Wednesday, December 14, 2016

प्रारब्ध

अंकिताचे लग्न होऊन ती सासरी आली ,, सासर आणि माहेर तसे काही जास्त दूर नाही काही तासाच्या अंतरावरच .. तिच्या माहेरी सगळे शिकलेले थोडयाशा नवीन विचारसरणीचे पण रिती परंपरा धरून असणारे .. सासरी एक नणंद , दीर , सासू  सासरे ... नणंदेचे लग्न झाले होते पण ती जवळच राहत होती त्यामुळे माहेरीच जास्त ...  सासरे घरीच आणि दीर काहीतरी कामे करत असायचा .. तिचा नवरा अजय हाच काय तो घरातील एकमेव कमावता ....
अंकितासाठी  अजयचे नाव तिच्या बाबांच्या मित्रांपैकी कुणीतरी सुचवले होते .  तिच्या बाबांनी सगळी माहिती घेतली त्यावेळी तरी त्यांना त्यात वावगे असे काहीच दिसले नाही .. एकत्र कुटुंब , राहायला घर आणि मुख्य म्हणजे मुलगा  अजय चांगला होता ,,, पण दिसते तसे नसते !!!!
लग्नावेळी अंकिताच्या  सासरच्यांनी खूप कोडकौतुक केले .. पण नव्याचे दिवस संपले तसे ..... !!!

अंकिता नोकरी करत होती लग्नानंतर ती कामावर जाऊ लागली ,, पहिले थोडे दिवस सगळे फक्त बघत होते पण नंतर नंतर तिच्या सासूने अजयला सांगायला सुरुवात केली ," तुझी बायको बघ कसले कसले ड्रेस घालते ,, साडी नेस म्हणले तरी ऐकत नाही,,  कारणे देत असते नुसती प्रवासात हेच बरे आहे ... घरातील कामे नको असतात ,सकाळी लवकर निघायचे आणि उशिरा यायचे  !!! "
अजयची आई रोजच त्याच्यासमोर असा पाढा वाचू लागली ... 
अंकिता खरे तर रोज सकाळी लवकर उठून घरातील कामे आवरून मग जात असे .... संध्याकाळी जेव्हा ती घरी येईल त्यावेळीच चहा होणार तोही तिनेच करायचा बाकी कुणी कशाला हात लावत नसे ...  सासरे तर दिवस रात्र पिऊन बसत कधी कधी त्यांना सोबत द्यायला नणंदेचा नवरा , आणि दीर सुद्धा असे ... 
अंकिताला त्यावेळी इतके अवघडल्यासारखे वाटायचे ,,, त्यांना चढली कि अगदी शिव्या सुद्धा द्यायला कमी करायचे नाहीत ... तिची सासू आणि नणंद फक्त हसत आणि टि व्ही लावून त्यावरच्या मालिका बघत त्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडत नसे .... 
अंकिताने अजयला सांगून पहिले ... त्याला तर सगळेच माहित होते पण तो काहीच बोलायचा नाही ... महिना झाला कि सगळा पगार आईच्या हातात आणून देणे कि आपली जबाबदारी संपली असे त्याच वागणे ... 
अंकिता खूप मागे लागली होती कि त्यांना सांग, समजावं काहीतरी .... ,,, 
 त्यावेळी अजयने तिला सांगितले कि , "हे आहे असेच राहणार !! तुला याची सवय करून घ्यावी लागेल मी कुणाला काही बोलणार नाही .... आणि तुझा पगार आईच्या हातात द्यायचा स्वतःच्या चैनीसाठी जरा कमी वापर !! तुझ्या  ऑफिस मध्ये तू काय करते , कुठे असते सगळे माहीत आहे मला ... !!!!!" 
हे ऐकून अंकिता त्याच्याकडे पाहतच राहिली !!! सगळेच नवीन होते तिच्यासाठी !!!! 
अंकिता स्वतःला कसेतरी सावरत  म्हणाली कि " हे पैसे माझे आहेत ते कसे कुठे वापरायचे ते माझे मी पाहीन !!"
पण अजय काही न ऐकता बाहेर निघून गेला आणि त्याच्या बाबांच्या सोबतीला जाऊन बसला ... 
अंकिता आतमध्ये एकटीच बसून होती ... ती आहे कि नाही याची पर्वा कुणालाच नाही !!!!
