Friday, March 10, 2017

एका मांजराची लगीनघाई

" आमची मनी  जात्याच हुशार हो म्हणूनच तर इतका हुशार नवरा पदरात पडला न नाहीतर आहेच कि ती शेजारची बया काय हाल करून घेऊन आलीय !!!" मंजुची आजी तिच्या मैत्रिणीला सांगत होती ..
मंजूला मनी म्हणणारी एकमेव तिची आजी बाकी सगळे तिला मंजूच म्हणायचे . 

आज त्यांच्या घरात तिच्याच लग्नाची गडबड चालू होती , पुढच्या आठवड्यात दारात लग्न होते , मांडव तोरण सजले होते ..  पै पाहुणे हळू हळू जमा होत होते ,, कुणाचा म्हणून कुणाला ताळमेळ नव्हता .. सगळे आपले एकमेकावर आपली कामे ढकलण्यात मग्न !!! मंजूच्या आईचा आणि भावाचा मात्र कामं करून पिट्टा पडत होता , तिचे वडील म्हणजेच आण्णा तर फक्त बाहेरच बघण्यात आणि या दोघाना ऑर्डरी सोडण्यात मग्न ... 
कमी काय म्हणून आजी होतीच !!!
पण आजीला तिची मनुबाय मात्र लै प्रिय !! आता आपली नात परक्या घरी जाणार म्हणून तर तिचं सगळं लक्ष तिच्या मनीवर लागलेलं !!!
आणि या मंजूबाईच तिच्या मनीवर !!! म्हणजे तिची आवडती मांजर ... 
तिला याची काळजी लागली होती कि आपली मनी आपल्यासोबत सासरी येणार कि  नाही ? , तस तिने आपल्या आईला सांगितले पण होते कि , " हे बघ मम्मे , कुणाला माझी पाठराखीण म्हणून पाठव नायतर नको पाठवू पण माझी मनी मात्र मला माझ्याबरोबर यायला हवी " 
आता त्या बिचाऱ्या आयेने कुणाकुणाचे म्हणून टेन्शन घ्यायचे तिलाच समजत नव्हते .. 
तशी मंजू तिच्या नवऱ्याला पण सांगत होती फोनवर कि मला माझी मनी  पाहिजे !!
तिकडून त्याला काय वाटले कुणास ठाऊक हिच्या आधी तोच तिला लाजत म्हणाला ," अग अजून आपलं लगीन तर होउदे !" 
तशी एकदम हि उसळलीच , तुमच्या जिभेला काही हाड ? मी माझ्या मांजर मनीबद्दल बोलतीय  !! 
तसा नवरा गार पडला कारण नवऱ्याला आपल्या आईची काळजी तिचं आणि मांजराचा जमायच तर म्हणजे  हाडवैरी असल्यासारखे .. 
आता त्याची  अवस्था इकडं आड अन तिकडं विहीर !!

सगळी काम होऊन झोपायला तसा जरा उशीरच झाला उद्या लग्न .कोण कुठं कस जागा मिळेल तस झोपत होत , इकड मंजुला जागा सापडना मग आजीच्या खोलीत आपल्या मांजरीबरोबर पथारी पसरली तिनं .. 
पण ती मांजर काय एका ठिकाणी थांबेना मंजुला काळजी कुठं पळून गेली तर ??  
हि आपली जातीय  तिच्या तिच्या मागं मागं आजीच्या कॉटखाली ,, शेवटी वैतागून तिला कधीतरी झोप लागली... 
तर त्यावेळी पहाटे सगळी उठायच्या गडबडीत ... आणि हिची मांजर आली कुणाच्या तर पायात , तशी मांजर घाबरून टुणकन उडी मारून घराच्या बाहेर ...  

