Wednesday, March 8, 2017

न्यू इनींग

आई ,  येतो ग भेटू संध्याकाळी !! असे  म्हणत मीराची दोन्ही मुले कॉलेजसाठी बाहेर पडले ..
तितक्यात आजी विचारत  आल्याच , " झाला का ग चहा ? " 
हो देतेच म्हणत मीराने त्यांचा आणि तिच्या नवऱ्याचा अजयचा  चहा टेबलवर ठेवला ... 
आणि परत स्वयंपाकघरात गेली अजयचा डबा भरला आणि स्वतःचे  आवरू लागली . 
मीरा ,अजय त्यांची दोन मुले आणि सासूबाई इतके छोटे कुटुंब ,, मीरा आणि अजय जॉबसाठी म्हणून बाहेर असत तर मुले  त्याचे कॉलेज , प्रोजेक्ट यासाठी .... 
रात्री जेवायच्या वेळीच सगळे थोडावेळ एकत्र भेटत .. नंतर मग सगळे आपापल्या कामात .... 
दिवसभर आजी एकट्याच घरी !!!
थोड्यावेळात मीरा आणि अजयही बाहेर पडले ,, आता नेहमीसारखेच तो मोठा फ्लॅट आणि आजी .... 
त्यात आजींना खूप बोलायची सवय , आधी शेजारी पाजारी होते , कुणी ना कुणी ओळखीचे घरी येत कधी आजी जात त्यांच्या घरी पण आता सगळेच बंद झाले होते या फ्लॅटमध्ये आल्यापासून .... 
नाही म्हणायला संध्याकाळी थोडावेळ खाली फेरफटका मारण्यासाठी जात पण वयामुळे जास्त चालणे होत नसे , मग बागेत बसून लहान मुलाचे खेळ बघत .... !!! 
पूर्वी स्वतःसाठी असा कामाच्या रगाड्यातून वेळ मिळत नसे आणि आता मिळतो आहे तर त्याचे काय करायचे हा नेहमीच प्रश्न ??
तसे मीराला आपल्या सासूबाईंच्या या अस्वस्थेबद्दल माहिती होती , आणि हेही माहिती होते कि आजी त्यांच्या सगळ्यांच्या हट्टामुळे तिथे राहत आहेत .... 
तसेही ती विचार करतच होती कि त्यांचा वेळ जावा म्हणून काय करता येईल ... ?? पण सुचत नव्हते ... 

