Wednesday, September 28, 2016

पहिला आंतरराष्ट्रीय विमान प्रवास

२६- २७ सप्टेंबर आज अमेरिकेत पाउल टाकून २ वर्ष उलटून गेली .
अजूनही आठवतो तो पहिला आंतरराष्ट्रीय विमान प्रवास .... आणि त्याच्या आठवणी आणि तसेही सगळ्याच पहिल्या गोष्टी खूप खास असतात ना !

माझा नवरा ऑगस्ट मध्येच इकडे आला होता माझ्या व्हिसासाठी मी थांबले होते ,  गौरी गणपती होते मी आपले नवरोबाला टुक टुक करत मोदक खाणे , पुरणपोळी यावर ताव मारत  होते . आईपण एकदा लेक अमेरिकेला गेली कि लवकर येणार नाही म्हणून आपले रोज रोज वेगवेगळे पदार्थ करून घालत होती . माझी आपली मजा चालू होती आणि आमच्या नवरोबांनी बॉम्ब टाकला कि तुला २७ ला निघायचे आहे .... काय सांगू हातात थालीपीठाचा घास होता तसाच राहिला .... कधीतरी जायचे होते हे माहित होते पण अचानक असे दत्त म्हणून समोर उभे ठाकले आणि श्वासच अडकला माझा ....
एक तर फक्त चार दिवस आधी कळाले ती तयारी , पहिला इतका दूर  एकटीचा प्रवास ,,,काहीच माहिती नाही ... याचे टेन्शन  आणि खरे सांगू का सगळ्यात जास्त वाईट वाटतं होते आई बाबांपासून इतके दूर राहणे जे माझ्यासाठी निव्वळ अशक्य होते त्यासाठी मी माझ्या मनाची तयारी खूप आधीपासून करत होते पण तरीही ..... कॉलेज साठी सुद्धा बाहेर होते  पण प्रत्येक आठवड्याला घरी जात असे माझे घर म्हणजे माझा श्वास आहे .....
आणि आता इतके दूर पण काहीच पर्याय नाही लग्न संसार  आणि कायतर म्हणे   समाज !!!..... जास्त दिवस मुलगी माहेरी राहिली कि आई बापापेक्षा शेजारच्यांना जास्त काळजी असते तिची  हो ना !!!...
असो ,
मग काय माझ्या प्रवासाची  तयारी सुरु..... दुसऱ्याच दिवशी आई बाबांचा निरोप घेऊन कवठे महांकाळहून पुणे हा प्रवास केला ... या सहा तासाच्या प्रवासात मला फक्त आणि फक्त माझ्या बालपणीचा काळ आणि माझ्या लग्नाआधीचे सगळे डोळ्यासमोर दिसत होते सगळे अगदी भर भर सरकत होते .... याच आठवणीत पुणे कधी आले ते कळालेच नाही , पुण्यातही  घरी जाऊन बॅग भर , सामान घेणे  , वजन करणे एक ना अनेक गोष्टी होत्या हे सगळे करताना इतके जिवावर येत होते कि सगळे सोडून तिथेच थांबावे वाटत होते ....
या सगळ्यात कमी कि काय म्हणून डोक्याला त्रास देणाऱ्या गोष्टी होत्याच  .... वेळ असते एक बाकी काही नाही  .....
पुण्यात दीदींकडे गेले पण तिथे माझी ८ महिन्याची गोडुली भाची स्पृहा तिच्यापासूनपण दूर जाणे .. खूप रडू येत होते पण काय करणार .....
२७ सप्टेंबर ला मुंबईहून पहाटे ४ ला विमान होते ... मुंबई ते दुबई , दुबई ते बोस्टन ...
माझा भाऊ मला सोडायला एअरपोर्टला येणार होता , काही म्हणा बाकी कितीही भांडलो , कसेही वागलो तरी  भावा बहिणेचे नाते  हे निराळेच  ... पुणे ते मुंबई कॅब प्रवास शुक्रवार असल्यामुळे रात्री ट्राफिकजॅमची भीती वेगळीच त्यामुळे पुण्यातून आम्ही लवकर निघायचे ठरवले आणि आमचा प्रवास सुरु झाला ...
खरे तर मला खूप खूप भीती वाटत होती इतका दूर प्रवास , मला जमेल का ? सगळे नीट होईल ना ... ??
तसा भाऊ होता सोबत म्हणून काळजी नाही पण कुणी कुणी काही तरी सांगितलेले असते त्याची  भीती मनात बसते ना तसे झाले होते ....
पण या कॅब प्रवासात मला एक मैत्रीण मिळाली आणि ती चक्क दुबई पर्यंत माझ्या सोबत असणार होती त्यावेळी हे ऐकून झालेला आनंद मी शब्दात नाही सांगू  शकत ...
म्हणजे वाळवंटात पाणी दिसावे आणि अगदी तसे  ,, माझे सगळे टेन्शन कुठल्या कुठे गाळून पडले माहित नाही... !!
आपली काळजी असते कुणालातरी योग्य वेळी तो अनुभव येतो आणि तसेच  झाले .अगदी ...
