Saturday, April 30, 2016

आजोळ

साधारणपणे आमची परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपली कि आजोबा आम्हाला  घेऊन जाण्यासाठी आलेलेच असणार , उन्हाळ्याची सुट्टी म्हणले कि आमचे ठरलेले ठिकाण येळावी माझे आजोळ . कवठे महांकाळ ते येळावी दीड दोन तासाचा प्रवास , तासगाव मधून गाडी बदलावी लागत असे  मी एकीकडे आजोबा मध्ये आणि दीदी दुसरीकडे असा आमचा प्रवास .

गाव तसे लहान होते पण आजोबांना मानणारे लोक खूप , त्यामुळे जोशीबुवांची नातवंडे म्हणून आमचीही मजा असे . तिथे उतरले कि स्टेंड वरच ओळखीचे एक दुकान होते तिथून आम्हला खूप गोळ्या बिस्किटे मिळत , तोपर्यंत आजोबा त्यांची सायकल घेऊन यायचे आणि आमचा प्रवास आमच्या मळ्याकडे , गावापासून २-३ किलोमीटर आतमध्ये आमचा मळा , जाताना दोन्ही बाजूने झाडे त्यामुळे उन्हाळा आहे असे वाटतच नसे . 
 घर जवळ आले कि सायकलची घंटी वाजवून आजीला सांगणार कि आम्ही आलो , पण ती त्याआधीच दृष्ट काढायचे समान हातात घेऊन उभी असे . "किती वाळल्या ग माझ्या पोरी ?" संधी (माझी आई संध्या ) नेहमी पोरांच्या मागे असते नुसती , असे म्हणून गालावर मायेने हात फिरवायची . 
  गेल्या गेल्या चुलीत भाजलेल्या कैरीचे मस्त पन्हे  प्यायला मिळायचे , आम्ही येणार म्हणून आजीची तयारी खूप जोरदार असायची , त्यात खास कैरीची चटणी , बाटाचे आणि साधे लोणचे , मुरंबा ,साखरांबा  सगळी नुसती धमाल …
  आम्ही येणार म्हणून आधीच प्रत्येकासाठी झोपाळे बांधून तयार असायचे , गोष्टीची पुस्तके आणि सोबत अभ्यासही असे , याबाबतीत आजोबा खूप कडक होते त्यांना रोज पाढे  म्हणून दाखवावे लागत आणि शुद्धलेखनसुद्धा यात कोणतीही तडजोड नसे . 
 आमचे दुपारचे जेवण शक्यतो आमराईत असे  वरती लटकलेल्या कैऱ्या , आजूबाजूला जांभूळ ,आवळा, सोनचाफा , मोगरा , अशी कितीतरी झाडे यात आमचे जेवण … आमची दुपारची छोटी डुलकीही  तिथेच होई, 
तिन्हीसांजेला आजोबा आमच्याकडून शुभं करोति , अथर्वशीर्ष , रामरक्षा ,मारुती स्तोत्र म्हणून घेत . रात्रीची जेवणेसुद्धा अंगणात होत  …  चांदण्यात आजी जवळ  कुशीत झोपताना तिने शिवलेल्या गोधडीची ऊब जास्त कि तिच्या कुशीची ? या विचारात आणि गोष्टी ऐकत निद्रादेवी भूल घालत असे . 
 सकाळी उठले कि चुलीसमोर जाऊन बसायचे , आजीची धार काढणे यात हळूच कधीतरी जाऊन तिला मदत करायची , शेणाने सारवायचे  असे उद्योगधंदे , हे दुध तापवल्यावर खाली राहिलेली साय आजी साखर घालून खरवडून द्यायची काय लाजवाब चव तिची …  दुपारचे आजीचे काम झाले कि ती मातीची खेळणी करून द्यायची माझा आणि दिदीचा  भातुकलीचा डाव रंगायचा …  कधी कधी आजोबांसोबत सगळ्या शेतात भटकायचे . 
   हळू हळू कैरीला पाड येऊ लागतो मग आमच्या सगळ्याचे लक्ष तिकडे आजोबा स्वतः झाडावर चढून कैऱ्या उतरवायचे. आम्ही त्यांना मदत करत असू . घरात एक छोटी खोली होती तिथे पोती घालून त्यावर या कैऱ्या पिकायला ठेवायच्या  . सगळ्या घरात नुसता आंब्याचा वास दरवळत असे . आम्ही तर त्या खोलीच्या शेजारीच झोपत असू , रोज उठले कि आज किती आंबे पिकले याची मोजदाद .  आमरस साठी वेगळे , कापून खायचे वेगळे , चोखून खायला वेगळे असे त्यांचे वर्गीकरण  ……  असे करता करता मे महिना संपत आलेला असे आणि आई बाबा आम्हाला  घेऊन जाण्यासाठी येत , दिवस किती लवकर सरले याचे इतके वाईट  वाटायचे 
पण …… 
 आजी न चुकता सगळ्या बरण्या आईला द्यायची , आमची परत एकदा पाणावलेल्या  डोळ्यांनी दृष्ट काढून मग  आम्हाला निरोप  . 