दुसऱ्या दिवशी अंकिताने नेहमीप्रमाणे आपली कामे आवरली आणि ऑफिसला न जाता  आईकडे गेली ... खूप दिवसांनी तिने आपले मन मोकळे केले .. आईने तिचे ऐकून तिला रडून दिले ती थोडी शांत झाल्यावर आईने  तिलाच विचारले " आता तुला काय करायचे आहे ? राहणार आहे का तिथे तू ? "
 " आता मला काय करायचे आहे ते मलाही नक्की माहित नाही , पण काहीतरी मार्ग काढायला हवा ,, एकदा अजयसोबत बोलून बघते , पण कुठेही बाहेर जायचे म्हणले कि त्याच्या आईची परवानगी लागते तिने हो म्हणले तरच आमचे घोड पुढे जाते नाहीतर तिथेच अडकते ... "  अंकिता .
तसे आई तिला म्हणाली बघ एखादे देव दर्शन असे निम्मित करून बाहेर पड , त्याच्या मनातले तुला कळाले कि पुढचे निर्णय खूप सोपे होतील ...
आईचे बोलणे अंकिताला पटले ,, काहीतरी विचार करून घरी पोहचली .. तर घरी आधीच समजले होते कि अंकिता ऑफिसला न  जात तिच्या माहेरी गेली होती .
तिच्या सासूला आधीच निम्मित हवे असते  बोलायला आता आयतेच सापडले होते  ,, माहेरी जाऊन आमच्याविषयी त्यांचे  कान भरून आली का ? कि नेहमीच जाते असे आम्हाला न सांगता .. ? तरीच माझ्या हातात पगार दे म्हणले कि द्यायचा नसतो आणि तिकडे जाऊन माहेरचे घर भरायचे असते असे एक ना अनेक बोलणे चालू होते .. तुला नोकरी होती म्हणून या घरात आणली नाही तर तुला विचारले सुद्धा नसते आम्ही .... " हे ऐकून मात्र अंकिताला धक्का बसला म्हणजे फक्त पैशासाठी माझ्याशी लग्न केले ...!!!!
आता अजयला विचारायलाच हवे , त्याचेही मत असे असले कि मग संपलेच ना !!
अजय घरी आला पण त्याआधीच त्याला घरी काय झाले आहे ते माहित होते ,, त्यामुळे तो येताना बाहेरूनच पिऊन आला होता .
अंकिता त्याला काही बोलणार तोच त्याने तिला शिव्याची लाखोली वाहायला सुरुवात केली .. तो काही ऐकून घेण्याच्या शुद्धीत नाही . अंकिता त्याला समजावत होती , पण तो फक्त वेड्यासारखे करत होता  एकदा तर त्याचा स्वतःचा तोल ढळला त्याने अंकिताला मारण्यासाठी तिच्यावर हात टाकला अंकिता बाजूला झाली आणि अजयचे डोके बेडच्या कठड्याला बडवले त्याला जोरात मार बसला .
त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले अंकिता सासू सासऱ्यांना बोलावू लागली पण सासऱ्यांना उठता येईना इतकी जास्त झाली होती .सासूला काय करावे ते समजेना !! अंकिताने तिच्या भावला फोन करून गाडी घेऊन यायला सांगितले .
तिचा भाऊ आला , अजयला घेऊन ते डॉक्टरकडे गेले ,, अजयकडे पाहून त्यांनी सांगितले कि आता लगेच याच्यासाठी रक्ताची व्यवस्था करावी लागेल , अजयचा आणि त्याच्या बाबांचा ब्लडग्रुप एकच होता पण आता यावेळी त्यांचा काही उपयोग नव्हता ... अंकिताच्या भावाने त्याच्या मित्रांना बोलावून सगळी तयारी केली ..
पण अजयने खूप दारू घेतली होती त्यामुळे डॉक्टर जास्त काही बोलत नव्हते ..
अंकिताचे आई बाबा तिथे आले ..
दुसऱ्यादिवशी डॉक्टरांनी सांगितले कि याची जखम खूप खोल आहे ती भरून येण्यासाठी वेळ लागेल ..
४-५ दिवसानी अजय घरी आला पण डोक्यावर पट्टी होतीच ,, डॉक्टरांनी त्याला सांगितले होते तुझे ड्रिंक्स घेणे असेच चालू राहिले तर तू यातुन नाही बाहेर पडू शकणार वेळीच सावर स्वतःला ...
