Tuesday, June 14, 2016

रेशीमधागा

तो असाच आहे झऱ्यासारखा अवखळ , नेहमीच प्रवाहात असणारा….  कधी अबोलच तर कधी कधी मनकवडा  काहीवेळा स्वतःत गुंग असणारा पण नेहमीच माझ्यकडे लक्ष देणारा …. आणि आता तो कसाही असला तरी माझा नवरा आहे .
कर्केचा तो हळवा अन धनुची  मी चिडकी तशी चंचलही … नेहमीच त्याने मला समजावून घ्यावे जरी तो चिडला तरी …. नेहमीच मी त्याला गृहीत धरत असते याची जाणीव आहे मला …. पण कसे समजावू या वेड्या मना ?
कधी कधी मी चिडते का ?  ते मलाच माहिती नसते पण तरीही त्यानेच येउन समजूत घालावी . त्या बिचाऱ्याला हेही माहित नसते कि काय झाले ? आणि त्याने कितीही विचारले तरी त्याचे उत्तर माझ्याकडे नसते !!! पण त्याने प्रेमाचे दोन शब्द बोलावे हि अपेक्षा असते … मलाही कळत असतो माझा वेडेपणा पण ती वेळच  असते वेडी  …
 मी वारा येईल तसा वाहणारी पण तो अचल पर्वत माझ्यासाठी नेहमीच स्थिर . या लहरी वाऱ्याने कधी कधी उठतात छोटी छोटी वादळे पण तीही आली तशीच शमून जातात … या वादळाची निर्मिती  हि अशीच असते , त्या नंतरची गोडी गुलाबी निराळीच असते … 
आज पर्यंत सगळ्याच गोष्टी न मागता मिळालेल्या यातील हि एक अनमोल भेट ….
साथ तुझी माझी  जन्मोजन्मीची
ओढ तुला अन मला एकमेकाच्या प्रीतीची
सहज गुंफला वीण हा रेशिमधाग्याचा
हाच आलेख आपल्या तीन वर्षाच्या सहजीवनाचा

रेशीमधागा 

Tuesday, June 7, 2016

माझे उद्योगधंदे

अमेरिकेत येउन २-३ महिनेच झाले असतील  नवीन असल्यामुळे बऱ्याच गोष्टी कळत होत्या  समजून घेणे चालूच होते . कधी कधी शनिवारी रविवारी अहो सोबत मॉल वारीही होत असे यावेळीही आम्ही दोघे मॉलमध्ये फिरायला गेलो होतो बरीच मैल पायपीट करून झाल्यावर दोघांनाही भूक लागली हल्ली आम्हाला  दोघांना एकमेकांकडे नुसते पहिले तरी कळते कि भूक लागली आहे ते !!! 
असो तर सगळ्यात वरती असेलल्या फूडकोर्ट मध्ये जाऊन मी आणि नवरा बसलो , ओर्डर करून खाण्यासाठी कोण घेऊन येणार ? यात आमचे तू तू मै मै चालू होते !!! शेवटी अहोंना भूक लागल्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली आणि रवाना झाले . 
मी आपली बसले होते आजू बाजूला पाहत , मी जिथे होते तिथे जागा होती ते पाहून एकजण तिच्या बाळाला स्ट्रोलर मध्ये घेऊन शेजारी येउन बसली . 
तिने माझ्याकडे पाहून एक स्माईल केले आणि " hi " करून बोलायला सुरवात केली . 
मीही आपली तिला : Hi  , how  r  u ? 
ती : I m gud thanks , btw I  m अमृता  व्हात्स युर नेम ? 
मी : श्वेताली . 
 ओह्ह स्वीट नेम !!! आय एम फ्रोम पुणे and यु ? 
मी : आय एम अल्सो फ्रोम पुणे कॅन यु स्पीक मराठी ?  
ती : एस   … 
मी किती खुश झाले !!! एक तर हि मराठी त्यात स्वतः हून बोलायला आली , किती छान !! इथे आल्यापासून मी बोलणारे पहिलेच नाहीत त्यात हि तर मराठी बोलणारी , चातक कसा पावसाची वाट पाहत असतो ,, त्याच्यासारखीच मी इथे मराठी बोलायला नेहमीच आसुसलेली असते , आत्ता इथले माझे मराठी भाषिक मित्र त्याचा अर्थ मला इंग्लिश बोलताच येत नाही असा लावत असतात का  तर मी त्यांच्याशी मराठीत बोलते म्हणून !!! जैसी जिसकी सोच !!! 
माझा हा स्वप्नविलास तिनेच तोडला  , कधीपासून आहेस इथे ? 
आम्ही आताच आलो २-३ महिनेच झाले . 
अरे म्हणजे अजून नवीनच आहात !! कुणी मित्र वैगरे आहेत कि नाहीत ? 
मी : नाही जास्त कुणी नाही … 
ती : काय करते जॉब ? 
मी : नाही H४ विसा त्यामुळे घरीच असते . वाचते , थोडेफार लिखाण करते , नवीन पदार्थ करून बघत असते ………   तिचा पुढचा प्रश्न ओळखून आधीच उत्तर दिले. 
ओह्ह thats grt !! 
तितक्यात नवरा खायचे घेऊन येतो म्हणून माझी त्या प्रश्नातून सुटका झाली .  
त्याच्याकडे बघूनही स्माईल … नवरा तर खुश होऊन लगेच  हाय आय एम विजय !! 
हाय मी अमृता ! 
मी आपली दोघांकडे आणि त्या खाण्याकडे बघत बसले . 
तिला काय वाटले माहित नाही पण माझा फोन नंबर घेऊन ती गेली . 
आम्हीही खाणे संपवले आणि परत घरी आलो . 
दुसऱ्या दिवशी नवरा ऑफिसला माझे चालू होते घरचे काम तितक्यात अमृताचा फोन आला . मी विचार करू लागले काळ तर हिला भेटले आज लगेच हिचा फोन ? थोड्याश्या आश्चर्यानेच तिला Hello केले . 
ती : disturb तर नाही न केला? 
मी  ( मनातल्या मनात हो म्हणले तर काय फोन ठ्वेणार आहेस का ?) तिला नाही ग बोल ना !
ती : इट्स रियली वेरी नाईस टू मिट यु अन्ड विजय ! 
मी : सेम हियर .
तिकडून तिचे अग तू खूप छान बोलतेस मी माझ्या नवऱ्याला पण सांगितले कि मला एक मराठी नवीन मैत्रीण मिळाली . म्हणून आज परत तुला कॉल केला . 
मी हो मला आणि विजयला पण खूप आनंद झाला तुला भेटून !!!! 
ती : अग माझा नवरा म्हणत होता कि आपण या शनिवारी भेटूया का ? कुठेतरी बाहेर जेवू !!! म्हणजे आपली परत भेट होईल !
मी: अग हो मस्त प्लान आहे भेटू आपण फक्त विजयला विचारते त्याचा काही प्लान असेल तर … 
ती : ओक चालेल बाय डियर !!

