Wednesday, August 24, 2016

मृगजळ

मुग्धा , मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधी मुलगी  कॉलेजमध्ये आहे  . आई एका पतसंस्थेत नोकरी करते ,तिचे बाबा आधी कोणत्यातरी कारखान्यात होते पण त्यांनी अफरातफर केली म्हणून त्यांना नोकरीवरून काढून टाकले आणी तिथेच मुग्धाच्या घराचे स्वास्थ्य हरवले , तिच्या वडिलांना दारू प्यायची सवय लागली  ,रात्री बेरात्री घरी येणे , आईने त्यांना काही बोलले कि तिला मारणे  हे सगळे ती पाहत होती पण काहीच करू शकत नव्हती .
सकाळी जेव्हा तिचे बाबा शुद्धीत यायचे तेव्हा सगळ्याशी अगदी गोड़ बोलायचे पण रात्री मात्र परत तेच !!
या सगळ्यालाच ती खूप वैतागली होती . 
कॉलेज मध्ये मित्र मैत्रीण रोज नवीन नवीन ड्रेस घालून यायचे तेव्हा हिला खूप वाईट वाटायचे तिचे आपले ठरलेले तेच चार पाच ड्रेस आलटून पालटून वापरायचे . 
कुणाची बडे पार्टी असली कि ती काही ना काही कारण काढून टाळायची . 
 मनातून तिलाही खूप वाटायचे कि आपणही यांच्यासारखे फिरावे , सिनेमाला जावे , पार्टी कराव्या पण  घरची परिस्थिती अशी होती कि इच्छा असूनही काही करता येत नव्हते . तशी ती खूप समजूतदार पण आपल्या बाबांवर तिचा विशेष राग होता, जे काही होत आहे त्यांच्यामुळेच !!! हे तितकेच सत्य होते एकदा दोनदा  आईला ती बोलली पण त्यावेळी आईनेच  तिला सुनावले ,  " गळ्यात असणाऱ्या चार मण्यांची किंमत बाहेरच्या जगात किती आहे हे तुला तुझे लग्न झाल्याशिवाय नाही कळायचे !!! "
त्याच्यानंतर ती कधी आईला बोललीच नाही ...... 
नुकतेच कॉलेज सुरु झाले होते आज ती नेहमीसारखी तयार होऊन कॉलेजला जायला निघाली , तिथे गेल्यावर कळाले कि आज पहिले लेक्चर नाही आहे  त्यामुळे सगळे कॅन्टीन मध्ये जाऊ लागले तिला जायचे नव्हते पण तिची मैत्रीण सुषमा तिने जवळ जवळ तिला ओढतच नेले . 
कॅन्टीन मध्ये सगळ्यांची गप्पा गोष्टी चालू होत्या पण मुग्धाचे कशातच लक्ष लागत नव्हते , तिच्या मनाला एक वेगळीच हुरहूर लागली होती.. 
कशाची काय हे कळतच नव्हते . 
बाकीचे गप्पा मारत असताना अचानक तो आला अनिकेत !! तिच्या नकळत तिच्या ओठातून त्याचे नाव आले. 
त्याला बघून तिचा मूड एकदम फ्रेश झाला . यावर्षी तो त्यांच्या कॉलेज मध्ये नवीनच आला होता . आलेल्या दिवसापासून तो तिला बाकीच्या तिच्या मित्रांपेक्षा खूप वेगळा वाटायचा . 
अनिकेत तिथे आल्यावर मुग्धाही लगेच गप्पामध्ये  सामील झाली . 
हळूहळू त्या दोघांची ओळख वाढत होती , कधी नोट्स तर कधी कोणता तरी इव्हेंट ... 
अनिकेत आल्यापासून मुग्धाला एक वेगळाच रंग मिळाल्यासारखा वाटत होता , एकदा सुषमाने तिला विचारलेही पण तिने काहीतरी कारण सांगून टाळले . 
अनिकेतचा स्वभाव अगदीच मोकळा होता , घरची परिस्थिती उत्तम , तो सगळ्यांशीच खूप मिळून राहायचा . 
अनिकेत आणि मुग्धाची खूप छान गट्टी जमली होती , अनिकेतलाही सुषमाकडून मुग्धाच्या घरची परिस्थिती कळाली होती त्यामुळे तो मुग्धाच्या नकळत तिला मदत करायचा 
अर्थात हे मुग्धाला समजत होते पण तीही त्याच्या अज्ञानात सुख मानत होती . 
थोडे दिवसानी अनिकेतची बड्डे  पार्टी  होती त्याने सगळ्यानांच बोलावले होते , यावेळीही मुग्धा काहीतरी कारण काढून नाही म्हणणार म्हणून त्याने तिला आधीच सांगून  ठेवले होते  कि यावेळी कोणतेही नाटक चालणार नाही . 