अंकिताने अजयसाठी  म्हणून २ महिन्याची सुट्टी घेतली होती .  तो पूर्ण बरा होईपर्यँत ती त्याच्या सोबत होती , पण ती सगळे करताना कर्तव्य म्हणून करत होती त्यात आपलेपणा असा कुठेच नव्हता ....
अजयला हे सगळे कळत होते त्याने एक दिवस अंकिताला विचारले , " रागावली आहेस का  ग ?
जास्त काही बोलत नाही , फक्त काम करत राहते .... "
अंकिताने त्याच्याकडे पाहिले आता तो पूर्णपणे बरा होत आला होता ,, ती काही न बोलता त्याच्याकडे पाहून हसली फक्त आणि म्हणाली आपण बोलू लवकरच तू आता आराम कर ,, उद्यापासून माझी सुट्टी संपणार आहे ..
अंकिता आता नेहमीप्रमाणे सगळे आवरून ऑफिसला जात होती , घरचे वातावरण सगळे पूर्वीसारखेच होते .. पण अंकिता आता तिकडे लक्ष देत नव्हती ..
पंधरा दिवसांनी ती घरी जरा लवकरच आली खुशीत होती ,,, त्यावेळी घरी अजय एकटाच सोफ्यावर पडला होता .. अंकिताला असे खुशीत पाहून तोही जरा गोंधळला ... अंकिताला त्याने विचारले आज काही खास आहे का ?

अंकिताने दोघांसाठी चहा करून आणला , ती म्हणाली अजय तू मला विचारले होते मी रागावले आहे का ? तर त्यावेळी मी स्वतःला शोधात होते .. २ महिन्यात घरी बसून खूप विचार केला कि पुढे आपल्याला काय करायचे आहे ? कसे जगायचे आहे ? त्यावेळी  बरेच पर्याय समोर आले , बरीच उत्तरे माझी मला सापडली ,, हरवलेली मी मला गवसले ....
अजय मी इथून आता बाहेर पडायचे ठरवले आहे काहीतरी नवीन करायचे आहे ,, माझी स्वतःची मला नवीन ओळख निर्माण करायची आहे , खरे हेच माझे स्वप्न होते लग्नाआधी ,, तुझ्यासाथीने ते पूर्ण करेन असे वाटले होते पण ते काही शक्य नाही ..... त्यामुळे आता माझी वाट मीच शोधेन ... !!!
अजय फक्त पाहत होता तो तिला म्हणाला मग इतके दिवस माझी सेवा करण्याचे फक्त नाटक का ?
तसे अंकिता म्हणाली नाही नाटक नाही ,,, माझे कर्तव्य करत होते .. तू आता धडधाकट आहेस तुझ्या पायावर उभा ,, त्यावेळी तुझ्या आईला वाटले होते कि तुला माझ्यामुळे लागले,,,  हा सगळा त्रास तुला माझ्यामुळे झाला  ..   पण खरे काय आहे ते तुला माहित आहेच ना !!!!
आणि खरे तर मी आपल्या विषयी बोलणार होते तुझ्यासोबत त्यादिवशी ,,, पण तू काही बोलायच्या पलीकडे होतास  ... मी काही सांगत होते पण तू ऐकून घेण्याआधीच हात उचलला माझ्यावर !!!
 अंकिता बोलतच होती आणि अजय फक्त ऐकत होता ....
अजय तिला म्हणाला जर असेच करायचे होते तर मग इतके दिवस नाटक कशासाठी केले ... त्यावेळीच गेली असतीस तर ....
अजय , हा प्रश्न मी तुला विचारते , जर त्यावेळी तू मला मारल्यामुळे जर मला काही झाले असते तर तू काय केले असते का ?
अंकिता त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती ... पण अजयला  तिच्या डोळ्यात पाहायची हिम्मत होत नव्हती ...

दारात अंकिताचा भाऊ तिला घेण्यासाठी आला होता ,, ती आपली बॅग घेऊन आली आणि अजयकडे एक कटाक्ष टाकून निघून गेली ...
अजय एकटक तिच्या पाठमोऱ्या लुप्त होणाऱ्या आकृतीकडे पाहत होता ....
अंकिता उद्यापासून एका नवीन जगात नवी प्रारब्धाची वाट शोधणार होती ...