मी रिलॅक्स होऊन तिच्याशी बोलू लागले मग आमची ओळख अगदी आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत अशी झाली ... मनातल्या मनात म्हणत होते माझ्या बडबडीचा फायदा कधीतरी कुठेतरी होतोच होतो ... उगीच आई आपली मला म्हणत असते कि किती बडबड करते म्हणून !!!!
गप्पा चालूच होत्या तितक्यात आमचे एअरपोर्ट आले आमचे म्हणजे मुंबईचे .... !!!
तिथे बाहेरच्या टपरीवर (सॉरी सॉरी कार्टवर ) पावभाजी खाऊन झाली एका पावभाजीचे २०० रुपये !!!!!!!
थोडावेळ बाहेर फिरणे चालू होते आता निरोप घ्यायचा होता तो भाऊरायाचा !! किती कठीण ना ?? त्याला करमणार नाही का तर मी भांडायला नसेल ना !!!! कोणत्या वेळी कशाचीही काळजी मला नाही का !!! तो मला बाय बाय करून गेला ...  आणि
मी आणि माझ्या मैत्रिणीने एअरपोर्टच्या आत पाऊल टाकले माझी पहिलीच वेळ ... मला कोणत्याही दृष्टीने वाटत नव्हते कि मी भारतात आहे इतके टकाटक ... काहीतरी पहिल्यांदाच पाहत होते !!! ...
पण मस्त आहे  हा एअरपोर्ट चकाचक ...
अजून आमचे काउंटर ओपन झाले नव्हते , तिला पुढे जर्मनीला जायचे होते तिने याआधी खूपवेळा प्रवास केलेला त्यामुळे ती निवांत बसली होती ....
मीच आपली बावरले होते वेड्यासारखी कशाला घाबरत होते तेच लक्षात येत नव्हते आणि आजही कळत नाहीय ... कदाचित अपनोसे दूर त्यामुळे त्यावेळचे  बावरणे , घाबरणे असेलही ....
पण माझ्या मैत्रिणींमुळे माझा बराच ताण हलका झाला होता ,, आम्ही बोर्डिंग पास घेतला , सिक्युरिटी चेक झाले गेट  जवळ जाऊन निवांत बसलो अजून दिड दोन तास वेळ होता ...
आजूबाजूला सगळेच पेंगुळलेले होते कुणी झोपले होते , कुणाचे मोबाईल , लॅपटॉप काही ना काही चालू होते  ... मी आपली सगळीकडे फिरत बसले होते !!!
इमिरेट्स माझी पहिली इंटरनॅशनल फ्लाईट .... मुंबईला जाऊन बसले विमानात पण विंडो सीट नाही त्यामुळे काहीच दिसेना कसे बसे पहाटेच्या वेळचे मुंबईचे दर्शन डोळ्यात साठवून घेतले आणि उड्डणांस सज्ज झाले ...
इतकी झोप येत होती आत गेल्यावर अर्ध्या तासाच्या आतच मी झोपले  जेवण आल्यावर माझ्या मैत्रिणीनेच उठवले ... पण ते काय जेवण ?? २ घास सुद्धा गेले नाहीत मला ...
पण मैत्रीण  होती ना तिने मेथीचे पराठे दिले ते पाहून दिल एकदम गार्डन गार्डन हो गया ....
मला आठवते तसे मी खोबऱ्याची बर्फीपण खाल्ली होती , पराठे इतके मस्त वाटले ना !!! ते खाऊन परत झोपी गेले ,,, दुबई काय आपल्या शेजारीच त्यामुळे  लगेच २-३ तासात पोहचलोपण  .... पण खाली उतरताना माझा कान इतका ठणकायला लागला कि मला काही सुचेना तिला सांगितले तर ती म्हणली होते असे कधी कधी लॅण्डिंगवेळेस म्हणून तिने मला चघळायला च्युगम दिले त्यानंतर लगेच कान दुखायचा थांबला ...
आता खरी मजा होती इथून आमच्या वाटा वेगळ्या होत्या .... मी बोस्टनला तर ती जर्मनीला जाणार होती .. तिचे विमान आधी होते माझे थोडे लेट होते ...
आम्ही थोडावेळ एकत्र बसलो , गप्पा मारल्या , तिच्या निघायच्या वेळी तिने मला पराठे दिले कारण मला विमानतले जेवण आवडत नाही म्हणून ... आणि च्युगमसुद्धा ... आता परत तिचा निरोप .. जाताना आमचे मेल आयडी आम्ही एकमेकींना दिले आणि आपआपल्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो ...
जास्त नाही फक्त काही तासांची ओळख आमची ... पण असे वाटत होते कि खूप वर्षांपासून आम्ही ओळखत आहे एकमेकीना .. किती निराळी असते ना हि दुनिया !! थोडे द्यायचे असते आणि थोडे घ्यायचे असते यातच खरी गंमत असते !!! पण काही लोकांना नाही कळत ती .....
कधीही मुंबईला एअरपोर्ट वर गेले कि ती आणि मी उभ्या आहे असेच मला जाणवते ,, माझी पहिली विमानप्रवास मैत्रीण स्नेहा....
आजच तिच्याशी खुपदिवसांनी बोलले आणि परत या सगळ्या गोष्टींना उजाळा मिळाला
शेवटी काय आहे या मैत्रीच्या खास गाठी कधी कुठे जुळून येतील सांगता येत नाही ना !!!

