Friday, August 4, 2017

आसू नि हसू

अनघा आणि तुषार हे दोघे एकाच कंपनीत काम करत होते ...
अनघाला तुषारपेक्षा थोडा जास्त अनुभव होता त्यामुळे साहजिकच ऑफिसमध्ये तिच्या शब्दाला मान होता .. काही काम असले की तुषारला अनघाकडेच जायला लागायचे खरे तर त्याला अनघा आवडत होती , पण कामासाठी तिच्याकडे जायचे म्हणले की त्याचा मेन्स इगो आडवा यायचा ....
तिच्यासोबत लंच ब्रेक किंवा कॉफी घेता यावी यासाठी त्याची धडपड चालू असायची .
अनघाला हे सगळे कळत होते ,पण त्याच्या साठी म्हणून ती तिच्या कामात कोणतीही तडजोड करायला तयार नव्हती , तिला वाटायचे इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि कदाचित थोडे दिवसांत तिला ऑनसाईट जायला मिळणार होते ... तिच्या दृष्टीने प्रेम ते करायला पूर्ण आयुष्य तर आहेच ... आता तिला फक्त स्वतः कडे लक्ष द्यायचे होते ..
एकीकडे तिलाही तुषार सोबत वेळ घालवायला खूप आवडे . त्याची बोलण्याची ढब , प्रत्येक वाक्यानंतर है ना म्हणण्याची सवय .. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे तिचे लक्ष असे .. ती इतकी सफाईने त्याच्याकडे पहायची की हे त्यालाही लक्षात येणार नाही ..
दोघे एकमेकांना आवडायचे पण नेहमीच आडवा यायचा तो इगो त्यामुळे एकमेकांना अजूनही त्यांनी आपल्या मनातले सांगितले नव्हते .
अशातच एक दिवस अनघाला सहा महिन्यांसाठी परदेशी जावं लागणार होते असे कळाले .... अनघा खूप खुष होती पण मनात एक चलबिचल होती तिला थोडेफार समजत होते की असे का होत आहे .. कदाचित तुषारपासून दूर जाणार म्हणून !!!!
तिला तयारीसाठी फक्त एक आठवडा मिळाला होता ,त्यातच तिला सगळे काम मार्गी लावून आणि तिची तयारी करायची होती ... या सगळ्यात तुषार सोबत बोलायला वेळ मिळत नव्हता..
इकडे तुषारची अवस्था फार काही वेगळी नाही त्यालाही कळत नव्हते की अनघासोबत कसे बोलायचे ...
या सगळ्यात तिच्या जाण्याचा दिवस आला ... अनघा निघून गेली ... तुषारला ऑफिसला यायलाही नको वाटायचे ...
अनघा तिकडे जाऊन सेट झाली .. थोडे दिवसांनी तिने तुषारला मेल केला , तिकडे ती कशी आहे , तिचे फ्रेंड सगळे लिहिले होते तसा मेल खूप मोठा होता .. आणि ती तिकडे मजा मस्ती करत आहे हे वाचून तो जरा दुखावला ... इकडे त्याचा एकही दिवस तिच्या आठवणी शिवाय जात नव्हता... आणि ती!!!!!!
तो मेल अर्धाच सोडुन तो उठला .....
पण तिने त्यातच लिहिले होते की ती त्याला किती मिस करते तो जर तिथे असता तर त्यांना काय काय केले असते ....
पण त्याने मेल अर्धा सोडला होता .......
तिला काहीतरी रिप्लाय द्यायचा म्हणून तुटक रिप्लाय दिला ....
त्याचे आलेले उत्तर पाहुन अनघाला वाटले खरेच याला माझ्याबद्दल कधीच काही वाटत नव्हते का?
आता बोलणे होत होते पण फक्त कामापुरते ... दोघेही आपआपल्या वाटेने पुढे जात होते ..
आणि अनघाचा तो मेल हळू हळू खाली जात होता ...
सहा महिन्यानंतर अनघाचे तिकडे राहणे अजून वाढले ..
तुषारचे प्रमोशन झाले आणि तो दुसऱ्या प्रोजेक्टला गेला ... अनघा जिथे होती तिथेच तो जवळपास गेला होता ... अनघाला सांगावे भेटावे असे बरेच वेळा वाटले पण परत पण आडवा आला .....
एक दिवस असेच मेल क्लिअर करत असताना अनघाचा तो मेल त्याला दिसला ... आता ती तर नाहीच म्हणून तो मेल डिलीट करणार होता पण एकदा वाचावा म्हणून त्याने उघडला ...
जसा जसा तो वाचत जात होता तसे त्याचे ठोके वाढत होते ...
आणि शेवटी त्यात तिने लिहिलेच होते , इकडे आले आहे पण खरेच तिकडे तुझ्या सोबतची मजा काही वेगळीच होती ... इथे खुपजण आहेत पण तू नाही आहेस !!!
हे वाक्य वाचल्यावर तुषार उडालाच .... त्याला आठवले आपण किती मूर्खपणाने आणि उद्धट रिप्लाय दिला होता !!!
आता काय करावे ?? किती दिवसात तिच्याशी काही बोलणे नाही ... कसे भेटायचे तिला .. आणि भेटले तर ती बोलेल का ? आपले काही ऐकून घेईल का असे एक ना दोन किती तरी प्रश्न त्याला एकावेळी पडत होते ...
शेवटी त्याने आधीच्या प्रोजेक्टमधील मित्रांची मदत घ्यायची ठरवले आणि त्याने एकाला फोन केला ... तर त्यानेच सांगितले की अनघा तुझ्या बद्दल विचारत होती ..
त्याने त्याला अगदी नीट तिचे ऑफिस , तिच्या जाण्या येण्याची वेळ सगळे विचारून घेतले , तिथे ती कुणा बरोबर राहते .. तिची मैत्रीण किंवा ऑफिस मधले कुणी असेल तर त्याचा नंबर सगळे घेऊन ठेवले ...
खरेतर त्याला माहिती होते की अनघा इतक्या सहज मानणार नाही म्हणूनच त्याला सगळे प्रयत्न करावे लागणार होते ...
उद्या सोमवार होता त्यामुळे आता वीकएंडशिवाय तिला भेटता येणार नव्हते .. त्याच्याकडे तिच्या रूममेटचा नंबर होता , त्याने तिला कॉल करून सगळे सांगितले अगदी स्वतःचा गाढवपणासुद्धा !!!
तिलाही माहिती होते तुषारबद्दल , अनघा तिच्याजवळ बऱ्याचदा बोलत असे , त्यामुळे अनघाच्या मनात अजूनही तुषारबद्दल फीलिंग आहेत हे तिला माहिती होते .. त्यामुळे ती तयार झाली ...
सोमवारी अनघा जेव्हा ऑफिस साठी बाहेर पडत होती तेव्हा बाहेर दारात मोठा पुष्पगुच्छ तिच्या नावाने ठेवला होता ...पण देणाऱ्याचे नावच नाही....
तो आता ठेवून ती ऑफिसला आली तर तिथे तिच्या डेस्कवर गुलाबाचे फुल ... तिने तिच्या कलीगना विचारले पण कुणालाच काही माहिती नाही ...
संध्याकाळी घरी गेली तर परत तिच्यासाठी ग्रीटिंग कार्ड सॉरीचे !!! तिने तिच्या रूममेटला विचारले तर तिलाही काही माहिती नाही ...
दुसऱ्या दिवशी पण सेम तेच ... आणि त्यात आज बदल म्हणजे तिच्या आवडीचे आईस्क्रीम होते ...
तिसरा दिवस तसाच ... आज वेगळे म्हणजे तिच्या आवडीचे चॉकलेट ... तिला समजत नव्हते हे सगळे कोण करत आहे ते ? कदाचित तुषार ???? पण तो इथे कुठे आहे हे सगळे करायला ???आणी आता का करत आहे ?
आजचा दिवस पण सारखाच पण आज तिच्या आवडीचा टेडी , चॉकलेट आणि सोबत मिस यु चे कार्ड ....
या सगळ्यामुळे अनघाला ती कुणासाठी खुप स्पेशल आहे हे कळत होते पण तो कोण ? उद्या तर शुक्रवार काय असेल या विचारात तिला रात्री खूप उशीरा झोप लागली ...
पण सकाळी उठली तर बाहेर काहीच नाही ऑफिसमध्ये पण खास असे काहीच नाहीं ...
तिचे कामात लक्ष लागेना रोज तर काही खास होते पण आज काहीच कसे नाही या विचाराने ती अस्वस्थ होत होती ... पूर्ण दिवस गेला 4 ला ती कॉफी आणण्यासाठी गेली आणि परत डेस्कवर आली तर ...एक कार्ड होते त्यात एका हॉटेलचे नाव आणि तिथे 8 ला पोहचायला सांगितले होते ....
अनघा जरा काळजीत घरी आली तर तिच्या मैत्रिणीने विचारले काय झाले ... अनघाला असे अनोळखी माणसाला भेटायला जायचे नव्हते ... कसा असेल कोण असेल तो कितीतरी प्रश्न तिला पडत होते ...
पण मैत्रीण म्हणाली एकदा जाऊन तर बघ कोण आहे ते ... कदाचित तुझ्या ओळखीचे कुणी असेल आणि तुझी मजा करत असेल .....
अनघाला तिने बरेच समजावलं तेव्हा ती हो म्हणाली ...
इकडे तुषार हाल्फ डे सुट्टी घेऊन केव्हाच निघाला होता ... मनात फक्त फक्त एकच भीती होती अनघा काय म्हणेल ...आता माती खाल्ली आहे तर निस्तरावी तर लागेल ना !!!
अनघा हॉटेल मध्ये आली तर वेटरने तिला तिच्यासाठी बुक केलेल्या टेबलवर बसवले .. तिला हे समजेना याला कसे कळले की हे टेबल माझ्यासाठी बुक केलं आहे ते ? इथे तर सगळे प्रश्नच होते आज त्याची उत्तरे मिळणार होती ...
कँडल लाईट डिनर ....
इतक्यात तो तिच्या समोर आला .... त्याला बघून तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलू लागले आधी राग, आश्चर्य , प्रेम ... प्रश्न चिन्ह सगळेच .... आणि यावेळी हे सगळे तुषार वाचू शकत होता .....
त्याने तिचा हात धरून शांतपणे तिला खाली बसवले ...
तर तिचे प्रश्न चालूच ... तू इथे कसा काय ? म्हणजे हे सगळे तू केले ?का ? त्यावेळी तर ......
मध्येच त्याने तिला शांत केले आणि सांगितले की तो इथे कसा ते .. . आणि त्याच्या कडून झालेली चूक तो अगदी सगळे शांतपणे सांगत होता .... पण ती अजून चिडली होती ... त्याच्यामुळे कितीतरी मनस्ताप तिला सहन करावा लागला होता ...
ती रडत होती मधेच हसत होती ... यातच त्याला कळत होते तिच्या मनात काय आहे ते ....
तो तिच्या जवळ जाऊन बसला ... आणि तिला म्हणाला कि ,, हे बघ मी कसा आहे ते तर तुला माहीत आहेच ... आता झाला आहे माझ्याकडून गाढवपणा तर माफ नाही का करणार का या गाढवला!!!! बाई ग मागच्या एका आठवड्यात तुला मनावण्यासाठी किती काय पापड लाटले ते माझे मलाच माहिती !!!! मान जा ना ... तुझे तो पता है मैं कैसा हू " है ना" ?????? असे म्हणत त्याने तिला डोळा मारला !!!!
है ना सेम त्याच स्टाइलमध्ये ... असे ती म्हणाली आणि तिने जीभ चावली ... तसा तो म्हणाला माहीत आहे मला तूला माझी ही स्टाइल आवडते ते है ना!!!!
तीही है ना म्हणत त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या आवडीचे घड्याळ त्याच्या हातात घातले ... तो शॉकच तुला कसे कळले की तो मी आहे ते !!!!
ती का तू हे इतके सगळे करू शकतो तर मी का नाही ??
हम भी किसींसे कमी नही है ना!!! आणि हसत त्याच्या कुशीत गेली ....