Monday, November 28, 2016

प्राजक्ताची फुले

आजही मुग्धा नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती , सकाळची वेळ त्यामुळे बस साठी गर्दी , कामाला जाणारे , शाळेला जाणारी मुले यांची धावपळ हे सगळे बघताना मुग्धाचा वेळ खूप पटकन जात असे .शाळेला जाणाऱ्या मुलांच्या गप्पा तिच्या कानावर पडल्या कि आपणही शाळेत जात आहोत असाच भास तिला होत असे . पण चार पाच दिवसापासून एक माणूस रोज त्या बस स्टॉप वर दिसत असे , आणि मुग्धाकडे एकटक पाहत असे . मुग्धाची आणि त्याची नजरानजर झाली कि तो दुसरीकडे पाहत असे , असा खेळ गेल्या काही दिवसापासून चालू होता , का कुणास ठाऊक पण मुग्धाला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच ओळख दिसत असे आधी कुठेतरी पहिल्यासारखा चेहरा तिला आठवत असे .
मुग्धा आधी शिक्षणासाठी म्हणून शहरात आली त्यावेळी ती तिची मैत्रीण दीप्तीसोबत  तिच्याच फ्लॅट मध्ये रहात होती कधी कधी काही कामासाठी म्हणून  दिप्तीचा  भाऊ अनिकेत येत असे त्यावेळी एक दोन दिवस तो तिथे राही  ,सुरुवातीचे थोडे दिवस मुग्धाला अवघडल्यासारखे होत असे पण नंतर तिची आणि अनिकेतची मैत्री झाली . त्या तिघांचे त्रिकुट खूप छान जमले होते .
अनिकेत खूप बोलका ,पटकन सगळ्यांना आपलेसे करून घेणारा दिसायला स्मार्ट नसला तरी नाकी डोळस ठीकठाक होता . मुळातच हुशार असल्याने त्याच्या ज्ञानाचे वलय  चेहऱ्यावर दिसत असे . त्याची यावर्षीची परीक्षा झाली कि तो पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जाणार होता . त्याच्यासाठी त्याचा अभ्यास त्याचे करिअर खूप महत्त्वाचे होते यासगळ्यांपुढे बाकी सगळ्या गोष्टींची किंमत त्याच्या लेखी शून्य होती .
मुग्धा तिला तिचे शिक्षण स्वबळावर पूर्ण करायचे होते त्यासाठी तिचे पार्टटाइम नोकरी शोधणे चालू होते , दीप्ती नोकरी करत होती तिच्या येण्या जाण्याच्या वेळा काही नक्की नसत . तिच्या ओळखीवरूनच मुग्धा दोन तीन ठिकाणी जाऊन आली होती , थोडे दिवसात तुम्हाला कळवतो असेच तिला सगळीकडे सांगितले होते . दुपारी कॉलेज मधून आली कि ती फ्रीच असे . दिवस जात होते ....
मुग्धाला एके ठिकाणाहून नोकरीसाठी बोलावणे आले , तिथे गेली तर तिला उद्यापासून जॉईन व्हा असे सांगण्यात आले .
कधी एकदा घरी जाऊन सगळे दिप्तीला सांगते असे मुग्धाला झाले होते . आनंदाच्या भरात ती घरी पोहचली तर दार आतून बंद होते  ...
अरे वा ! आज दीप्ती घरी लवकर आलेली दिसत आहे , माझ्या नोकरीचे ऐकून किती खूष होईल ती या विचारात तिचे बेल वाजवणे चालूच होते , दार उघडले तसे मुग्धा दीप्तीच्या गळ्यात पडत दीप्ती ! दीप्ती ! मला नोकरी मिळाली उद्यापासूनच या असे सांगितले ... ... ती बोलतच होती ....
इतक्यात अरे वा  ! हो का अभिनंदन  असे म्हणत अनिकेतचा आवाज ....
मुग्धाने वर पहिले तर ती तिच्या आनंदात दीप्ती समजून अनिकेतच्या गळयात पडली होती .
त्याला पाहून दोन मिनिटे तिला समजेना काय करावे ते ? ती तशीच उभी ...
अनिकेतने तिला हलवले तेव्हा कुठे भानावर आली पटकन तिने हात मागे घेतले ..
