Wednesday, December 14, 2016

प्रारब्ध

अंकिताचे लग्न होऊन ती सासरी आली ,, सासर आणि माहेर तसे काही जास्त दूर नाही काही तासाच्या अंतरावरच .. तिच्या माहेरी सगळे शिकलेले थोडयाशा नवीन विचारसरणीचे पण रिती परंपरा धरून असणारे .. सासरी एक नणंद , दीर , सासू  सासरे ... नणंदेचे लग्न झाले होते पण ती जवळच राहत होती त्यामुळे माहेरीच जास्त ...  सासरे घरीच आणि दीर काहीतरी कामे करत असायचा .. तिचा नवरा अजय हाच काय तो घरातील एकमेव कमावता ....
अंकितासाठी  अजयचे नाव तिच्या बाबांच्या मित्रांपैकी कुणीतरी सुचवले होते .  तिच्या बाबांनी सगळी माहिती घेतली त्यावेळी तरी त्यांना त्यात वावगे असे काहीच दिसले नाही .. एकत्र कुटुंब , राहायला घर आणि मुख्य म्हणजे मुलगा  अजय चांगला होता ,,, पण दिसते तसे नसते !!!!
लग्नावेळी अंकिताच्या  सासरच्यांनी खूप कोडकौतुक केले .. पण नव्याचे दिवस संपले तसे ..... !!!

