Thursday, December 15, 2016

वाड्यातील जत्रा

आज ना एक आगळ्या वेगळ्या गावाबद्दल सांगणार आहे , आमचे मूळगाव कवठे महांकाळ पासून अगदी जवळ फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावरच आमचे हे गाव  " आगळगाव " . इथे एक खूप जुने शंकराचे म्हणजे आगळेश्वराचे मंदिर आहे त्यावरून हे नाव पडले असे म्हणतात , हा इतकाच याचा इतिहास मला माहिती आहे.

आमचा मोठा वाडा आहे इथे , लहान असताना आम्हा बच्चेकंपनीला या वाड्याचे आणि आमच्या मळ्याचे खूप आकर्षण .. अजूनही आहे !!! वाड्यात रमायला , मळ्यात हिंडायला फिरायला आंब्याच्या झाडाखाली बसून पत्ते खेळायला ,, पारावर भातुकलीचा डाव .....  सगळे डोळ्यासमोर आले फक्त गाव म्हणले  !!!!!
   आणि आज याची आठवण आली म्हणजे  खास कारण असे कि  आमच्या गावची जत्रा .... यात्रा !!
मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला असते , दोन दिवस यल्लमा देवीची यात्रा ....
 यात्रा म्हणले कि सगळे एकत्र येतात सख्खे  चुलत असे मिळून आम्ही घरचे ५० -७५ जण असतो कोणताही कार्यक्रम असू दे  , आणि हा आमचा वाडा सगळ्याना संभाळून घेत असतो !!!
लग्न झाल्यावर गावाकडे जायला जमलेच नाही  ,, पण यात्रा आली कि जाम आठवण येते ,, लहानपणी केलेल्या धमाल मस्तीची ...
लहानपणी गावी जात असताना  आगळगाव फाटा आला कि आम्ही गाडीतच दंगा करायचो "आगळ वेगळ गाव आले"  आणि असे म्हणतच आमची गाडी वाड्यापर्यंत पोहचायची  ..  सगळ्यांच्या दंग्याने त्या वाड्यालाही जाग  यायची ,, माजघरातील ती चूल त्यात झालेला धूर , आणि आमच्या आई , काकूंचे त्यामुळे पाण्याने भरलेले डोळे !!!  आम्ही आत गेलो कि काय असते रे तुमचे माजघरात जा सोप्यात खेळा इति आमची आजी ,,
पहिले पहिले  माजघर , सोपा हे शब्द ऐकून इतकी मजा वाटायची पण परत त्याची सवय झाली,, आता आम्हीपण वाड्यात गेलो हे  असेच म्हणतो !!
पहिल्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक आणि तोही चुलीवर सगळ्या वाड्यात त्या पुरणावरणाचा वास दरवळत असे ,, पण मला खरी मजा यायची ती भल्या मोठ्या पातेल्यातील बटाटे पोहे खायला ,, काय तो वास त्याचा आहा !!! सगळे त्यादिवशी वेगळ्या चवीचे लागायचे , पोट भरत होते पण मन नाही ...
आमच्या वाडयापासून ३० -३५ पावले चालत गेले कि आमची जत्रा भरलेलीच ,, सुरुवात ती चिरमुरे , शेव , भजीच्या स्टॉलने !! जरा पुढे गेले कि मग चालू झाले फुगे , गाड्या , दुर्बीण , बांगड्या , गळ्यातली, कानातली .... आणि खूप काही !!! इतक्या जवळ असल्यामुळे आम्ही दर अर्ध्या तासाने बघून यायचो काय बदल झाला आहे का ?? .. आणि किती ते भांडण नाही पैसे कमी करण्यासाठी !!!
मला लहानपानपासून वेड आहे ते फुग्याचे , त्यात  भरलेली रेती आणि तो वाजवायचा जोरात  किती भारी वाटते ना !! आम्ही सगळे मिळून किती फुगे आणायचो याला काही मापच नाही फुटला फुगा कि आण !! दोन दिवस हेच फक्त ...
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सगळ्याच्या आंघोळी आवराव्या लागत कारण पालखी येणार असायची घरी ,, पालखीची मानाची काही घरे असतात त्या घरात पालखी त्या क्रमाने जात असते , आमच्या वाड्यात ती दुसऱ्या कि तिसऱ्या नंबरला येते ..
कुणीतरी वाडयाच्या दारातच उभे असणार लांबून पालखीचा आवाज म्हणजे वाजत गाजत येते पालखी .. आवाज आला कि सगळे सोप्यात येऊन उभे ,, पालखी ठेवली कि तिथे ओटी , पूजा , नमस्कार सगळे होते ..
जे पालखी घेऊन आलेले असतात ते देवीची गाणी म्हणतात जोगती असतात ते नाच करतात   थोडावेळ कार्यक्रम असतो शेवटी आरती होते आणि पालखी जाते ... मग तिथून आम्ही देवीचे दर्शन घेण्यासाठी देवळात जातो ,, त्याच्या समोरच ओढा आहे त्यात पाय धुवून मगच पुढे मंदिरात , खूप जुने मंदिर आहे जास्तीत जास्त एकावेळी आत ४-५ लोक थांबू शकतात ,, आणि आत जाण्यासाठी तर वाकूनच जावे लागते इतके छोटे दार आहे , खूप मस्त आहे परिसर तो !! एकदम शांत पण यात्रेवेळी गडबड गोंधळ असतोच ...
तसे इथे  पाळणे ते असतात पण जास्त मोठे नाही छोटे छोटे , आमचा मोर्चा देवळातूनच स्टॉल कडे जातो ..
दिवसभर काही ना काही चालूच असते !! यात्रा जवळ असलेला फायदा हा !!
अरे हो तमाशा देखील असतो !! पण तो आमचा प्रांत नाही !!
संध्याकाळी पालखी किचात जाते त्यावेळी यात्रा संपते ,, किचात म्हणजे  निखारा असतो  ,, जे लोक पालखी घेऊन फिरत असतात ते आणि देवळातील पुजारी त्यावरून पालखी घेऊन चालतात तेव्हा यात्रा संपली असे म्हणतात ... आमच्यकडे शक्यतो पालखी किचात गेल्याशिवाय कुणी गावाबाहेर जात नाही !!
मजा असते यात्रा म्हणजे , मुळात आमचे सगळे घर एकत्र आलेले असते तो आनंद वेगळाच !!!
वाडा असो कि पूर्वीच्या काही रिती ,परंपरा यांच्या आठवणीनेही एक वेगळीच शांती आणि समाधान मिळते नाही का !!!











No comments:

Post a Comment