अनिकेतने अभिनंदन म्हणत हात पुढे केला तर कसाबसा त्याच्याशी हात मिळवत ती आता निघून गेली .
अनिकतेच्या डोळ्यात पाहणे तिला शक्य होत नव्हते .
अनिकेत मात्र नुसतंच हसत होता .
 थोड्यावेळाने दीप्ती घरी आली , अनिकेतने तिला मुग्धाच्या नोकरीचे सांगितले , तितक्यात मुग्धा बाहेर आली  दिप्तीने अभिनंदन करून आज आपण बाहेर जेवायला जाऊ असे सांगितले मुग्धाचाही तोच विचार होता .
सगळे मस्त तयार होऊन जेवणासाठी बाहेर पडले .जेवणानंतर आईस्क्रीम खाऊन घरी आले .
उद्या मुग्धाचा पहिला दिवस होता आणि दिप्तीला लवकर जायचे होते त्यामुळे त्या लवकर झोपल्या .
अनिकेत त्याचा अभ्यास करत बसला ..
सकाळी मुग्धाला बेस्ट लक करून दीप्ती लवकरच बाहेर  पडली .
मुग्धा तयार होऊन बाहेर जात होती इतक्यात अनिकेतने तिच्या हातात  प्राजक्ताची फुले ठेवली . शुभेच्छा म्हणून तो निघून गेला .
मुग्धा त्या फुलांकडे पाहत होती , त्यांचा सुगंध तिच्या सगळ्या शरीरात फुलला होता ... स्वतःशीच हसून ती ऑफिसला निघाली .
ऑफिसचा पहिलाच दिवस असल्यामुळे काम कमी होते  , पण राहून राहून ती फुलेच तिच्या नजरेसमोर येत होती .
अनिकेत मितभाषी त्यामुळे तो स्वतःहून त्याच्या मनात काही असेल तर बोलणार नाही हे तिला माहित होते .
आणि झालेही तसेच दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमधून यायच्या आधीच तो निघून गेला होता . तिला खूप राग आला होता पण सांगणार कोणाला ? दीप्तीशी ती यावर काही बोलू शकत नव्हती .
थोडे दिवस  झाले पण अनिकेत आला नाही , आणि दिप्तीला काही दिवसासाठी दुसऱ्या शहरात जावे लागणार होते नक्की किती दिवसासाठी हे तिला माहीत  नव्हते .
मुग्धाला काहीच कळत नव्हते इथेच राहावे कि दुसरीकडे जावे पण तिच्या ओळखी खूप कमी होत्या त्यामुळे दुसरीकडे लगेच सोय होणे शक्य नव्हते . दिप्तीला जरी ती तिथेच राहिली तरी काहीच हरकत नव्हती प्रश्न होता तो फक्त अनिकेतचा ... !!!
हो नाही करत मुग्धा तिथे राहायला तयार झाली , कारण तिला ऑफिस , कॉलेज सगळेच जवळ पडत होते आणि मुख्य म्हणजे हि जागा तिच्या सवयीची झाली होती . आणि इथे राहिली तर परत कधीतरी अनिकेत भेटेल हि आस मनामध्ये होतीच ...
आता मुग्धा एकटीच राहत होती दिप्तीला जाऊन २ महिने होत आले होते . अनिकेतची काही खबरबात नव्हती .
एक दिवस मुग्धा घरी आली तर दार आतून बंद , दीप्ती तर आली नसेल ? कि अनिकेत ? अनिकेतची नाव मनात येताच तिच्या मनाची धडधड वाढली . कंप पावणाऱ्या हाताने कशीतरी तिने बेल वाजवली तर पुढ्यात अनिकेतच उभा !!!!
त्याला पाहून मुग्धाला काय बोलावे ते समजेना ?
त्याला हाय करून ती आत निघून गेली , अनिकेत नेहमीप्रमाणेच वागत होता त्याच्या वागण्यात काहीच वेगळेपण नाही !! मग मलाच का असे होत आहे ? याच विचाराने मुग्धाला काही सुचेनासे झले ..
ती स्वयंपाकासाठी गेली तर अनिकेतने सगळे करून ठेवले होते फक्त पोळ्या करायच्या बाकी होत्या .
