Wednesday, March 23, 2016

चिमण्या


संध्याकाळचे ५ वाजत आले कि माझी रणभूमी वर जाण्याची तयारी सुरु  असे कारण आमची तीन पात्र ….  आई भूक लागली करतच घरी !!  शाळेचे दप्तर एकीकडे तर ड्रेस दुसरीकडे आणि जयघोष काय केले ते सांग … भडंग ,चकली, लाडू चिवडा ,पोहे  रोज कितीही वेगळे सांगा पण यावर मात्र यांचे एकमत रोज काय ग तेच तेच 
" काहीतरी वेगळे " करत जा ना . एकीला बोर्नविटाची कोल्डकॉफी , एकीचे गरम दुध , एकाला चहा  खाणे पिणे कमी पण नाटकेच जास्त . 
 अभ्यासाचे तर  नाव नको … हि दोन नंबरची तर मराठी महिने  म्हण म्हणताना माघ नंतर पुढे , अग माघ नंतर फाल्गुन ग पण नाही म्हणे आई अग माघ नंतर पुढेच असते फाल्गुन काय ?  मलाच वेड्यात काढून मोकळी  फक्त डोके फोडायचे बाकी होते यांच्यासमोर . यांचे लहानपण खूप  भुर्रकन गेले . मोठीची बारावी झाली त्यांनतर एकेक करत शिक्षणासाठी म्हणून बाहेर पडली हि पाखरे . मुलांसोबत घराला पण एक पोक्तपण आले तेही आता शांत  शांत राहू लागले . घरातला चिवचिवाट आता महिन्यातून एकदा दोनदाच होऊ लागला . 

मोठ्या चिमणीचे लग्न ठरले ती उडाली तेव्हा धाकटी होती म्हणून थोडे कमी जाणवले दोन वर्षांनी तीही उडाली मग मात्र घर खायला उठले …  लहानपणी खेळायला पळताना शाळेला जाताना  अग बायानो दार  लावत जा ग प्रत्येक वेळी ओरडून सांगावे लागायचे   आणि आज तेच दार  मला रोज हसून विचारते , " आता कारण शोधते का मला उघडे ठेवण्यासाठी ?" रविवारी डोसे करायचे म्हणजे पहिला नंबर कुणाचा ? याची तयारी सकाळी कोण लवकर उठेल तो इथून तयारी … आणि आता ???     " काहीतरी वेगळे " याची कृती अजूनही सापडलीच नाहीय …  काहीतरी हरवत  आणि काहीतरी गवसत आणि ते नेमके काय असते हेच नाही उमजत !!!
  बाहेरून आल्यावर  घरातल्या पसाऱ्यासोबत मिळणाऱ्या गरम चहाची चवच जास्त गोड लागायची… आज या दोन चिमण्या खूप सुखात आहेत पण या मायेच्या घरट्याला त्यांची उणीव नेहमीच जाणवणार

(    माझ्या आईच्या मनातील भावनांना शब्दात गुंफायचा एक छोटासा प्रयत्न )    चिमण्या 

No comments:

Post a Comment