Tuesday, August 2, 2016

ओळख

आमच्या घराशेजारी एक काका राहायला होते , स्वभावाने खूप छान आणि मनमोकळे काकूही तशाच अगदी ... त्यांना दोन मुले जवळपास दोन अडीच वर्षाचा फरक असेल दोघांच्यात दोघेही खूप हुशार . दोन्ही मुले शिकायला परदेशात एकूणच काय सगळे उत्तम चालू होते . 
नुकतेच काका त्यांच्या नोकरीतून रिटायर झाले होते , त्यामुळे घरी बसून गाणी ऐकणे , फिरणे , मित्र यात त्यांचा खुपसा वेळ जात असे , आणि घरी काकूंना मदत करत  त्यामुळे काकूही  खुश . काकांचा मित्रपरिवार खूप मोठा त्यामुळे नाटक , कुठेतरी छोटीशी ट्रिप हे सारखे काही न काही चालूच असे . 
नोकरीच्या काळात फिरायला  वेळ मिळत नसे आणि आता पैसाही आहे आणि तब्येतपण साथ देत आहे तोवर फिरून घ्यायचे हा एकच बाणा काकांनी रिटायरमेंट नंतर अवलंबला होता . 
काकांची कंपनी मिळणे म्हणजे त्यांच्या मित्रांना मेजवानीच काकांकडे त्यांच्या नोकरीतले किस्से , बाकी बारीकसारीक अनुभव यांचा खजिनाच होता ,कधी कधी हे सगळे आपल्या बायकांना सोबत घेऊन जात तेव्हा काकूही जात असत . 
यावेळी काकांनी पावसाळी ट्रिप काढायची असे ठरवले पण फक्त मित्र मित्र त्यामुळे काकू घरीच , तसाही काकूंना त्यांच्या व्यापातून दिवस कमीच पडत असे .  
यावेळी त्यांच्या ग्रुपने गड  किल्ले असा कार्यक्रम आखला होता . सगळी तयारी झाल्यावर एक दिवशी भल्यापहाटे सगळी मित्रमंडळी किल्लेचढाई साठी रवाना झाली . एकेक किल्ले पाहून त्यांची माहिती घेऊन तिथल्या शौर्यगाथा मनात साठवत त्यांची मोहीम चालू होती . 
आज शेवटचा दिवस रात्री घरासाठी प्रयाण.... 
जेवण झाल्यावर परतीची तयारी चालू केली , सगळ्यांचे सामान गाडीत स्थिरावल्यावर मोठ्याने हर हर  महादेवचा जयघोष करत गाडी चालू झाली , पावसाळ्याचे दिवस होते तसाही ड्राईव्हर  गाडी हळू हळू चालवत होता , घाटात गाडी आली तशी ड्राईव्हरने   गाडीचा वेग आणखी कमी केला , सगळेच थकल्यामुळे झोपेत होते , हळू हळू गाडी पुढे जात होती , अचानक एका वळणावर पुढून एक ट्रक जोरात आला ड्राइव्हरने गाडी सांभाळायचा प्रयत्न करत होता अचानक गाडीचा वेग वाढलेला पाहून सगळेच जागे झाले ,काही कळण्याआधीच गाडी एका मोठ्या दगडावर जाऊन आदळली . कुणाला काहीच कळत नव्हते कुणी माझा पाय तर कुणी हात , गुढगा म्हणत कह्णत होते ,पण काकाचा तर काहीच आवाज नाही डोक्याला मार  लागल्यामुळे ते बेशुद्ध झाले होते . 
मागून येणाऱ्या गाड्यानी हे पाहून पोलिसांना फोन केला आणि सगळ्यांना घेऊन जवळच्याच हॉस्पिटल मध्ये गेले , ड्राइव्हरच्या हुशारीमुळे जीव जाताजाता वाचला होता जर का  गाडी दरीत कोसळली असती तर ??? 
पण नशीबवान सगळेच होते . 
फक्त काकांच्या डोक्याला जोरात मार  लागला होता बाकीचे  हातपाय फ्रॅक्चरवर निभावले होते . 
पण काका अजूनही शुद्धीत आले नव्हते , काकूही तिथे येऊन पोहचल्या  काकांची अवस्था पाहून त्याही कोसळणारच होत्या पण काकांना आधार देण्यासाठी आता फक्त त्याच तर तिथे होत्या . 