लगेच विजयला कॉल करून , अरे त्या अमृताचा कॉल आला होता भेटूया म्हणत होती ! माझ्या विषयी फारच गोड बोलत होती बुवा , काय कळेना मला तिचे पहिल्या भेटीत असे कसे काय ? 
तर त्याचे लॉजिक , अग टिपण एकटीच असेल म्हणून …. बर घरी आल्यावर बोलू ! फोन कट . 
माझ्या डोक्यात आपले किडे असे कुणी बोलते का इतके गोड गोड !! काहीतरी नक्की आहे !! नाहीतर इथे स्वतःहून ओळख देणारे फार कमी !! 
तो दिवस तसाच गेला .  
परत दुसऱ्या दिवशी  तेच तिचा कॉल हे ! काय प्लान तुमचा मग ? भेटायचे ना ? 
अरे देवा परत मी  आणी विजय यावर बोल्याचेच विसरलो !! आता काय ? 
तिला कसेतरी कटवले !! आणि परत त्याला फोन तर साहेब बिझी मीटिंगमध्ये !! 
तोही दिवस तसाच … 
परत सलग तिसऱ्या दिवशी तिचा कॉल यावेळी थेट प्रश्न विजयला विचारले का ? आहे का तो फ्री? 
मी गप्पच … आता मात्र पलीकडून धूर निघेल असे वाटत होते पण तिने ओके lets  talk tommrow !! फोन कट 
 आज मात्र विजयशी बोल्याचेच … तो घरी आल्यावर अरे काय सांगू तिला ? रोज कॉल करत आहे ती !!
तो : कोण ती (जरा घाबरून )
अमृता रे आणि कोण ? 
ती होय हा भेटू आपण !! 
हुश्श !!!! अपेक्षेप्रमाणे तिचा फोन आलाच 
यावेळी मात्र तिने खुश होऊन फोन ठेवून दिला …. 
शनिवारी आमचे निवांत आवरणे चालू होते तोच तिचा मेसेज ,, प्लान चेंज्ड  वी विल मिट अट युर होम .  डायरेक्ट आज्ञा !!! 
आम्हाला साधे विचारावेसे पण तिला वाटले नाही . पण असो आलिया भोगासी असावे सादर याप्रमाणे आम्ही दोघेही ओके म्हणून गप्प बसलो . 
थोड्या वेळात त्यांचे  सहकुटुंब आगमन  झाले . चहा पाणी होत असताना तिच्या नवऱ्यासोबत ओळख परेड चालू होती  आमच्या खानदानाची माहिती घेणे चालू होते . कोण काय करते ? कुठे असतात ? किती भाऊ ? बहिणी ? आम्ही आपले एकमेकांकडे पाहत उत्तरे देत होतो .

तिचा नवरा अनिकेत आमच्या डायनिंग टेबल वर आला आणि एक डायरी काढली आपण एक खुर्ची आणि मला आणि विजयला एक एक खुर्ची घेऊन बसायला लावले . त्याचा पहिला प्रश्न  विजयला तुला भविष्यात काय करायचे आहे ? कि नेहमीच नोकरी ? स्वतःचे असे काही करायचे आहे का ?
 विजय थोडा गोंधळून हो आहे विचार पण अजून काही केला नाही . तोच प्रश्न मला  माझेही उत्तर् तेच …
ते पाहून त्याने थेट मुद्द्यालाच हात घातला … आमचा असा एक बिझनेस आहे , आतापर्यंत मी खूप पैसे कमावले यात …. खूप फायदा आहे , आपले भविष्य अगदी सुरक्षित होते ,, (जसे कि आता आमच्या डोक्यावर तलवारच होती ) यात किती लोक यशस्वी झाले त्याचा आलेख मांडून दिला , माझा नवरा मन  लावून ऐकत होता . मी आपले अधून मधून हो हो नाही नाही चालू होते … खरे तर माझे लक्ष देवघरातल्या गणपतीसमोर तांडव करणाऱ्या उंदराकडे होते !!!!!  त्याची उडी पाहून मी ओरडणार इतक्यात त्याचे भाषण संपले …
 हुश्श अजून मी करत होते तितक्यात त्यांनीच मी आणि विजय उद्या त्यांच्या मोठ्या लोकांसोबत जी मीटिंग आहे तिथे येणार असे फायनल केले … (कसे असतात न हे लोक )  आत कुठे अंदाज येत होता कि हे काय आहे ते तर परत नवीन अध्याय …
काही पर्यायच नव्हता मग काय हो म्हणालो .
एक तर शनिवार वाया गेला होताच आता रविवारही  पाण्यात …
 रविवारी दोघे आम्हाला घेण्यासठी आले तर त्यांच्या गाडीत आधीच दोन बकरे दिसत होते बिचारे !!!!!
आम्ही सगळे पोहचलो . तिथे मी आणि विजय मागे बसलो तर ते दोघे जरा पुढे होते .
बापरे !! किती मोठ्यांनी टाळ्या देणे ! हसणे उगाचच सारखे एकमेकांना हायफाय देणे चालू होते . त्यानंतर कुणी किती प्रगती केली यात सुद्धा प्रत्येक दोन वाक्यानंतर टाळ्या !!!
काहीजण लिहून घेत होते ??? काय हा मला प्रश्नच होता ?
त्यात अमृता येउन विचारून गेली एन्जोय करत आहात ना ?
आता तिला काय सांगणार ? कात्रीत सापडल्यासारखी आमची अवस्था … हो खूप छान तिलाही बरे वाटले असावे ती गेली  .
मी आपली नवऱ्याला चल रे चल रे ! तर त्याचे आता आलोय ना मग थांब !!!!
कसे ३ तास घालवले एकटे त्या  मोबाईललाच ठाऊक !!! येताना हातात २ सीडी आणि एक पुस्तक दिले पूजेला आल्यावर प्रसाद कसा देतात तसे !! (ते परत द्यायचे असते हे मला नंतर समजले ) .
 रात्री उशिरा घरी आलो , आम्हाला वाटले होते तिथे असेल डिनर पण साधे पाणी कुणी विचारले नाही !!!
घरी येउन परत वरण भात कुकर झिंदाबाद ….   पूर्ण शनिवार रविवार बिझ्नेसात !! आणि जो कि करायचाही नव्हता !!
पण हि चतुर लोक तिथे जाईपर्यंत ताकास तूर लागून देत नाहीत नेमके काय आहे ते !!
सोमवारी नवरा परत ऑफिसात  मी आपली कामात आणि हिचा कॉल आता धूर माझ्याकडून यायचा बाकी होता .
कारण विजयने रात्रीच मेसेज केला होता आम्ही या उद्योगाला सध्यातरी तयार नाहीयोत असा .… तरी परत  ??
मी नाही घेतला तरी परत अनिकेतने विजयला केला कॉल आणि त्यांनी त्यांनाच आज रात्री आमच्या घरी भेटायचे आमंत्रण दिले कि घेतले !!!!
इतके सांगूनही परत हे दारात !!!! पण अतिथी देवो भव : शेवटी संस्कार आड आले ….  चहा पाणी झाले हा उद्योग किती फायद्याचा आहे हे पटवून झाले अजून उदाहरणे देऊन देऊन चालू होते …. आमचे भविष्य किती सुजलाम सुफलाम होईल  असे सांगून झाले ….  पण मी आणि विजय निश्चल दगडासारखे ….
फक्त मधूनच हलायचे काम करत होतो . त्यांनाही समजून चुकले किती डाळ शिजवायची ती झाली शिजवून आता ती तड्कयात पडण्यापूर्वी निघावे .
 आता मात्र कुणी कुठले आमंत्रण देण्यापूर्वी किंवा घेण्यापूर्वी  एकदा सोडून दहा वेळा विचार करतो !! कधी कधी भेटतात असे ,, तेव्हा नवरा डायरेक्ट म्हणतो अरे मी तुम्हाला ना त्या बिझनेस मीटिंग मध्ये पहिले आहे !!!
त्या बिचारयालाही कळते कि हा मासा गळाला लागणाऱ्यातला नाही .