Thursday, September 22, 2016

Autumn ..... पानगळ

आज फॉलचा पहिला दिवस , autumn किंवा fall  सुरु झाला म्हणजे आता झाडाची पानगळ सुरु होईल . पण त्याआधी  झाडाची हिरवी पाने लाल , पिवळा . नारिंगी आणि जांभळा असे वेगवेगळे रंग स्वतःवर ओढून घेतील आणि सरतेशेवटी गळताना तपकिरी रंग पांघरून झोपीच जाईल .
निसर्गाचे ऋतुचक्रही किती मजेशीर ना !!!
आताच उन्हाळा चालू झाला म्हणून इथल्या लोकांनी वेग वेगळी झाडे लावली , त्यांची अगदी छोट्या मुलांप्रमाणे काळजी घेणे चालूच होते ,त्यात मध्येच कधीतरी एखादे गुलाबाचे फुल खुदकन हसताना दिसायचे तर कधीतरी एखादा भोपळा टुणूक टुणूक उड्या मारत असणार . जास्त नाही अगदी जेमतेम तीन ते साडेतीन महिने उन्हाळा पण त्यातही हे आपले झाडे लावयची हौस पुरेपूर भावून घेतात . त्यांच्या शेतात पिकलेल्या भोपळ्याचे , भाज्यांचे फार अप्रूप असते हं त्यांना ..... आणि तोपर्यंतच  ......
हळूहळू फॉलमध्ये  भाज्या , फळे   येऊन झाडे नवीन रूपे धारण करतील एखाद्या नकलाकारासारखी वेगवेगळी रूपे घेतील , ते पाहून आपण मात्र नक्कीच हरकून जाऊ.
हा एक निसर्गाचा चमत्कारच ,  एकाच माणसाची जशी वेगवेगळी रूपे तसेच हे झाडाचे वेगळे रुपडे ... वेगवेगळे सोंग साकारताना कधी निष्प्राण होऊन गळतील हे कळणारदेखील नाही ..... मग राहील तो फक्त त्याचा सांगाडा पण त्यात सुद्धा परत नवीन रंग भरलेच जातील ते खुलेल हसेल अगदी एका तान्ह्या बाळासारखे फक्त त्याला वेळ द्यायला हवा असेच असते ना ऋतुचक्र  ...
यावेळी बघूया नवरोबा कुठे घेऊन जातात फॉलचे दर्शन घेण्यासाठी तिकडे गेले कि येतीलच नवनवीन फोटोसोबत माझे तत्वज्ञान ....
 तोपर्यत हे मागच्यावर्षीचे फोटो बघून घ्या ...