मुग्धा आली होती पार्टीमध्ये पण  हायक्लास पार्टी बघून ती गोंधळून गेली होती . 
  मजा मस्ती चालूच होती घशाला कोरड पडली म्हणून ती पाणी घेण्यासाठी जात होती , तर तिथंच बाजूला तिला वेगवेगळ्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या दिसल्या आणि अनिकेत अगदी मस्त मजेत ते पित मजा करत होता . 
मुग्धा तिथेच त्याच्याकडे एकटक पाहत उभी होती , ज्यागोष्टीपासून ती  दूर राहण्याचा प्रयत्न करत होती  , विसरायचा प्रयत्न करत होती  तेच तिच्या समोर येत होते राहून राहून हाच विचार तिच्या डोक्यात चालू होता . 
इकडे तिच्या खांद्यावर कुणीतरी हात  ठेवल्याचा तिला भास झाला तर तो अनिकेत होता !!!
तिला विचारत होता कुठे आहे लक्ष ? कुठे पाहत आहेस ?
तिला काय बोलावे हेंच समजेना काहीतरी कारण सांगून ती पार्टीतून निघून गेली . 
अनिकेतलाही जाणवले काहीतरी गडबड आहे . 
त्यानंतर मुग्धा कॉलेजला आल्यावरही त्याच्यापासून दूर दूर राहायचा प्रयत्न करत होती अगदी कारणापुरते बोलत होती , अनिकेतला तिचे हे असे वागणे खटकत होते  त्याने बोलायचा प्रयत्न केला पण ती त्याला दाद लागू देत नव्हती . 
दोन दिवस असे होत आहे हे पाहिल्यावर कॉलेज संपल्यावर लगेच ती जाते त्या स्टॉपवर अनिकेत जाऊन थांबला , मुग्धाने ते पाहून न पाहिल्यासारखे केले , पण आज अनिकेतने तिच्याशी बोलायचे ठरवलेच होते . 
तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या जवळ जाऊ लागला तर मुग्धा तिथून चालत जाऊ लागली , अनिकेतने तिला थांबवले  आणि तिच्या मागे लागून जवळच असणाऱ्या एका छोट्या कॅफे मध्ये घेऊन गेला . 
" मुग्धा , माझे काही चुकले आहे का ? त्यादिवशी पार्टीतून निघून गेली अचानक आणि आता परत काही बोलत पण नाही आहे . काय झाले आहे ते तर सांग . काही बोलली नाहीस तर मला कळणार कसे ? " अनिकेत . 
"अनिकेत , नाही रे तुझे नाही , चुकले आहे माझे कदाचित माझ्याच अपेक्षा जास्त होत्या म्हणून.... !" मुग्धा 
" बोल ना मुग्धा का थांबलीस " ...  अनिकेत 
 " नाही नको आणि तसेही तुला काही बोलायचा अधिकार मला नाहीय " ...  मुग्धा  
 " असे का म्हणतेस मुग्धा आपण इतके दिवस झाले ओळखतो एकमेकांना आणि किती चांगले मित्र आहोत आणि तू आज अचानक असे का म्हणत आहेस ? ".... अनिकेत 
 " फक्त चांगले मित्र अनिकेत ? " मुग्धाने असे म्हणत अनिकेतकडे पहिले .... 
" नाही अग म्हणजे मला ... अग तुझ्याइतके चांगले मला कुणीच समजावून घेत नाही , तू खूप जवळची आहे मला आणि आवडते  पण ..   " अनिकेत 
पण काय अनिकेत ? 
 " पण तुझ्या मनात काय आहे हे मला खरेच माहिती नव्हते त्यामुळे मी गप्प होतो आणि म्हणूनच तुला काही सांगितले नाही माझ्या मनातले .... "  मुग्धा आता थोडी शांत झाल्यासारखी दिसत होती 
"  मुग्धा,  प्लिज आता तरी मला सांग ना काय झाले आहे ते ? का तू नाराज आहेस माझ्यावर ? " अनिकेत
" अनिकेत , लहानपणी आई बाबा नोकरी करत होते तेव्हा आम्ही खूप सुखी होतो पण अचानक माझ्या बाबांना खूप पैसे कमवण्याचे वेड काय लागले आणि त्यात त्याच्या मित्राने त्यांना फसवले तेव्हापासून ते दारूच्या नशेत राहू लागले . खूप प्रयत्न केला त्यांना समजावण्याचा पण ते काही ऐकूनच घेत नाहीत उगीच आईला मारतात . कंटाळा आला आहे मला त्यांच्या या वागण्याचा पण मी काहीच करू शकत नाही . " मुग्धाचे डोळे पाण्याने भरले. 