Friday, June 3, 2016

POCONOS MOUTAIN

रोज रोज तेच करून कंटाळा आल्यानंतर वेगळे काम , कुठेतरी बाहेर फिरायला जाणे किती सकारात्मक उर्जा देणारे असते . गेल्यावर्षी मी आणि नवरा दोघेच बोस्टोनला कुणीच ओळखीचे नाही त्यामुळे जिथे जाईल तिथे दोघेच !!! पण आता इकडे न्यू जर्सीला आल्यापासून थोडे  माणसात आल्यासारखे वाटते .
आता उन्हाळा सुरु झाला , इकडे या दोन्ही गोष्टीचा अतिरेकच आहे थंडी म्हणली तर खूप आणि उन्हाळाही तसाच , २-३ महिन्यातून कधीतरी एकदा मिळणारा long weekend सोबत मित्र मंडळी  …. दंगा , मजा मस्ती याचा खूप दिवसांनी अनुभव घ्यायला मिळाला .
शुक्रवार संध्याकाळपासून आमची सुट्टी सुरु झाली , सगळे ऑफिसमधून येउन जमा होऊन निघायला ७ वाजले पण सूर्यास्तच आता खूप उशिरा होतो त्यामुळे तसेही खूप लवकर निघाल्यासारखे वाटत होते . साधारणपणे ७ वाजता आमची गाडी poconos moutain  साठी रवाना झाली . यावेळी आम्ही सगळे मिळून १३ लोक्स  , त्यात ३ बच्चे कंपनी …
एका मागे एक अशा तीन गाड्या …  सगळ्या अगदी लयबद्ध ओवरटेकची मजा नाहीच . जर कुणी केला आगाऊ पणा तर असतातच पुढच्या एक्झिट ला पोलिस मामा भेटायला . दोन तासाची सफर झाली आणि एका सुंदर वळणावरून गाडी जंगलात … इतकी झाडे हिरवीगार ,मस्त थंडगार वारा , आम्ही ३ दिवस राहण्यासाठी एक  Camel Ski Resort बुक केले होते अगदी घरासारखे . त्याच्या  सगळ्या बाजूनी उंच उंच झाडे  अगदी टिपिकल जंगलात  राहायचे फिलिंग .
इथे ३-४ दिवस बाहेर राहायचा माझा पहिलाच अनुभव , आम्ही तिथे पोहचलो होतो तेव्हा १० वाजत आले होते आणी असे कुठे बाहेर असले कि जरा जास्तच भूक लागते नै का ?  कुणी काय आणायचे आहे ते  आधीच ठरले होते . पुलाव , भरून वांग्याची भाजी , उसळ ,चटणी , लोणचे , कितीतरी प्रकार सगळ्यांना कधी एकदा जेवतो असे झाले , सगळे सामान गाडीतून फक्त आत आणून ठेवले  . आणि लगेच सगळे जेवण टेबल वर तयार कुणाला काय हवे ते घ्या !!! छोट्यांचा दंगा होताच पण मोठेही कमी नाहीत , इतक्या सगळ्यांमध्ये जेवताना वाटत होते कि किती दिवस झाले जेवून ?  कितीही खाल्ले तरी पोट भरतच नव्हते मन मात्र तृप्त झाले होते .
   जेवून झाल्यावर सगळ्याचेच डोळे झोपेला आले होते काम आणि प्रवासचा थकवा …
आम्ही बरेच लोक हॉल मध्ये एकत्र झोपलो  हा प्रकार ना मला खूप  आवडतो निवांत झोप लागेपर्यंत गप्पा उगीच हसणे , सकाळी निवांत उठणे ,लग्न घराची आठवण करून देणारा …
 
सकाळी ६ वाजले असतील तरी ८ वाजून गेले असतील इतका उजेड बाहेर … तरी ८ पर्यंत लोळणे चालूच होते हा जगातील सगळ्यांच्याच आवडीचा छंद पण आयांश आणि अनया हे  दोघे झोपून देतील तर कसले ? यांना सगळ्यांना झोपेतून उठवायचे contract दिल्यासारखे चालू होते . आमच्या जगी सर्वसुखी असा कोण आहे ? या विचारांवर पाणी पडण्याचे काम ते बरोबर करत होते  !!

सकळी चहा आणि पोहे झाल्याशिवाय आपली सकाळच झाली आहे असे वाटतच नाही . मस्त गरम गरम पोहे आणि  चहा आणि त्यासोबत फ्री गप्पा दिवसभर आज करायचे याच्या !
 adventure rides ला सगळ्याचे  अनुमोदन मिळाले . तिथे खूप काही करण्यासारखे होते पण वेटिंग खूप … camelback moutain coaster ride केली  त्यामध्ये पूर्ण त्याचा सगळा कंट्रोल तुमच्याकडे आणि  फिरत आजू बाजूला डोंगर दर्यातून फिरायचे  सुंदर मनमोहक त्या पर्वताचा नजारा … यावेळी खूप काही डोळ्यात साठवले फोटोपेक्षा !!!! ४००० फिट zip flyer पाऊस पडल्याने कॅन्सेल करावी लागली .
 दुसऱ्या एका राईड मध्ये खूप उड्या मारल्या .  थोडावेळ badminton खेळण्यात घालवला
  शेवटी Go Karting बापरे !! सही होती हि कार गोल गोल घुमो … आवडली म्हणून तीनवेळा केलेली राईड !!! यात सगळ्यात जास्त वेळ तुमचा नंबर लावण्यातच जातो … पण काही दुसरा पर्यायही नाही … इथे paintball ला खूप मजा आली .
पहिला दिवस संपवून ९च्या आसपास घर वापसी .
परत घरी येउन जेवण गरम करणे खाणे आणि गप्पांचा फड  रात्री २ पर्यत … आपल्या घरातल्या लोकांसोबत  नेहमीच बाहेर जात असतो , पण  ज्यांना आपण ओळखतो त्यांच्यासोबत आणखी सुंदर धागे दोरे गुंफण्यासाठी   या सहली , एकमेकासोबत वेळ घालवणे अशाने सहज साध्य होतात . यात आपल्याही काही कमी कळतात नवीन लोकांना समजून घेण्याची संधी मिळते . जे अबोल असतात त्यानाही वाटते आपण बोलावे …