आसू नि हसू 

Thursday, June 22, 2017

बिझनेस बिझनेस !!!

चार दिवस झाले आता कुठे सकाळी लवकर उठायची सवय लावून घेत आहे .. म्हणून आपला मित्र मैत्रिणी , जरा फेसबुक , व्हाट्सअप ला जास्त येऊ लागले .. 
नेहमीप्रमाणे जरा सकाळी फिरून आले ??? आणि येऊन मोबाईल बघत बसले  कुणाचे शुभ प्रभात  तर कुणी शुभ संध्या .. नाहीतर तेच आपले सगळीकडे फिरून आलेले आणि दमून भागून येऊन पडलेले मेसेज ... 
मित्र मैत्रिणींना रिप्लाय देत होते तोच एक मेसेज चमकला ... 
काय आज खूप दिवसांनी रिप्लाय दिला ??
मी : हो 
मेसेज मित्र ( मेमि ) :  काय चालू , कशी आहेस ? 
मी : हा मजेत  , बसले आहे निवांत ( निवांत या शब्दालाच माशी शिंकली  ना ) !!!
मेमि : तुला घरी बसून कंटाळा येत नाही का ग ? म्हणजे बोअर होत नाही ...??/
मी : हा कधी कधी ( का बोलले मी असे )   .. पण जातो माझा चांगला वेळ  वाचन  करण्यात  काहीतरी बघण्यात ... आणि माझ्या प्रिय सखी " निद्रा " सोबत ( झाली इथेच नजर लागली मला ) 
मेमि : तसे नाही ग , पण तुला वाटत नाही का कि काहीतरी फळ देणारे आपण करावे  ( fruiful तो असे म्हणाला होता ) आणि तू खुप छान लिहिते ग ( हरभरा झाड आठवले मला ) 
मी ( मनातल्या मनात) अजून एक बिझनेस बोलावणे आले .... !!! हे देवा वाचवरे मला !!!!
मी : अरे जे काही आहे ते थेट सांग उगीच आडून बोलू नको .. 
मेमि :तसे नाही ग पण तुला इंटरेस्ट असेल तर बोलू .. 
मी : हे बघ जे काही चेन टाईप बिझनेस आहेत त्यात मला इंटरेस्ट नाहीय ... सो मला काही सांगू नको .. 
मेमि : मी काही तुला फसवणार नाहीय .. यात खूप फायदा आहे .. तुला फिरायची आवड आहे तू ती पूर्ण करू शकते !!! ... 
मी माझ्याच मनाला झालं सुरु आता बोलण्यात काही राम नाही .. 
मेमि : (अजून त्याचे चालूच आहे ) अग आमचा असला काही बिझनेस नाहीय , यात खूप फायदा आहे आमचे हे सर  बघ आता त्याच्या फॅमिली बरोबर  अमेरिका टूर ला गेले आहेत  , त्यांचे फोटो येत आहेत !!  !! 
 तू तुझ्या आई वडिलांना आता घेऊन जाऊ शकत नाही या बिझनेस मुळे तू त्यांना तिकडे घेऊन जाऊ शकते !!
(मी  परत माझ्या मनाला  माझ्या आई बापाच्या मागे आता साक्षात ब्रह्मदेव जरी लागला कि तुम्ही अमेरिकेला जा तरी तर काही यायचे नाहीत !!!! ) 
 मेमि : बघ मी तुला काही जबरदस्ती नाही करणार .... 
(परत मी माझ्या  मनालाच किती वेळा बोलले मी माझ्या मनासोबत ते पण थकले आता .. मी किती उशीर झाले त्याला काही रिप्लाय देत  नाहीय एकदा नाही म्हणून सांगितले आहे आणि तो मेसेज करतच आहे याला काय म्हणतात जबरदस्तीच ना ??)
मेमि :  बघ एकदा तुझ्या नवऱ्याला सांगून , आपण व्हिडिओ कॉल करू .. !!!! 
मी मनातच ओरडत आहे नको !!!!!!!!!!!
मी शेवटी थेट त्यालाच .... हेबघ मला नाहीय इंटरेस्ट मला नाही करायचे आता यातले काही ... 
पण मी आता एक करणार आहे जे काही बोलणे आपल्यात होत आहे ते मी पोस्ट करणार आहे ... !!!! 
 मेमि : त्यात माझे नाव घेऊ नकोस हा !! सगळे पॉसिटीव्ह लिही ... 
(हे देवा आता मी काय लिहायचे तेपण हा सांगणार का ? हे  मात्र देवाला !!!!) 
 जाऊदे ना मुझको क्या ... अजूनही येत आहेत मेसेज  तोवर झाले माझे लिहून  !!!! आनेदो रे !!!!
 आता उद्यापासून नकोच ते लवकर उठणे !!! कटकट डोक्याला !!! हे आता नवऱ्याला सांगितले कॉल करून कि उद्यापासून पहिले पाढे पंचावन्न !!!! बसला आहे ऑफिस मध्ये बिचारा डोक्याला हात लावून कधी नव्हे ते बायको लवकर उठत होती !!!! 