मला या आंब्याच्या जातीमधले काही कळत नाही , हापूस , पायरी ,शेपू आणि कुठलाहि असो पण एक नक्की आहे कि आजही आंबे खाताना त्याला आजोबांनी उतरवलेल्या आंब्याची सर येत नाही  ……

Tuesday, April 26, 2016

SIX FLAGS

अमेरिकेत आल्यापासून शनिवार रविवार म्हणले कि एखादे म्युझियम , मॉल  आणि त्या उंच उंच इमारती पाहून खरेच खूप  कंटाळा आला होता , काहीतरी वेगळे करावे असे मनात होते पण हि थंडी !!!!!!!! पण या वसंत ऋतूच्या आगमनासमवेत नवरा बोलला कि आपण या रविवारी माझ्या ऑफिसच्या मित्रासोबत फिरायला जायचे. सिक्स  फ्लाग(six  flag ) आणि  अनिमल सफारी चा आपला प्लान आहे , हे सिक्स फ्लाग काय असते असे म्हणल्यावर नवरोबांनी त्याचे फोटो दाखवले ते पाहून मी उडालेच , ह्या हे काय आमची जत्रा !! म्हणून मी आपली लई खुश  , तर अहो म्हणतात कसे जत्रा कि " खतरा " कळेलच रविवारी !!! आणि इथे आल्यापासून आम्ही फक्त मराठी  लोक सोबत जाणार मग तर  दुधात साखर केशर सगळेच !!!!

कुठेही जायचे म्हणले कि हमखास उशिरा उठणारी मी यावेळी रविवार असून  देखील लवकर उठले ,  जत्रेत जायची हौस हो आणि त्यात दोन वर्षांनी जत्रा पाहायला मिळतीय म्हणल्यावर काय आमचे घोडे पुढेच पळत होते साधारण नऊच्या सुमारास आमचे प्रयाण सुरु झाले  तासा दीड तासाचा प्रवास , इथे प्रवास करताना आजूबाजूला उंच झाडे इमारती आणि मॉल दिसतात पण  लगेचच असे एखादे वळण येते कि आपण पाहतच राहतो …… तर अशा या झोकदार वळणानंतर आमचे ध्येय डोळ्यासमोर होते .
 आम्ही मोठे आठ जण आणि चिल्लीपिल्ली दोन असा लवाजमा घेऊन पावती फाडण्यासाठी गेलो , इथे सुरुवातीला पावती फाडली कि आत सगळे फोकट में ! पण पहिलीच पावती अव्वाच्या सव्वा असते पण आमचा ग्रुप होता आणि त्यात एका मैत्रिणीची कंपनी सवलत घेऊन मदतीला आली . सगळे सोपस्कार करून आत मध्ये गेल्या गेल्या फोटो फोटो करत मधमाशा कशा पोळ्याला येउन चिकटतात तसे सगळे मागे आणि परत त्याच फोटोचे पैसे उकळतात अर्थात आपण घेतले तर !!
 आम्ही पहिली जंगल भ्रमंती घेतली त्यासाठी तासभर रांगेत उभे राहून मग  ट्रक दिसला चलो पायपीट नाही म्हणून खुश वाघ सिंह असे प्राणी सोडले तर बाकी सगळे मोकळेच फिरत होते मजा वाटली , या भ्रमंती मध्ये एक छोटा थांबा होता जिराफाना  खायला घालण्यासाठी पण पैसे देऊन !! कुठे कसे पैसे उकळावेत ते न या लोकांकडून शिकावे …। इतक्या मोठ्या भ्रमंती नंतर सगळ्यांचाच भूक अग्नी प्रज्वलित झाला होता , पण शुध्द शाकाहारी म्हणले कि पिझ्झा , बर्गर आणि  sandwich  याशिवाय काही पर्याय नसतो , पिझ्झाची एक तुकडा पोटात गेल्यावर जरा उभारी आली आणि नव्या दमाने आमची ब्रिगेड सज्ज झाली खऱ्या  मजा मस्ती साठी ……. 