 आज मीराला जास्त काही काम नव्हते त्यामुळे  तो वेळ घरी जाऊन आजीसोबत घालवावा म्हणून ती लवकर निघाली , जाता जाता आजींना आवडणारा ढोकळा घेतला आणि घरी पोहचली ... 
दुपारची वेळ होती आजी झोपल्या असतील म्हणून तिने बेल न वाजवता स्वतःच कुलूप काढले ... 
घर अगदी शांत होते , आजी झोपल्या असतील म्हणून त्यांच्या खोलीकडे गेली तर तिकडे पण कुणी नाही .... 
" सहसा त्या न सांगता कुठे बाहेर जात नाहीत मग  आज अचानक कुठे गेल्या ? "  मीरा स्वतःशीच बोलत होती 
तिथेच तिला त्यांच्या जुन्या सामानाची बॅग दिसली , त्यात त्यांचे दागिने , साड्या , जपून ठेवलेल्या बऱ्याच गोष्टी होत्या ... 
ते बघून तिला जरा जास्तच काळजी वाटली .... एकदा तिला वाटले कि अजयला सांगावे फोन करून पण आधी जरा आजूबाजूला पाहू मग बघू असा विचार करून त्या शेजारी आहेत का पाहण्यासाठी गेली तर तिथे कुलूप होते ... 
आता कुठे शोधायचे म्हणत ती खाली गेट जवळ पोहचली तिथे तिने वॉचमन जवळ चौकशी केली तर तो म्हणाला ... 
आजी ना गेल्या आठवड्यापासून रोज दुपारी ते सोसायटीचे मंदिर आहे तिकडे जातात .... 
हे ऐकून तिला थोडे हायसे वाटले ,, तसे ती झपाझप पावले टाकत देवळाकडे गेली . तर तिथे एक आजी नाही तर खूप आज्या होत्या ,, आणि आज त्यांच्यातील प्रत्येकजण नटून थटून आली होती अगदी सगळं साज शृंगार करून ... त्यात आजीही होत्या ... 
आज कितीतरी दिवसानी मीरा त्यांना या अशा  सवाष्ण रूपात पाहत होती , एक वेगळेच तेज होते त्यांच्या चेहऱ्यावर .. घरात असतात त्यापेक्षा कितीतरी जास्त खुश दिसत होत्या त्या !!!
पण मीराला समजत नव्हते कि त्यांचे सगळ्याचे हे काय चालू आहे ते ?
सगळ्याजणी गोलाकार करून बसल्या होत्या ,, आणि आपण पूर्वी कशा होतो याची एकमेकींना ओळख करून देत होत्या अगदी लहान असल्यापासुन ते आतापर्यंत ... 
नवरा होता तोपर्यंतचे आयुष्य आणि आताचे यावर बोलताना प्रत्येकीचे डोळे भरून येत होते ... ! त्यांच्यातील प्रत्येकजण आजच्या या रूपात आपल्या स्वतःला शोधत होते आणि त्यांची ती धडपड मीराला अगदी स्पष्ट दिसत होती एक वेगळाच सोहळा तिकडे चालू होता , आणि इकडे मीराचे डोळेही भरून आले .!!!!!!
प्रत्येकाची ओळखपरेड संपली आणि आजी उठल्या .. त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरत होती , तिथे काम करणाऱ्या बायका आणि त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी त्या सगळ्या प्रयत्न करणार आहेत हे मीराला त्यांच्या बोलण्यातून समजले .... 
नंतर सगळ्याजणी हळूहळू जाण्यासाठी उठू लागल्या तशी मीरा धावत आपल्या घरी पोहचली ... 
आजी घरी आल्यातर घराचे दार उघडे .. ते बघून त्यांना काही सुचेना त्यांना वाटले कि आपण कुलूप लावायचे विसरून खाली गेलो कि काय ? अरे देवा आता थोड्यावेळात सगळे येतील असे घरचे दार उघडे राहिलेले त्यांना कळले तर काय म्हणतील मला असा विचार करतच त्या आत गेल्या ... तर समोर मीरा उभी !!!!
तिला पाहून तर त्या थंडच पडल्या ,, काय बोलावे ते समजेना !!
शेवटी मीरानें  त्यांना बसवले पाणी दिले तेव्हा कुठे त्या शांत झाल्या ... 
मीरा त्यांच्याकडे एकटक पाहत होती , तीच डाळिंबी रंगाची साडी , कपाळाला ठसठशीत कुंकू , हातात बांगड्या ... तिला त्यांचे तिच्या गृह्प्रवेशावेळचे रुपडे आठवत होते ... तिचे तसे बघणे पाहून आजीला लाजायला झाले .. तेव्हा तर त्या आणखीच गोड़ दिसत होत्या .. 
त्या तिथून आत जाण्यासाठी उठल्या तर मीराने त्यांना थांबवले .. 
त्यांना वाटले सून आता ओरडणार कि सगळ्या सोसायटीत आमच्या अब्रूचे धिंडवडे काढले म्हणून ... पण मीरा तशी नव्हती हे माहित होते त्यांना ....... पण असे पाहून कदाचित ती चिडली असेल असे त्यांना वाटत होते ... 
" आई तुम्ही खरेच किती करता हो सगळ्यांसाठी ?" हे मीराच्या तोंडून ऐकताच आजी सावरून बसल्या .... 
आता वर येताना आपली कामवाली भेटली तिने सांगितले कि , तुम्ही तिच्या मुलाला शिकवता म्हणून !!! 
आणि आता फक्त तिच्या मुलाला न शिकवता सोसायटीत जे जे कामाला येतात त्यांच्या मुलांना  शिकवणार आहे ,, आणि त्यांच्या आईला सुद्धा !!! 
आज जो तुमचा कार्यक्रम सुरु होता तो पहिला , पहिले थोडे विचित्र वाटले पण नंतर कळाले कि तुम्ही असे का केले !! ती स्वतःला मॉड म्हणवून घेणारी ऋतू तिने तिच्या मुलाच्या वाढदिवसदिवशी सगळ्यांसमोर औक्षण करताना तिच्या सासूचा  अपमान केला ,, आणि तेव्हापासून तिची सासू खूप डिस्टर्ब असायची कुणाशी काही बोलत नव्हती ,, म्हणून मग या निम्मिताने का होईना सगळयांचे मन हलके होईल , त्याच्या जुन्या आठवणी पुन्हा जागवता येतील म्हणून हे सगळे तुम्ही केलंत ... 
अगदी हा तुमचा ग्रुप सुरु करण्यापासुन .... आई खरेच खूप कौतुक वाटते तुमचे .. मला स्वतःला इतके अपराधी वाटायचे कि आम्ही तुम्हाला इथे बळजबरीने ठेवून घेत आहे पण आता खरेच खूप कौतुक वाटत आहे तुमचे .... 
मीराला शब्द कमी पडत होते आपल्या सासुचे कौतुक करायला .... 
बोलता बोलता तिने आणलेला ढोकळा त्यांच्यासमोर धरला .. आणि एक हाताने त्यांचा हात हातात घेऊन  आई ऑल द बेस्ट फॉर युर न्यू इनींग  असे म्हणत तो कापला .... 
तो कापताना दोघीही एकमेकींकडे बघत हसत होत्या फक्त ते हसू होते काहीतरी गवसल्याचे !!!!