Wednesday, June 7, 2017

शाळेतल्या मुली

कितीही मोठे झालो तरी आयुष्यभर एक गोष्ट कधीच डोक्यातून जात नाही ती म्हणजे शाळा !!!!
त्यात जून महिना म्हणले कि तर त्या आठवणी परत परत शाळेकडे धाव घेतच असतात ... आणि नकळत वेडा जीव त्यात अडकतो आणि डोळे पाणवतात ... 
आज खूप दिवसांनी आमच्या शाळेतल्या मुलींच्या ग्रुपवर बोलणे झाले , सगळ्या आठवणी परत एकदा जाग्या झाल्या .. तसा हा ग्रुप काढून फक्त काही महिनेच झालेत आणि त्यात हि रुसवा , थोडी चढा ओढ आहेच पण कुठेतरी आता थोड्या मोठ्या झालोत याचा समजूतदारपणाही  आहे !! 
मला आठवत तसे आमच्या बॅच मधील ना कुणी कधी असे म्हणले नाही कि मला माझ्या सोबत बाकड्यावर हिच माझ्या सोबत हवी आहे , जे कुणी असेल तिच्याशी जमवून नाही जमले तर भांडून वर्ष काढायचेच ... 
आधी तो बेंच मिळवण्यासाठी आमची धडपड असायची त्यामुळे जे आहे ते गोड मानायचे आणि पुढे जायचे ... 
दुपारच्या सुट्टीत खेळलेले खेळ .. आणि विज्ञान आणि गणिताच्या तासाला चुकून जरी खेळायला मिळाले तर सोने पे सुहागा !!!
कब्बडी खो खो हे असले खेळ आम्हाला नको असायचेच , कुठेतरी बांगडीच्या काचेवर पाय देऊन गेट ला नाही त झाडाला शिवणे .. दगड पाणी ..  आणि एक काही तरी होता ऍडमिट किडा किस्का घर मेरा घर असे म्हणत ... 
वेड्यासारखे खेळायचो ... !!!
मधल्या सुट्टीत घेतलेल्या गोळ्या बिस्कीट नंतर पुढच्या तासाला चोरून खायचे ,, मैत्रिणीला द्यायचे .. सगळे लपून छपून ,,, 
खिडकीतून दप्तर खाली टाकायचे आणि दारातून बाहेर यायचे , मागच्या बाजूने घरी पळून जायचे .. किंवा गृहपाठ केला नसेल तर आधीच बाहेर जाऊन थांबायचे म्हणजे कुणी काही विचारायलाच नको !!!! 
काही केले नाही असे नाही सगळी मजा मस्ती दंगा केला अभ्यास सोडून !!! 
रमजानला  मैत्रिणीच्या घरी शीरखुर्मा खायला , यात्रेवेळी यात्रेत फिरायला मजा यायची एक वेगळीच दुनिया होती ती ... 
तेव्हा मोबाईल नसल्यामुळे एक दिवस शाळेला दांडी मारली कि आज काय शाळेत काय झाले विचारायला मैत्रिणीकडे जायचे .. आणि तिने अभ्यासाचे  सोडून सगळे सांगावे ... !!!!
माहित नाही काय जादू आहे शाळा या शब्दात !!!.. फक्त शाळा शब्द कानावर पडतो अन डोळे मिटतात आणि आठवणीची पोतडी उघडत जाते नकळत डोळ्यातल्या आसवांसोबत ..... 

Tuesday, May 9, 2017

आनंदी

काही मित्र , मैत्रिणी बघताक्षणी आपलेसे वाटतात , कधी त्यांच्यासोबत सूर जुळले जाऊन एकमेकांची सुख दुःखे आपली होऊन जातात समजत नाही .... अशीच माझी एक मैत्रिण अंजु .. 
तिला जेव्हा मी भेटले त्यावेळी ती खुप वेगळीच वाटली ,  खूप लोकांच्या गर्दीत आपली ओळख जपून ठेवणारी अशी ....  काही माणसे पहिल्या भेटीत आपली होतात , काहींना थोडा वेळ द्यावा लागतो यातल्या ती पहिल्या प्रकारात मोडणारी आणि मी दुसऱ्या तरीही आमची मैत्री झाली , वेळ जाईल तशी  हि दोस्ती पक्की झाली .. 
अंजुला कुणीही पहिले तरी समोरची व्यक्ती कितीही दुःखी असुदे नाहीतर टेन्शनमध्ये त्याच्या चेहऱ्यावर हसू येणार हे नक्की !! 
काय रसायन आहे तिच्याकडे माहिती नाही , तिची बोलण्याची ढब , हातवारे करण्याची सवय किंवा एखाद्याची नक्कल करण्याची सवय आणि शुद्ध मराठी बोलताना मध्येच कुठेतरी हिंदी इंग्लिशची फोडणी त्यामुळे होणाऱ्या अर्थाचा अनर्थ...  यामुळे तिच्याजवळ कुणी आहे  आणि हसणे खिदळणे नाही हे केवळ अशक्य !!!
तिला जेव्हा भेटले तेव्हा खरेच तिचा खूप हेवा वाटला होता कसे शक्य आहे हिला आपल्या आजूबाजूला इतक्या माणसाना गुंगवून ठेवणे ? सगळ्याशी गोडीगुलाबीने वागणे ? पण खरेच आहे ती तशी आणि वेगळी .. मनातले भाव चेहऱ्यावर न उमटून देणारी .... !!!
आता आमची मैत्री अगदी जिवाभावाच्या दोस्तीत बदलली होती .. त्यामुळे घरातील गोडधोड गोष्टीपासून ते तिखटमिठाच्या फोडणीपर्यंत आमच्या गप्पा रंगू लागल्या ... 
अंजुचे आणि माझे बालपण अगदी सारखेच गेले , मजेत  दंगा मस्ती करण्यात , सगळे काही वेळच्या वेळी  मिळायचे ... तिचे शिक्षण पूर्ण झाले तसे लग्न झाले आणि पहिले मजा मस्तीचे दिवस संपले आणि संसार सुरु झाला .. 
तिचा संसार आणि तिची कहाणी वेगळीच ...  जेव्हा तिने सांगितले कि तेव्हा खरेच प्रश्न पडला कि आजच्या जगात पण अशी लोक असू शकतात ? 
किती तो त्रास ? बायको म्हणजे मोलकरीण !!! रात्रीची सोबतीण  फक्त इतकेच नाते  असते का एका नवरा बायकोत ? त्यापुढे काही नाही ...  तिला विचार करायचे स्वातंत्र्य नाही कि स्वतःच्या मर्जीने काही करायचे नाही...  जर तिने असे काही केले कि मग आहेतच लाथा !! आणि सगळ्या गोष्टी त्याच्या मनासारख्या करून मिळते पण काय तर तिच्या माहेरच्या लोकांचा उद्धार  आणि त्यांच्यासोबत बोलायला बंदी ..  सहा सहा महिने कोणती मुलगी आपल्या आई बापाशी न बोलता राहू शकते ??  आणि तिचे सासू सासरे म्हणजे काय तर कहरच !!! ते तिच्या नवऱ्याच्या वरचे ...  !!! एकापेक्षा एक किस्से ऐकायला मिळाले ..  म्हणजे अगदी मराठी सिरीयल तयार होईल त्यावर एक !!! तिचा खूप त्रागा होतो , चिडचीड होते... आता तीच बदलत आहे स्वतःला यातून नक्कीच काहीतरी चांगले होईल ... 
पण या सगळ्यात आवडतो फक्त तिचा स्वभाव  नेहमी आशावादी राहण्याचा दृष्टिकोन  कितीही दुःख असले तरी  दुसऱयाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची एक कला ...  


Thursday, March 23, 2017

एक पत्र मनातले

                                                                   ।। श्री ।।
प्रिय ....
साष्टांग नमस्कार .. 
आज खूप दिवसांनी तुला पत्र लिहीत आहे , खूप दिवसांनी का तसे पाहायला गेले तर आज पहिलीच वेळ आहे तुम्हाला पत्र लिहायची .... फक्त प्रिय यासाठी लिहिले कि मला तुमच्या कुणा एका
बद्दल नाही लिहायचे , आणि तसेही तुम्ही सगळे एकच आहात  .. आपण सारी या एका देशाची बाळे !!
काय सांगू तुला देशा , इकडे परदेशात आले खरी पण तुझी आठवण मात्र अगदी प्रत्येक क्षणाला येत असते , इथे अगदी छोटी गोष्ट दिसली तरी त्याची तुलना  तुझ्यासोबत होतेच होते ...
इथे जेव्हा आले त्यावेळी सगळे खूप नवीन होते ,सगळीकडे शांतता , स्वच्छता होती आताही आहे आणि ते पाहून वाटते की हे सगळे तुझ्याकडे का नाही ? 
टापटीपपणा तुझ्यात का नाही , नेहमी इतका का तू  गरीब बिचारा दिसतो ? बघेल तिकडे सगळीकडे नुसता पैसा पैसा करणारी लोक ... इकडे आल्यापासून विचार करायला खूप वेळ मिळतो रे देशा म्हणून जास्तीत जास्त तुझाच विचार येत असतो ...
आता तू म्हणशील कि हे सगळे मी करतो का? तर नाहीच तू करत नाही ... तुझ्या आत लपलेली एक कीड आहे वाळवी आहे ती हे सगळे करते .. काहीतरी करायचे आहे रे हे कीड घालवण्यासाठी तूच सांग आता काय करू ते असेल तुझ्याकडे एखादा उपाय तर नक्की कळव ...
पण तुझ्याइथे माझा जन्म झाला हि माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे , तुझ्यासारखे स्वातंत्र्य , आपलेपणा , वेगवेगळेपणा  दुसरीकडे कुठे पाहायलाही मिळत नाही .. तुझ्यात हि माणसांना तुझ्याकडे धरून ठेवण्याची जी शक्ती आहे ना ती खरेच खूप अफाट आहे , माझ्यासारखे खुपजण आज तुझ्यापासून दूर असतील पण त्या सगळयांना तुझी ओढ खूप आहे ... खूप दिवसानी तुझ्या जमिनीवर पाय ठेवला कि आईच्या कुशीत गेल्यावर वाटते ना  तसे वाटते , सगळ्याच बाबतीत तू नेहमी आघडीवर असतो पण काहीना ते बघवत नाही म्हणून तुझी काळजीही वाटते पण हा विश्वास आहे कि तू सगळ्यांना नक्की पुरून उरणार !!! 
तुझं झाले रे सगळे विचारपूस करून आता महाराष्ट्रबद्दल काही नाही  विचारले  तर त्याला वाईट वाटेल .. 
अरे तो कसा आहे ? काय चालू आहे तिकडे , यावर्षी पण दुष्काळ का ? उन्हाळ्यात खूप हाल होतात रे !! 
पाणी , वीज सगळ्याचीच मग बचत कम कापाकापी चालू झाली असेल हो ना ? 
इकडे काय वीज कधी जात नाही बघ  , काय करून ठेवले आहे या लोकांना विचारायलाच हवं ... 
आणि पाणी तर इकडे विकत घ्यावे लागते , महिन्याला बिल येते त्याचे मग अगदी सांभाळून वापरते .. तसेही तुझ्यामुळे मला पाणी पहिल्यापासून जपून वापरायची सवय आहे तीच इकडे कामी येत आहे .. 
पण तुझ्याबद्दल मला एक खूप वाईट वाटते बघ इकडे कुणी जास्त मराठी बोलणारी मला मिळतच नाही ... कधी कधी तर वैतागून असे वाटते कि आपणच एक मराठी शाळा सुरु करावी .. त्यानिम्मिताने तरी मला कुणीतरी माझ्याशी आपल्या भारी शब्दांत बोलणारे मिळेल ... पण काय रे ऐकते ते खरे आहे का ? कि म्हणे तुझ्यातच मराठी शाळा कमी  होत जात आहेत ? का रे बाबा !!! त्यांना सांग कुठेही गेले तरी आपली ती आपलीच असते .... समजतील रे सगळे कारण ती आहेच तशी अमृताहुनी गोड .... !!!!
आता मला सांग माझी सांगली काय म्हणते खूप दिवस झाले तिलापण भेटून ... अरे आपली  कृष्णामाई आणि जिथे तासनतास वेळ घालवला तो गणपती बाप्पा काय कसा आहे ?  त्या सगळयांची पण खूप आठवण येते .. 
आणि ती भेळ , पाणीपुरी तर विचारूच नको कुठेही मिळाली नाही बघ अशी आजपर्यत !!!
कवठे महांकाळ रे जिथे आपण आपले बालपण घालवले ते कसे आहे रे !!! माझी जास्वदीं आहे ना तिथे फुले लागतात का रे तिला ? तुला आठवत ना उन्हाळ्यात किती लांबून पाणी आणून ती झाडे जगवली आहेत ... 
यावेळी तर तिकडे भरपूर पाऊसपाणी येउदे !!! माझी शाळा , मित्र मैत्रिणी कुणी दिसले तर सांग हं त्यांना मी आठवण काढत होते म्हणून !!! 
अजून खूप काही लिहायचे आहे पण काय आहे आंतरराष्ट्रीय पत्र आहे .. जास्त लांबले तर कुणीतरी फोडून मध्येच वाचेल  ... तुझ्यापर्यंत पोहचायला तरी हवे ... 
असो , तू मात्र तुझी आणि सगळ्याचीच काळजी घे , तशी मी मजेत आहे पण तुझी खूप आठवण येते ,, तुझ्या या लेकीला विसरू नको .. तुझा आशिर्वाद असुदे !!!