सगळी एक एक करून उठून आवरत होती तर मंजुचा अजून पत्ता नाही , अन कुणाला कुठं दिसली पण नाही सकाळ पासून .. तिच्या आईनं तर सगळं घर पालथं घातलं .... 
घरात ढिगभर माणसं ,, कुणाला विचारवं तर आपलीच अब्रू जायची म्हणून कसबस तिच्या भावला तेवढं सांगितलं अन दोघे मिळून तिच्या शोधला लागले .." तसा तिच्या आईच्या मनात विचार आला पोरगी मांजरामुळ  तर .... "  पण स्वतःला समजावून परत कामाला लागली !!! 
आजी सगळयांची विचारपूस करत बाहेर आली , अन तिनं कुणाला तरी विचारलं , " अर आमची मनी दिसली का ?"
तस कुणीतरी म्हणली होय सकाळीच बाहेर पळून जाताना पहिली कि तिला मला वाटलं काहीतरी झालं असल म्हणून गेली बाहेर ....  !!!!
तसा आजीनं दंगा चालू केला , अगं  सुनबाई कुठं गेलीस ,इकडं तुझी लेक पळाली तरी तुला पत्ता नाही आता कस  व्हायच , अक्क्या खान्दानाचे नाव पोरीने धुळीला मिळवलं ... 
दंगा ऐकून तिची आई भाऊ , आण्णा सगळी बाहेर आले .. 
अण्णा तर सगळं खापर बायकोवर फोडत  तुझा लाड नडला पोरीला , आता गेली ना पळून आमच्या तोंड़ला काळ फासून .. 
तशी आई ओरडलीच , तरी म्हणलं होत ना ते काळ मांजर आणू नका  घरात , लागला पोरीला तिचा जीव अन गेली पळून तिच्यामाग .... 
काय मांजराच्या माग ? आजीनं अगदी जोर लावून सुरात विचारलं ... 
तशी सुनबाई म्हणली , " मग काय तर जेंव्हापासनं हे लगीन ठरलंय पोरगी मला रोज म्हणतीय मम्मे पाठराखीण नाही पाठवली तरी चालेल पण माझी मनी  पाहिजे मला " काय खुळ डोक्यात घेऊन बसलीय देव जाणं !!!
इकडं मंजूला तर पत्ता नाही तिच्यामुळे घरात केवढा गोंधळ चाललाय ... ती घोरत आजीच्या कॉटखाली ... 

"मंजूच सासर जवळच नाही म्हणल तर तिकडं पण तासाभरात खबर पोहचणारच " असं कुणीतरी म्हणलं .... 

तितक्यत मंजूचा होणार सासरा गाडी घेऊन दारात हजर .... कुणीतरी शहाण्यान त्यांच्याकडचं फोन करून विचारलं होत म्हणे कि मंजू  आलीय का ?.. 
मंजूच्या बापाला तर काय बोलावं समजना... तो मूग गिळून गप्प .... 
तशी तिची आई म्हणली , " पावणं पोरगीला मांजराचा लै लळा बघा ती गेली म्हणून तिच्या मग कुठंतर गेली बघा पोर ....  तस तिन सांगितलं होत जावईबापूना  कि तिला मनीला घेऊन यायचं म्हणून .... "
सासरे काही बोलणार इतक्यात मनी , टुणकन उडी मारून आजीच्या खोलीत कॉटखाली जाऊन मंजुला बिलगली .... 
सगळी त्या मनीच्या मागं आली तर मंजू कॉटखाली ...!!!!
तशी आईन तिला जवळजवळ कॉटखालनं बाहेरच ओढलं .... 
अग आजे मी मगाशी तुला मांजरीबद्दल बोलली  मनी म्हणजे .... मंजूबद्दल नाही .. पण तुम्ही सगळ्यांनी इतका दंगा चालू केला कि मला कुणी काय परत बोलूनच नाही दिलं ... ती मघाची कुणीतरी बोलली 
तशी आजी त्याच्यावरच उसळली , " अग बये  , मी मंजुला मनी  म्हणते ते माहित नाही काय  तुला  ? "
 सगळीच हसू लागली अगदी मंजुचा सासरा पण ... 
तसा हसत हसत तिला तो म्हणाला , सुनबाई येताना घेऊन या तुमच्या त्या मनीला , नायतर परत समंध रामायण घडायचं ... !!!!
मंजुला तर लक्षातच येत नव्हतं कि काय चाललंय ते !!! पण कशामुळं का असना तिला मानिला घेऊन जायला मिळणार होत ... 
म्हणून तर म्हणलय ना ऐकू आलेली प्रत्येक गोष्ट खरी असतेच असं  नाही ,,, त्यापेक्षा वेगळी दुनिया दिसू शकते नाही का ?

No comments:

Post a Comment