हलकेच अनिकेत तिच्या हातांना थोपटत होता . 
मुग्धाचे मन बरेच हलके झाले होते खूप दिवसांनी ती आपल्या मनातले कुणाशी तरी बोलत होती . 
अनिकेतने तिला विचारले , हो पण तू माझ्यावर का नाराज आहे ? ते तर सांग !! 
त्यादिवशी तुझ्या घरी आले होते पार्टीसाठी आणि तु ड्रिंक्स घेताना दिसला त्यावेळी माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती तुझे हे रूप मला माहितीच नाही , मला त्यावेळी फक्त राहून राहून माझ्या घरातील परिस्थिती आठवत होती .
यावर काय बोलावे हे अनिकेतला समजेना ..
अग मी कधीतरी मजा म्हणून घेतो ड्रिंक्स रोज काही अगदी अट्टल दारुड्यासारखा पित नाही .  
अनिकेत सगळेच पहिला मजा म्हणून घेत असतात त्याची परत चटक लागून आपण आपल्याच आयुष्याला कशी सजा देतो हे स्वतःच्या सुद्धा लक्षात येत नाही ...
असे मुग्धा म्हणाल्यावर अनिकेतला बोलयला काही राहिलेच नव्हते . 
मुग्धा त्याच्या उत्तराची वाट बघत होती.
 ठीक आहे मुग्धा तुला जर आवडत नसेल माझे ड्रिंक्स घेणे तर,  मी नाही घेत पण तू अशी नाराज नको होऊ मी पूर्णपणे प्रयत्न करेन.....
तो हे सगळे इतके मनापासून बोलत आहे हे पाहून मुग्धा खुश झाली तिला कुठेतरी वाटत होते कि हा आपल्यासाठी इतके तरी करेल . 
त्या दिवसापासून अनिकेत खरेच बदलायचा प्रयत्न करत होता ,  मुग्धाला हि खूप समाधान वाटत होते कि आपली निवड चुकणार नाही ..
ज्यावेळी मुग्धा आणि अनिकेत जवळ येत होते तेव्हाच सुषमाने मुग्धाला सावध करायचा प्रयत्न केला होता , मुग्धा , अनिकेत हा खूप मोठ्या कुटुंबातून आलेला आहे , तो आता जरी तुला गोड़ वाटेल असे वागत असला तरी पुढे जाऊन तो  त्याच्या पहिल्या मार्गावर येणार नाही याची काय खात्री आहे ? त्यादिवशी तू पार्टीतून गेल्यावर अनिकेतचे मित्र त्यांची पार्टी हे सगळे मी पहिले आहे ...... सुषमा मुग्धाला समजावयचा खूप प्रयत्न करत होती ...
पण म्हणतात ना प्रेम आंधळे असते ..
मुग्धाला आताच अनिकेतचा चांगुलपणा फक्त दिसत होता , अर्थात अनिकेत हा खूप चांगला मुलगा होता फक्त त्याचे काही मित्र आणि त्याची ड्रिंक्स घेण्याची सवय सोडली तर सगळेच आलबेल होते .
जरी अनिकेत आणि मुग्धा हे एकत्र असले तरी अनिकेत अधूनमधून पार्टीला जात असे ,अगदी थोडे थोडे करत त्याचे मित्र त्याला ड्रिंक्स घ्यायला भाग पाडत .
मुग्धा त्याच्यावर नाराज होई परत  तो तिला मनवायचा .....

पण हे सारखे सारखे होऊ लागल्यावर मुग्धाची बुद्धी आणि मन यात अंतर तयार झाले , तिची बुद्धी तिच्या मनाला साथ देईना ... कारण तिच्या बुद्धीला हे पटत होते कि हे चुकीचे आहे , अनिकेतच्या प्रेमात आपण वाहवत जात आहोत कि तो फसवत आहे कि नाही याचा सुद्धा तिला निर्णय घेता येईना ...
त्याच्यामुळे बदलेली तिची लाईफस्टाईल , महागड्या गिफ्ट्स याने मन सुखावत होते , पण बुद्धी मात्र तिला वेगळाच विचार करायला भाग पाडे ,पण प्रत्येक वेळी तिच्या मनाचे पारडे जड  होई आणि बुद्धी कमकुवत पडे ...
 शिक्षण पूर्ण झाल्यावर मुग्धाच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी सुरु झाली , त्यावेळी मुग्धाने तिच्या आईला अनिकेत बद्दल सांगितले तिच्या आईला तशी काहीच अडचण नव्हती मुलीला इतके सुंदर सासर मिळणार आहे हे पाहून ...
