Saturday, April 30, 2016

आजोळ

साधारणपणे आमची परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपली कि आजोबा आम्हाला  घेऊन जाण्यासाठी आलेलेच असणार , उन्हाळ्याची सुट्टी म्हणले कि आमचे ठरलेले ठिकाण येळावी माझे आजोळ . कवठे महांकाळ ते येळावी दीड दोन तासाचा प्रवास , तासगाव मधून गाडी बदलावी लागत असे  मी एकीकडे आजोबा मध्ये आणि दीदी दुसरीकडे असा आमचा प्रवास .

गाव तसे लहान होते पण आजोबांना मानणारे लोक खूप , त्यामुळे जोशीबुवांची नातवंडे म्हणून आमचीही मजा असे . तिथे उतरले कि स्टेंड वरच ओळखीचे एक दुकान होते तिथून आम्हला खूप गोळ्या बिस्किटे मिळत , तोपर्यंत आजोबा त्यांची सायकल घेऊन यायचे आणि आमचा प्रवास आमच्या मळ्याकडे , गावापासून २-३ किलोमीटर आतमध्ये आमचा मळा , जाताना दोन्ही बाजूने झाडे त्यामुळे उन्हाळा आहे असे वाटतच नसे . 
 घर जवळ आले कि सायकलची घंटी वाजवून आजीला सांगणार कि आम्ही आलो , पण ती त्याआधीच दृष्ट काढायचे समान हातात घेऊन उभी असे . "किती वाळल्या ग माझ्या पोरी ?" संधी (माझी आई संध्या ) नेहमी पोरांच्या मागे असते नुसती , असे म्हणून गालावर मायेने हात फिरवायची . 
  गेल्या गेल्या चुलीत भाजलेल्या कैरीचे मस्त पन्हे  प्यायला मिळायचे , आम्ही येणार म्हणून आजीची तयारी खूप जोरदार असायची , त्यात खास कैरीची चटणी , बाटाचे आणि साधे लोणचे , मुरंबा ,साखरांबा  सगळी नुसती धमाल …
  आम्ही येणार म्हणून आधीच प्रत्येकासाठी झोपाळे बांधून तयार असायचे , गोष्टीची पुस्तके आणि सोबत अभ्यासही असे , याबाबतीत आजोबा खूप कडक होते त्यांना रोज पाढे  म्हणून दाखवावे लागत आणि शुद्धलेखनसुद्धा यात कोणतीही तडजोड नसे . 
 आमचे दुपारचे जेवण शक्यतो आमराईत असे  वरती लटकलेल्या कैऱ्या , आजूबाजूला जांभूळ ,आवळा, सोनचाफा , मोगरा , अशी कितीतरी झाडे यात आमचे जेवण … आमची दुपारची छोटी डुलकीही  तिथेच होई, 
तिन्हीसांजेला आजोबा आमच्याकडून शुभं करोति , अथर्वशीर्ष , रामरक्षा ,मारुती स्तोत्र म्हणून घेत . रात्रीची जेवणेसुद्धा अंगणात होत  …  चांदण्यात आजी जवळ  कुशीत झोपताना तिने शिवलेल्या गोधडीची ऊब जास्त कि तिच्या कुशीची ? या विचारात आणि गोष्टी ऐकत निद्रादेवी भूल घालत असे . 
 सकाळी उठले कि चुलीसमोर जाऊन बसायचे , आजीची धार काढणे यात हळूच कधीतरी जाऊन तिला मदत करायची , शेणाने सारवायचे  असे उद्योगधंदे , हे दुध तापवल्यावर खाली राहिलेली साय आजी साखर घालून खरवडून द्यायची काय लाजवाब चव तिची …  दुपारचे आजीचे काम झाले कि ती मातीची खेळणी करून द्यायची माझा आणि दिदीचा  भातुकलीचा डाव रंगायचा …  कधी कधी आजोबांसोबत सगळ्या शेतात भटकायचे . 
   हळू हळू कैरीला पाड येऊ लागतो मग आमच्या सगळ्याचे लक्ष तिकडे आजोबा स्वतः झाडावर चढून कैऱ्या उतरवायचे. आम्ही त्यांना मदत करत असू . घरात एक छोटी खोली होती तिथे पोती घालून त्यावर या कैऱ्या पिकायला ठेवायच्या  . सगळ्या घरात नुसता आंब्याचा वास दरवळत असे . आम्ही तर त्या खोलीच्या शेजारीच झोपत असू , रोज उठले कि आज किती आंबे पिकले याची मोजदाद .  आमरस साठी वेगळे , कापून खायचे वेगळे , चोखून खायला वेगळे असे त्यांचे वर्गीकरण  ……  असे करता करता मे महिना संपत आलेला असे आणि आई बाबा आम्हाला  घेऊन जाण्यासाठी येत , दिवस किती लवकर सरले याचे इतके वाईट  वाटायचे 
पण …… 
 आजी न चुकता सगळ्या बरण्या आईला द्यायची , आमची परत एकदा पाणावलेल्या  डोळ्यांनी दृष्ट काढून मग  आम्हाला निरोप  . 

मला या आंब्याच्या जातीमधले काही कळत नाही , हापूस , पायरी ,शेपू आणि कुठलाहि असो पण एक नक्की आहे कि आजही आंबे खाताना त्याला आजोबांनी उतरवलेल्या आंब्याची सर येत नाही  ……

No comments:

Post a Comment