तुझीच लाडकी लेक ... !! Tuesday, March 21, 2017

अमिश फार्म

सुट्टी असली कि फिरायला जाणे असतेच , थंडीत नको वाटते जायला तसे आता कमी व्हायला हवी थंडी पण अजून तर काही लक्षणे नाहीत ... आणि शनिवार रविवार कुठे बाहेरचा प्लॅन ठरवला कि त्या आधी २ दिवस बर्फ पडणारच  ..  यावेळी पण तसेच झाले पण आधी ठरल्यामुळे आम्ही फिलाडेफिया , अमिश फार्म , आणि वॉशिग्टन अशी टूर होती ... 
टूरने जायचे असेल तर चायनीज टूरच आपल्या खिशाला परवडतील अशा आहेत , आणि मुख्य म्हणजे त्याची सर्व्हिसपण छान  आहे . १ , २ , ४ दिवस जस आपल्याला हवं असेल त्या टूर आपण घेऊ शकतो .. 
आमची २ दिवस टूर होती त्यात पहिल्या दिवशी प्रिन्सटन युनिव्हर्सिटी , आणि आमिष फार्म , तर दुसऱ्या दिवशी फक्त वॉशिंग्टन अशी होती .. 
सकाळी ८ ला आम्ही आमच्या स्टॉपवर पोहचलो ठरल्याप्रमाणे आमची गाडी आली , पण नेमके आम्ही सोडून दुसरे एक भारतीय होते ते मात्र आपल्या इंडिअन टाइम या उक्तीला जागून अर्धा तास लेट आले ,, 
एकतर सगळी कडे बर्फाचे डोंगर  नाहीतर बर्फाची चादर इतकेच खिडकीतून बाहेर दिसत होते  आणि त्यात पाऊस ... 
या सगळ्यात तो गाडी चालवणारा शूरवीरच म्हणायला हवा इतक्या धुक्यात पण तो खूप सफाईने गाडी चालवत होता .. पहिला स्टॉप युनिव्हर्ससिटीचा होता ,पाहायला वेळ खूप कमी आणि आतून ती पाहायला नाही आली त्यामुळे त्याची इतकी मजा नाही आली , हा पण परिसर खूप मोठा आहे  .... 
मला या आमच्या टूर मध्ये आवडलेले सगळ्यात मस्त ठिकाण म्हणजे , आमिष फार्म .... 
 पेनसिल्व्हेनिया मध्ये आहे हे फार्म ..
एक वेगळ्या लोकांची वेगळी दुनिया आहे इथे . या टूर च्या लोकांसोबत गेले ना एक मोठी अडचण असते ती म्हणजे ते जेव्हा माहिती देत असतात त्यावेळी ते सारखे चायनीज आणि इंग्लिश अशा उड्या मारत  असतात म्हणजे दोन्ही भाषेत बोलत  असतात त्यातल्या त्यात त्यांची जास्त ... त्यामुळे थोडेफार डोक्यावरून जात होते काही काही कळाले ... 
आमिष हि एक जमात आहे  साधारणपणे त्यांनी  गेल्या ३०० वर्षांपासून त्यांचा इतिहास जपून ठेवला आहे .. 
" जगात रहा पण जगाचे बनून राहू नका " असे काहीसे या लोकांचे म्हणणे आहे आणि त्याप्रमाणेच हे जगतात. 
 आजहि ते सोलरचा उपयोग करून वीज तयार करतात , त्यांचा स्वयंपाकही तसाच करतात जितके नैसर्गिक आहे तितका त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतात , 
जास्तीत जास्त डिझेल जनरेटर , प्रोपेन गॅस सोलर वापरतात .. 
इतक्या मरणाच्या थंडीत कशी काय हे हिट तयार करतात खरेच तो देव जाणे .. 
स्वयंपाकघरा सगळ्यात मोठे असते , जास्तीत जास्त  त्यांचा वेळ इथे जातो  .. म्हणजे अगदी शिवणकाम , विणकाम ,झोप ..... 
इथे या मुलांना फक्त ८वी पर्यंत शाळा असते  आणि तेही एका खोलीत !!!!! त्यानंतर जर एखाद्याला शिकायचे असेल तर तो शिकू शकतो ,, पण लहानपणापासून  यांच्यावर असे संस्कार केले जातात कि पुढे कुणी शिकतच  नाही .... 
 आजच्या जगात मोबाईल , नेट यापासून माणूस राहू शकत नाही पण हे लोक त्याच्यापासून कोसो दूर आहेत या सगळ्या गोष्टींशी त्यांना काही देणे घेणं नाही ..  अगदी टि .व्ही  नाही .... 
बाहेर जाण्यासाठी सुद्धा हे घोडागाडीच वापरतात , कार , बाईक वापरणे म्हणजे आपण आपल्या माणसापासून दूर जात आहोत असे त्यांना वाटते ... 
तिथे एक विणकामाचा नमुना पाहायला मिळाला  खूप सुरेख होता , आणि हे लोक खूप छान छान वस्तू बनवतात कोणतंही मशीन न वापरता ... 
कपडे शिवण्यासाठी आपल्याकडे जसे मशीन असते तसे इथे बऱ्याच घरात दिसते  ..  इथल्या कुठल्याच कपड्याला चेन नावाचा प्रकार नसतो ,, फक्त बटणे 
आणि कलर अगदी चारपाच , निळा,  पांढरा, काळा , पिवळा  असे ...यांच्याकडे त्याला अर्थ कलर म्हणतात ..  तेही पूर्ण प्लेन कोणतेही नक्षीकाम नाही
 .. लग्नापूर्वी मुलींना  नेहमी पांढरा ऍप्रॉन घालावा लागतो , आणि नंतर काळा  यावरून त्यांच्या लक्षात येते कि लग्न झाले आहे कि नाही .. मुलांच्या बाबतीत  पण त्यांना लग्नाआधी दाढी मिशी काही ठेवता येत नाही  आणि लग्नानंतर फक्त दाढी ठेवायची मिशी नाही ...    
हे लोक कोणतेही दागिने घालत नाहीत ... ( किती पैसे वाचत असतील नै ) मुलींना केस कापायला बंदी असते ...  आणि विशेष म्हणजे हे  लोक स्वतः चे फोटो अजिबात काढत नाहीत , आणि आपण तिथे फोटो काढत असताना खूप काळजी घेऊन काढावे लागतात ... 
या लोकांचे चर्च असे कुठंही नाही , कुणाच्या एकाच्या घरी जमा होऊन प्रार्थना करतात ... 
 यांच्या मुलांवर कोणतेही बंधन नसते कि तुम्ही हा धर्म स्वीकार करा ... जर इच्छा असेल तर घ्या नसेल तर नको पण ९५ % मुले हा त्यांचा वारसा पुढे चालवतात ... 
 किती वेगळी लोक , वेगळे आचार विचार .. पण आजच्या जगात सुद्धा हे तग धरून आहेत खरंच स्वतःला सगळ्या मोहापासून दूर करून , फक्त स्वतःला  आपल्या माणसासोबत ठेवणे हि कला जोपसायला नककीच हवी 


Friday, March 10, 2017

एका मांजराची लगीनघाई

" आमची मनी  जात्याच हुशार हो म्हणूनच तर इतका हुशार नवरा पदरात पडला न नाहीतर आहेच कि ती शेजारची बया काय हाल करून घेऊन आलीय !!!" मंजुची आजी तिच्या मैत्रिणीला सांगत होती ..
मंजूला मनी म्हणणारी एकमेव तिची आजी बाकी सगळे तिला मंजूच म्हणायचे . 

