Wednesday, March 8, 2017

न्यू इनींग

आई ,  येतो ग भेटू संध्याकाळी !! असे  म्हणत मीराची दोन्ही मुले कॉलेजसाठी बाहेर पडले ..
तितक्यात आजी विचारत  आल्याच , " झाला का ग चहा ? " 
हो देतेच म्हणत मीराने त्यांचा आणि तिच्या नवऱ्याचा अजयचा  चहा टेबलवर ठेवला ... 
आणि परत स्वयंपाकघरात गेली अजयचा डबा भरला आणि स्वतःचे  आवरू लागली . 
मीरा ,अजय त्यांची दोन मुले आणि सासूबाई इतके छोटे कुटुंब ,, मीरा आणि अजय जॉबसाठी म्हणून बाहेर असत तर मुले  त्याचे कॉलेज , प्रोजेक्ट यासाठी .... 
रात्री जेवायच्या वेळीच सगळे थोडावेळ एकत्र भेटत .. नंतर मग सगळे आपापल्या कामात .... 
दिवसभर आजी एकट्याच घरी !!!
थोड्यावेळात मीरा आणि अजयही बाहेर पडले ,, आता नेहमीसारखेच तो मोठा फ्लॅट आणि आजी .... 
त्यात आजींना खूप बोलायची सवय , आधी शेजारी पाजारी होते , कुणी ना कुणी ओळखीचे घरी येत कधी आजी जात त्यांच्या घरी पण आता सगळेच बंद झाले होते या फ्लॅटमध्ये आल्यापासून .... 
नाही म्हणायला संध्याकाळी थोडावेळ खाली फेरफटका मारण्यासाठी जात पण वयामुळे जास्त चालणे होत नसे , मग बागेत बसून लहान मुलाचे खेळ बघत .... !!! 
पूर्वी स्वतःसाठी असा कामाच्या रगाड्यातून वेळ मिळत नसे आणि आता मिळतो आहे तर त्याचे काय करायचे हा नेहमीच प्रश्न ??
तसे मीराला आपल्या सासूबाईंच्या या अस्वस्थेबद्दल माहिती होती , आणि हेही माहिती होते कि आजी त्यांच्या सगळ्यांच्या हट्टामुळे तिथे राहत आहेत .... 
तसेही ती विचार करतच होती कि त्यांचा वेळ जावा म्हणून काय करता येईल ... ?? पण सुचत नव्हते ... 