Tuesday, March 7, 2017

सरप्राइज

"अमित , आज ऑफिसमध्ये एक कार्यक्रम आहे महिलादिनाचा त्यामुळे मला यायला थोडा उशीर होईल . " असे सीमाने घरी फोन करून सांगितले . ऑफिसचा कार्यक्रम खूप छान झाला त्यांना सगळ्यांना फुले दिली . थोडी भाषणे नेहमीप्रमाणे महिलांसोबत कसे वर्तन केले पाहिजे त्यांचा मान सन्मान ................ चला "बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले" म्हणत सीमा तिथून निघाली ट्रेन मध्ये गर्दी थोडी कमी होती पण बसायला जागा नाही . ती तशीच एका सीटचा आधार घेत उभी राहिली . तिच्यासमोरच एक बाई तिच्या लहान मुलीला घेऊन उभी होती. तिची उभी राहण्यासाठीची कसरत पाहून सीमा ला वाईट वाटले . त्या बाई समोरच दोन पुरुष आणि एक बाई बसली होती . ते पुरुष कदाचित त्या उभ्या असलेल्या बाई सोबत बोलत होते कदाचित ओळखीचे असतील पण तिला बसायला जागा देत नव्हते .आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या बाईच्या चेहऱ्यावर असे भाव होते कि ओळखीचे तिला जागा देत नाहीत तर मी का देऊ ? सीमा स्वतःशीच हसली आणि विचार करू लागली आज सकाळपासून स्त्री शक्ती जिंदाबाद , स्त्रियांचा आदर करा , त्यांना सन्मानाने वागवा . हैप्पी वुमेन्स डे अगदी पाऊस पडला आणि आजच संध्यकाळी त्याचा असा चिखल झालेला दिसतो आहे. सगळे नुसते बोलण्यापुरते कृती मात्र काहीच नाही . इतक्यात तिचे स्टेशन आले म्हणून ती उतरली . आता काय घरी जाऊन स्वयंपाक ,उद्याच्या डब्याची तयारी , जाताना भाजी घेऊन जायची असे विचार करत ती रोड पार करत होती तोच एक गाडी तिच्या समोर आडवी आली. ती अडखळून थोडी मागे झाली आणि रागाने त्या गाडीवाल्याला ओ मिस्टर!! म्हणून बोलणार तोच तिचा नवरा बोला मिस्सेस" करत हसू लागला ती थोडी आश्चर्यने त्याच्याकडे पाहू लागली . तर तोच उतरला ," कधीतरी करावी बायकोची सेवा , मग पुढच्या जन्मी देव चांगली बायको देतो !" असे म्हणत तो मिश्किल हसला .तिनेही लटक्या रागाने त्याच्याकडे पहिले . बसा लवकर नाहीतर मामा येतील , आणि आपली कन्या वाट बघत असेल . असे म्हणताच सीमा गाडीवर बसली . आज बेल वाजवायच्या आधीचे आर्याने दार उघडले , समोर welcome होम मिनिस्टर चा बोर्ड बघून तिला धक्काच बसला आज कुछ तो गडबड है म्हणत आत गेली तर सगळे घर लकाकत होते . ती आणि तीच दिसत होती सगळीकडे . आर्याने पाणी दिले अजून या धक्क्यातून सावरत होती तोच मागच्या महिन्यात तिला आवडलेली साडी पण काही कारणामुळे ती न घेताच परत आली होती , तीच तिच्या हातात अमितने दिली . आर्या तिला जबरदस्तीने तयार व्हायला आत घेऊन गेली . सीमा तयार होऊन आली आणि टेबलवर सगळी तिच्या आवडीची पक्वाने तिची वाट बघत होती . आर्या आणि अमित सीमाला काही बोलूच देत नव्हते तिला मिळत होते ते धक्यावर धक्के ..... जेवण झाल्यावर तिच्या आवडीचे आइस क्रीम ते खात असताना ,,, तिला झालेला आनंद तिच्या डोळ्यात दिसताच आर्या बोलली " आई, तुझी डेलीसोप आज नको ग " तुझ्या बाबासाराखीच बोलयला शिकली म्हणत सीमाने तिला जवळ घेतले आर्या म्हणाली , आई आज बाबनी सुट्टी घेतली होती तुला न सांगता , आणि सविता काकुना पण सुट्टी दिली सगळी कामे आज त्यांनी केली आणि....... इतक्यात अमितने तिचे बोलणे तोडले तो बोलला , मग सविता काकूहि आहे न त्यांच्या घराची होम मिनिस्टर.... ... आणि आर्या आता तुझ्या बी बी सी न्युज बास कर आणि झोप ...!! सीमाला वाटत होते कि हळू हळू चिखलात कमळ उमलत आहे .....