आज त्यांच्या घरात तिच्याच लग्नाची गडबड चालू होती , पुढच्या आठवड्यात दारात लग्न होते , मांडव तोरण सजले होते ..  पै पाहुणे हळू हळू जमा होत होते ,, कुणाचा म्हणून कुणाला ताळमेळ नव्हता .. सगळे आपले एकमेकावर आपली कामे ढकलण्यात मग्न !!! मंजूच्या आईचा आणि भावाचा मात्र कामं करून पिट्टा पडत होता , तिचे वडील म्हणजेच आण्णा तर फक्त बाहेरच बघण्यात आणि या दोघाना ऑर्डरी सोडण्यात मग्न ... 
कमी काय म्हणून आजी होतीच !!!
पण आजीला तिची मनुबाय मात्र लै प्रिय !! आता आपली नात परक्या घरी जाणार म्हणून तर तिचं सगळं लक्ष तिच्या मनीवर लागलेलं !!!
आणि या मंजूबाईच तिच्या मनीवर !!! म्हणजे तिची आवडती मांजर ... 
तिला याची काळजी लागली होती कि आपली मनी आपल्यासोबत सासरी येणार कि  नाही ? , तस तिने आपल्या आईला सांगितले पण होते कि , " हे बघ मम्मे , कुणाला माझी पाठराखीण म्हणून पाठव नायतर नको पाठवू पण माझी मनी मात्र मला माझ्याबरोबर यायला हवी " 
आता त्या बिचाऱ्या आयेने कुणाकुणाचे म्हणून टेन्शन घ्यायचे तिलाच समजत नव्हते .. 
तशी मंजू तिच्या नवऱ्याला पण सांगत होती फोनवर कि मला माझी मनी  पाहिजे !!
तिकडून त्याला काय वाटले कुणास ठाऊक हिच्या आधी तोच तिला लाजत म्हणाला ," अग अजून आपलं लगीन तर होउदे !" 
तशी एकदम हि उसळलीच , तुमच्या जिभेला काही हाड ? मी माझ्या मांजर मनीबद्दल बोलतीय  !! 
तसा नवरा गार पडला कारण नवऱ्याला आपल्या आईची काळजी तिचं आणि मांजराचा जमायच तर म्हणजे  हाडवैरी असल्यासारखे .. 
आता त्याची  अवस्था इकडं आड अन तिकडं विहीर !!

सगळी काम होऊन झोपायला तसा जरा उशीरच झाला उद्या लग्न .कोण कुठं कस जागा मिळेल तस झोपत होत , इकड मंजुला जागा सापडना मग आजीच्या खोलीत आपल्या मांजरीबरोबर पथारी पसरली तिनं .. 
पण ती मांजर काय एका ठिकाणी थांबेना मंजुला काळजी कुठं पळून गेली तर ??  
हि आपली जातीय  तिच्या तिच्या मागं मागं आजीच्या कॉटखाली ,, शेवटी वैतागून तिला कधीतरी झोप लागली... 
तर त्यावेळी पहाटे सगळी उठायच्या गडबडीत ... आणि हिची मांजर आली कुणाच्या तर पायात , तशी मांजर घाबरून टुणकन उडी मारून घराच्या बाहेर ...  

सगळी एक एक करून उठून आवरत होती तर मंजुचा अजून पत्ता नाही , अन कुणाला कुठं दिसली पण नाही सकाळ पासून .. तिच्या आईनं तर सगळं घर पालथं घातलं .... 
घरात ढिगभर माणसं ,, कुणाला विचारवं तर आपलीच अब्रू जायची म्हणून कसबस तिच्या भावला तेवढं सांगितलं अन दोघे मिळून तिच्या शोधला लागले .." तसा तिच्या आईच्या मनात विचार आला पोरगी मांजरामुळ  तर .... "  पण स्वतःला समजावून परत कामाला लागली !!! 
आजी सगळयांची विचारपूस करत बाहेर आली , अन तिनं कुणाला तरी विचारलं , " अर आमची मनी दिसली का ?"
तस कुणीतरी म्हणली होय सकाळीच बाहेर पळून जाताना पहिली कि तिला मला वाटलं काहीतरी झालं असल म्हणून गेली बाहेर ....  !!!!
तसा आजीनं दंगा चालू केला , अगं  सुनबाई कुठं गेलीस ,इकडं तुझी लेक पळाली तरी तुला पत्ता नाही आता कस  व्हायच , अक्क्या खान्दानाचे नाव पोरीने धुळीला मिळवलं ... 
दंगा ऐकून तिची आई भाऊ , आण्णा सगळी बाहेर आले .. 
अण्णा तर सगळं खापर बायकोवर फोडत  तुझा लाड नडला पोरीला , आता गेली ना पळून आमच्या तोंड़ला काळ फासून .. 
तशी आई ओरडलीच , तरी म्हणलं होत ना ते काळ मांजर आणू नका  घरात , लागला पोरीला तिचा जीव अन गेली पळून तिच्यामाग .... 
काय मांजराच्या माग ? आजीनं अगदी जोर लावून सुरात विचारलं ... 
तशी सुनबाई म्हणली , " मग काय तर जेंव्हापासनं हे लगीन ठरलंय पोरगी मला रोज म्हणतीय मम्मे पाठराखीण नाही पाठवली तरी चालेल पण माझी मनी  पाहिजे मला " काय खुळ डोक्यात घेऊन बसलीय देव जाणं !!!
इकडं मंजूला तर पत्ता नाही तिच्यामुळे घरात केवढा गोंधळ चाललाय ... ती घोरत आजीच्या कॉटखाली ... 

"मंजूच सासर जवळच नाही म्हणल तर तिकडं पण तासाभरात खबर पोहचणारच " असं कुणीतरी म्हणलं .... 

तितक्यत मंजूचा होणार सासरा गाडी घेऊन दारात हजर .... कुणीतरी शहाण्यान त्यांच्याकडचं फोन करून विचारलं होत म्हणे कि मंजू  आलीय का ?.. 
मंजूच्या बापाला तर काय बोलावं समजना... तो मूग गिळून गप्प .... 
तशी तिची आई म्हणली , " पावणं पोरगीला मांजराचा लै लळा बघा ती गेली म्हणून तिच्या मग कुठंतर गेली बघा पोर ....  तस तिन सांगितलं होत जावईबापूना  कि तिला मनीला घेऊन यायचं म्हणून .... "
सासरे काही बोलणार इतक्यात मनी , टुणकन उडी मारून आजीच्या खोलीत कॉटखाली जाऊन मंजुला बिलगली .... 
सगळी त्या मनीच्या मागं आली तर मंजू कॉटखाली ...!!!!
तशी आईन तिला जवळजवळ कॉटखालनं बाहेरच ओढलं .... 
अग आजे मी मगाशी तुला मांजरीबद्दल बोलली  मनी म्हणजे .... मंजूबद्दल नाही .. पण तुम्ही सगळ्यांनी इतका दंगा चालू केला कि मला कुणी काय परत बोलूनच नाही दिलं ... ती मघाची कुणीतरी बोलली 
तशी आजी त्याच्यावरच उसळली , " अग बये  , मी मंजुला मनी  म्हणते ते माहित नाही काय  तुला  ? "
 सगळीच हसू लागली अगदी मंजुचा सासरा पण ... 
तसा हसत हसत तिला तो म्हणाला , सुनबाई येताना घेऊन या तुमच्या त्या मनीला , नायतर परत समंध रामायण घडायचं ... !!!!
मंजुला तर लक्षातच येत नव्हतं कि काय चाललंय ते !!! पण कशामुळं का असना तिला मानिला घेऊन जायला मिळणार होत ... 
म्हणून तर म्हणलय ना ऐकू आलेली प्रत्येक गोष्ट खरी असतेच असं  नाही ,,, त्यापेक्षा वेगळी दुनिया दिसू शकते नाही का ?