पहिली कोणती  राइड घ्यायची हे बघत बघत एका ठिकाणी येउन थांबलो आणि ठरवले आता श्रीगणेशा इथून त्या राइडचे नाव होते " एल टोरो " तिथे पोहचण्यासाठीही  आम्हला अर्धा पाउण तास वाट पहावी लागली तिथे  थोडे पुढे गेल्यावर एका कोंबडीचे चित्र दाखवून लिहिले होते " पळून जाण्यासाठी शेवटची संधी " !! असे करत आमची राईड मध्ये बसण्याची घटिका जवळ आली त्यावेळी पोटात सकाळी पाहिलेले सगळे प्राणी कत्थक करू लागले होते तसे या राईड मध्ये आपल्या सुरक्षितेची पूर्ण काळजी घेतली असते त्याच्या वेगामुळे …. अपवाद असतो तो आपल्या मनातील वेगाच्या भीतीचा !! 
राईडमध्ये बसल्यावर पहिला अगदी रेल्वेत बसल्यासारखे हळू हळू नंतर एक मोठा चढ जो को १७६ फुटावर जाऊन थांबत होता तिथे अगदी काही सेकंद थांबवले पण त्यानंतर १७६ फुटावरून खाली मुक्त पडणे ( free  fall )  तोही ७० मैल्स पर अवर (७० mph )  या वेगाने यावेळी मला ३३ कोटी देव सुद्धा आळवायला कमी पडले . 
हि राईड फक्त २ मिनिटे आणि ५ सेकंदची होती पण … ………  फक्त अनुभव !!!! 


खाली आल्यावर मी आहे न याची खात्री करून घेतली आणि कधी एकदा नवऱ्याचे तोंड पाहते असे झाले तो या अशा गोष्टींपासून दूरच असतो तसा !!! 
या नंतर एक छोटी राईड केली जी कि फन राईड होती . मग छोट्या मुलांच्या रेल्वेत मज मस्ती केली . यानंतर एका राईड कडे लक्ष होते निट्रो कि नायट्रो (nitro ) म्हणून होती त्यातही मी अगदी हौसेने बंसणार म्हणून गेले पण तिथे आपला नंबर यायची वाट पाहत असताना त्याचे सर्वोच्च टोक दिसले तो २३० फुटावर आणि तिथून खाली ८० मैल्स पर अवर या वेगाने !!!!!!!  त्या २३० फुटावर मला मघाशी जंगलात पाहिलेला रेडा यमाचा रेडा म्हणून दिसू लागला आणि माझ्या निश्चयाचा महामेरू ढासळला , त्यात नाही बसले यावरून टोमणे ऐकले पण  जान बची तो लाखो पाये !!!! 
  पण यानंतर मात्र एका राईड मध्ये बसायचे ठरवले होते ती म्हणजे वटवाघूळ(batman ) राईड त्यात आपण उलटे लटकून आपले पाय अधांतरीच याचे सर्वोच्च टोक १०५ फुटावर आणि वेग ५० मैल्स पर अवर यात इतके लटके झटके झाले माधुरीने सुद्धा आतापर्यंत कमी घेतले असतील ! त्यानंतर दोन दिवस मान हलवता येत नव्हती असे हाल  ,एकही राईड मध्ये डोळे उघडून  बघायची हिम्मत होत नव्हती आणि मी तर जाताना नवऱ्याला सांगून जात होते कि " जगले वाचले तर भेटू परत " !!! आणि सगळ्या राईडस २ मिनिटापेक्षा कमी होत्या पण  खतरा  राईडस होत्या या  ……. 
यानंतर मात्र छोट्या छोट्या म्हणजे कार डाशिंग  उर्फ दे धक्का  यात मात्र माझी कार जास्त वेळ स्वतः भोवती गोलगोल फिरत होती !!! आणि मला आवडलेली राईड sky screamer २४२ फुटावर फक्त गोलगोल  फिरून आजूबाजूचा सुंदर परिसर पाहणे आणि खास म्हणजे यात आम्ही सूर्य मावळतीला जात असताना बसलो होतो ती सांजवेळ आणि दिव्यांची उघडझाप पाहून तर त्याला चार चांद लागल्यासारखे वाटत होते …. सलग दोन वेळा बसूनही तोच आनंद 


