Saturday, May 14, 2016

अबोल प्रीती

" मुग्धा , आहेस का ग घरी ?"  असे म्हणत शेजारच्या आजी त्यांच्या घराच्या पायरीवर येउन बसल्या .
 मुग्धा बाहेर आली ,  तिलाही रोजची सवय होती आजींची , संध्याकाळी तिची काकू बाहेर फिरायला जाई त्यावेळी आजी खास मुग्धाला भेटायला यायच्या हे तिला माहित होते . आजी आल्या कि तिलाही कुणीतरी आपले भेटल्या सारखे वाटे.
आजींनी  तिच्यासाठी कुंद्याची फुले आणली होती  तुला आवडतात ना  म्हणून खास तुझ्यासाठी काढून ठेवली होती , मुग्धाकडे फुले देत आजी बोलल्या .
कुंद्याचा वास घेताना मुग्धाला आईची आठवण आली आपण लहान होतो त्यावेळी आई नेहमी गजरा करून देत असे . मुग्धाचे डोळे आईच्या आठवणीने भरून आले . किती दिवस झाले तिला भेटून ?
तिच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून  आजीनी विचारले , का ग ? काय झाले ?
 तसे मुग्धा स्वतःला सावरत म्हणाली काही नाही सहजच असे म्हणत आत गेली , आजींसाठी तिने चहा ठेवला, स्वतःच्या विचारात  गुंगली .
  लहानपणापासून आई बाबांची लाडकी मुग्धा, शेजारीही खूप लाडकी होती . शाळेतही तिचा नेहमी पहिला नंबर असे  त्यामुळेच तिला पुढे खूप शिकवायची तिच्या  आई बाबांची इच्छा  होती , पण जिथे ती राहत होती तिथे चौथी पर्यंत शाळा होती , त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी तिला बाहेर जावे लागणार होते .  तिच्या घरी  पुढे शिक्षण कुठे सुरु ठेवावे याची चर्चा चालू असे , त्यावेळीच तिची काकू सुट्टीसाठी म्हणून गावी आली होती , काकूने हे ऐकताच ती मुग्धाच्या आईला म्हणाली , राहील मुग्धा आमच्या कडे , एकट्या मुलीला बाहेर ठेवण्यापेक्षा हे बरे नाही का ?
खरे तर त्यावेळी सगळ्यांचीच मनस्थिती  द्विधा होती  पण काकू स्वतः हून म्हणत आहे म्हणल्यावर आई बाबा तयार झाले मुग्धाला त्यांच्याकडे ठेवायला .
 काकुसोबतच मुग्धा शहरात आली , काकूला दोन मुले होती पण ती मुग्धापेक्षा लहान होती . मुग्धाची शाळा सुरु झाली  त्यासोबत तिची जबाबदारही वाढली , काकू हळू हळू तिला कामे सांगू लागली , आधी फक्त काकुच्या मुलांचे खायला प्यायला बघणे , त्यांचा अभ्यास असे होते . मुग्धाही आनंदाने करत असे , पण एकदा काकुच्या मोठ्या मुलाला परीक्षेत कमी मार्क मिळाले तेव्हा काकूने केलेला रुद्र अवतार पाहून मुग्धा खूप घाबरली होती .
सगळी चूक तिचीच आहे , तिने अभ्यास करून घेतला नाही असे मत होते काकूचे !!! तिने सांगूनही काकू काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती त्याचे सगळे खापर मुग्धावारच फुटले .
 सुट्टीमध्ये मुग्धाला आपल्या आईला भेटायला मिळत नसे , कधीतरी काकुसोबतच गेली तर आणि तिच्यासोबतच परत , काकूने असा धाक घातला होता कि मनात असूनही ती आपल्या आईशी बोलू शकत नव्हती .
मुग्धा जशी मोठी होऊ लागली सगळी घरातली कामेही तिच्यावरच पडू लागली , तिची काकूही इतकी हुशार कि घराबाहेरची सगळी कामे ती स्वतः करेल पण  आत मध्ये मात्र मुग्धा !! पण त्यातूनही मुग्धाने तिचा अभ्यास सुरु ठेवला आणि नुकतीच बारावीची तिने  परीक्षा दिली होती .
  मुग्धा हे कुणालाच बोलत नसली तरी आजींना हे सगळे माहित होते , म्हणूनच मुग्धाबद्दल त्यांना खूप जिव्हाळा होता .
आतून काहीतरी करपल्याचा वास येऊ लागला म्हणून आजींनी  मुग्धाला हाक दिली , " मुग्धा ,अग काय करत आहेस ? कसला वास येतोय ? "