Saturday, March 4, 2017

भेट

आम्ही दोघेही एका वेगळ्या दुनियेतील माणसे , अगदी वेगळे विचार , आचार तर त्याहून वेगळे ...
मी अगदी  हातात येईल तो ड्रेस घालणार त्याला इस्त्री असो व नसो आणि  फॉर्मल पासून चार हात दूरच . 
तर ती मात्र टापटीप तिला सगळे कसे जागच्या जागी लागायचे , ऑफिसमध्ये कधीही आली तरी हसरा चेहरा एका हातात पर्स , ड्रेसला मॅचिंग असा हलकासा मेकअप .. 
आमची मैत्री कशी आणि कधी जुळली हे एक कोडेच आहे ,   जसे विरुद्ध मॅग्नेट एकमेकांकडे ओढले जातात तसे आम्ही ओढले गेलो , हा पण मैत्रीच्या पुढे कधी गेलोच नाही , जरी मनात असले तरी मी नाही बोललो आणि ना ती !!!!
तसे आम्ही दोघे खरेच वेगळे तो खूप साधा पण तरीही सगळ्या गोष्टीत अप टू डेट कधी काही विचारले तर नेहमी उत्तर तयार , खरे तर अशी अजागळ राहणारी माणसे मला आवडायची नाहीत कारण मी नेहमी छान आवरून तयार असायचे आणि पुढचाही तसाच हवा हा माझा हट्ट असायचा  पण याची गोष्टच काही वेगळी होती कितीही आळशी असला तरी त्याच्यात नक्कीच काहीतरी असे होते कि मी त्याच्याकडे ओढली जायचे .. 
आज खूप दिवसांनी त्याला फोन केला , का माहित नाही पण करावासा वाटला . 
 त्याने माझा आवाज ओळखला असे वाटत नाही , ते त्याच्या आवजावरूनच समजले.... 
त्याच्याशी बोलताना एक वेगळेपणा वाटत होता , कधी कधी आपल्या खूप ओळखीच्या माणसांना भेटावे असे वाटते ना तसेच काहीसे वाटत होते , शेवटी विचारलेच त्याला भेटूया का थोडावेळ ? 
तोही हो म्हणाला .... आता वाट पाहत बसले आहे आमच्या नेहमीच्या कॉफीशॉप मध्ये ..... 
आज जेव्हा तिचा फोन आला त्यावेळी दोन मिनिटे समजलेच नाही कुणाचा आवाज आहे ते !!! खूप दिवसानी फोन केला तिने ,,, तसा मीही नाही केला...... 
तशी खूप कारणे देता येतील मला पण तिच्याबद्दल खोटे बोलून माझ्या मनालाच मला नाही फसवायचे .. 
पण खरे सांगायचे तर माझ्या कामाच्या गडबडीत ती खरेच कुठंतरी मागे पडत चालली होती ... तिची आठवण येत नव्हती असे नाही  पण वेळच नाही ,
आज जर तिने कॉल केला नसता तर कदाचित आम्ही भेटलो नसतोही .... 
आज तो भेटला खूप दिवसानी .... छान वाटले त्याच्याशी बोलून खूपच बदल झाला आहे त्याच्यात पूर्वी अगदी फॉर्मलपासून दूर पळायचा पण आता मात्र छान दिसत होता आज फॉर्मलमध्ये , बोलण्याची ढब अगदी प्रोफेशनल झाली आहे . ते टाळी देऊन बोलने खूप मागे पडले वाटत .... नाकावरचा चष्मा मात्र त्याच्या कामाच्या धावपळीची जाणीव करून देत होता .. याच कॉफीशॉपमध्ये पूर्वी आमच्या तासन तास गप्पा रंगायच्या पण आज एक ताससुद्धा जास्ती झाला होता ..... 
त्याला भेटून खरेच खूप मस्त फीलिंग आले अगदी आपल्या ओळखीतले कुणीतरी जुने आपले भेटल्याचे .... 
आज ती भेटली , थोडी वेगळीच दिसत होती म्हणजे केस मागे वर टांगलेले , आधी जर ऑफिस मध्ये असे कुणी दिसले तर आम्ही दोघे मिळून त्याला कोंबडा म्हणू चिडवत असू .... 
खूप शांत झाली आहे , कदाचित तिच्या कामामुळे असेल , पण कॉफी घेण्याची सवय मात्र आहे तशी आहे आमच्या तासभराच्या भेटीत सुद्धा अडीच कप कॉफी घेतली तिने .... 
पण तिला भेटून फ्रेश वाटले काम करायचा परत नवीन जोश आला .. 
जरी काही कारणासाठी त्यांच्या वाटा  वेगळ्या असतील पण कधीतरी वाटतेच एखाद्या आपल्या अशा माणसाला भेटावे त्याच्यासोबत बोलावे ,  मार्ग वेगळे आहेत पण त्यासाठी मने वेगळी असणे थोडीच गरजेचे आहे !!!!