 आज मीराला जास्त काही काम नव्हते त्यामुळे  तो वेळ घरी जाऊन आजीसोबत घालवावा म्हणून ती लवकर निघाली , जाता जाता आजींना आवडणारा ढोकळा घेतला आणि घरी पोहचली ... 
दुपारची वेळ होती आजी झोपल्या असतील म्हणून तिने बेल न वाजवता स्वतःच कुलूप काढले ... 
घर अगदी शांत होते , आजी झोपल्या असतील म्हणून त्यांच्या खोलीकडे गेली तर तिकडे पण कुणी नाही .... 
" सहसा त्या न सांगता कुठे बाहेर जात नाहीत मग  आज अचानक कुठे गेल्या ? "  मीरा स्वतःशीच बोलत होती 
तिथेच तिला त्यांच्या जुन्या सामानाची बॅग दिसली , त्यात त्यांचे दागिने , साड्या , जपून ठेवलेल्या बऱ्याच गोष्टी होत्या ... 
ते बघून तिला जरा जास्तच काळजी वाटली .... एकदा तिला वाटले कि अजयला सांगावे फोन करून पण आधी जरा आजूबाजूला पाहू मग बघू असा विचार करून त्या शेजारी आहेत का पाहण्यासाठी गेली तर तिथे कुलूप होते ... 
आता कुठे शोधायचे म्हणत ती खाली गेट जवळ पोहचली तिथे तिने वॉचमन जवळ चौकशी केली तर तो म्हणाला ... 
आजी ना गेल्या आठवड्यापासून रोज दुपारी ते सोसायटीचे मंदिर आहे तिकडे जातात .... 
हे ऐकून तिला थोडे हायसे वाटले ,, तसे ती झपाझप पावले टाकत देवळाकडे गेली . तर तिथे एक आजी नाही तर खूप आज्या होत्या ,, आणि आज त्यांच्यातील प्रत्येकजण नटून थटून आली होती अगदी सगळं साज शृंगार करून ... त्यात आजीही होत्या ... 
आज कितीतरी दिवसानी मीरा त्यांना या अशा  सवाष्ण रूपात पाहत होती , एक वेगळेच तेज होते त्यांच्या चेहऱ्यावर .. घरात असतात त्यापेक्षा कितीतरी जास्त खुश दिसत होत्या त्या !!!
पण मीराला समजत नव्हते कि त्यांचे सगळ्याचे हे काय चालू आहे ते ?
सगळ्याजणी गोलाकार करून बसल्या होत्या ,, आणि आपण पूर्वी कशा होतो याची एकमेकींना ओळख करून देत होत्या अगदी लहान असल्यापासुन ते आतापर्यंत ... 
नवरा होता तोपर्यंतचे आयुष्य आणि आताचे यावर बोलताना प्रत्येकीचे डोळे भरून येत होते ... ! त्यांच्यातील प्रत्येकजण आजच्या या रूपात आपल्या स्वतःला शोधत होते आणि त्यांची ती धडपड मीराला अगदी स्पष्ट दिसत होती एक वेगळाच सोहळा तिकडे चालू होता , आणि इकडे मीराचे डोळेही भरून आले .!!!!!!
प्रत्येकाची ओळखपरेड संपली आणि आजी उठल्या .. त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरत होती , तिथे काम करणाऱ्या बायका आणि त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी त्या सगळ्या प्रयत्न करणार आहेत हे मीराला त्यांच्या बोलण्यातून समजले .... 
नंतर सगळ्याजणी हळूहळू जाण्यासाठी उठू लागल्या तशी मीरा धावत आपल्या घरी पोहचली ... 
आजी घरी आल्यातर घराचे दार उघडे .. ते बघून त्यांना काही सुचेना त्यांना वाटले कि आपण कुलूप लावायचे विसरून खाली गेलो कि काय ? अरे देवा आता थोड्यावेळात सगळे येतील असे घरचे दार उघडे राहिलेले त्यांना कळले तर काय म्हणतील मला असा विचार करतच त्या आत गेल्या ... तर समोर मीरा उभी !!!!
तिला पाहून तर त्या थंडच पडल्या ,, काय बोलावे ते समजेना !!
शेवटी मीरानें  त्यांना बसवले पाणी दिले तेव्हा कुठे त्या शांत झाल्या ... 
मीरा त्यांच्याकडे एकटक पाहत होती , तीच डाळिंबी रंगाची साडी , कपाळाला ठसठशीत कुंकू , हातात बांगड्या ... तिला त्यांचे तिच्या गृह्प्रवेशावेळचे रुपडे आठवत होते ... तिचे तसे बघणे पाहून आजीला लाजायला झाले .. तेव्हा तर त्या आणखीच गोड़ दिसत होत्या .. 
त्या तिथून आत जाण्यासाठी उठल्या तर मीराने त्यांना थांबवले .. 
त्यांना वाटले सून आता ओरडणार कि सगळ्या सोसायटीत आमच्या अब्रूचे धिंडवडे काढले म्हणून ... पण मीरा तशी नव्हती हे माहित होते त्यांना ....... पण असे पाहून कदाचित ती चिडली असेल असे त्यांना वाटत होते ... 
" आई तुम्ही खरेच किती करता हो सगळ्यांसाठी ?" हे मीराच्या तोंडून ऐकताच आजी सावरून बसल्या .... 
आता वर येताना आपली कामवाली भेटली तिने सांगितले कि , तुम्ही तिच्या मुलाला शिकवता म्हणून !!! 
आणि आता फक्त तिच्या मुलाला न शिकवता सोसायटीत जे जे कामाला येतात त्यांच्या मुलांना  शिकवणार आहे ,, आणि त्यांच्या आईला सुद्धा !!! 
आज जो तुमचा कार्यक्रम सुरु होता तो पहिला , पहिले थोडे विचित्र वाटले पण नंतर कळाले कि तुम्ही असे का केले !! ती स्वतःला मॉड म्हणवून घेणारी ऋतू तिने तिच्या मुलाच्या वाढदिवसदिवशी सगळ्यांसमोर औक्षण करताना तिच्या सासूचा  अपमान केला ,, आणि तेव्हापासून तिची सासू खूप डिस्टर्ब असायची कुणाशी काही बोलत नव्हती ,, म्हणून मग या निम्मिताने का होईना सगळयांचे मन हलके होईल , त्याच्या जुन्या आठवणी पुन्हा जागवता येतील म्हणून हे सगळे तुम्ही केलंत ... 
अगदी हा तुमचा ग्रुप सुरु करण्यापासुन .... आई खरेच खूप कौतुक वाटते तुमचे .. मला स्वतःला इतके अपराधी वाटायचे कि आम्ही तुम्हाला इथे बळजबरीने ठेवून घेत आहे पण आता खरेच खूप कौतुक वाटत आहे तुमचे .... 
मीराला शब्द कमी पडत होते आपल्या सासुचे कौतुक करायला .... 
बोलता बोलता तिने आणलेला ढोकळा त्यांच्यासमोर धरला .. आणि एक हाताने त्यांचा हात हातात घेऊन  आई ऑल द बेस्ट फॉर युर न्यू इनींग  असे म्हणत तो कापला .... 
तो कापताना दोघीही एकमेकींकडे बघत हसत होत्या फक्त ते हसू होते काहीतरी गवसल्याचे !!!!




No comments:

Post a Comment