Wednesday, March 8, 2017

न्यू इनींग

आई ,  येतो ग भेटू संध्याकाळी !! असे  म्हणत मीराची दोन्ही मुले कॉलेजसाठी बाहेर पडले ..
तितक्यात आजी विचारत  आल्याच , " झाला का ग चहा ? " 
हो देतेच म्हणत मीराने त्यांचा आणि तिच्या नवऱ्याचा अजयचा  चहा टेबलवर ठेवला ... 
आणि परत स्वयंपाकघरात गेली अजयचा डबा भरला आणि स्वतःचे  आवरू लागली . 
मीरा ,अजय त्यांची दोन मुले आणि सासूबाई इतके छोटे कुटुंब ,, मीरा आणि अजय जॉबसाठी म्हणून बाहेर असत तर मुले  त्याचे कॉलेज , प्रोजेक्ट यासाठी .... 
रात्री जेवायच्या वेळीच सगळे थोडावेळ एकत्र भेटत .. नंतर मग सगळे आपापल्या कामात .... 
दिवसभर आजी एकट्याच घरी !!!
थोड्यावेळात मीरा आणि अजयही बाहेर पडले ,, आता नेहमीसारखेच तो मोठा फ्लॅट आणि आजी .... 
त्यात आजींना खूप बोलायची सवय , आधी शेजारी पाजारी होते , कुणी ना कुणी ओळखीचे घरी येत कधी आजी जात त्यांच्या घरी पण आता सगळेच बंद झाले होते या फ्लॅटमध्ये आल्यापासून .... 
नाही म्हणायला संध्याकाळी थोडावेळ खाली फेरफटका मारण्यासाठी जात पण वयामुळे जास्त चालणे होत नसे , मग बागेत बसून लहान मुलाचे खेळ बघत .... !!! 
पूर्वी स्वतःसाठी असा कामाच्या रगाड्यातून वेळ मिळत नसे आणि आता मिळतो आहे तर त्याचे काय करायचे हा नेहमीच प्रश्न ??
तसे मीराला आपल्या सासूबाईंच्या या अस्वस्थेबद्दल माहिती होती , आणि हेही माहिती होते कि आजी त्यांच्या सगळ्यांच्या हट्टामुळे तिथे राहत आहेत .... 
तसेही ती विचार करतच होती कि त्यांचा वेळ जावा म्हणून काय करता येईल ... ?? पण सुचत नव्हते ... 

 आज मीराला जास्त काही काम नव्हते त्यामुळे  तो वेळ घरी जाऊन आजीसोबत घालवावा म्हणून ती लवकर निघाली , जाता जाता आजींना आवडणारा ढोकळा घेतला आणि घरी पोहचली ... 
दुपारची वेळ होती आजी झोपल्या असतील म्हणून तिने बेल न वाजवता स्वतःच कुलूप काढले ... 
घर अगदी शांत होते , आजी झोपल्या असतील म्हणून त्यांच्या खोलीकडे गेली तर तिकडे पण कुणी नाही .... 
" सहसा त्या न सांगता कुठे बाहेर जात नाहीत मग  आज अचानक कुठे गेल्या ? "  मीरा स्वतःशीच बोलत होती 
तिथेच तिला त्यांच्या जुन्या सामानाची बॅग दिसली , त्यात त्यांचे दागिने , साड्या , जपून ठेवलेल्या बऱ्याच गोष्टी होत्या ... 
ते बघून तिला जरा जास्तच काळजी वाटली .... एकदा तिला वाटले कि अजयला सांगावे फोन करून पण आधी जरा आजूबाजूला पाहू मग बघू असा विचार करून त्या शेजारी आहेत का पाहण्यासाठी गेली तर तिथे कुलूप होते ... 
आता कुठे शोधायचे म्हणत ती खाली गेट जवळ पोहचली तिथे तिने वॉचमन जवळ चौकशी केली तर तो म्हणाला ... 
आजी ना गेल्या आठवड्यापासून रोज दुपारी ते सोसायटीचे मंदिर आहे तिकडे जातात .... 
हे ऐकून तिला थोडे हायसे वाटले ,, तसे ती झपाझप पावले टाकत देवळाकडे गेली . तर तिथे एक आजी नाही तर खूप आज्या होत्या ,, आणि आज त्यांच्यातील प्रत्येकजण नटून थटून आली होती अगदी सगळं साज शृंगार करून ... त्यात आजीही होत्या ... 
आज कितीतरी दिवसानी मीरा त्यांना या अशा  सवाष्ण रूपात पाहत होती , एक वेगळेच तेज होते त्यांच्या चेहऱ्यावर .. घरात असतात त्यापेक्षा कितीतरी जास्त खुश दिसत होत्या त्या !!!
पण मीराला समजत नव्हते कि त्यांचे सगळ्याचे हे काय चालू आहे ते ?
सगळ्याजणी गोलाकार करून बसल्या होत्या ,, आणि आपण पूर्वी कशा होतो याची एकमेकींना ओळख करून देत होत्या अगदी लहान असल्यापासुन ते आतापर्यंत ... 
नवरा होता तोपर्यंतचे आयुष्य आणि आताचे यावर बोलताना प्रत्येकीचे डोळे भरून येत होते ... ! त्यांच्यातील प्रत्येकजण आजच्या या रूपात आपल्या स्वतःला शोधत होते आणि त्यांची ती धडपड मीराला अगदी स्पष्ट दिसत होती एक वेगळाच सोहळा तिकडे चालू होता , आणि इकडे मीराचे डोळेही भरून आले .!!!!!!
प्रत्येकाची ओळखपरेड संपली आणि आजी उठल्या .. त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरत होती , तिथे काम करणाऱ्या बायका आणि त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी त्या सगळ्या प्रयत्न करणार आहेत हे मीराला त्यांच्या बोलण्यातून समजले .... 
नंतर सगळ्याजणी हळूहळू जाण्यासाठी उठू लागल्या तशी मीरा धावत आपल्या घरी पोहचली ... 
आजी घरी आल्यातर घराचे दार उघडे .. ते बघून त्यांना काही सुचेना त्यांना वाटले कि आपण कुलूप लावायचे विसरून खाली गेलो कि काय ? अरे देवा आता थोड्यावेळात सगळे येतील असे घरचे दार उघडे राहिलेले त्यांना कळले तर काय म्हणतील मला असा विचार करतच त्या आत गेल्या ... तर समोर मीरा उभी !!!!
तिला पाहून तर त्या थंडच पडल्या ,, काय बोलावे ते समजेना !!
शेवटी मीरानें  त्यांना बसवले पाणी दिले तेव्हा कुठे त्या शांत झाल्या ... 
मीरा त्यांच्याकडे एकटक पाहत होती , तीच डाळिंबी रंगाची साडी , कपाळाला ठसठशीत कुंकू , हातात बांगड्या ... तिला त्यांचे तिच्या गृह्प्रवेशावेळचे रुपडे आठवत होते ... तिचे तसे बघणे पाहून आजीला लाजायला झाले .. तेव्हा तर त्या आणखीच गोड़ दिसत होत्या .. 
त्या तिथून आत जाण्यासाठी उठल्या तर मीराने त्यांना थांबवले .. 
त्यांना वाटले सून आता ओरडणार कि सगळ्या सोसायटीत आमच्या अब्रूचे धिंडवडे काढले म्हणून ... पण मीरा तशी नव्हती हे माहित होते त्यांना ....... पण असे पाहून कदाचित ती चिडली असेल असे त्यांना वाटत होते ... 
" आई तुम्ही खरेच किती करता हो सगळ्यांसाठी ?" हे मीराच्या तोंडून ऐकताच आजी सावरून बसल्या .... 
आता वर येताना आपली कामवाली भेटली तिने सांगितले कि , तुम्ही तिच्या मुलाला शिकवता म्हणून !!! 
आणि आता फक्त तिच्या मुलाला न शिकवता सोसायटीत जे जे कामाला येतात त्यांच्या मुलांना  शिकवणार आहे ,, आणि त्यांच्या आईला सुद्धा !!! 
आज जो तुमचा कार्यक्रम सुरु होता तो पहिला , पहिले थोडे विचित्र वाटले पण नंतर कळाले कि तुम्ही असे का केले !! ती स्वतःला मॉड म्हणवून घेणारी ऋतू तिने तिच्या मुलाच्या वाढदिवसदिवशी सगळ्यांसमोर औक्षण करताना तिच्या सासूचा  अपमान केला ,, आणि तेव्हापासून तिची सासू खूप डिस्टर्ब असायची कुणाशी काही बोलत नव्हती ,, म्हणून मग या निम्मिताने का होईना सगळयांचे मन हलके होईल , त्याच्या जुन्या आठवणी पुन्हा जागवता येतील म्हणून हे सगळे तुम्ही केलंत ... 
अगदी हा तुमचा ग्रुप सुरु करण्यापासुन .... आई खरेच खूप कौतुक वाटते तुमचे .. मला स्वतःला इतके अपराधी वाटायचे कि आम्ही तुम्हाला इथे बळजबरीने ठेवून घेत आहे पण आता खरेच खूप कौतुक वाटत आहे तुमचे .... 
मीराला शब्द कमी पडत होते आपल्या सासुचे कौतुक करायला .... 
बोलता बोलता तिने आणलेला ढोकळा त्यांच्यासमोर धरला .. आणि एक हाताने त्यांचा हात हातात घेऊन  आई ऑल द बेस्ट फॉर युर न्यू इनींग  असे म्हणत तो कापला .... 
तो कापताना दोघीही एकमेकींकडे बघत हसत होत्या फक्त ते हसू होते काहीतरी गवसल्याचे !!!!
Tuesday, March 7, 2017