दुसरा दिवस हा सगळ्यांसाठीच खास होता … पाणी पाणी आणि पाणी
घरातून निघताना सगळ्या पुरुष कंपनीने मिळून लिंबू सरबत केले होते तिथे उनामध्ये फिरताना त्रास होऊ नये किती काळजी आमची !!!!!
water rides खूप धमाल … मला लहानपणपासून घसरगुंडीची खूप भीती आहे आणी या पाण्यात खेळायचे म्हणजे सगळ्यावरून घसरत खाली !!! पण ज्यात tube मध्ये बसून खाली यायचे होते त्या म्हणजे सोन्याहून पिवळे !! पाण्यात खेळायला कुणाला आवडत नाही ? lazy river मध्ये tube मध्ये आरामात बसून गोल गोल फिरणे इतके आळशी कि मागून कुणीतरी येउन धक्का देतेच तुम्ही आपोआप पुढे ….
मला त्याचे नाव नाहीय आठवत पण आम्ही त्यात बसून पर्वतच्या टोकावर गेलो होतो जाताना आणि परत खाली येताना काय सुंदर नजारा आणि हरीण बागडताना इतके दिसत होते कि बस्स !!! तिथून परत यायलाच नको वाटत होते .
इतकी लोक पण स्वच्छता आणी टापटीपपणा …
तुमच्या जीवाची तुम्हला जितकी काळजी नाही तितके इथले security वाले करतात !!!!
बाहेर थोडे थोडे पावसाचे वातावरण … तुम्ही जंगलात आणि भेळ काय सही आहे ना ?
घरी परत येउन पत्त्याचा डाव रंगला ७-८ ,,५-३-२ ,, challenge बापरे इथे इतकी फसवा फसवी हसून हसून पोट दुखायला लागले . हा मजा मस्तीचा वेळ खूप लवकर जातो !!!
तितक्यात जोरात पाऊस सुरु झाला आणि आमच्या सुंदर घरामध्येच टीप टीप बरसा पाणी चालू झाले आणि त्या पावसाने आमच्या तिथल्या शेवटच्या मुक्कामी लग्न घराच्या मनसुब्यावर पाणी फिरवले .
शेवटचा दिवस सगळेच कंटाळलेले उद्या ऑफिस या विवंचनेत …
तरीही पहिल्या दिवशी पावसामुळे कॅन्सेल झालेली आमची ride ४०००फिट zip  flyer आज पूर्ण करायचीच होती . नशीब आज जोरावर होते त्यामुळे लवकरचे तिकीट मिळाले , तिथे खाली रेडी होऊन गाडीत बसून पर्वतच्या टोकावर गेलो , तिथे फोटो सेशन करून fb ला टाकून आमची सेना खाली येण्यासाठी तयार … दोन दोन च्या जोडीने !! हा अनुभव पण डोळ्यात मनात साठवून ठेवावा असाच ….
यानंतर १००० zip line हि राईड फक्त अन फक्त त्या सुंदर जंगलात फिरण्यासाठी आणि फोटोसाठी केली …
यावेळेचा अनुभव खरेच खूप सुंदर होता ३ दिवस घरापासून दूर पण तरीही जवळ सगळेच आपले आणि सगळेच वेगळे ,
प्रत्येकजण  आधीपासून ओळखीचा असूनदेखील अनोळखीच वाटत होता खूप नवीन रूपे पहायला मिळाली , रोजच्या आयुष्यापेक्षा माणूस निसर्गात अधिक खुलतो .
अशावेळी माणसातला माणूस कळतो का ते माहित नाही … पण निसर्गातल्या माणसाला तो स्वतः नक्कीच कळतो .
सगळी आवरा आवर करून आम्ही तिथून निघालो , आणि एक मस्त इंडिअन हॉटेल मध्ये जेवायला पोहचलो . तिथे जास्त कुणाला काही बोलायचा मूड नव्हताच . सगळ्यांना एक वेगळेच समाधान होते जे कि पुढच्या काही दिवसासाठी tonic  होते .
 जेवणानंतर प्रत्येकाच्या वाटा  वेगवेगळ्या होत्या पण तरीही त्या एकमेकात अडकल्या होत्या . 



Thursday, May 26, 2016

तुझी न माझी प्रीत

पहिल्यापासूनच तिला रोज सकाळी लवकर उठायचा कंटाळा इथे आल्यापासून तर फक्त ते दोघेच !!!
तो रोज तिच्या आधी उठून स्वतःचे सगळे आवरून तिला ८ वाजता उठवत असे , ८. ३० ला तो घरातुन  ऑफिस साठी बाहेर पडे त्याआधी त्याचा डबा तिला तयार करावा लागे , रोज सकाळी तिला उठवणे म्हणजे एक दिव्य !! सकाळी त्याच्या पहिल्या हाकेत ती उठली आहे असे आजवर कधीच झाले नाही . 
सकाळी उठली कि ती चहा घेत नाही आणि तिला सकाळचा पहिला चहा करायचा कंटाळा आहे , बाकी मी दिवसभर तुला कितीही वेळा चहा करून देईन पण पहिला तेव्हढा कधी करायला सांगू नको हे तिने त्याला लग्नाआधीच सांगून ठेवले होते  . 
 आज सकाळीही त्याने नेहमीप्रमाणे उठून आवरले ,  तिला उठवले , " ८ वाजले उठा आता " . 
 आज संकष्टी त्यामुळे फक्त खिचडी साठी किती दहा मिनिटे लागतील अशा विचारात अजून पाच मिनिटे करत ८. १५ झाले तरी उठलीच नाही , त्याला आज बरोबर ९ ला मिटिंग  होती त्यासाठी वेळेत पोहचायचे होते , त्यामुळे त्याचा पारा चढला . त्याच्या आवाजाने ती उठली आणि किचन मध्ये जाऊन कामाला लागली , तिचीही  जरा धुसफूस चालूच होती ,  
तो , "काय ग कधीतरी उठते का लवकर ? नेहमी आळशीपणा , कधी वाटत नाही लवकर  उठून आवरावे , किती जीवावर येते ना उठायचे ? "
 जरी उशिरा उठले तरी वेळेत जातोस ना  कधी तरी लेट झाला का माझ्यामुळे ? आणि कितीही गडबडीत तुला पोळी भाजी करून  दिली तरी चव आहे तीच असते ना ? का बदलते ? 
 तिनेही जर घुश्यातच डबा आणून दिला , त्यानेही तिच्याकडे न बघता  तो घेतला आणि तो पायात बूट घालू लागला , ती त्यावेळी त्याला बाय करण्यासाठी नेहमी तिथेच थांबायची पण आज मूड वेगळाच असल्यामुळे आत निघून गेली , तोही काही न बोलता ऑफिसला गेला . 
आता ती  घरी एकटीच संध्याकाळी ६ पर्यंत इकडे दूरदेशी कुणी ओळखीचे नाही बोलयला कि कुठे बाहेर जायला .
हेच रोज रोज करून तिला कंटाळा आला होता , तसे त्याचेही रुटीन तसेच असे . पण त्याला कधी का कंटाळा येत नसेल ? याचा विचार करून ती कधी कधी थकून जायची पण तिला उत्तर कधीच मिळत नसे . 

