Wednesday, December 21, 2016

झोप

झोप हा  माझ्या अंत्यत जिव्हाळ्याचा विषय आहे , त्यातली त्यात जर ती दुपारची झोप असेल तर मग काय विचारूच नका इतकी प्रिय ...
आमच्या आईच्या भाषेत आम्ही तीन माकडे (  त्यांचे वंशज ना म्हणून म्हणत असेल !!) म्हणजे मी आणि माझे बहीण भाऊ कुंभकर्ण आहोत , हत्ती जरी आमच्या अंगावरून गेला तरी आम्ही ढिम्म हलणार नाही..  सकाळी नऊ वाजले तरी आमचा सुर्य अजून उगवायचाच असतो .. 
आमची परीक्षा असली कि आमच्या आईची सत्वपरीक्षा असणार !! ... यात आमचे बाबा मात्र झोपु दे ग अजून थोडवेळ या कॅटेगरीतील !
त्यामुळे आईचा आणखी जरा तिळपापड व्हायचा !! आणि  त्यांच्या या नेहमीच्या गोड  संवादात आमची अजून एक डुलकी काढून व्हायची... 
दुपारचे रामायण तर वेगळेच असायचे म्हणजे कसे ना दुपारची वामकुक्षी किती वेळ अर्धा तिथे पाऊण तास असावी  , यालाच काय ते मॉड भाषेत पॉवर नॅप म्हणतात !!! पण आम्ही एकदा वामकुक्षी चालू केली कि आमची कुशी कमीत कमी २-३ तास त्या जागेवरून हालत नाही ...
आता हि इतकी प्रिय गोष्ट मी कॉलेजला आले तरी माझ्या जवळ अगदी माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी राहिली ,इतकी कि माझी मैत्रीण मला कॉलेजला जाताना सोडून जाईल पण हि माझी सखी माझे जेवण झाले कि पुढच्या लेक्चरला माझ्या सोबतच .. तरी बरे पुढचे तीन मागचे दोन बेंच सोडून मी मधल्या बाकड्यावर आपली गादी टाकणार ,, एकदा दोनदा सापडता सापडत वाचलीय !!!! नाहीतर निद्रादेवीचा कोपच झाला असता !!
पण कुठेही गाडीतून किंवा बसमधून प्रवास करताना मात्र मी बाहेरच्या निसर्गाला भरभरून दाद देत असते , त्यावेळी हि माझी सखी मला बिलकुल त्रास द्यायला येत नाही .
एक वेळ रात्रीची झोप मोड झाली तरी चालेल पण दुपारची अहं !!!
आता माझ्या झोपेला नजर लावायला माझ्या आईनंतर आहे तो म्हणजे नवरा ,, याचे आणि माझ्या सोन्यासारख्या सखीचे काय वाकडे आहे तेच समजत नाही !! दुपारची तर नाहीच पण रात्रीचीही झोप इवलीशी पुरते त्याला ?? कधीही झोपला तरी सकाळी सातला आहेच उठलेला कि त्याच्या आधी मला माहिती नाही बा कारण त्यावेळी आपली मध्यान्ह कम पहाट असते ...
सकाळी उठला कि मुद्दाम काहीतरी किचन मध्ये जाऊन आवाज करायचे आणि माझी झोप मोड करायची यातून कुठला असुरी आंनद मिळवतो ते तो असुरच जाणे !!
आता थंडीत तर बाहेर बर्फ पाऊस आणि   आवडती लहानपणीची शॉल गुंडाळून मस्त झोपलेले असताना मुद्दाम ऑफिस मधून फोन करून विचारायचे ,, " काय ग , काय करत आहेस ? "
पहिले पहिले  मीही अगदी सोज्वळपणे सांगायचे कि झोपले आहे रे !! आणि आता म्हणते  बसलीय विमाने मोजत !!! तिकडून छद्मी हसत फोन ठेवला जातो कारण त्यांचे काम फत्ते झालेले असते !!!
अशी हि दुपारच्या झोपेबाबत असलेली अरसिक माणसे !!
दुपारची झोप झाली कि गरम गरम वाफाळता चहा आणि काहीतरी गरमगरम खायला म्हणजे स्वर्गसुखच .. पण इथेही आमच्या मातोश्रीना असे वाटते कि नुसते खायचे प्यायचे आणि झोपायचे... खायला तर भस्म्याच झालेला असतो नुसते बकासुर आहात तिघे !!!
आता खरे सांगायचे तर आमच्या तिघांनाही हा प्रश्न पडलेला असतो कि आम्ही नेमके वंशज कुणाचे  कुलकर्ण्याचे कि कुंभकर्णाचे कि बकासुराचे ???
पण आई म्हणत आहे ना मग असेलच काहीतरी !!!
आज सकाळीच आमच्या नवरोबांसोबत थोडेसे हलके फुलकेसे संभाषण काम सं "वाद " झाला , सगळेच कसे तुमच्या घरचे दुपारचे पण झोपतात असे काही बाही  ......... आणि ऑफिसला जाता जाता मला प्रेमळ  शब्दात सांगून गेले कि आज दुपारी अजिबात झोपायचे नाही !!!
मग काय माझ्यातील एक वळवळणारा किडा जागृत झाला मग मीही काहीही संवाद न करता दिवसभर  मस्त ताणून दिली !!!
संध्याकाळी अहोनी बेल वाजवल्यावरच झोपेत दार उघडले !!
ते पाहून आमचे लंबोदर मला म्हणाले कि ," सकाळी जरा ऑफिसच्या कामाचे टेन्शन होते ,, आणि तुला तर माहिती आहेच कि ग आता मला किती लोड होता !!! त्यामुळे सकाळी जरा थोडे जास्तच बोललो नाहीतर तसा काही माझा उद्देश नाहीच किंबहुना कधीच नसतो फक्त ते जरा वोर्कलोड मुळे .....
आता यात पण माझी आई म्हणते कि अति तेथे माती आणि जर गोडी गुलाबीने होत असेल तर जास्त ताणू नये आणि मलाही पटले कि हे सगळे तो मनापासून बोलत आहे मग काय दिले सोडून !!!
अहा असे तसे नाही हं ... गरमगरम चहा आणि आता काहीतरी चमचमीत खायला द्यायच्या बोलीवरच ..... !!!


No comments:

Post a Comment