Friday, February 24, 2017

महाशिवरात्र यात्रा

काही दिवस काही क्षण असे असतात कि असे वाटते कि आता डोळ्यासमोर आहेत . आज असे होण्याचे कारण महाशिवरात्र आमच्या गावाची यात्रा ........ मल्लिकार्जुनची यात्रा आजपासून सुरु होते पुढचे ५ दिवस कवठे महांकाळला ... लहान असताना या गोष्टीची खूप ओढ असते ना आजही आहे म्हणा . यात्रा म्हणून आमच्या शाळेला दोन दिवस सुट्टी त्याच्या आधी आमचे शाळेत प्लान्निंग कि नेहमीप्रमाणे आपण धनुच्या घराबाहेर भेटू तिथून पुढे यात्रा आणि आम्ही . महाशिवरात्रीदिवशी आम्ही अगदी ठरल्याप्रमाणे आई बाबा यांच्या सोबत जात असू . तिथे जाऊन देव दर्शन मग थोडे फिरणे काही घ्यायचे असेल तर ते आणि परत असे रुटीन .... महाशिवरात्री दिवशी मंदिरात एकदम शांत आणि गंभीर वाटे अगदी एक वेगळेच रूप त्या मंदिराचे बघायला मिळे. रात्री पासून अभिषेक सुरु असल्यामुळे ती पिंड इतकी तेजस्वी दिसत असे . बाहेर केलेला झगमगट आणि ती मोठ्या आवाजातील गाणी ..... दुसऱ्यादिवशी आमची सुरुवात संध्याकाळी ५ पासून सुरुवात आमच्या घरापासून कारण मीच सगळ्यात लांब राहत होते. मी गायत्रीच्या घरी तिथून ती आणि मी धनुच्या घरी आणि बाकीच्या मग स्वाती ,सायरा , लीना , मयुरी संज्ञा , दीपाली असे सगळे जमा झाले कि आमचा मोर्चा यात्रेकडे ... तिथून १० मिनिटा मध्ये आम्ही यात्रेतल्या गर्दीत मग एकमेकीचा हात धर किंवा प्रभातफेरी सारखे २-२ च्या जोड्या आमचा पहिला हल्ला असे तो तिथे लागलेल्या कानातले , गळ्यातले यांच्या स्टोलवर.. बापरे!! तिथे त्या लोकांना सारखे कमी कमी करा अहो नाहो ओ हे ना येते इतक्यात !!! असे अगदी ओरडून ओरडून सांगायचे ... नाहीतर आहेच पुढचा स्टोल असे करत खरेदी .... एक मात्र असे कि आम्ही सगळ्याजणी मिळून एकसारखे हातात बांधायचे धागे घेत असू आणि दुसऱ्या दिवशी शाळेत तो कोणत्याही परिस्थितीत बांधून यायचाच ... याला रूल किंवा आणि काही म्हणता येईल पण तो सगळ्यांच्या हातात बघून जाम भारी वाटायचे खरेदी झाले कि आम्हला बोलवू लागायचा तो उंच पाळणा .... काय मजा यायची त्यात ... कोलंबस , ब्रेकडान्स यात बसण्यासाठी गडबड यात भांडणेही त्या चालवणाऱ्या भैयासोबत इतकी व्ह्यायची आम्हाला एकत्र बसायचे असायचे आणि तो ऐकत नसे पण यात आम्ही कधीच compromise नाही केले जे असेल ते एकत्रच ... बंदुकीने फुगे फोडायचे , रिंग टाकणे ,,, आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे हिरालाल आणि पन्नालाल गाढव ..........
इतके फिरून फिरून भूक लागली कि भेळ , दाबेली, पाणीपुरी अगदी ओरडून ओरडून आपल्याला या या म्हणत आहे असे वाटायचे !!! बर तरी घरच्यांनी सांगितलेले असते बाहेर काही खाऊ नका धूळ असते खूप ... पण आम्ही अगदी यात्रेत आपापल्या मित्र मैत्रिणीसोबत आलेल्या बहिण भावाची नजर चुकवत अग थोडे अग थोडे करत जोर धरणार ......... खासकरून यात्रेत मला फुगा घायायला खूप आवडायचे आजही आवडते म्हणा त्यात वाळू भारेलेली तो येणारा आवाज it sounds crazy हो ना !!!! रात्री ९ नंतर घरी जाण्यासाठीची गडबड एकेक करत चालू अग चल ना जाऊ उशीर होतोय चल चला करत हातात कुल्फी आणि वाजणारा फुगा घेत घरी ... जाता जाता उद्याचे पाल्न्निंग उद्या पण आज केले असेच ना ग ... बर येते म्हणत कल्टी .......
आज खरेच परत एकदा इतकीच लहान होऊन तिथे जावेसे वाटत आहे .... खूप आठवण येतीय तुमच्या सगळ्यांची आणि आपण केलेल्या मजा मस्तीची .....