त्यालाही माहिती होते कि दिवसभर घरी एकटी बसून कंटाळते , तिला एकटीला बाहेर कुठे  जायला आवडत नाही कुणाची सोबत असेल  तर लगेच खुश होऊन जाईल , इथे आल्यापासून तिचे सगळे रुटीनच बदलेले आहे अगदी खाण्यापिण्या मध्ये सुद्धा  , वातावरण सगळेच पण तरीही तिने माझ्यासाठी सांभळून घेतले आहे . 
तशी ती रोज तक्रार करण्यातली नाही पण महिन्या दोन महिन्यातून बाईसाहेब एक दोन दिवसासाठी अशा वेगळ्याच अस्मानी मूड मध्ये जातात , आता त्यालाही याची सवय झाली होतीच आणि  तिला कसे मूळपदावर आणायचे हे त्याला माहिती होते . 
   इतका कसला राग ? आज अजून ऑफिसला पोहचला नसेल हा ? रोज तर २५व्या मिनिटाला फोन येतो आणि आज अजून नाही ? चिडला आहे  ना  मग मीही नाही करत अजून जरा चीड . तरीही त्याच्या फोनची वाट बघत तिनेच  मेसेज  केला . खिचडी कशी झाली आहे  ? खारट ना ? त्याला शालजोडीतला मारायचा प्रयत्न …. पण त्याचे उत्तर हि तसेच नाही खारट नाही पण झणझणीत झालीय !!!
     तीही परत गप्प बसली आता संकष्टी आज मोदक करायला हवेत नाहीतर त्याला परत टोमणे मारायला निम्मितच मिळेल . तसेही मोदक खायला त्याने गणपती बाप्पाच्या हातावर हात मारला आहे आणि आता तसे व्हायलाही लागले आहे लंबोदर !!!  स्वतःच्या विचाराने खुदकन हसली . 

तिची तयारी चालूच होती तितक्यात तो आला , आज लवकर ? तिचा प्रश्न 
हो आलो ! सांगितले बॉस ला आज लवकर नाही गेलो तर खाण्याचे वांदे  होतील माझे !!  त्यालाही बायको आहेच समजले असतील माझे हाल ! 
 अग बाई हो का ? मग रोज रोज बरा तो तुझा बॉस त्याला बायको आहे ते विसरतो  ? 
आता आलो आहे ना लवकर चहा मिळेल का ? जरा कडकच !! तिने त्याच्याकडे पहिले त्याचा मूड वेगळाच दिसत होता .
ती ,"  नाही आज कैरीचे सरबत आहे चालेल का ? थोडे आंबट थोडे गोड ?  "
त्याला समजले कि हळू हळू नूर पालटतोय 
 हम्म ठीक आहे दे आता तुला हवे ते ! आम्ही काय तुमच्या शब्द बाहेर थोडीच ? 
" हो का ? मग सकाळी सकळी जे काही झाले ते रामायण फुकटचच  का ? "  
अग बाई  कधी कधी तुला चार्ज करावे लागते असे नाहीतर जाशील न माझ्या हातातून !! आणि तू थोडी चार्ज झाली कि जरा जास्तच गोड दिसते नाही का ? अगदी सकाळच्या खिचडी सारखी !!!
 अरे देवा  म्हणजे खिचडी गोड झाली होती का ? sorry हा परत उठेन हो लवकर तुम्ही म्हणता तसे . 
अग नाही ग छान झाली होती ! अशीच थोडी मजा !! 
 असुदे तरीही माझा तुझ्यावर नाहीय विश्वास , मी कसेही दिले तरी तुला ते गोडच लागेल माहितीय मला ! 
पुढच्या वेळेपासून पक्का लवकर उठेन !  आणि स्वतःच्या मनातच…….  आज कितव्यांदा बोलत असेन मी ? पण तरीही तो काहीच म्हणत नाही . मीच आपली उगीचच चिडत असते त्याच्यावर !!! 
" बर चल मग आज काय ? करायचे ते सांग ? " तो 
आज काय मोदक ! गणपती बाप्पासाठी आणि माझ्या लंबोदर साठी सुद्धा !!!  असे म्हणत तिने जीभ चावली . 
तू  मला , मला लंबोदर  म्हणतीय ?  थांब बघतोच आता तुला मी ! ! 
काय बघणार आहेस ? रोजच तर बघतो ? चल आता मदत करायला मी उकडीची तयारी करते तोपर्यंत तू सारण कर . मग बघ  मला ! 
 चला बाईसाहेब , आजच्या मोदकासाठी साक्षात या गणपती बाप्पाची उर्फ लंबोदराची मदत होणार तर !! 
 मनातल्या मनात तो चला आता मूड ठीक झाला आहे कधी कधी असतेच न एखादी वेळ वेडी आणि लहरी अगदी हिच्यासारखी  !!!!  
    

Wednesday, May 18, 2016

मेस काकू

" काय ओ काकू ,मी तुम्हाला नेहमी आठवण करून देते माझा गुरुवार आहे म्हणून  एखाद्यावेळी मी विसरले तर इतके काय ओरडता मला ? "
माझ्या डोक्यात नाही राहत बाई ! कितीजणी तुम्ही मेसला प्रत्येकीचे वेग वेगळे नखरे मी कुणाचे म्हणून आणि काय काय लक्षात ठेवायचे ?  असा संवाद मी आणि आमच्या मेसच्या काकू आमच्यात महिन्यातून एखाद्यातरी गुरुवारी रंगायचाच . 
 मी  आदल्या दिवशी उद्या खिचडी म्हणून आठवण करून द्यायला विसरले कि ,  समजायचे उद्या रामायण…
आमच्या रुमच्या मागे  दोन खोल्यांचे एक छोटे कौलारू घर होते तिथे काकू त्यांच्या छोट्या मुला सोबत राहत . गळ्यात एक छोटी चेन , हातात  २-३ काचेच्या बांगड्या , कपाळावर एक नाजूक अशी उभी टिकली आणि थोडासा फुगवटा करून घातलेली केसांची वेणी  , जर घरातून बाहेर  जाणार असेल तर दोन्ही खांद्यावर पदर असे रूप काकुंचे , त्यांचा मुलगा ८-९ वर्षाचा असेल अल्लड , थोडासा हट्टी आणि  नेहमी आमच्यासोबत वाद घालयला तयार  अशा आवेशात  त्याच्या वयाला शोभेल असाच होता तो  !!!
आम्ही तिथे रहायला गेलो आणि त्याच वर्षी काकुनी नवीन मेस चालू केली ,  आम्ही सगळ्याच दहा -पंधरा जणी त्यांच्याकडेच जेवायला , प्रत्येक सेमला नवी मेस हे आमचे ब्रीदवाक्य असल्यासारखेच आम्ही मेस बदलत असू  अपवाद फक्त या काकूंच्या मेसचा तिथे जास्त दिवस आम्ही टिकलो कदाचित नवीन मेस , थोडीफार घरगुती जेवणासारखी चव , आणि त्या नवीन असल्यामुळे आमचे नखरेही चालवून घायच्या पहिले पहिले … कधी कधी सकाळी , संध्याकाळी  पोहे , उप्पीट , चहा  असे कधी ऐनवेळी सांगितले कि आधी त्यांचा दंगा  मग  अगदी मी आहे म्हणूनच तुम्ही खाताय असा चेहरा करून आम्हाला खायला  करून द्यायच्या .