अंकिता नोकरी करत होती लग्नानंतर ती कामावर जाऊ लागली ,, पहिले थोडे दिवस सगळे फक्त बघत होते पण नंतर नंतर तिच्या सासूने अजयला सांगायला सुरुवात केली ," तुझी बायको बघ कसले कसले ड्रेस घालते ,, साडी नेस म्हणले तरी ऐकत नाही,,  कारणे देत असते नुसती प्रवासात हेच बरे आहे ... घरातील कामे नको असतात ,सकाळी लवकर निघायचे आणि उशिरा यायचे  !!! "
अजयची आई रोजच त्याच्यासमोर असा पाढा वाचू लागली ... 
अंकिता खरे तर रोज सकाळी लवकर उठून घरातील कामे आवरून मग जात असे .... संध्याकाळी जेव्हा ती घरी येईल त्यावेळीच चहा होणार तोही तिनेच करायचा बाकी कुणी कशाला हात लावत नसे ...  सासरे तर दिवस रात्र पिऊन बसत कधी कधी त्यांना सोबत द्यायला नणंदेचा नवरा , आणि दीर सुद्धा असे ... 
अंकिताला त्यावेळी इतके अवघडल्यासारखे वाटायचे ,,, त्यांना चढली कि अगदी शिव्या सुद्धा द्यायला कमी करायचे नाहीत ... तिची सासू आणि नणंद फक्त हसत आणि टि व्ही लावून त्यावरच्या मालिका बघत त्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडत नसे .... 
अंकिताने अजयला सांगून पहिले ... त्याला तर सगळेच माहित होते पण तो काहीच बोलायचा नाही ... महिना झाला कि सगळा पगार आईच्या हातात आणून देणे कि आपली जबाबदारी संपली असे त्याच वागणे ... 
अंकिता खूप मागे लागली होती कि त्यांना सांग, समजावं काहीतरी .... ,,, 
 त्यावेळी अजयने तिला सांगितले कि , "हे आहे असेच राहणार !! तुला याची सवय करून घ्यावी लागेल मी कुणाला काही बोलणार नाही .... आणि तुझा पगार आईच्या हातात द्यायचा स्वतःच्या चैनीसाठी जरा कमी वापर !! तुझ्या  ऑफिस मध्ये तू काय करते , कुठे असते सगळे माहीत आहे मला ... !!!!!" 
हे ऐकून अंकिता त्याच्याकडे पाहतच राहिली !!! सगळेच नवीन होते तिच्यासाठी !!!! 
अंकिता स्वतःला कसेतरी सावरत  म्हणाली कि " हे पैसे माझे आहेत ते कसे कुठे वापरायचे ते माझे मी पाहीन !!"
पण अजय काही न ऐकता बाहेर निघून गेला आणि त्याच्या बाबांच्या सोबतीला जाऊन बसला ... 
अंकिता आतमध्ये एकटीच बसून होती ... ती आहे कि नाही याची पर्वा कुणालाच नाही !!!!
दुसऱ्या दिवशी अंकिताने नेहमीप्रमाणे आपली कामे आवरली आणि ऑफिसला न जाता  आईकडे गेली ... खूप दिवसांनी तिने आपले मन मोकळे केले .. आईने तिचे ऐकून तिला रडून दिले ती थोडी शांत झाल्यावर आईने  तिलाच विचारले " आता तुला काय करायचे आहे ? राहणार आहे का तिथे तू ? "
 " आता मला काय करायचे आहे ते मलाही नक्की माहित नाही , पण काहीतरी मार्ग काढायला हवा ,, एकदा अजयसोबत बोलून बघते , पण कुठेही बाहेर जायचे म्हणले कि त्याच्या आईची परवानगी लागते तिने हो म्हणले तरच आमचे घोड पुढे जाते नाहीतर तिथेच अडकते ... "  अंकिता .
तसे आई तिला म्हणाली बघ एखादे देव दर्शन असे निम्मित करून बाहेर पड , त्याच्या मनातले तुला कळाले कि पुढचे निर्णय खूप सोपे होतील ...
आईचे बोलणे अंकिताला पटले ,, काहीतरी विचार करून घरी पोहचली .. तर घरी आधीच समजले होते कि अंकिता ऑफिसला न  जात तिच्या माहेरी गेली होती .
तिच्या सासूला आधीच निम्मित हवे असते  बोलायला आता आयतेच सापडले होते  ,, माहेरी जाऊन आमच्याविषयी त्यांचे  कान भरून आली का ? कि नेहमीच जाते असे आम्हाला न सांगता .. ? तरीच माझ्या हातात पगार दे म्हणले कि द्यायचा नसतो आणि तिकडे जाऊन माहेरचे घर भरायचे असते असे एक ना अनेक बोलणे चालू होते .. तुला नोकरी होती म्हणून या घरात आणली नाही तर तुला विचारले सुद्धा नसते आम्ही .... " हे ऐकून मात्र अंकिताला धक्का बसला म्हणजे फक्त पैशासाठी माझ्याशी लग्न केले ...!!!!
आता अजयला विचारायलाच हवे , त्याचेही मत असे असले कि मग संपलेच ना !!
अजय घरी आला पण त्याआधीच त्याला घरी काय झाले आहे ते माहित होते ,, त्यामुळे तो येताना बाहेरूनच पिऊन आला होता .
अंकिता त्याला काही बोलणार तोच त्याने तिला शिव्याची लाखोली वाहायला सुरुवात केली .. तो काही ऐकून घेण्याच्या शुद्धीत नाही . अंकिता त्याला समजावत होती , पण तो फक्त वेड्यासारखे करत होता  एकदा तर त्याचा स्वतःचा तोल ढळला त्याने अंकिताला मारण्यासाठी तिच्यावर हात टाकला अंकिता बाजूला झाली आणि अजयचे डोके बेडच्या कठड्याला बडवले त्याला जोरात मार बसला .
त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले अंकिता सासू सासऱ्यांना बोलावू लागली पण सासऱ्यांना उठता येईना इतकी जास्त झाली होती .सासूला काय करावे ते समजेना !! अंकिताने तिच्या भावला फोन करून गाडी घेऊन यायला सांगितले .
तिचा भाऊ आला , अजयला घेऊन ते डॉक्टरकडे गेले ,, अजयकडे पाहून त्यांनी सांगितले कि आता लगेच याच्यासाठी रक्ताची व्यवस्था करावी लागेल , अजयचा आणि त्याच्या बाबांचा ब्लडग्रुप एकच होता पण आता यावेळी त्यांचा काही उपयोग नव्हता ... अंकिताच्या भावाने त्याच्या मित्रांना बोलावून सगळी तयारी केली ..
पण अजयने खूप दारू घेतली होती त्यामुळे डॉक्टर जास्त काही बोलत नव्हते ..
अंकिताचे आई बाबा तिथे आले ..
दुसऱ्यादिवशी डॉक्टरांनी सांगितले कि याची जखम खूप खोल आहे ती भरून येण्यासाठी वेळ लागेल ..
४-५ दिवसानी अजय घरी आला पण डोक्यावर पट्टी होतीच ,, डॉक्टरांनी त्याला सांगितले होते तुझे ड्रिंक्स घेणे असेच चालू राहिले तर तू यातुन नाही बाहेर पडू शकणार वेळीच सावर स्वतःला ...
अंकिताने अजयसाठी  म्हणून २ महिन्याची सुट्टी घेतली होती .  तो पूर्ण बरा होईपर्यँत ती त्याच्या सोबत होती , पण ती सगळे करताना कर्तव्य म्हणून करत होती त्यात आपलेपणा असा कुठेच नव्हता ....
अजयला हे सगळे कळत होते त्याने एक दिवस अंकिताला विचारले , " रागावली आहेस का  ग ?
जास्त काही बोलत नाही , फक्त काम करत राहते .... "
अंकिताने त्याच्याकडे पाहिले आता तो पूर्णपणे बरा होत आला होता ,, ती काही न बोलता त्याच्याकडे पाहून हसली फक्त आणि म्हणाली आपण बोलू लवकरच तू आता आराम कर ,, उद्यापासून माझी सुट्टी संपणार आहे ..
अंकिता आता नेहमीप्रमाणे सगळे आवरून ऑफिसला जात होती , घरचे वातावरण सगळे पूर्वीसारखेच होते .. पण अंकिता आता तिकडे लक्ष देत नव्हती ..
पंधरा दिवसांनी ती घरी जरा लवकरच आली खुशीत होती ,,, त्यावेळी घरी अजय एकटाच सोफ्यावर पडला होता .. अंकिताला असे खुशीत पाहून तोही जरा गोंधळला ... अंकिताला त्याने विचारले आज काही खास आहे का ?