स्वयंभु

आपल्या आयुष्यात अशी काही माणसे येतात कि त्यांना कधी आठवावे लागतच नाही ,अशी एखादी गोष्ट , घटना घडते तीच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यासमोर येऊन ठाकते .
शामराव जोशी असेच एक छोट्या गावातील बडे प्रस्थ , सगळेच त्यांना काका म्हणून ओळखत कधी कुणी जोशी बुवाही म्हणत . शेतीवाडी  , दोन भरपूर पाणी देणाऱ्या विहरी , शांत सालस बायको . एक मुलगा आणि मुलगी . 
पांढरे शुभ्र धोतर , सदरा  डोक्यावर शुभ्र टोपी हा नेहमीच पेहेराव यात कधीच बदल झाला नाही , रस्त्यावरून जातानासुद्धा त्यांचा दरारा दिसून येत असे . कुठेही जायचे यायचे म्हणले कि सायकल आणि ते हेच समीकरण. कुणी म्हणाले , " चला सोडतो काका "  तरी यांचे आपले एकच उत्तर,  "नको बाबा !अजून हातापायात जीव आहे तर त्यांना हालचाल नको का द्यायला ? परत बंद पडले कि आहेच तुम्ही उचलायला "  आणि स्वतःच हसणार . पुढचा माणूस काही न बोलता निघून जायचा . 
आयुष्यात कधीच कुणावर अवलंबून ठेवू नको रे गणराया !!! हि प्रार्थना मात्र गजाननाने अगदी मनोमन ऐकली. का नाही ऐकणार तो ? लहानपणापासून गणपतीवर अगदी मनापासून श्रद्धा , भाद्रपदात एखादी जरी पत्री कमी मिळाली तर यांच्या जिवाला घोर .. आणि तोच घोर  परत यांच्या बायकोच्या मागे जमदग्नीच्या कोपासारखा  ... पण तिने वळलेले सुरेख मोदक पाहून त्या कोपावर अलगद शांतीची धार पडायची . 
सहस्रआवर्तने , गणपतीची आरती , उच्चार अगदी स्पष्ट आणि सुरेख , ऐकताना आपलीच तंद्री लागावी आणि डोळे उघडता क्षणी साक्षात त्याचे ते दिव्य रूप समोर यावे .....  असा एक निराळाच माणूस . 
शेतात राबणाऱ्या गडी माणसापासून ते अगदी गावातील प्रतिष्ठित लोकांची  नेहमीच काकांच्या घरी उठबस असायची . जरी शीघ्रकोपी असले तरी कधीच त्यांनी कुणाला दुखावले नाही . विशेषतः त्यांची मुलगी खूपच लाडकी त्यांची ... 
 सकाळी उठून नारळाच्या झावळ्या गोळा करून त्याच्या खराट्याने सगळे अंगण , गोठा स्वच्छ करणे हे त्यांचे पहिले काम , त्याच अंगणात काकू त्यांच्या नाजूक बोटानी रेखीव रांगोळी रेखाटत . सायकल वरून देव दर्शन करून येताना मुलांसाठी गोळ्या बिस्किटे याची नेहमीच सोबत . 
स्वतःच्या गोठ्यातील जनावरांवर आपल्या पोटच्या पोरांसारखे प्रेम करणारा माणूस किती वेगळाच ना ! त्यांच्या आजारपणात राञभर तिथेच बसून त्यांची काळजी घेणार अशा या माणसावर परमेश्वराने खरेच दया दाखवली . त्याची अन त्याच्या बायकोची आम्हाला उठता बसता मरण दे रे भगवंता !!! हि मनापासून दिलेली साद बरे झाले त्याने  ऐकली ....
आणि .... 
म्हातारपणी त्यांच्या रिकाम्या होत जाणाऱ्या मनात  आणखी एक जखम होता होता राहिली ... 

Wednesday, September 21, 2016

आज कुठे हरवला आहेस ?


असेच सुचलेले ....

का ते माहित नाही पण आज अचानक तुझी खूप आठवण आली  ,  माझ्या लग्नानंतर मी तुझ्याशी बोलणार नाही  असे म्हणणारा तू  आज कुठे हरवला आहेस ? 
मित्र मैत्रिणीच्या गोतावळ्यातील आपली निखळ मैत्री , एकमेकांशी न बोलताही मनातले जाणणारे ...... 
तुझी न माझी मैत्री किंबहुना त्या पलीकडचे नाते पण तो धागाही निखळच ... 
लग्न झाले तुझे पण हरवला मित्र माझा 
त्यानंतर कधी तो मला गवसलाच नाही ,
कधी काही लागले , कुणी बोलले तर मी काही न सांगता माझ्या मनातले जाणणारा तू ... पण खरेच कुठे हरवला आहेस तू ?
नेहमी छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझ्यासोबत वाद घालायला तयार असणार आणि आज बोलावत आहे तरी ........ !!!!
माहित आहे कि तू नाही येणार पण तरीही थोडेसे भातुकलीच्या खेळासारखे भांडण तरी करायचे .... 
घातली असती मी माझ्या मनाची समजूत पण तेवढ्यासाठी तरी यायचे ... 
तुझ्यातला गवसलेला तू मला मिळाला आहे पण परत तू मात्र स्वतः साठीच हरवला आहेस ....