पहिल्यापासूनच तिला रोज सकाळी लवकर उठायचा कंटाळा इथे आल्यापासून तर फक्त ते दोघेच !!!
तो रोज तिच्या आधी उठून स्वतःचे सगळे आवरून तिला ८ वाजता उठवत असे , ८. ३० ला तो घरातुन ऑफिस साठी बाहेर पडे त्याआधी त्याचा डबा तिला तयार करावा लागे , रोज सकाळी तिला उठवणे म्हणजे एक दिव्य !! सकाळी त्याच्या पहिल्या हाकेत ती उठली आहे असे आजवर कधीच झाले नाही .
सकाळी उठली कि ती चहा घेत नाही आणि तिला सकाळचा पहिला चहा करायचा कंटाळा आहे , बाकी मी दिवसभर तुला कितीही वेळा चहा करून देईन पण पहिला तेव्हढा कधी करायला सांगू नको हे तिने त्याला लग्नाआधीच सांगून ठेवले होते .
आज सकाळीही त्याने नेहमीप्रमाणे उठून आवरले , तिला उठवले , " ८ वाजले उठा आता " .
आज संकष्टी त्यामुळे फक्त खिचडी साठी किती दहा मिनिटे लागतील अशा विचारात अजून पाच मिनिटे करत ८. १५ झाले तरी उठलीच नाही , त्याला आज बरोबर ९ ला मिटिंग होती त्यासाठी वेळेत पोहचायचे होते , त्यामुळे त्याचा पारा चढला . त्याच्या आवाजाने ती उठली आणि किचन मध्ये जाऊन कामाला लागली , तिचीही जरा धुसफूस चालूच होती ,
तो , "काय ग कधीतरी उठते का लवकर ? नेहमी आळशीपणा , कधी वाटत नाही लवकर उठून आवरावे , किती जीवावर येते ना उठायचे ? "
जरी उशिरा उठले तरी वेळेत जातोस ना कधी तरी लेट झाला का माझ्यामुळे ? आणि कितीही गडबडीत तुला पोळी भाजी करून दिली तरी चव आहे तीच असते ना ? का बदलते ?
तिनेही जर घुश्यातच डबा आणून दिला , त्यानेही तिच्याकडे न बघता तो घेतला आणि तो पायात बूट घालू लागला , ती त्यावेळी त्याला बाय करण्यासाठी नेहमी तिथेच थांबायची पण आज मूड वेगळाच असल्यामुळे आत निघून गेली , तोही काही न बोलता ऑफिसला गेला .
आता ती घरी एकटीच संध्याकाळी ६ पर्यंत इकडे दूरदेशी कुणी ओळखीचे नाही बोलयला कि कुठे बाहेर जायला .
हेच रोज रोज करून तिला कंटाळा आला होता , तसे त्याचेही रुटीन तसेच असे . पण त्याला कधी का कंटाळा येत नसेल ? याचा विचार करून ती कधी कधी थकून जायची पण तिला उत्तर कधीच मिळत नसे .
त्यालाही माहिती होते कि दिवसभर घरी एकटी बसून कंटाळते , तिला एकटीला बाहेर कुठे जायला आवडत नाही कुणाची सोबत असेल तर लगेच खुश होऊन जाईल , इथे आल्यापासून तिचे सगळे रुटीनच बदलेले आहे अगदी खाण्यापिण्या मध्ये सुद्धा , वातावरण सगळेच पण तरीही तिने माझ्यासाठी सांभळून घेतले आहे .
तशी ती रोज तक्रार करण्यातली नाही पण महिन्या दोन महिन्यातून बाईसाहेब एक दोन दिवसासाठी अशा वेगळ्याच अस्मानी मूड मध्ये जातात , आता त्यालाही याची सवय झाली होतीच आणि तिला कसे मूळपदावर आणायचे हे त्याला माहिती होते .
इतका कसला राग ? आज अजून ऑफिसला पोहचला नसेल हा ? रोज तर २५व्या मिनिटाला फोन येतो आणि आज अजून नाही ? चिडला आहे ना मग मीही नाही करत अजून जरा चीड . तरीही त्याच्या फोनची वाट बघत तिनेच मेसेज केला . खिचडी कशी झाली आहे ? खारट ना ? त्याला शालजोडीतला मारायचा प्रयत्न …. पण त्याचे उत्तर हि तसेच नाही खारट नाही पण झणझणीत झालीय !!!
तीही परत गप्प बसली आता संकष्टी आज मोदक करायला हवेत नाहीतर त्याला परत टोमणे मारायला निम्मितच मिळेल . तसेही मोदक खायला त्याने गणपती बाप्पाच्या हातावर हात मारला आहे आणि आता तसे व्हायलाही लागले आहे लंबोदर !!! स्वतःच्या विचाराने खुदकन हसली .
तिची तयारी चालूच होती तितक्यात तो आला , आज लवकर ? तिचा प्रश्न
हो आलो ! सांगितले बॉस ला आज लवकर नाही गेलो तर खाण्याचे वांदे होतील माझे !! त्यालाही बायको आहेच समजले असतील माझे हाल !
अग बाई हो का ? मग रोज रोज बरा तो तुझा बॉस त्याला बायको आहे ते विसरतो ?
आता आलो आहे ना लवकर चहा मिळेल का ? जरा कडकच !! तिने त्याच्याकडे पहिले त्याचा मूड वेगळाच दिसत होता .
ती ," नाही आज कैरीचे सरबत आहे चालेल का ? थोडे आंबट थोडे गोड ? "
त्याला समजले कि हळू हळू नूर पालटतोय
हम्म ठीक आहे दे आता तुला हवे ते ! आम्ही काय तुमच्या शब्द बाहेर थोडीच ?
" हो का ? मग सकाळी सकळी जे काही झाले ते रामायण फुकटचच का ? "
अग बाई कधी कधी तुला चार्ज करावे लागते असे नाहीतर जाशील न माझ्या हातातून !! आणि तू थोडी चार्ज झाली कि जरा जास्तच गोड दिसते नाही का ? अगदी सकाळच्या खिचडी सारखी !!!
अरे देवा म्हणजे खिचडी गोड झाली होती का ? sorry हा परत उठेन हो लवकर तुम्ही म्हणता तसे .
अग नाही ग छान झाली होती ! अशीच थोडी मजा !!
असुदे तरीही माझा तुझ्यावर नाहीय विश्वास , मी कसेही दिले तरी तुला ते गोडच लागेल माहितीय मला !
पुढच्या वेळेपासून पक्का लवकर उठेन ! आणि स्वतःच्या मनातच……. आज कितव्यांदा बोलत असेन मी ? पण तरीही तो काहीच म्हणत नाही . मीच आपली उगीचच चिडत असते त्याच्यावर !!!
" बर चल मग आज काय ? करायचे ते सांग ? " तो
आज काय मोदक ! गणपती बाप्पासाठी आणि माझ्या लंबोदर साठी सुद्धा !!! असे म्हणत तिने जीभ चावली .
तू मला , मला लंबोदर म्हणतीय ? थांब बघतोच आता तुला मी ! !
काय बघणार आहेस ? रोजच तर बघतो ? चल आता मदत करायला मी उकडीची तयारी करते तोपर्यंत तू सारण कर . मग बघ मला !
चला बाईसाहेब , आजच्या मोदकासाठी साक्षात या गणपती बाप्पाची उर्फ लंबोदराची मदत होणार तर !!
मनातल्या मनात तो चला आता मूड ठीक झाला आहे कधी कधी असतेच न एखादी वेळ वेडी आणि लहरी अगदी हिच्यासारखी !!!!
No comments:
Post a Comment