 आता निघायची वेळ झाली होती पण अजून खूप काही बाकी होते पण पानात वाढलेले सगळे एकदम संपवायचे  नसते ना  हळूहळू  चवीने खायचे असते , त्यामुळे सिक्स फ्लागला अजून भेटायचे आश्वासन देऊन काढता पाय घेतला …….    
  

Tuesday, April 19, 2016

एक नवी ओळख

आरुषीचा संसार मांडून आता ४-५ वर्ष झाली . सगळ्याच आयांप्रमाणे मलाही माझ्या नातवंडाची तोंड पहायची घाई होतीच पण लेकीचे करिअर त्यात आधी  तिला जम बसवायचा होता त्यामुळे मीही थोडी शांतच होते . पण आज लेकीचा फोन आला आणि कधी एकदा तिला जाऊन भेटते असे झाले . जवळ असते तर गेले असते लगेच पण परदेशी ?
आज आरुषीचा फोन आल्यापासून नुसती माझी गडबड चालू होती, पण तिचे बाबा मात्र  अगदी शांत  आनंद झाला नाही असे नाही पण ठेविले अनंते  तैसेचि राहावे हि वृत्ती ….  आनंद आणि दुःख कशाचाच बाऊ करायचा नाही . तसेही लेकीने फोनवरून बाबांना तुम्हीही याच  असे सांगितले होते आणि मलाही कडक शब्दात सांगितले होते काहीही कर पण त्यांना घेऊन ये . म्हणजे तुमचे दुसरे हनिमून होईल ग !! आणि खळखळून हसली , 
दुसरे ?
          तसा  मनात विचार आला आपण कधीतरी गेलो होतो का असे दोघे बाहेर ? एकत्र कुटुंब , सासू सासरे दीर जाऊ  मुल यातच सरले नव्याचे नऊ  दिवस . … त्यामुळे लेकीने हनिमून म्हणताच नाही म्हणली तरी गालावर खळी  फुलली होतीच , पण परदेशी लेकीच्या घरी ५-६ महिने राहावे लागणार होते ते यांना किती रुचेल म्हणून जरा घाबरतच विचारले काय विचार आहे तुमचा ?  रिटायर झाल्यापासून पेपर मधून तोंड न वर काढता उत्तर देतात तसेच आजही आले  आणि तेही चक्क हो म्हणून !!!  जाऊया दोघे असे !!! 
तसेही आधी मला एकटी जायचे म्हणजे थोडी भीती होतीच , तिथले नियम , कायदे कानून सगळे वेगळे मला एकटीला कसे जमणार ? पण लेकीचे बाळंतपण म्हणजे आईच्या जिव्हाळ्याइतकाच जबाबदारीचा प्रश्न !!!  आणि त्यात आज स्वारी मूड मध्ये मग काय माझे पाय तर जमिनीवर ठरेना झाले .  मी तर अगदी दिवस मोजू लागले विमान प्रवास पहिलाच जोडीने , विमानतळवर पोहचल्यावर तिथली लोक , झगमग पाहून माझीच मला मी एक ध्यान वाटत होते ,पण फक्त तिथे तुम्ही होतात म्हणून  …….   
 विमान उडते वेळी माझी झालेली अवस्था पाहून हातात घेतलेला हात तुम्ही विमानातून उतरेपर्यंत धरून ठेवला होता , तिथली बाई जेव्हा विचारत होती Is  there any rice or liquid in ur bag ? मी आपली तिला समजावत होते येस येस  देअर आर सम मसालाज  !!! पण तिला माझे ओ कि ठो  कळत नव्हते आणि तुम्ही तिला सांगितले she means some spices are there ... आणि ती हसली त्यावेळी असा राग आला होता न त्या भवानीचा ! पण ……… 