Thursday, January 5, 2017

बालपण देगा देवा

आज सकाळी सकाळी दीदीने हा फोटो पाठवला आणि दिवसभर आम्ही तिघे यावरूनच परत  भांडत बसलो !!
तसेही आमच्या घरात टीव्हीवेडी मीच जास्ती आणि त्यानंतर आमचे बंधुराज ,
अगदी सासू सून किंवा खूप विचार करायला लावणाऱ्या सिरिअल्स मी खूप कमी बघायचे , लहानपणी सोनपरी , सिम्बाचे कार्टून ,सिन्ड्रेला , शरारात अशा छान छान बघायचे आणि नंतर थोड्या रोमँटिक म्हणजे कशा तर मिले जब हम तुम , अरमान आणि रिधिमाची कोणतीतरी एक सिरीयल होती नाव आठवत नाहीय !! मस्त मस्त सिरिअल्स मी बघायचे आणि माझ्या भावाला वाटायचे कि किती रडक्या सिरिअल्स बघते हि आणि मग नेहमी आमच्यात भांडणे ,, त्या रिमोटची तर अवस्था काय असायची मी आधीच सांगितले आहे तुम्हाला आणि हो आमच्या बहीणभावाच्या प्रेमाबद्दल हि !!!
जर त्या रिमोटला पाय असते ना तर तो बिचारा नक्कीच आमचे घर सोडून पळाला असता !!
तर आमच्या बंधुराजांना मॅच नाहीतर तर wwf बघायचे  असायचे  ,,  बर जर मॅच चालू असेल तर ठीक ना बघायला मजा तरी यायची पण हा हिरो एकतर  जुन्या मॅचेस लावणार त्याही याला सगळ्या पाठ कधी कोण कसे कुठे कितीवर आऊट , किती रन्स सगळे माहित ,, त्याची लाईव्ह कॉमेंटरी आम्हाला ऐकायला लावायचा !!
इतका राग यायचा ना !!
मग कधी कधी हळूच मी जाऊन केबलची पिन काढून ठेवायचे ,सगळ्या टीव्हीवर मुंग्या ते पाहून असे वाटायचे कि केबलवाल्याची लाईट गेली , बिचारा  वाट बघून बघून  बाहेर जायचा तो  गेला कि मी पिन लावून माझ्या सिरिअल्स पाहत बसणार ,,  यात आमची दीदी  मात्र नामनिराळी तिला जे बघायचे असेल त्याची सवय ती आधीपासूनच मला लावायची त्यामुळे तिला अगदी आरामात बघायला मिळायचे सगळे !!
पण नंतर नंतर माझी ट्रिक आमच्या बंधूराजाना कळाली कारण त्याच्या मित्रांच्या घरी तर टीव्ही चालू असणार आणि आमचाच बंद !!!! त्यामुळे  बाहेर जाताना रिमोट लपवून जाणार ,  तो येईपर्यंत मला  काही रिमोट  मिळायचा नाही !! यावेळी  दीदीचे  खोबरे तिकडे चांगभले असे !!!
हे सगळे कमी होते कि काय म्हणून व्हिडिओ गेम आणली त्याचे तर दोन दोन रिमोट पण अवस्था तीच !!
पहिला कोण आणि दुसरा ?   मारिओ , पझ्झल , कार रेसिंग  त्यातून आम्ही शहाण्या बाळासारखे डबल प्लेअर गेम घेणार म्हणजे एकावेळी दोघांना तरी खेळता येईल !!
फक्त गेम आणि टीव्ही साठी नाहीतर पेपर साठी सुद्धा आमचे भांडण पहिला कोण वाचणार आणि पुरवणी असेल तर मग काय सगळीच मज्जा !!
 हि सगळी सुट्टीतील मजा !! शाळा सुरु असताना गोष्ट काही वेगळीच असायची ,, आम्ही सगळे एका टीम मध्ये आणि विरुद्ध पार्टीत आई बाबा !!
बाहेर बाबांच्या गाडीचा आवाज आला कि आम्ही टीव्ही बंद करून खिडीकीतून त्यांना दिसू नये म्हणून वाकून वाकून पलायन करून पुस्तके घेऊन बसायचो !! आणि यासाठी खिडकीजवळ नेहमी कुणीतरी असणार जरा आवाज आला कि टीव्ही बंद !!!
बस्स आज या एका फोटोवरून खूप साऱ्या आठवणींना उजाळा मिळाला ,
आजभी ये सब कुछ करना है  बट साला वो टाइमही नाही है !!!




