Tuesday, April 19, 2016

एक नवी ओळख

आरुषीचा संसार मांडून आता ४-५ वर्ष झाली . सगळ्याच आयांप्रमाणे मलाही माझ्या नातवंडाची तोंड पहायची घाई होतीच पण लेकीचे करिअर त्यात आधी  तिला जम बसवायचा होता त्यामुळे मीही थोडी शांतच होते . पण आज लेकीचा फोन आला आणि कधी एकदा तिला जाऊन भेटते असे झाले . जवळ असते तर गेले असते लगेच पण परदेशी ?
आज आरुषीचा फोन आल्यापासून नुसती माझी गडबड चालू होती, पण तिचे बाबा मात्र  अगदी शांत  आनंद झाला नाही असे नाही पण ठेविले अनंते  तैसेचि राहावे हि वृत्ती ….  आनंद आणि दुःख कशाचाच बाऊ करायचा नाही . तसेही लेकीने फोनवरून बाबांना तुम्हीही याच  असे सांगितले होते आणि मलाही कडक शब्दात सांगितले होते काहीही कर पण त्यांना घेऊन ये . म्हणजे तुमचे दुसरे हनिमून होईल ग !! आणि खळखळून हसली , 
दुसरे ?
          तसा  मनात विचार आला आपण कधीतरी गेलो होतो का असे दोघे बाहेर ? एकत्र कुटुंब , सासू सासरे दीर जाऊ  मुल यातच सरले नव्याचे नऊ  दिवस . … त्यामुळे लेकीने हनिमून म्हणताच नाही म्हणली तरी गालावर खळी  फुलली होतीच , पण परदेशी लेकीच्या घरी ५-६ महिने राहावे लागणार होते ते यांना किती रुचेल म्हणून जरा घाबरतच विचारले काय विचार आहे तुमचा ?  रिटायर झाल्यापासून पेपर मधून तोंड न वर काढता उत्तर देतात तसेच आजही आले  आणि तेही चक्क हो म्हणून !!!  जाऊया दोघे असे !!! 
तसेही आधी मला एकटी जायचे म्हणजे थोडी भीती होतीच , तिथले नियम , कायदे कानून सगळे वेगळे मला एकटीला कसे जमणार ? पण लेकीचे बाळंतपण म्हणजे आईच्या जिव्हाळ्याइतकाच जबाबदारीचा प्रश्न !!!  आणि त्यात आज स्वारी मूड मध्ये मग काय माझे पाय तर जमिनीवर ठरेना झाले .  मी तर अगदी दिवस मोजू लागले विमान प्रवास पहिलाच जोडीने , विमानतळवर पोहचल्यावर तिथली लोक , झगमग पाहून माझीच मला मी एक ध्यान वाटत होते ,पण फक्त तिथे तुम्ही होतात म्हणून  …….   
 विमान उडते वेळी माझी झालेली अवस्था पाहून हातात घेतलेला हात तुम्ही विमानातून उतरेपर्यंत धरून ठेवला होता , तिथली बाई जेव्हा विचारत होती Is  there any rice or liquid in ur bag ? मी आपली तिला समजावत होते येस येस  देअर आर सम मसालाज  !!! पण तिला माझे ओ कि ठो  कळत नव्हते आणि तुम्ही तिला सांगितले she means some spices are there ... आणि ती हसली त्यावेळी असा राग आला होता न त्या भवानीचा ! पण ……… 

सगळे सोपस्कार पार पाडून  बाहेर आलो त्यावेळी लेकीचा चेहरा उजळलेला पाहून कोण काय जाणे  आंनद होता , पण आज प्रथमच तुमच्यातला आजोबा जावयाशी बोलताना पहिला . लेकीच्या घरी मी लवकर रुळले पण  तुम्ही ?  तरीही क्षणोक्षणी मला आधार देत तुम्ही माझ्याजवळ होतात …  
 आपली लेक  दवाखान्यात असताना  आणि बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून एकाचवेळी खारट आणि गोड  अश्रू तुमच्या डोळ्यात……  कधी अपेक्षाच नाही असे वेगळे रूप तुमचे , इतक्या लहान मुलाला घ्यायची सवय नसताना त्यासाठी केलेली धडपड  तेव्हा आपल्या नातीइतकेच निरागस दिसत होता तुम्ही ,  आणि ती घरी आल्यावर माझी उडणारी तारांबळ पाहून रात्रीच्या जागरणात केलेली सोबत !!

आज आपली लेक ३-४ महिन्याच्या विश्रांतीनंतर आजपासून कामावर जायला लागली , घरात मी न आपली नात …… पण जायच्या आधी लेकीने शिकवले हा laptop वापरायला आणि लिहायला , पहिला प्रयत्न केला लिहायचा तुम्हालाच  , कामासाठी म्हणून तुम्ही आधी गेलात पण जाताना मात्र मला परत तुमची एक नवीन ओळख देऊन गेलात  …… 

No comments:

Post a Comment