अंकिताने दोघांसाठी चहा करून आणला , ती म्हणाली अजय तू मला विचारले होते मी रागावले आहे का ? तर त्यावेळी मी स्वतःला शोधात होते .. २ महिन्यात घरी बसून खूप विचार केला कि पुढे आपल्याला काय करायचे आहे ? कसे जगायचे आहे ? त्यावेळी  बरेच पर्याय समोर आले , बरीच उत्तरे माझी मला सापडली ,, हरवलेली मी मला गवसले ....
अजय मी इथून आता बाहेर पडायचे ठरवले आहे काहीतरी नवीन करायचे आहे ,, माझी स्वतःची मला नवीन ओळख निर्माण करायची आहे , खरे हेच माझे स्वप्न होते लग्नाआधी ,, तुझ्यासाथीने ते पूर्ण करेन असे वाटले होते पण ते काही शक्य नाही ..... त्यामुळे आता माझी वाट मीच शोधेन ... !!!
अजय फक्त पाहत होता तो तिला म्हणाला मग इतके दिवस माझी सेवा करण्याचे फक्त नाटक का ?
तसे अंकिता म्हणाली नाही नाटक नाही ,,, माझे कर्तव्य करत होते .. तू आता धडधाकट आहेस तुझ्या पायावर उभा ,, त्यावेळी तुझ्या आईला वाटले होते कि तुला माझ्यामुळे लागले,,,  हा सगळा त्रास तुला माझ्यामुळे झाला  ..   पण खरे काय आहे ते तुला माहित आहेच ना !!!!
आणि खरे तर मी आपल्या विषयी बोलणार होते तुझ्यासोबत त्यादिवशी ,,, पण तू काही बोलायच्या पलीकडे होतास  ... मी काही सांगत होते पण तू ऐकून घेण्याआधीच हात उचलला माझ्यावर !!!
 अंकिता बोलतच होती आणि अजय फक्त ऐकत होता ....
अजय तिला म्हणाला जर असेच करायचे होते तर मग इतके दिवस नाटक कशासाठी केले ... त्यावेळीच गेली असतीस तर ....
अजय , हा प्रश्न मी तुला विचारते , जर त्यावेळी तू मला मारल्यामुळे जर मला काही झाले असते तर तू काय केले असते का ?
अंकिता त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती ... पण अजयला  तिच्या डोळ्यात पाहायची हिम्मत होत नव्हती ...

दारात अंकिताचा भाऊ तिला घेण्यासाठी आला होता ,, ती आपली बॅग घेऊन आली आणि अजयकडे एक कटाक्ष टाकून निघून गेली ...
अजय एकटक तिच्या पाठमोऱ्या लुप्त होणाऱ्या आकृतीकडे पाहत होता ....
अंकिता उद्यापासून एका नवीन जगात नवी प्रारब्धाची वाट शोधणार होती ...



No comments:

Post a Comment