सरप्राइज

"अमित , आज ऑफिसमध्ये एक कार्यक्रम आहे महिलादिनाचा त्यामुळे मला यायला थोडा उशीर होईल . " असे सीमाने घरी फोन करून सांगितले . ऑफिसचा कार्यक्रम खूप छान झाला त्यांना सगळ्यांना फुले दिली . थोडी भाषणे नेहमीप्रमाणे महिलांसोबत कसे वर्तन केले पाहिजे त्यांचा मान सन्मान ................ चला "बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले" म्हणत सीमा तिथून निघाली ट्रेन मध्ये गर्दी थोडी कमी होती पण बसायला जागा नाही . ती तशीच एका सीटचा आधार घेत उभी राहिली . तिच्यासमोरच एक बाई तिच्या लहान मुलीला घेऊन उभी होती. तिची उभी राहण्यासाठीची कसरत पाहून सीमा ला वाईट वाटले . त्या बाई समोरच दोन पुरुष आणि एक बाई बसली होती . ते पुरुष कदाचित त्या उभ्या असलेल्या बाई सोबत बोलत होते कदाचित ओळखीचे असतील पण तिला बसायला जागा देत नव्हते .आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या बाईच्या चेहऱ्यावर असे भाव होते कि ओळखीचे तिला जागा देत नाहीत तर मी का देऊ ? सीमा स्वतःशीच हसली आणि विचार करू लागली आज सकाळपासून स्त्री शक्ती जिंदाबाद , स्त्रियांचा आदर करा , त्यांना सन्मानाने वागवा . हैप्पी वुमेन्स डे अगदी पाऊस पडला आणि आजच संध्यकाळी त्याचा असा चिखल झालेला दिसतो आहे. सगळे नुसते बोलण्यापुरते कृती मात्र काहीच नाही . इतक्यात तिचे स्टेशन आले म्हणून ती उतरली . आता काय घरी जाऊन स्वयंपाक ,उद्याच्या डब्याची तयारी , जाताना भाजी घेऊन जायची असे विचार करत ती रोड पार करत होती तोच एक गाडी तिच्या समोर आडवी आली. ती अडखळून थोडी मागे झाली आणि रागाने त्या गाडीवाल्याला ओ मिस्टर!! म्हणून बोलणार तोच तिचा नवरा बोला मिस्सेस" करत हसू लागला ती थोडी आश्चर्यने त्याच्याकडे पाहू लागली . तर तोच उतरला ," कधीतरी करावी बायकोची सेवा , मग पुढच्या जन्मी देव चांगली बायको देतो !" असे म्हणत तो मिश्किल हसला .तिनेही लटक्या रागाने त्याच्याकडे पहिले . बसा लवकर नाहीतर मामा येतील , आणि आपली कन्या वाट बघत असेल . असे म्हणताच सीमा गाडीवर बसली . आज बेल वाजवायच्या आधीचे आर्याने दार उघडले , समोर welcome होम मिनिस्टर चा बोर्ड बघून तिला धक्काच बसला आज कुछ तो गडबड है म्हणत आत गेली तर सगळे घर लकाकत होते . ती आणि तीच दिसत होती सगळीकडे . आर्याने पाणी दिले अजून या धक्क्यातून सावरत होती तोच मागच्या महिन्यात तिला आवडलेली साडी पण काही कारणामुळे ती न घेताच परत आली होती , तीच तिच्या हातात अमितने दिली . आर्या तिला जबरदस्तीने तयार व्हायला आत घेऊन गेली . सीमा तयार होऊन आली आणि टेबलवर सगळी तिच्या आवडीची पक्वाने तिची वाट बघत होती . आर्या आणि अमित सीमाला काही बोलूच देत नव्हते तिला मिळत होते ते धक्यावर धक्के ..... जेवण झाल्यावर तिच्या आवडीचे आइस क्रीम ते खात असताना ,,, तिला झालेला आनंद तिच्या डोळ्यात दिसताच आर्या बोलली " आई, तुझी डेलीसोप आज नको ग " तुझ्या बाबासाराखीच बोलयला शिकली म्हणत सीमाने तिला जवळ घेतले आर्या म्हणाली , आई आज बाबनी सुट्टी घेतली होती तुला न सांगता , आणि सविता काकुना पण सुट्टी दिली सगळी कामे आज त्यांनी केली आणि....... इतक्यात अमितने तिचे बोलणे तोडले तो बोलला , मग सविता काकूहि आहे न त्यांच्या घराची होम मिनिस्टर.... ... आणि आर्या आता तुझ्या बी बी सी न्युज बास कर आणि झोप ...!! सीमाला वाटत होते कि हळू हळू चिखलात कमळ उमलत आहे .....

Saturday, March 4, 2017

भेट

आम्ही दोघेही एका वेगळ्या दुनियेतील माणसे , अगदी वेगळे विचार , आचार तर त्याहून वेगळे ...
मी अगदी  हातात येईल तो ड्रेस घालणार त्याला इस्त्री असो व नसो आणि  फॉर्मल पासून चार हात दूरच . 
तर ती मात्र टापटीप तिला सगळे कसे जागच्या जागी लागायचे , ऑफिसमध्ये कधीही आली तरी हसरा चेहरा एका हातात पर्स , ड्रेसला मॅचिंग असा हलकासा मेकअप .. 
आमची मैत्री कशी आणि कधी जुळली हे एक कोडेच आहे ,   जसे विरुद्ध मॅग्नेट एकमेकांकडे ओढले जातात तसे आम्ही ओढले गेलो , हा पण मैत्रीच्या पुढे कधी गेलोच नाही , जरी मनात असले तरी मी नाही बोललो आणि ना ती !!!!
तसे आम्ही दोघे खरेच वेगळे तो खूप साधा पण तरीही सगळ्या गोष्टीत अप टू डेट कधी काही विचारले तर नेहमी उत्तर तयार , खरे तर अशी अजागळ राहणारी माणसे मला आवडायची नाहीत कारण मी नेहमी छान आवरून तयार असायचे आणि पुढचाही तसाच हवा हा माझा हट्ट असायचा  पण याची गोष्टच काही वेगळी होती कितीही आळशी असला तरी त्याच्यात नक्कीच काहीतरी असे होते कि मी त्याच्याकडे ओढली जायचे .. 
आज खूप दिवसांनी त्याला फोन केला , का माहित नाही पण करावासा वाटला . 
 त्याने माझा आवाज ओळखला असे वाटत नाही , ते त्याच्या आवजावरूनच समजले.... 
त्याच्याशी बोलताना एक वेगळेपणा वाटत होता , कधी कधी आपल्या खूप ओळखीच्या माणसांना भेटावे असे वाटते ना तसेच काहीसे वाटत होते , शेवटी विचारलेच त्याला भेटूया का थोडावेळ ? 
तोही हो म्हणाला .... आता वाट पाहत बसले आहे आमच्या नेहमीच्या कॉफीशॉप मध्ये ..... 
आज जेव्हा तिचा फोन आला त्यावेळी दोन मिनिटे समजलेच नाही कुणाचा आवाज आहे ते !!! खूप दिवसानी फोन केला तिने ,,, तसा मीही नाही केला...... 
तशी खूप कारणे देता येतील मला पण तिच्याबद्दल खोटे बोलून माझ्या मनालाच मला नाही फसवायचे .. 
पण खरे सांगायचे तर माझ्या कामाच्या गडबडीत ती खरेच कुठंतरी मागे पडत चालली होती ... तिची आठवण येत नव्हती असे नाही  पण वेळच नाही ,
आज जर तिने कॉल केला नसता तर कदाचित आम्ही भेटलो नसतोही .... 
आज तो भेटला खूप दिवसानी .... छान वाटले त्याच्याशी बोलून खूपच बदल झाला आहे त्याच्यात पूर्वी अगदी फॉर्मलपासून दूर पळायचा पण आता मात्र छान दिसत होता आज फॉर्मलमध्ये , बोलण्याची ढब अगदी प्रोफेशनल झाली आहे . ते टाळी देऊन बोलने खूप मागे पडले वाटत .... नाकावरचा चष्मा मात्र त्याच्या कामाच्या धावपळीची जाणीव करून देत होता .. याच कॉफीशॉपमध्ये पूर्वी आमच्या तासन तास गप्पा रंगायच्या पण आज एक ताससुद्धा जास्ती झाला होता ..... 
त्याला भेटून खरेच खूप मस्त फीलिंग आले अगदी आपल्या ओळखीतले कुणीतरी जुने आपले भेटल्याचे .... 
आज ती भेटली , थोडी वेगळीच दिसत होती म्हणजे केस मागे वर टांगलेले , आधी जर ऑफिस मध्ये असे कुणी दिसले तर आम्ही दोघे मिळून त्याला कोंबडा म्हणू चिडवत असू .... 
खूप शांत झाली आहे , कदाचित तिच्या कामामुळे असेल , पण कॉफी घेण्याची सवय मात्र आहे तशी आहे आमच्या तासभराच्या भेटीत सुद्धा अडीच कप कॉफी घेतली तिने .... 
पण तिला भेटून फ्रेश वाटले काम करायचा परत नवीन जोश आला .. 
जरी काही कारणासाठी त्यांच्या वाटा  वेगळ्या असतील पण कधीतरी वाटतेच एखाद्या आपल्या अशा माणसाला भेटावे त्याच्यासोबत बोलावे ,  मार्ग वेगळे आहेत पण त्यासाठी मने वेगळी असणे थोडीच गरजेचे आहे !!!!