त्यांच्या आवजाने मुग्धा एकदम भानावर आली तर समोर चहा उकळून बाहेर पडू पाहत होता , आजीसाठी चहा  घेऊन ती बाहेर आली , त्यांनी आणलेल्या फुलांचा गजरा करत त्यांच्याजवळ बसली .
 मग मुग्धा बारावी होशील यावर्षी तू , पुढे काय करायचा विचार आहे तुझा ? आजी तिला विचारत होत्या .
 आजी , मला पुढे खूप शिकायचे आहे  आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे . पण  …….   ,,,
 असे म्हणत ती अडखळली .
काकूला जेव्हा ती असे म्हणाली होती त्यावेळी  काकूने खूप दंगा केला होता , पैसे कोण तुझे आई बाप देणार का ? म्हणे पुढे शिकायचे … जेव्हापासून पोरगीला शिकायला ठेवली तेव्हापासून जणू काही त्यांचा तुझ्याशी काही संबध नाही असेच वागत आहे कि , तू त्यांना नकोच होती म्हणूनच आमच्या गळ्यात मारली तुला …. असे एक न अनेक तिला ऐकून घ्यावे लागले होते .
पण खरे पाहता तसे काही नव्हते  काका काकू घरातले मोठे होते त्यामुळे घराचा सगळा कारभार या दोघांकडे असे , आणि म्हणूनच तिला व तिच्या आई बाबांना  त्यांचे ऐकावे लागे . हे कळण्या इतके मुग्धा आता नक्कीच मोठी होती ……
पण  ……  पुढे काय मुग्धा ? आजींनी तिला परत स्वप्नातून जागे केले .
 पण आजी आता निकाल लागला कि मगच ठरवेन पुढे शिकायचे कि नाही ते ? मुग्धा . 
 " का ग ? अचानक विचार बदलला तो ? " आजी .
नाही आजी आई बाबा आले होते ना परवा तेव्हा तेच म्हणत होते , कि माझे लग्नाचे वय झाले आता ……
 मुग्धा  आई बाबा म्हणतात ते सगळे ठीक आहे पण तुझे काय ते सांग ? आजी तर तिच्या मागेच लागल्या होत्या  त्यांना समजावे पर्यंत तिच्या नाकी नऊ आले . पण मुग्धाने काकूचे नावही तिच्या तोंडून घेतले नाही .
 खरे तर आजींना कौतुक वाटत होते  इतके सगळे होऊन हि मुग्धा आपल्याला काहीच सांगत नाही …
ती रडवेली झाली आजीनं समजावताना ….
 तेव्हा आजीनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या , मुग्धे तुझे आई बाबा आले होते ना  ते मला भेटायला आले होते , मीच त्यांना बोलावून घेतले होते .
मुग्धा अविश्वासाने आजींकडे पाहत होती…
 अग आमचा श्रीधर माहित आहे न तुला ?  , श्रीधर म्हणजे आजींच्या मुलीचा मुलगा  तो नेहमी सुट्टीत आजींकडे यायचा .  मुग्धाची आणि त्याची तशी थोडीफार ओळख होती .
 श्रीधरचे नाव ऐकताच मुग्धा गोड हसली . आजींनी ते ओळखले पण त्या पुढे म्हणाल्या
यावर्षी आमचा श्रीचे शिक्षण पूर्ण झाले , एक दोन वर्षात त्याचे सगळे बस्तानही बसेल  . मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला होता आणि त्याने मला तुझ्याबद्दल सांगितले ,  मी तर खूप आधी पासून ओळखत होते हे पण तो काही बोलत नाही म्हणून शांत होते . त्यानेच मला सांगितले तुझ्याशी बोलायला  म्हणून आधी तुझ्या आई बाबांशी बोलले , त्यांना काही अडचण नाहीय  … आणि मी मघाशी श्रीचे नाव घेताच तू जे गोड हसलीस त्यावरून तुझे विचारही कळले मला असे म्हणत आजी मिश्किल हसू लागल्या .
मुग्धा हसत हसतच एकदम गंभीर झाली .
आजी , आई बाबा अन मी ठीक आहे पण काका काकुना कोण समजावणार ?
 मुग्धा ,  अग मी आहे ना  , तुझ्या काकुपेक्षा नक्कीच चार पावसाळे जास्त पाहिलेत मी !  तिचे बघू आपण परत… !! असे म्हणत आजींनी शेवटची दोन फुले  गाठीच्या गजऱ्यात बांधली  , आणि तो गजरा मुग्धाच्या केसात माळला . आणि तिला विचारले
" जायचे मग श्री ला फोन करायला ?" आजी असे म्हणताच मुग्धा लाजून आत मध्ये पळून गेली .


No comments:

Post a Comment