सगळे सोपस्कार पार पाडून  बाहेर आलो त्यावेळी लेकीचा चेहरा उजळलेला पाहून कोण काय जाणे  आंनद होता , पण आज प्रथमच तुमच्यातला आजोबा जावयाशी बोलताना पहिला . लेकीच्या घरी मी लवकर रुळले पण  तुम्ही ?  तरीही क्षणोक्षणी मला आधार देत तुम्ही माझ्याजवळ होतात …  
 आपली लेक  दवाखान्यात असताना  आणि बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून एकाचवेळी खारट आणि गोड  अश्रू तुमच्या डोळ्यात……  कधी अपेक्षाच नाही असे वेगळे रूप तुमचे , इतक्या लहान मुलाला घ्यायची सवय नसताना त्यासाठी केलेली धडपड  तेव्हा आपल्या नातीइतकेच निरागस दिसत होता तुम्ही ,  आणि ती घरी आल्यावर माझी उडणारी तारांबळ पाहून रात्रीच्या जागरणात केलेली सोबत !!

आज आपली लेक ३-४ महिन्याच्या विश्रांतीनंतर आजपासून कामावर जायला लागली , घरात मी न आपली नात …… पण जायच्या आधी लेकीने शिकवले हा laptop वापरायला आणि लिहायला , पहिला प्रयत्न केला लिहायचा तुम्हालाच  , कामासाठी म्हणून तुम्ही आधी गेलात पण जाताना मात्र मला परत तुमची एक नवीन ओळख देऊन गेलात  …… 

Monday, April 4, 2016

तेवणारी वात

         "शुभमंगल सावधान " असे शब्द ऐकले आणि रमा काकुंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणखी एका जबाबदारीतून त्यांना मोकळीक मिळाली . अंजूचे लग्न थाटामाटात पार पडले तिचा जोडीदार तिने शोधला म्हणून काकू थोड्या नाराज होत्या पण होणाऱ्या जावयाला आणि त्याच्या घरच्यांना भेटल्यावर त्यांचा विरोध मावळला . अमित आणि अंजली रमा काकूंची दोन मुले अमितचे लग्न ४ वर्षापूर्वी झाले अपर्णा त्याची बायको आणि आकांक्षा काकूंची  लाडकी नात असा सुखी परिवार .
    आज रमा काकू सगळ्या जबाबदारीतून मुक्त झाल्या होत्या , वयाच्या अठराव्या वर्षी देशमुखांच्या घराचा उंबरठा ओलांडला होता त्यावेळी दिसायला बारीक सावळी ,नाक अगदी धारदार ,घारे डोळे आणि मंजुळ आवाजाच्या रमेने सगळ्यांना आपलेसे केले होते अपवाद होता तो फक्त विनायकरावांचा म्हणजे रमा काकूंच्या नवऱ्याचा !!

