Tuesday, May 9, 2017

आनंदी

काही मित्र , मैत्रिणी बघताक्षणी आपलेसे वाटतात , कधी त्यांच्यासोबत सूर जुळले जाऊन एकमेकांची सुख दुःखे आपली होऊन जातात समजत नाही .... अशीच माझी एक मैत्रिण अंजु .. 
तिला जेव्हा मी भेटले त्यावेळी ती खुप वेगळीच वाटली ,  खूप लोकांच्या गर्दीत आपली ओळख जपून ठेवणारी अशी ....  काही माणसे पहिल्या भेटीत आपली होतात , काहींना थोडा वेळ द्यावा लागतो यातल्या ती पहिल्या प्रकारात मोडणारी आणि मी दुसऱ्या तरीही आमची मैत्री झाली , वेळ जाईल तशी  हि दोस्ती पक्की झाली .. 
अंजुला कुणीही पहिले तरी समोरची व्यक्ती कितीही दुःखी असुदे नाहीतर टेन्शनमध्ये त्याच्या चेहऱ्यावर हसू येणार हे नक्की !! 
काय रसायन आहे तिच्याकडे माहिती नाही , तिची बोलण्याची ढब , हातवारे करण्याची सवय किंवा एखाद्याची नक्कल करण्याची सवय आणि शुद्ध मराठी बोलताना मध्येच कुठेतरी हिंदी इंग्लिशची फोडणी त्यामुळे होणाऱ्या अर्थाचा अनर्थ...  यामुळे तिच्याजवळ कुणी आहे  आणि हसणे खिदळणे नाही हे केवळ अशक्य !!!
तिला जेव्हा भेटले तेव्हा खरेच तिचा खूप हेवा वाटला होता कसे शक्य आहे हिला आपल्या आजूबाजूला इतक्या माणसाना गुंगवून ठेवणे ? सगळ्याशी गोडीगुलाबीने वागणे ? पण खरेच आहे ती तशी आणि वेगळी .. मनातले भाव चेहऱ्यावर न उमटून देणारी .... !!!
आता आमची मैत्री अगदी जिवाभावाच्या दोस्तीत बदलली होती .. त्यामुळे घरातील गोडधोड गोष्टीपासून ते तिखटमिठाच्या फोडणीपर्यंत आमच्या गप्पा रंगू लागल्या ... 
अंजुचे आणि माझे बालपण अगदी सारखेच गेले , मजेत  दंगा मस्ती करण्यात , सगळे काही वेळच्या वेळी  मिळायचे ... तिचे शिक्षण पूर्ण झाले तसे लग्न झाले आणि पहिले मजा मस्तीचे दिवस संपले आणि संसार सुरु झाला .. 
तिचा संसार आणि तिची कहाणी वेगळीच ...  जेव्हा तिने सांगितले कि तेव्हा खरेच प्रश्न पडला कि आजच्या जगात पण अशी लोक असू शकतात ? 
किती तो त्रास ? बायको म्हणजे मोलकरीण !!! रात्रीची सोबतीण  फक्त इतकेच नाते  असते का एका नवरा बायकोत ? त्यापुढे काही नाही ...  तिला विचार करायचे स्वातंत्र्य नाही कि स्वतःच्या मर्जीने काही करायचे नाही...  जर तिने असे काही केले कि मग आहेतच लाथा !! आणि सगळ्या गोष्टी त्याच्या मनासारख्या करून मिळते पण काय तर तिच्या माहेरच्या लोकांचा उद्धार  आणि त्यांच्यासोबत बोलायला बंदी ..  सहा सहा महिने कोणती मुलगी आपल्या आई बापाशी न बोलता राहू शकते ??  आणि तिचे सासू सासरे म्हणजे काय तर कहरच !!! ते तिच्या नवऱ्याच्या वरचे ...  !!! एकापेक्षा एक किस्से ऐकायला मिळाले ..  म्हणजे अगदी मराठी सिरीयल तयार होईल त्यावर एक !!! तिचा खूप त्रागा होतो , चिडचीड होते... आता तीच बदलत आहे स्वतःला यातून नक्कीच काहीतरी चांगले होईल ... 
पण या सगळ्यात आवडतो फक्त तिचा स्वभाव  नेहमी आशावादी राहण्याचा दृष्टिकोन  कितीही दुःख असले तरी  दुसऱयाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची एक कला ...