एक दिवस मला बरे वाटत नव्हते म्हणून मी रुममध्येच थांबले होते  त्यावेळी कधी नाही ते त्यांच्या घरातून मोठ्याने बोलण्याचा आवज येत होता , खरे तर त्यांचा इतिहास आम्हाला तसा काहीच माहित नव्हता आणि आम्ह्लाही कधी तो जाणून घ्यायची गरज पडली नाही . मलाही कळेना जेवायला जाऊ कि नको थोड्यावेळाने आवाजही कमी झाला  मग काकुनीच बोलावले जेवायला .  मीही एकटीच होते त्यांचा मुलगा शाळेत गेला होता  त्यामुळे रात्रीच्या जेवणाची तयारी करत त्याही माझ्यासमोरच बसल्या .
मी असे कधी एकटी त्यांच्याकडे जेवण्याची वेळच आली नव्हती त्यामुळे मलाही थोडे अवघडल्या सारखेच झाले होते . पण त्यांनीच बोलायला सुरुवात केली .
श्वेता , अठराव्या वर्षी लग्न झाले माझे माझा नवरा एका गाडीवर ड्रायव्हर होता , शेती होती  घर भरलेले म्हणून  आई वडिलांनी लग्न करून दिले त्यानंतर  दोन वर्षांनी हा एक पोरगा झाला , अवघा  ८-९ महिन्याचा असताना याचा बाप एका अपघातात गेला , तो गेल्यावर सासरच्यांनी घरात राहून दिले नाही बाहेर काढले , माहेर गेले पण तिथे तरी किती दिवस राहणार ?  भावांच्या बायकांना मी जड झाले ,  आपला बोजा त्यांच्यावर नको म्हणून एका दुकानात नोकरी करू लागले , तर पोरग एकटे घरी  ,माझ्यामुळे माझ्या आई बापाला  म्हातारपणात त्रास देऊ लागल्या . तिथले काम सोडून इथे येउन राहिले पहिला पहिला एकटी बाई म्हणून घर मिळेना कसेतरी एक खोली मिळवली , एका कपड्याच्या दुकानात नोकरी मिळाली पहिला पोराला घेऊन जात होते ,परत त्या मालकाने सांगितल्यावर त्याला तिथल्याच एका अंगणवाडीत बसवू लागले . त्या बाईने ऐकले म्हणून झाल हे नाहीतर सगळी परिस्थिती अवघडच होती ,  पण या कामामुळे पोराकडे लक्ष द्यायला वेळ मिळेना , हातातून जावू नये यासाठी घरीच राहून काही करता येईल का बघत होते . पण आता होते तिथे काही करणे शक्य नाही म्हणून ओळखीने इकडची जागा मिळवली आणि आता या नव्या जागेत मेस सुरु केली , आता कुठे याचा जम बसायला लागला तोच , माझ्या सासरच्या लोकांचा मान  वर उफाळून आला  , हे असले उद्योग आमच्यात कुणी करत नाही म्हणून लागले सुनवायला , आमची अब्रू वेशीवर टांगायला निघाली वाटेल ते तोंडाला येईल ते बोलतात , तशी मी आहे ग खमकी पण कधी कधी नाही सहन होत , काय माहिती कधी पर्यंत जगते ते ? पोराला शिकून मोठे करायचे  इतकेच डोळ्यासमोर आहे तोपर्यंत टिकले तरी बास !!! असे म्हणेपर्यंत त्यांचे डोळे पाण्याने डबडबले .
 मलाही काय बोलावे समजेना तसाच हात घेऊन बसले होते , परत काकूच म्हणाल्या तुला काय वाटते ग काय असेल माझे वय ?  त्यांच्याकडे पाहून तरी आम्हाला सगळ्यांनाच त्या ४०-४५च्या वाटायच्या , पण त्या फक्त तिशीत होत्या हे ऐकून मला धक्काच बसला कारण खरेच काकूंकडे पाहून असे बिलकुल वाटत नव्हते कि त्या इतक्या लहान असतील आमच्या सगळ्यांपेक्षा ८-१० वर्षांनी मोठ्या !!!
परिस्थितीमुळे आलेले अकाली प्रौढत्व , त्या चेहऱ्या वरच्या सुरकुत्या , आणि डोळ्यातील करुणा  माणसाचे रुपडेच बदलून टाकते  याचे मूर्तिमंत उदाहरण होते .
त्या कधी खूप चिडायच्या , ओरडायच्या आम्हाला याचा खूप राग यायचा पण त्यामागे अशी कहाणी असेल असे कधी वाटले नव्हते ते कळाले तेव्हा सगळ्यांनाच खूप वाईट वाटले .
 आम्ही त्या ठिकाणाहून परत दुसरीकडे राहायला गेलो त्यामुळे त्या काकूंची मेस बंद केली ,
परत कधी संपर्कच नाही माहित नाही त्या कशा असतील ?
पण काही माणसे खरेच मनात राहतात  ……