विनायक रावांना घरात जास्त अडकून राहायला आवडायचे नाही . चंचल स्वभावामुळे त्यांचा पाय घरात ठरत नसे लग्न झाल्यावरहि तसेच वागणे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना समज दिली पण त्यांचे वागणे तात्पुरते बदलायचे परत जैसे थे परिस्थिती असायची . रमा काकुना हळू हळू या सगळ्याची सवय झाली पण त्यांच्या डोळ्यतील वेदना मात्र त्यांना ओळखणाऱ्याला कळे.
 अशातच एक दिवस गोड बातमी रमा काकुना दिवस गेल्याची त्यामुळे रमा काकुना एक नवीन उमेद मिळाली जगण्याची अर्थात झालेल्या जखमा पूर्ण भरून येणाऱ्या नक्कीच नाहीत पण कुठेतरी वाळवंटात पाउस ….!  पहिला मुलगा झाल्यावर विनायकरावहि जरा आनंदले लाडाने त्याचे नाव अमित ठेवले . रमा काकुना आता दिवसही  कमी पडू लागला . अमितच्या बाललीला बघण्यात त्या रमून जात . विनायकरावांच्या वागण्यातील बदल खूप कमी काळ टिकला . अमितला दोन वर्ष पूर्ण झाली बघता बघता आणि आणि अंजली घरी आली
आपल्या दोन मुलांमधून काकुना आता वेळ मिळेना झाला .काकुना वाट्त होते कि आता संसार परत मार्गी लागेल पण एके दिवशी कामानिम्मित परगावी गेलेले विनायकराव परतलेच नाहीत .
 अमित अवघा चार वर्षाचा आणि अंजू दोन वर्षाची काकू तर खूपच खचून गेल्या सासू  सासर्यांनी त्यांना धीर दिला . बाहेरच्या जगाला तोंड द्यायची हिम्मत काकुना त्यांच्याकडूनच मिळाली .काकुना स्वतः च्या पायावर उभे केले सासर्यांच्या ओळखीने कुठल्या तरी पतसंस्थेत नोकरी मिळाली . पण ते दोघे तरी किती दिवस पुरणार होते ?  काकुनी स्वतःला सावरल  त्यांच्या मुलांसाठी आता फक्त त्याच होत्या . हळू हळू मुले मोठी होत होती अमित खूप समंजस आणि हुशार होता ,त्याच्या मानाने अंजू थोडी चंचल पण तिचा  आईवर खूप जीव  होता .

काकुनी दोन्ही मुलांना शिकवून स्वतःच्या पायावर उभे केले . अमित साठी मुली बघायला चालू केल्यावर तर त्यांचे चित्त थाऱ्यावर नसे . त्यांना कसलीतरी खूप भीती वाटत असे पण काही बोलायच्या नाहीत म्हणून एकदा त्यांच्या नणंदेने विचारलेही , वाहिनी " आजकाल खूप काळजीत असता ? मुली बघताना सुद्धा इतका का ओ विचार ? " तेव्हा त्या म्हणल्या ," वन्स , दुध पोळले कि ताकही फुंकून प्यावे हो " यापुढे कुणीच काही बोलले नाही फक्त निरव शांतता …… त्यांच्या डोळ्यातील भावना फक्त त्यांचीच दोन मुले वाचू शकली

पण त्यांच्या सुदैवाने अमितचा संसार सुखात चालू होता आकांक्षा सारखी एक गोंडस मुलगी होती. आता अंजुही मार्गी लागेल तिची पाठवणी केली कि मी मोकळी असे म्हणत त्या एकदम भानावर आल्या . आजूबाजूला गोंधळ चालू होता अंजूच्या लग्नाचा , कितीवेळ मी अशीच बसले होते कुणास ठाऊक म्हणत त्या तिथून उठू लागल्या तितक्यात अमितही त्यांना शोधत तिथे आला .

काकुना घेऊन तो एका टेबलजवळ आला तिथे केक त्यांच्या आवडीचे पदार्थ सगळे होते ते पाहून त्यांना काहीच कळेना . अमितने सांगितले कि परवा आत्या बोलता बोलता म्हणाली कि ,तुझ्या आईला आता या घरत येउन ४२-४३ वर्ष होतील आली,तेव्हा फक्त १८-१९ वर्षाची होती . मग त्या अंदाजानी तुला एकसष्ठ वर्ष पूर्ण झाली म्हणून आज तुझी एकसष्ठी … यावर काय बोलवे काकुना कळेना लग्नापासूनचा सगळा प्रवास त्यांच्या डोळ्यासमोरून तरळू लागला .

अंजू आणि अपर्णा एकसष्ठ दिवे घेऊन आल्या ,अमितने आईला बसवले अंजू आणि अपर्णा त्यांचे औक्षण करताना   ते पाहून काकुना लहानपणी मुलांना दिवाळी,शुक्रवार, त्यांच्या वाढदिवसादिवशी केलेली औक्षण आठवू लागली , समोरच्या तेवणाऱ्या वातीमध्ये जणू त्या स्वतःलाच पाहत होत्या सगळेच धुसर झाले होते .
 आज त्यांना या एका क्षणात कधीच काही न मिळून खूप काही मिळाल्यासारखे झाले होते .