Wednesday, December 21, 2016

झोप

झोप हा  माझ्या अंत्यत जिव्हाळ्याचा विषय आहे , त्यातली त्यात जर ती दुपारची झोप असेल तर मग काय विचारूच नका इतकी प्रिय ...
आमच्या आईच्या भाषेत आम्ही तीन माकडे (  त्यांचे वंशज ना म्हणून म्हणत असेल !!) म्हणजे मी आणि माझे बहीण भाऊ कुंभकर्ण आहोत , हत्ती जरी आमच्या अंगावरून गेला तरी आम्ही ढिम्म हलणार नाही..  सकाळी नऊ वाजले तरी आमचा सुर्य अजून उगवायचाच असतो .. 
आमची परीक्षा असली कि आमच्या आईची सत्वपरीक्षा असणार !! ... यात आमचे बाबा मात्र झोपु दे ग अजून थोडवेळ या कॅटेगरीतील !
त्यामुळे आईचा आणखी जरा तिळपापड व्हायचा !! आणि  त्यांच्या या नेहमीच्या गोड  संवादात आमची अजून एक डुलकी काढून व्हायची... 
दुपारचे रामायण तर वेगळेच असायचे म्हणजे कसे ना दुपारची वामकुक्षी किती वेळ अर्धा तिथे पाऊण तास असावी  , यालाच काय ते मॉड भाषेत पॉवर नॅप म्हणतात !!! पण आम्ही एकदा वामकुक्षी चालू केली कि आमची कुशी कमीत कमी २-३ तास त्या जागेवरून हालत नाही ...
आता हि इतकी प्रिय गोष्ट मी कॉलेजला आले तरी माझ्या जवळ अगदी माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी राहिली ,इतकी कि माझी मैत्रीण मला कॉलेजला जाताना सोडून जाईल पण हि माझी सखी माझे जेवण झाले कि पुढच्या लेक्चरला माझ्या सोबतच .. तरी बरे पुढचे तीन मागचे दोन बेंच सोडून मी मधल्या बाकड्यावर आपली गादी टाकणार ,, एकदा दोनदा सापडता सापडत वाचलीय !!!! नाहीतर निद्रादेवीचा कोपच झाला असता !!
पण कुठेही गाडीतून किंवा बसमधून प्रवास करताना मात्र मी बाहेरच्या निसर्गाला भरभरून दाद देत असते , त्यावेळी हि माझी सखी मला बिलकुल त्रास द्यायला येत नाही .
एक वेळ रात्रीची झोप मोड झाली तरी चालेल पण दुपारची अहं !!!
आता माझ्या झोपेला नजर लावायला माझ्या आईनंतर आहे तो म्हणजे नवरा ,, याचे आणि माझ्या सोन्यासारख्या सखीचे काय वाकडे आहे तेच समजत नाही !! दुपारची तर नाहीच पण रात्रीचीही झोप इवलीशी पुरते त्याला ?? कधीही झोपला तरी सकाळी सातला आहेच उठलेला कि त्याच्या आधी मला माहिती नाही बा कारण त्यावेळी आपली मध्यान्ह कम पहाट असते ...
सकाळी उठला कि मुद्दाम काहीतरी किचन मध्ये जाऊन आवाज करायचे आणि माझी झोप मोड करायची यातून कुठला असुरी आंनद मिळवतो ते तो असुरच जाणे !!
आता थंडीत तर बाहेर बर्फ पाऊस आणि   आवडती लहानपणीची शॉल गुंडाळून मस्त झोपलेले असताना मुद्दाम ऑफिस मधून फोन करून विचारायचे ,, " काय ग , काय करत आहेस ? "
पहिले पहिले  मीही अगदी सोज्वळपणे सांगायचे कि झोपले आहे रे !! आणि आता म्हणते  बसलीय विमाने मोजत !!! तिकडून छद्मी हसत फोन ठेवला जातो कारण त्यांचे काम फत्ते झालेले असते !!!
अशी हि दुपारच्या झोपेबाबत असलेली अरसिक माणसे !!
दुपारची झोप झाली कि गरम गरम वाफाळता चहा आणि काहीतरी गरमगरम खायला म्हणजे स्वर्गसुखच .. पण इथेही आमच्या मातोश्रीना असे वाटते कि नुसते खायचे प्यायचे आणि झोपायचे... खायला तर भस्म्याच झालेला असतो नुसते बकासुर आहात तिघे !!!
आता खरे सांगायचे तर आमच्या तिघांनाही हा प्रश्न पडलेला असतो कि आम्ही नेमके वंशज कुणाचे  कुलकर्ण्याचे कि कुंभकर्णाचे कि बकासुराचे ???
पण आई म्हणत आहे ना मग असेलच काहीतरी !!!
आज सकाळीच आमच्या नवरोबांसोबत थोडेसे हलके फुलकेसे संभाषण काम सं "वाद " झाला , सगळेच कसे तुमच्या घरचे दुपारचे पण झोपतात असे काही बाही  ......... आणि ऑफिसला जाता जाता मला प्रेमळ  शब्दात सांगून गेले कि आज दुपारी अजिबात झोपायचे नाही !!!
मग काय माझ्यातील एक वळवळणारा किडा जागृत झाला मग मीही काहीही संवाद न करता दिवसभर  मस्त ताणून दिली !!!
संध्याकाळी अहोनी बेल वाजवल्यावरच झोपेत दार उघडले !!
ते पाहून आमचे लंबोदर मला म्हणाले कि ," सकाळी जरा ऑफिसच्या कामाचे टेन्शन होते ,, आणि तुला तर माहिती आहेच कि ग आता मला किती लोड होता !!! त्यामुळे सकाळी जरा थोडे जास्तच बोललो नाहीतर तसा काही माझा उद्देश नाहीच किंबहुना कधीच नसतो फक्त ते जरा वोर्कलोड मुळे .....
आता यात पण माझी आई म्हणते कि अति तेथे माती आणि जर गोडी गुलाबीने होत असेल तर जास्त ताणू नये आणि मलाही पटले कि हे सगळे तो मनापासून बोलत आहे मग काय दिले सोडून !!!
अहा असे तसे नाही हं ... गरमगरम चहा आणि आता काहीतरी चमचमीत खायला द्यायच्या बोलीवरच ..... !!!


Thursday, December 15, 2016

वाड्यातील जत्रा

आज ना एक आगळ्या वेगळ्या गावाबद्दल सांगणार आहे , आमचे मूळगाव कवठे महांकाळ पासून अगदी जवळ फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावरच आमचे हे गाव  " आगळगाव " . इथे एक खूप जुने शंकराचे म्हणजे आगळेश्वराचे मंदिर आहे त्यावरून हे नाव पडले असे म्हणतात , हा इतकाच याचा इतिहास मला माहिती आहे.