Friday, February 24, 2017

महाशिवरात्र यात्रा

काही दिवस काही क्षण असे असतात कि असे वाटते कि आता डोळ्यासमोर आहेत . आज असे होण्याचे कारण महाशिवरात्र आमच्या गावाची यात्रा ........ मल्लिकार्जुनची यात्रा आजपासून सुरु होते पुढचे ५ दिवस कवठे महांकाळला ... लहान असताना या गोष्टीची खूप ओढ असते ना आजही आहे म्हणा . यात्रा म्हणून आमच्या शाळेला दोन दिवस सुट्टी त्याच्या आधी आमचे शाळेत प्लान्निंग कि नेहमीप्रमाणे आपण धनुच्या घराबाहेर भेटू तिथून पुढे यात्रा आणि आम्ही . महाशिवरात्रीदिवशी आम्ही अगदी ठरल्याप्रमाणे आई बाबा यांच्या सोबत जात असू . तिथे जाऊन देव दर्शन मग थोडे फिरणे काही घ्यायचे असेल तर ते आणि परत असे रुटीन .... महाशिवरात्री दिवशी मंदिरात एकदम शांत आणि गंभीर वाटे अगदी एक वेगळेच रूप त्या मंदिराचे बघायला मिळे. रात्री पासून अभिषेक सुरु असल्यामुळे ती पिंड इतकी तेजस्वी दिसत असे . बाहेर केलेला झगमगट आणि ती मोठ्या आवाजातील गाणी ..... दुसऱ्यादिवशी आमची सुरुवात संध्याकाळी ५ पासून सुरुवात आमच्या घरापासून कारण मीच सगळ्यात लांब राहत होते. मी गायत्रीच्या घरी तिथून ती आणि मी धनुच्या घरी आणि बाकीच्या मग स्वाती ,सायरा , लीना , मयुरी संज्ञा , दीपाली असे सगळे जमा झाले कि आमचा मोर्चा यात्रेकडे ... तिथून १० मिनिटा मध्ये आम्ही यात्रेतल्या गर्दीत मग एकमेकीचा हात धर किंवा प्रभातफेरी सारखे २-२ च्या जोड्या आमचा पहिला हल्ला असे तो तिथे लागलेल्या कानातले , गळ्यातले यांच्या स्टोलवर.. बापरे!! तिथे त्या लोकांना सारखे कमी कमी करा अहो नाहो ओ हे ना येते इतक्यात !!! असे अगदी ओरडून ओरडून सांगायचे ... नाहीतर आहेच पुढचा स्टोल असे करत खरेदी .... एक मात्र असे कि आम्ही सगळ्याजणी मिळून एकसारखे हातात बांधायचे धागे घेत असू आणि दुसऱ्या दिवशी शाळेत तो कोणत्याही परिस्थितीत बांधून यायचाच ... याला रूल किंवा आणि काही म्हणता येईल पण तो सगळ्यांच्या हातात बघून जाम भारी वाटायचे खरेदी झाले कि आम्हला बोलवू लागायचा तो उंच पाळणा .... काय मजा यायची त्यात ... कोलंबस , ब्रेकडान्स यात बसण्यासाठी गडबड यात भांडणेही त्या चालवणाऱ्या भैयासोबत इतकी व्ह्यायची आम्हाला एकत्र बसायचे असायचे आणि तो ऐकत नसे पण यात आम्ही कधीच compromise नाही केले जे असेल ते एकत्रच ... बंदुकीने फुगे फोडायचे , रिंग टाकणे ,,, आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे हिरालाल आणि पन्नालाल गाढव ..........
इतके फिरून फिरून भूक लागली कि भेळ , दाबेली, पाणीपुरी अगदी ओरडून ओरडून आपल्याला या या म्हणत आहे असे वाटायचे !!! बर तरी घरच्यांनी सांगितलेले असते बाहेर काही खाऊ नका धूळ असते खूप ... पण आम्ही अगदी यात्रेत आपापल्या मित्र मैत्रिणीसोबत आलेल्या बहिण भावाची नजर चुकवत अग थोडे अग थोडे करत जोर धरणार ......... खासकरून यात्रेत मला फुगा घायायला खूप आवडायचे आजही आवडते म्हणा त्यात वाळू भारेलेली तो येणारा आवाज it sounds crazy हो ना !!!! रात्री ९ नंतर घरी जाण्यासाठीची गडबड एकेक करत चालू अग चल ना जाऊ उशीर होतोय चल चला करत हातात कुल्फी आणि वाजणारा फुगा घेत घरी ... जाता जाता उद्याचे पाल्न्निंग उद्या पण आज केले असेच ना ग ... बर येते म्हणत कल्टी .......
आज खरेच परत एकदा इतकीच लहान होऊन तिथे जावेसे वाटत आहे .... खूप आठवण येतीय तुमच्या सगळ्यांची आणि आपण केलेल्या मजा मस्तीची .....

Thursday, January 5, 2017

बालपण देगा देवा

आज सकाळी सकाळी दीदीने हा फोटो पाठवला आणि दिवसभर आम्ही तिघे यावरूनच परत  भांडत बसलो !!
तसेही आमच्या घरात टीव्हीवेडी मीच जास्ती आणि त्यानंतर आमचे बंधुराज ,
अगदी सासू सून किंवा खूप विचार करायला लावणाऱ्या सिरिअल्स मी खूप कमी बघायचे , लहानपणी सोनपरी , सिम्बाचे कार्टून ,सिन्ड्रेला , शरारात अशा छान छान बघायचे आणि नंतर थोड्या रोमँटिक म्हणजे कशा तर मिले जब हम तुम , अरमान आणि रिधिमाची कोणतीतरी एक सिरीयल होती नाव आठवत नाहीय !! मस्त मस्त सिरिअल्स मी बघायचे आणि माझ्या भावाला वाटायचे कि किती रडक्या सिरिअल्स बघते हि आणि मग नेहमी आमच्यात भांडणे ,, त्या रिमोटची तर अवस्था काय असायची मी आधीच सांगितले आहे तुम्हाला आणि हो आमच्या बहीणभावाच्या प्रेमाबद्दल हि !!!
जर त्या रिमोटला पाय असते ना तर तो बिचारा नक्कीच आमचे घर सोडून पळाला असता !!
तर आमच्या बंधुराजांना मॅच नाहीतर तर wwf बघायचे  असायचे  ,,  बर जर मॅच चालू असेल तर ठीक ना बघायला मजा तरी यायची पण हा हिरो एकतर  जुन्या मॅचेस लावणार त्याही याला सगळ्या पाठ कधी कोण कसे कुठे कितीवर आऊट , किती रन्स सगळे माहित ,, त्याची लाईव्ह कॉमेंटरी आम्हाला ऐकायला लावायचा !!
इतका राग यायचा ना !!
मग कधी कधी हळूच मी जाऊन केबलची पिन काढून ठेवायचे ,सगळ्या टीव्हीवर मुंग्या ते पाहून असे वाटायचे कि केबलवाल्याची लाईट गेली , बिचारा  वाट बघून बघून  बाहेर जायचा तो  गेला कि मी पिन लावून माझ्या सिरिअल्स पाहत बसणार ,,  यात आमची दीदी  मात्र नामनिराळी तिला जे बघायचे असेल त्याची सवय ती आधीपासूनच मला लावायची त्यामुळे तिला अगदी आरामात बघायला मिळायचे सगळे !!
पण नंतर नंतर माझी ट्रिक आमच्या बंधूराजाना कळाली कारण त्याच्या मित्रांच्या घरी तर टीव्ही चालू असणार आणि आमचाच बंद !!!! त्यामुळे  बाहेर जाताना रिमोट लपवून जाणार ,  तो येईपर्यंत मला  काही रिमोट  मिळायचा नाही !! यावेळी  दीदीचे  खोबरे तिकडे चांगभले असे !!!
हे सगळे कमी होते कि काय म्हणून व्हिडिओ गेम आणली त्याचे तर दोन दोन रिमोट पण अवस्था तीच !!
पहिला कोण आणि दुसरा ?   मारिओ , पझ्झल , कार रेसिंग  त्यातून आम्ही शहाण्या बाळासारखे डबल प्लेअर गेम घेणार म्हणजे एकावेळी दोघांना तरी खेळता येईल !!
फक्त गेम आणि टीव्ही साठी नाहीतर पेपर साठी सुद्धा आमचे भांडण पहिला कोण वाचणार आणि पुरवणी असेल तर मग काय सगळीच मज्जा !!
 हि सगळी सुट्टीतील मजा !! शाळा सुरु असताना गोष्ट काही वेगळीच असायची ,, आम्ही सगळे एका टीम मध्ये आणि विरुद्ध पार्टीत आई बाबा !!
बाहेर बाबांच्या गाडीचा आवाज आला कि आम्ही टीव्ही बंद करून खिडीकीतून त्यांना दिसू नये म्हणून वाकून वाकून पलायन करून पुस्तके घेऊन बसायचो !! आणि यासाठी खिडकीजवळ नेहमी कुणीतरी असणार जरा आवाज आला कि टीव्ही बंद !!!
बस्स आज या एका फोटोवरून खूप साऱ्या आठवणींना उजाळा मिळाला ,
आजभी ये सब कुछ करना है  बट साला वो टाइमही नाही है !!!