Saturday, May 14, 2016

अबोल प्रीती

" मुग्धा , आहेस का ग घरी ?"  असे म्हणत शेजारच्या आजी त्यांच्या घराच्या पायरीवर येउन बसल्या .
 मुग्धा बाहेर आली ,  तिलाही रोजची सवय होती आजींची , संध्याकाळी तिची काकू बाहेर फिरायला जाई त्यावेळी आजी खास मुग्धाला भेटायला यायच्या हे तिला माहित होते . आजी आल्या कि तिलाही कुणीतरी आपले भेटल्या सारखे वाटे.
आजींनी  तिच्यासाठी कुंद्याची फुले आणली होती  तुला आवडतात ना  म्हणून खास तुझ्यासाठी काढून ठेवली होती , मुग्धाकडे फुले देत आजी बोलल्या .
कुंद्याचा वास घेताना मुग्धाला आईची आठवण आली आपण लहान होतो त्यावेळी आई नेहमी गजरा करून देत असे . मुग्धाचे डोळे आईच्या आठवणीने भरून आले . किती दिवस झाले तिला भेटून ?
तिच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून  आजीनी विचारले , का ग ? काय झाले ?
 तसे मुग्धा स्वतःला सावरत म्हणाली काही नाही सहजच असे म्हणत आत गेली , आजींसाठी तिने चहा ठेवला, स्वतःच्या विचारात  गुंगली .
  लहानपणापासून आई बाबांची लाडकी मुग्धा, शेजारीही खूप लाडकी होती . शाळेतही तिचा नेहमी पहिला नंबर असे  त्यामुळेच तिला पुढे खूप शिकवायची तिच्या  आई बाबांची इच्छा  होती , पण जिथे ती राहत होती तिथे चौथी पर्यंत शाळा होती , त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी तिला बाहेर जावे लागणार होते .  तिच्या घरी  पुढे शिक्षण कुठे सुरु ठेवावे याची चर्चा चालू असे , त्यावेळीच तिची काकू सुट्टीसाठी म्हणून गावी आली होती , काकूने हे ऐकताच ती मुग्धाच्या आईला म्हणाली , राहील मुग्धा आमच्या कडे , एकट्या मुलीला बाहेर ठेवण्यापेक्षा हे बरे नाही का ?
खरे तर त्यावेळी सगळ्यांचीच मनस्थिती  द्विधा होती  पण काकू स्वतः हून म्हणत आहे म्हणल्यावर आई बाबा तयार झाले मुग्धाला त्यांच्याकडे ठेवायला .
 काकुसोबतच मुग्धा शहरात आली , काकूला दोन मुले होती पण ती मुग्धापेक्षा लहान होती . मुग्धाची शाळा सुरु झाली  त्यासोबत तिची जबाबदारही वाढली , काकू हळू हळू तिला कामे सांगू लागली , आधी फक्त काकुच्या मुलांचे खायला प्यायला बघणे , त्यांचा अभ्यास असे होते . मुग्धाही आनंदाने करत असे , पण एकदा काकुच्या मोठ्या मुलाला परीक्षेत कमी मार्क मिळाले तेव्हा काकूने केलेला रुद्र अवतार पाहून मुग्धा खूप घाबरली होती .
सगळी चूक तिचीच आहे , तिने अभ्यास करून घेतला नाही असे मत होते काकूचे !!! तिने सांगूनही काकू काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती त्याचे सगळे खापर मुग्धावारच फुटले .
 सुट्टीमध्ये मुग्धाला आपल्या आईला भेटायला मिळत नसे , कधीतरी काकुसोबतच गेली तर आणि तिच्यासोबतच परत , काकूने असा धाक घातला होता कि मनात असूनही ती आपल्या आईशी बोलू शकत नव्हती .
मुग्धा जशी मोठी होऊ लागली सगळी घरातली कामेही तिच्यावरच पडू लागली , तिची काकूही इतकी हुशार कि घराबाहेरची सगळी कामे ती स्वतः करेल पण  आत मध्ये मात्र मुग्धा !! पण त्यातूनही मुग्धाने तिचा अभ्यास सुरु ठेवला आणि नुकतीच बारावीची तिने  परीक्षा दिली होती .
  मुग्धा हे कुणालाच बोलत नसली तरी आजींना हे सगळे माहित होते , म्हणूनच मुग्धाबद्दल त्यांना खूप जिव्हाळा होता .
आतून काहीतरी करपल्याचा वास येऊ लागला म्हणून आजींनी  मुग्धाला हाक दिली , " मुग्धा ,अग काय करत आहेस ? कसला वास येतोय ? "
त्यांच्या आवजाने मुग्धा एकदम भानावर आली तर समोर चहा उकळून बाहेर पडू पाहत होता , आजीसाठी चहा  घेऊन ती बाहेर आली , त्यांनी आणलेल्या फुलांचा गजरा करत त्यांच्याजवळ बसली .
 मग मुग्धा बारावी होशील यावर्षी तू , पुढे काय करायचा विचार आहे तुझा ? आजी तिला विचारत होत्या .
 आजी , मला पुढे खूप शिकायचे आहे  आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे . पण  …….   ,,,
 असे म्हणत ती अडखळली .
काकूला जेव्हा ती असे म्हणाली होती त्यावेळी  काकूने खूप दंगा केला होता , पैसे कोण तुझे आई बाप देणार का ? म्हणे पुढे शिकायचे … जेव्हापासून पोरगीला शिकायला ठेवली तेव्हापासून जणू काही त्यांचा तुझ्याशी काही संबध नाही असेच वागत आहे कि , तू त्यांना नकोच होती म्हणूनच आमच्या गळ्यात मारली तुला …. असे एक न अनेक तिला ऐकून घ्यावे लागले होते .
पण खरे पाहता तसे काही नव्हते  काका काकू घरातले मोठे होते त्यामुळे घराचा सगळा कारभार या दोघांकडे असे , आणि म्हणूनच तिला व तिच्या आई बाबांना  त्यांचे ऐकावे लागे . हे कळण्या इतके मुग्धा आता नक्कीच मोठी होती ……
पण  ……  पुढे काय मुग्धा ? आजींनी तिला परत स्वप्नातून जागे केले .
 पण आजी आता निकाल लागला कि मगच ठरवेन पुढे शिकायचे कि नाही ते ? मुग्धा . 
 " का ग ? अचानक विचार बदलला तो ? " आजी .
नाही आजी आई बाबा आले होते ना परवा तेव्हा तेच म्हणत होते , कि माझे लग्नाचे वय झाले आता ……
 मुग्धा  आई बाबा म्हणतात ते सगळे ठीक आहे पण तुझे काय ते सांग ? आजी तर तिच्या मागेच लागल्या होत्या  त्यांना समजावे पर्यंत तिच्या नाकी नऊ आले . पण मुग्धाने काकूचे नावही तिच्या तोंडून घेतले नाही .
 खरे तर आजींना कौतुक वाटत होते  इतके सगळे होऊन हि मुग्धा आपल्याला काहीच सांगत नाही …
ती रडवेली झाली आजीनं समजावताना ….
 तेव्हा आजीनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या , मुग्धे तुझे आई बाबा आले होते ना  ते मला भेटायला आले होते , मीच त्यांना बोलावून घेतले होते .
मुग्धा अविश्वासाने आजींकडे पाहत होती…
 अग आमचा श्रीधर माहित आहे न तुला ?  , श्रीधर म्हणजे आजींच्या मुलीचा मुलगा  तो नेहमी सुट्टीत आजींकडे यायचा .  मुग्धाची आणि त्याची तशी थोडीफार ओळख होती .
 श्रीधरचे नाव ऐकताच मुग्धा गोड हसली . आजींनी ते ओळखले पण त्या पुढे म्हणाल्या
यावर्षी आमचा श्रीचे शिक्षण पूर्ण झाले , एक दोन वर्षात त्याचे सगळे बस्तानही बसेल  . मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला होता आणि त्याने मला तुझ्याबद्दल सांगितले ,  मी तर खूप आधी पासून ओळखत होते हे पण तो काही बोलत नाही म्हणून शांत होते . त्यानेच मला सांगितले तुझ्याशी बोलायला  म्हणून आधी तुझ्या आई बाबांशी बोलले , त्यांना काही अडचण नाहीय  … आणि मी मघाशी श्रीचे नाव घेताच तू जे गोड हसलीस त्यावरून तुझे विचारही कळले मला असे म्हणत आजी मिश्किल हसू लागल्या .
मुग्धा हसत हसतच एकदम गंभीर झाली .
आजी , आई बाबा अन मी ठीक आहे पण काका काकुना कोण समजावणार ?
 मुग्धा ,  अग मी आहे ना  , तुझ्या काकुपेक्षा नक्कीच चार पावसाळे जास्त पाहिलेत मी !  तिचे बघू आपण परत… !! असे म्हणत आजींनी शेवटची दोन फुले  गाठीच्या गजऱ्यात बांधली  , आणि तो गजरा मुग्धाच्या केसात माळला . आणि तिला विचारले
" जायचे मग श्री ला फोन करायला ?" आजी असे म्हणताच मुग्धा लाजून आत मध्ये पळून गेली .


Thursday, May 5, 2016

आता वाटली ना काळजी

आज  ऑफिसला जाण्यासाठी दोघांना गडबड होती म्हणून तो तिला म्हणाला कि आज डबा राहू दे बाहेरच खाऊ काहीतरी ! तसेही ती पण त्याच्या सोबत बाहेर पडत असल्यामुळे त्याला तिला त्रास द्यायला आवडायचे नाही पण त्याच्या साठी डबा बनवायला तिला खूप  आवडायचे , पण आज गडबडीमुळे दोघेही लवकर बाहेर पडले ,  त्याचे ऑफिस एकीकडे आणि तिचे एकीकडे त्यामुळे सोबत हि फक्त स्टेशन पर्यंत असे तिथून वेगळे रस्ते ..

