Wednesday, June 22, 2016

भातुकली

" ए नाही ग ! आज माझा बाहुला आणि तुझी बाहुली .. नेहमी का म्हणून माझ्या बाहुलीने सासरी जावे कधीतरी येउदे ना तुझी बाहुली पण माझ्या घरी !"
नेहमी चित्रा माझ्या बाहुलीला घरी घेऊन जात असे म्हणून आज मी  तिचे काही एक ऐकायला तयार नव्हते . आज माझा बाहुला आणि तिची बाहुली असा हट्टच होता  माझा ...
मी आणि चित्रा नेहमी आमच्या गच्चीवर हा आमचा भातुकलीचा डाव मांडायचो . तिची थोडी खेळणी आणि माझी अशी मिळून आमची दुपार मस्त जायची कधी कधी घरचे ओरडायचे बास करा आता, खऱ्याखुऱ्या संसारावेळी नाकी नऊ येतील आता खेळताय लुटुपुटुचा खेळ !!!
तेव्हा हे कळण्याइतके ना ती मोठी होती ना मी आमचे आपले विश्वच होते त्यात रमलेल्या आम्ही दोघी ..

मला भातुकलीची खूप आवड कुठेही गेले तरी मी  घरी येताना घेऊन येत असे ,, अजूनही माझ्याकडे लाकडी , स्टील , चिनीमाती ,प्लास्टिक सगळ्या भातुकली आहेत .
 दुपारच्या वेळी माझा अन तिचा डाव रंगलेला असायचा कधी बाहुला बाहुलीचे लग्न , कधी बारसे , तर कधी एकमेकींचे वाढदिवस ...  वाढदिवसावेळी आम्ही मारीच्या बिस्किटाचा केक करायचो ..
दुपारी आई झोपली असताना हळूच एखादा बटाटा , कांदा , चिरमुरे , कच्ची मोहरी जिरे , तिखट सगळे गोळा करणार आणि आईने केलेल्या पोळ्यांचे छोटे छोटे घासाचे तुकडे करून ठेवायचे ...
जेव्हा आमची जेवायची वेळ असेल तेव्हा या कच्च्या भाज्या त्या पोळी सोबत खायच्या  आणि परत जसे मोठी माणसे जेवणानंतर गोळी घेतात म्हणून आम्हीही चिरमुऱ्याची गोळी घेत असू ....  किती निरागस विश्व असते बालपणाचे ...
जेवण झाल्यावर झोप मग परत खोट्या कपात खरे पाणी आणि  साखर  घालून तोच चहा म्हणून पिणार , संध्याकाळी  फिरायला बाहुला बाहुलीला घेऊन बागेत जायचे.
आमचा खेळ पूर्ण सुट्टीत रंगलेला असायचा आम्हाला दोघीनांही कधीही कंटाळा यायचा नाही . मला जितके आठवते त्याप्रमाणे आम्ही आठवी नववी पर्यंत आमचे हे उद्योग करत होतो .
नंतर भातुकली संपली आणि आम्ही शाळा सोडून कॉलेजला जायला लागलो , तिने जेमतेम बारावीची परीक्षा दिली असेल आणि तिच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवले  ... तेव्हा फक्त मला इतकेच कळत होते की ही आता माझ्या पासून दुरावणार ,माझ्या  लहानपणी आई सारखे एक गाणे म्हणायची

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी
 ज्यावेळी तिचे लग्न ठरले तेव्हा मला असे वाटले की हे गाणे आमच्या दोघींसाठीच आहे पण या गाण्याचा खरा अर्थ मला पुढे जाऊन समजणार होता हे तेव्हा कुठे माहीत होते ?
 ती तिच्या सासरी जाताना मी माझी बाहुली तिला दिली माझी आठवण म्हणून आम्ही दोघोही खूप रडलो शेवटी तिची पाठवणी झाली .
मीही माझ्या पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पडले . मी सुट्टीच्या दिवशी घरी जात असे तेव्हा कधीतरी ती आली असेल तर तिची माझी भेट होई लग्नानंतर फारच अबोल झाली होती ती .  मी तिला फोन करूनही बोलू शकत नव्हते , ती नवी नवरी तिकडे काय म्हणतील तिला म्हणून ... शेवटी सगळा काय तो समाज !!!!!

तसेही ती खूप सुखी असल्याचे मला सांगत होती पण एकदा तिची आई  बोलताना ऐकले होते की तिचा नवरा दारू पितो म्हणे !!!! आधी सगळ्यांना सांगितले होते नोकरी आहे पण तिच्या नवऱ्याने लग्न झाले आणि एक महिन्यात नोकरी सोडून दिली .. जणू काही फक्त लग्नासाठीच नोकरी करत होता , आता कसे होईल पॊरीचे या
विचाराने ती माउली अस्वस्थ होत होती ...
मला मात्र खूप राग येत होता याआधी सगळे नीट पाहता येत नव्हते का ? किती लवकर केले तिचे लग्न ? मी आईला म्हणत असताना आईने मलाच गप्प केले .... ??
 आता दिवाळी होती म्हणू मी घरीच होते तीही  येणार होतीच पहिला दिवाळी सण ...
ती आल्यावर मी तिला पाहून थक्कच झाले चक्क ती ५ महिन्याची गरोदर होती !! आणि मला कुणी काहीच सांगितले नाही अगदी आईनेही .....
आईचे मत पडले अशा गोष्टी लवकर उघड करत नाहीत ....  आता काय ती लवकर जाणार नाही हे माहितीच होते मला ... दिवाळी झाली मी कॉलेज साठी गेले तरी ती तिथेच होती आता म्हणे सगळे आवरून जाणार महाराणी !!! मला नेमका कुणाचा राग येत होता हेच कळत नव्हते ? एकतर हिचा नवरा स्थिर नाही त्यात हिची अवस्था!!!! या साध्या गोष्टी तिला कळू नयेत का ?
 एक दिवस दुपारीच आईचा फोन आला की चित्राला मुलगा झाला ,,, तरी बरे तिला मुलगा झाला म्हणून .... मुलगी असती तर परत तिच्या सासरचे काय म्हणाले  असते देव जाणे !!!!!

मुलाचे बारसे अगदी थाटामाटात केले त्यावेळीही मला आमच्या  भातुकलीचा डाव आठवत होता ... काल परवा पर्यंत खोटे  डाव मांडता मांडता आज ही खरी भातुकली उभीही झाली होती ....
 ती परत तिच्या सासरी राहायला गेली , आता तिचे येणे जाणे वाढले होते मुलामुळे ... ???
या सगळ्यात तिच्या चेहऱ्याचे हास्यच गायब झाले  होते  खूप चिडचिडी झाली होती !!!
पण दिवस नाही राहत कुणासाठी बघता बघता तिच्या मुलाचा पहिला वाढदिवस झाला .. आणि त्यानंतर एक दोन महिन्यातच तिच्या नवरा आजारी पडला अति दारूमुळे तिथून पुढचे पंधरा दिवसच सगळे आलबेल होते पण त्यानंतर सगळा खेळ संपला होता ......
त्यादिवशी प्रथमच ती लग्नानंतर  माझ्याजवळ खूप मनमोकळेपणाने रडली ... नियतीने तिची खूप परीक्षा घेतली होती अजूनही घेत आहे  कदाचित पुढे काहीतरी चांगले होईल तिच्यासोबत ....  पण त्यावेळी  मात्र  मला गाणे आठवत होते ....

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी ....

No comments:

Post a Comment