चोवीस तासानंतर काका शुद्धीवर आले , तेव्हा काकू त्यांच्या समोरच होत्या , काकूंनी डॉक्टरांना बोलावले काकांना चेक करून , डॉक्टर त्यांना काही प्रश्न विचारू लागले पण काकांना त्यांचे नावही आठवेना  आणि काकूही ..... 
आता काकू फक्त पाहत होत्या त्याच्या डोळ्यासमोर फक्त अंधार होता . 
तसे काकांना लागलेला मार पाहून डॉक्टरांनी हि शक्यता वर्तवली होतीच पण त्यावेळी ती फक्त शक्यता होती आणि  आता ती वास्तविकता होती . 
त्यांच्या मुलांना बोलावून घेतले , काकांच्या ऑपरेशनसाठी त्यांना मोठ्या हॉस्पिटलला हलवण्यात आले , तसेही ऑपरेशन रीस्कीचं होते कारण यात काका कोमात जाण्याचीही शक्यता होती . 
काकूंना तर वेड लागायचे बाकी होते . सगळे देव पाण्यात आले होते . 
मुलांनाही आईला आधार द्यावा कि स्वतःला सांभाळावे समजत नव्हते 
 काकांचे ऑपरेशन झाले , त्यांच्या शुद्धीत येण्याची सगळेजण वाट पाहू लागले , काका शुद्धीत आले आणि त्यांनी काकूंचे नाव घेतले तेव्हा काकूंना झालेला आंनद अवर्णनीयच होता तो तर त्यांच्या डोळ्यात देखील दिसू लागला . पण  खूप थोडा वेळ टिकला . 
काकांना परत आठवेना आपण कोण , आपली मुले ? सगळे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर !!!!!
थोडे दिवस डॉक्टरांच्या निगराणी खाली राहून , काका घरी आले पण त्या घराची ओळख त्यांना पटेना ... पण त्या तिथे त्यांना एक वेगळीच आंतरिक ओढ नक्कीच जाणवत होती ... 
शेवटी काका काकूंनी काडी काडी गोळा करून आपले ते घरटे बनवले होते , त्याची ओळख थोड्यावेळासाठी हरवली असेल पण काकांना त्याचे विस्मरण नक्कीच होणार नव्हते . 
कधी कधी त्यांच्याकडून काकूंना त्यांच्या नावाने हाक येई त्यावेळी त्यांच्या आशा खूप पल्लवीत होत पण खूप थोड्यावेळासाठी .... 
काकाचे हे विस्मरण काकूंच्या खूप जिव्हारी लागले होते पण काकांसाठी त्या स्वतःला सावरत होत्या , पण त्याही खूप खचून गेल्या होत्या . 
काकांचे मित्र घरी येत पण त्यांच्या डोळ्यातील अनोखळी पण पाहून गलबलून येत असे त्यांना .
थोडावेळ जरी स्वतःची ओळख नाही पटली , छोट्या छोट्या गोष्टी नाही आठवल्या तर किती अस्वस्थ व्हायला होते .... 
काकांची छोट्या छोट्या गोष्टीवरून चिड चिड होऊ लागली ,  सगळ्याच्या डोळ्यात त्यांना फक्त सहानभूती दिसत होती आणि त्याचा त्यांना त्रास होत होता , काकूही त्यांना समजावून थकल्या पण एकतर आजारपण आणि हट्टी स्वभाव त्यामुळे यात काहीच फरक पडत नव्हता , त्यांच्या अशा वागण्यामुळे काकू खूपच खचत गेल्या . 
काकांना आधार देता देता स्वतःचा आधार हरवत होता हेच त्यांना नाही कळाले  काकांना सोडून गेल्या त्या कायमच्याच ....... 
यानंतर काकांनी आपल्या घराला ओळखले पण आता त्या घराला मात्र काकांची ओळख पटत नव्हती.....  

No comments:

Post a Comment