 ती ऑफिसला पोहचली आणि त्याचा मेसेज आला, "reached n u ? " ती त्याला उत्तर देत होती तोच तिला client call आला त्यात ती बिझी झाली ,   मेसेज करायला विसरली . call झाल्यावर कोन्फारंस रूम मध्ये मीटिंग होती  त्यात ती तिचा मोबाईल डेस्क वरच विसरून गेली . आज अजून हि पोहचली कशी नाही म्हणून याने call  केला तर घेतलाच नाही म्हणून मेसेज केला r u der ? तरीही तिचा काही मेसेज नाही , आज त्या मीटिंग मध्ये तिला कळाले कि तिला ४ वाजता मीटिंग साठी client office   ला जावे लागेल  ,  तिला वाटले कि आता जेवण करून मगच डेस्कवर जावे तिने पटदिशी एक डोसा घेतला तो खात असतानाच  त्याला call करून सांगावे त्यावेळी तिच्या लक्षात आले कि आपण मोबाईल तर डेस्क वरच विसरून आलो ते  खाऊन  तिला डेस्कवर यायला २.३० वाजले आता आवरून निघाले तर वेळेत पोहचेन म्हणून तिने घाई घाईने डेस्क आवरायला घेतला ऑफिसच्या समोरच स्टेशन होते धावत पळत तिने ट्रेन पकडली आता पोहचेन वेळेत म्हणून  मोबाईल हातात घेतला  पण सगळ्या ट्रेन जमिनीखालून जात असल्याने नेटवर्क नाही आता पण call करू शकत नाही आता मात्र ट्रेन मधून बाहेर आले कि लगेच फोन करायला हवा सकाळपासून एकदाही बोलणे झाली नाही हे तिचे विचार ,,, तोपर्यंत त्याने हिला परत फोन केला तर आता तिचा फोन नेटवर्क मध्ये नाही असे सांगत होते त्यामुळे तर त्याला जास्तच काळजी  वाटू लागली तिला मेसेज करून ठेवले , तिच्या मैत्रिणीला फोन केला तर ती नेमकी आज सुट्टीवर , कुठे गेली असेल हि ? असे कधीच करत नाही ! काही अडचणीत असेल का ? असे एक न अनेक प्रश्न?  याचे कामात लक्ष लागेना झाले कदाचित घरी गेली असेल का ? असा विचार येउन त्याने आज घरी लवकर जायचे ठरवले  ….
 आजचा दिवस बहुदा तिचा नसावाच कारण ट्रेन लेट झाली त्यामुळे तिला client कडे पोहचायला लेट झाला गडबडीत तिने मीटिंग पूर्ण केली , तेव्हा घड्याळात ६. ३० झाले होते , तिने मोबाईल पहिला तर याचे २०-२५ misscall  आणि मेसेजस  ते पाहून हिने लगेच त्याला फोन केला तिचे नाव बघताच त्याने  झडप घालून फोन घेतला अग ए आहेस कुठे ? किती फोन किती मेसेज करायचे ? फोन वापरता येत नाही तर घ्यायचा कशाला ? तो तापलेलाच होता .
हिने शांतपणे सागितले कि पोहचते घरी मग बोलूच , हिच शांतपणा पाहून याला आणखीन राग आला पण हो म्हणून त्याने फोन ठेवला .
  एकतर आज खूप दमल्यामुळे हिची चिडचिड होत होती आणि घरी आल्यापासून त्याची धुसफूस ! ! तो काहीतरी बोलला ती आणखी चिडली आणि म्हणाली ,"मी काय लहान कुक्कुल बाळ आहे का ? कळत नाही का मला ? " याचा त्यालाही राग आला त्याने आत जाऊन जोरात बेडरूमचा दरवाजा आपटला आणि झोपला ,हिने पण जेमतेम आवराआवरी करून जाऊन झोपली . दोघेही जागे होते पण कुणीच बोलत नव्हते .
 सकाळी ती उठली तरी तो झोपलाच होता , तिला वाटत होते कि काल नाहीतर आपली चूक होतीच त्याला sorry म्हणायला हवे ! तो उठला कि पहिले काम तेच  असे म्हणून ती तिच्या कामाला लागली . तर हा पूर्ण तयार होऊनच बाहेर आला आज मला डबा  नको खातो बाहेरच , bye  म्हणून तो दाराकडे गेला ती काही बोलायच्या आधीच दार बंद झाल्याचा आवाज आला . मग तिनेही एक कॉफी करून घेतली आणि आवरून बाहेर पडली आज तिला कसेतरीच वाटत होते , ऑफिसमध्ये पोहचल्यावर तिने पहिला कि त्याचा मेसेज नाही आला म्हणून तिने पोहचले असा केला तर त्याला काहीच उत्तर नाही ,  बिझी असेल करेल परत या विचाराने ती कामाला लागली पण मेसेज टोन ऐकल्यावर लगेच बघत असे पण त्याचा नसला कि निराशा सगळी सकाळ यातच गेली तिने फोन केला तरी त्याने घेतला नाही .
आता १ वाजत आला त्याचा लंच टैम  म्हणून जेवण ? असा मेसेज केला तरी त्याने काहीच उत्तर पाठवले नाही , तिने फोन केला तर कट केला आणि मेसेज केला कि "बिझी" म्हणून , माझ्या प्रत्येक फोन ला मेसेज ला उत्तर देणारा हा आज असा का करतोय ? कदाचित त्याचा फोन हरवला असेल आणि दुसरेच कुणीतरी मेसेज करत असेल ? किंवा  त्याला काही झाले असेल का ? अरे देवा कसले कसले विचार येत आहेत माझ्या मनात ? कामात तिचे लक्ष लागेना  , मला बरे वाटत नाहीय , असे सांगून ती ऑफिस मधून बाहेर पडली ते थेट त्याच्या ऑफिस कडे जाण्यासाठीच .
त्याचे ऑफिस हे तिच्या ऑफिसच्या अगदी दुसऱ्या टोकाला ती तिकडे कधी जास्त गेलीही नाही तिला फक्त एरिया माहित होता . अर्धा पाऊण तास ट्रेन मध्ये काढल्यावर ती बाहेर आली पण तिला काहीच ओळखीचे वाटेना तिने याला फोन लावला पण त्याने तो घेतला नाही , आता शेवटचा उपाय म्हणत तिने मेसेज केला कि ,  तुझ्या ऑफिसच्या खाली मी थांबले आहे , हे वाचून मात्र दुसर्या मिनिटाला त्याचा call  आला , अग हि काय पद्धत आहे का ? कुठे आहेस? मी आलो खाली तू  दिसत नाहीय !
 ती , अरे तो एक स्मित स्ट्रीट  आहे न तिथे आहे मी !
कप्पाळ  म्हणत त्याने डोक्याला हात लावला , अहो madam तुम्ही एक stop आधीच उतरला आहात  , आता आहे तिथेच थांब मी पोहचतो १५-२० मिनिटात …. तोच पाऊस  सुरु झाला  , तसे हि पुटपुटली " इथला पाऊस पण कधी येईल नेम नाही ! "
यावर लगेच तो ," तो ही तुझ्यासारखाच लहरी वेडा "
 ती छत्री घेऊन उभी होती , तिची नजर त्यालाच शोधत होती आणि तितक्यात तो रोडच्या पलीकडच्या स्टेशन मधून बाहेर आला , पुढे ट्राफिकमुळे तिला पलीकडे जाता येईना , तसा तोच आला हिच्याकडे पळत तसे  दोघे किती  वर्षांनी एकमेकांना भेटत आहेत असे भेटले . !!!
 दोघे एकाच छत्रीतून चालत असताना त्याने फक्त तिला इतकेच विचारले , "आता  वाटली ना  काळजी ?"