडझाप पाहून तर त्याला चार चांद लागल्यासारखे वाटत होते …. सलग दोन वेळा बसूनही तोच आनंद 


 आता निघायची वेळ झाली होती पण अजून खूप काही बाकी होते पण पानात वाढलेले सगळे एकदम संपवायचे  नसते ना  हळूहळू  चवीने खायचे असते , त्यामुळे सिक्स फ्लागला अजून भेटायचे आश्वासन देऊन काढता पाय घेतला …….    
  

No comments:

Post a Comment