आमचा मोठा वाडा आहे इथे , लहान असताना आम्हा बच्चेकंपनीला या वाड्याचे आणि आमच्या मळ्याचे खूप आकर्षण .. अजूनही आहे !!! वाड्यात रमायला , मळ्यात हिंडायला फिरायला आंब्याच्या झाडाखाली बसून पत्ते खेळायला ,, पारावर भातुकलीचा डाव .....  सगळे डोळ्यासमोर आले फक्त गाव म्हणले  !!!!!
   आणि आज याची आठवण आली म्हणजे  खास कारण असे कि  आमच्या गावची जत्रा .... यात्रा !!
मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला असते , दोन दिवस यल्लमा देवीची यात्रा ....
 यात्रा म्हणले कि सगळे एकत्र येतात सख्खे  चुलत असे मिळून आम्ही घरचे ५० -७५ जण असतो कोणताही कार्यक्रम असू दे  , आणि हा आमचा वाडा सगळ्याना संभाळून घेत असतो !!!
लग्न झाल्यावर गावाकडे जायला जमलेच नाही  ,, पण यात्रा आली कि जाम आठवण येते ,, लहानपणी केलेल्या धमाल मस्तीची ...
लहानपणी गावी जात असताना  आगळगाव फाटा आला कि आम्ही गाडीतच दंगा करायचो "आगळ वेगळ गाव आले"  आणि असे म्हणतच आमची गाडी वाड्यापर्यंत पोहचायची  ..  सगळ्यांच्या दंग्याने त्या वाड्यालाही जाग  यायची ,, माजघरातील ती चूल त्यात झालेला धूर , आणि आमच्या आई , काकूंचे त्यामुळे पाण्याने भरलेले डोळे !!!  आम्ही आत गेलो कि काय असते रे तुमचे माजघरात जा सोप्यात खेळा इति आमची आजी ,,
पहिले पहिले  माजघर , सोपा हे शब्द ऐकून इतकी मजा वाटायची पण परत त्याची सवय झाली,, आता आम्हीपण वाड्यात गेलो हे  असेच म्हणतो !!
पहिल्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक आणि तोही चुलीवर सगळ्या वाड्यात त्या पुरणावरणाचा वास दरवळत असे ,, पण मला खरी मजा यायची ती भल्या मोठ्या पातेल्यातील बटाटे पोहे खायला ,, काय तो वास त्याचा आहा !!! सगळे त्यादिवशी वेगळ्या चवीचे लागायचे , पोट भरत होते पण मन नाही ...
आमच्या वाडयापासून ३० -३५ पावले चालत गेले कि आमची जत्रा भरलेलीच ,, सुरुवात ती चिरमुरे , शेव , भजीच्या स्टॉलने !! जरा पुढे गेले कि मग चालू झाले फुगे , गाड्या , दुर्बीण , बांगड्या , गळ्यातली, कानातली .... आणि खूप काही !!! इतक्या जवळ असल्यामुळे आम्ही दर अर्ध्या तासाने बघून यायचो काय बदल झाला आहे का ?? .. आणि किती ते भांडण नाही पैसे कमी करण्यासाठी !!!
मला लहानपानपासून वेड आहे ते फुग्याचे , त्यात  भरलेली रेती आणि तो वाजवायचा जोरात  किती भारी वाटते ना !! आम्ही सगळे मिळून किती फुगे आणायचो याला काही मापच नाही फुटला फुगा कि आण !! दोन दिवस हेच फक्त ...
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सगळ्याच्या आंघोळी आवराव्या लागत कारण पालखी येणार असायची घरी ,, पालखीची मानाची काही घरे असतात त्या घरात पालखी त्या क्रमाने जात असते , आमच्या वाड्यात ती दुसऱ्या कि तिसऱ्या नंबरला येते ..
कुणीतरी वाडयाच्या दारातच उभे असणार लांबून पालखीचा आवाज म्हणजे वाजत गाजत येते पालखी .. आवाज आला कि सगळे सोप्यात येऊन उभे ,, पालखी ठेवली कि तिथे ओटी , पूजा , नमस्कार सगळे होते ..
जे पालखी घेऊन आलेले असतात ते देवीची गाणी म्हणतात जोगती असतात ते नाच करतात   थोडावेळ कार्यक्रम असतो शेवटी आरती होते आणि पालखी जाते ... मग तिथून आम्ही देवीचे दर्शन घेण्यासाठी देवळात जातो ,, त्याच्या समोरच ओढा आहे त्यात पाय धुवून मगच पुढे मंदिरात , खूप जुने मंदिर आहे जास्तीत जास्त एकावेळी आत ४-५ लोक थांबू शकतात ,, आणि आत जाण्यासाठी तर वाकूनच जावे लागते इतके छोटे दार आहे , खूप मस्त आहे परिसर तो !! एकदम शांत पण यात्रेवेळी गडबड गोंधळ असतोच ...
तसे इथे  पाळणे ते असतात पण जास्त मोठे नाही छोटे छोटे , आमचा मोर्चा देवळातूनच स्टॉल कडे जातो ..
दिवसभर काही ना काही चालूच असते !! यात्रा जवळ असलेला फायदा हा !!
अरे हो तमाशा देखील असतो !! पण तो आमचा प्रांत नाही !!
संध्याकाळी पालखी किचात जाते त्यावेळी यात्रा संपते ,, किचात म्हणजे  निखारा असतो  ,, जे लोक पालखी घेऊन फिरत असतात ते आणि देवळातील पुजारी त्यावरून पालखी घेऊन चालतात तेव्हा यात्रा संपली असे म्हणतात ... आमच्यकडे शक्यतो पालखी किचात गेल्याशिवाय कुणी गावाबाहेर जात नाही !!
मजा असते यात्रा म्हणजे , मुळात आमचे सगळे घर एकत्र आलेले असते तो आनंद वेगळाच !!!
वाडा असो कि पूर्वीच्या काही रिती ,परंपरा यांच्या आठवणीनेही एक वेगळीच शांती आणि समाधान मिळते नाही का !!!