प्रश्न होता तो अनिकेतच्या आई वडिलांचा , अनिकेतची आई खूप साधी फक्त वडील  कडक होते पण ते आपल्या मुलासाठी तयार झाले ...
अनिकेतच्या घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न थाटामाटात झाले , मुग्धाकडची मंडळी तर  पाहत होती  सगळा झगमगाट .... आईला वाटले आपल्या पोरीने तरी  नशीब काढले ...
मुग्धा आणि अनिकेत हनिमूनसाठी जाऊन आले , अनिकेतच्या बाबांच्या इच्छेनुसार त्याने त्यांची छोटी फर्म जॉईन केली .
दोघांचा सुखी संसार चालू होता , अनिकेतचे मित्र आणि त्याच्या पार्टी चालूच होत्या , कधी कधी मुग्धा त्यावरून त्याला बोले पण तो तिची  तेवढ्यापुरती समजूत घालत असे , आणि परत त्याचे चालूच ...
मुग्धा आता त्याच्या या गोड गोड बोलण्याला कंटाळली होती ....
एक दिवस असाच अनिकेत खूप उशिरा घरी आला मुग्धा त्याची वाट पाहत बसली होती दुसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस होता म्हणून ती खुशीत होती ....
दारावरची बेल वाजली , तिने दार उघडले तर अनिकेत तोल जाऊन तिच्या अंगावर कोसळला ..
तो इतका पिऊन आला होता कि त्याला कशाचीच शुद्ध नव्हती ..
मुग्धाने कसेबसे त्याला सावरत बेडरूममध्ये  झोपवले ..
ती रात्र तिने तशीच जागून काढली रडून रडून तिचे डोळे सुजले होते . अनिकेत दुसऱ्या दिवशी डोके धरूनच उठला , तिने त्याला लिंबूपाणी आणून दिले  आणि तिथून निघून गेली .
अनिकेतला रात्री काय झाले त्यातले काही आठवत नव्हते , मुग्धाशी बोलायला गेल्यावर ती त्याच्या एकदम  ओरडत अंगावरच आली ,...
अनिकेत का विश्वास ठेवला मी तुझ्यावर ? त्यावेळीच जर स्वतःला सावरले असते तर आज हि वेळ आली नसती मझ्यावर का असा वागत आहेस ? तुझी माफी ,मनवणे हे सगळे खोटे का ? काही अर्थ आहे का तुझ्या वागण्याला मुग्धा बडबडतच होती ...
अनिकेतचे डोके आधीच दुखत होते तिच्या या बोलण्याने तो जास्तच चिडला  तिला ओरडू लागला , तुला माझ्याशी लग्न करायची घाई झालेली , पैसा पाहून तू प्रेम केलेस माझ्यावर !! मी हा आधीपासूनच असा आहे....  माहिती होते ना मग ? तरीही केलेस लग्न मग आता हि खोटी नाटके कशाला ??  अनिकेतचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता ...
हो त्यावेळी केला मूर्खपणा , पण आता करेन त्याची भरपाई मला नाही राहायचे तुझ्यासोबत , आणि तू म्हणतो आहेस ना या पैशासाठी लग्न केले त्यातले एक पैसाही नको मला ... मुग्धाही काही वाटेल ते बोलत होती ...
अनिकेतकडे पैसा आहे हे कारण होतेच पण   मुग्धाचे त्याच्यावर खूप प्रेम होते म्हणूनच ती त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करत होती , मुग्धाला वाटले होते आपण अनिकेतला बदलू शकू पण ते आता शक्यच दिसत नव्हते .
मुग्धाचा वाढदिवस अनिकेत पूर्णपणे विसरला होता पण तिच्या सासू सासऱ्यांनी तिच्यासाठी एक पार्टी ठेवली होती .
संध्याकाळी घरी पार्टी पाहून त्याला आठवले कि आज मुग्धाचा वाढदिवस आणि आपण तिला काही बाही बोलून गेलो , अनिकेत तिला समजावण्यासाठी तिच्या जवळ येत होता .....
सगळयांच्या गराड्यामध्ये मुग्धा बाहुलीसारखी खोटे खोटे हसत होती , सोन्याच्या पिंजऱ्यातल्या  पोपटासारखी  तिची अवस्था झाली होती , आजूबाजूच्या लोकांच्या गराड्यात तिचा जीव घुसमटत होता ...
आणि तिला तिच्या आईचे शब्द आठवत होते ..."  या चार काळ्या मण्यांची किंमत  ....... ..."




  


No comments:

Post a Comment