" अरे ! तू कशाला केले इतके सगळे मी केले असते ना ? " मुग्धा
 " अग हो तू दमून येशील मग कधी करणार म्हणून म्हणले आज आपण करावे  ." अनिकेत
मुग्धाला मात्र खूप छान वाटत होते आपण दमून भागून आल्यावर आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी असेच स्वयंपाक केला असेल ती तिच्या विचारात हरवली
मुग्धा ! मुग्धा  ! जरी बाकी सगळे मला येत असले तरी पोळ्या मात्र तुला कराव्या लागतील मला त्या अजून जमत नाहीत  कि करू नकाशे ? असे अनिकेत म्हणताच मुग्धा हसत हसत कामाला लागली .
जेवण झाल्यावर सगळे आटपून मुग्धा तिच्या रूममध्ये गेली आणि अनिकेत अभ्यास करत बसला होता .
अचानक वादळी पाऊस सुरु झाला , वीज , ढगांचा कडकडाट होऊ लागला . मुग्धा पुस्तक वाचत बसली होती .
आणि अचानक लाइट गेली , सगळीकडे अंधार  मुग्धा बॅटरी घेऊन बाहेर आली तर अनिकेत तिच्याकडेच येत होता  .
दोघेही एकमेकासमोर मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात बसले होते . मुग्धाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गुलाबी छटा होती , आता काय ? हा एकच प्रश्न दोघांच्या मनात होता .
विजांचा कडकडाट जसा वाढू लागला तशी मुग्धाची चलबिचलताही वाढू लागली .
काहीतरी बोलायचे म्हणून मुग्धा त्याला विचारू लागली , " अनिकेत त्या दिवशी तू मला प्राजक्ताची फुले का दिली ? "
तुला आवडतात म्हणून , इतकेच अनिकेत बोलला आणि गप्प बसला ..
पण तुला कसे कळाले कि मला प्राजक्त आवडतो ते ? तिने मिश्कीलपणे त्याला विचारले .
कसे म्हणजे काय रोज सकाळी बघतो ना तुला त्या प्राजक्ता जवळ रुंजी घालताना त्याची काळजी घेताना तू इथे  राहायला आल्यापासून तसा तो खूपच बहरला  आहे.  हे ऐकताच मुग्धाची कळी खुलली ...
अनिकेत त्याच्या नकळत आज काही वेगळेच बोलत होता , मुग्धा त्याला आवडत होतीच पण त्याने कधीच तिला बोलून दाखवले नाही ...
रात्र उलटत होती , त्यांच्या गप्पाना वेगळाच रंग चढत होता मध्ये कॉफी झाली , समोरासमोर बसलेले ते दोघे आता शेजारी येऊन बसले होते , अनिकेतने मुग्धाचा हात प्रेमाने हातात घेतला , तशी मुग्धा शहारली , तिचा हात थंड पडला .
मुग्धा , मागच्या वेळी दीप्ती समजून अजाणतेपणाने मला मिठी घातली त्यावेळीच वाटत होते कि तुला खरे काय ते सांगून टाकावे , पण मी असा अबोल , आणि त्यावेळेची माझी परिस्थिती मी काहीच करत नव्हतो , तुलाही नुकतीच नोकरी लागली होती . पण तुझी ती मिठी मी तुझ्यापासून दूर असतानाहि मला तुझी आठवण करून देत होती ...  मला आता परदेशी जावे लागेल कधी ते सांगता येणार नाही किती दिवसासाठी तेही माहित नाही माझे प्रोजेक्ट संपले कि मी येईन परत . मला तू खूप आवडतेस ग .... अनिकेत बोलतच होता ....
बाहेर कसलातरी आवज झाला आणि मुग्धाने अनिकेतला घट्ट पकडले , आणि त्या बेसावध क्षणी मुग्धा आणि अनिकेत एक झाले बाहेर पाऊस पडत होता आणि आतमध्ये या दोघांची मने चिंब भिजत होती .
 सकाळी मुग्धाने चहा केला अनिकेतला उठवले हे करताना मुग्धाला आज खूप वेगळेच वाटत होते , काहीतरी वेगळे फीलिंग ...
सगळे आवरून ती ऑफिसला निघून गेली ,अचानक अनिकेतला एक कॉल आला आणि तो निघून गेला . मुग्धासाठी एक मेसेज ठेवून ," मला एका महत्वाच्या कामासाठी जावे लागणार आहे मला वेळ मिळाला कि तुला कॉल करतोच "
संध्यकाळी मुग्धा घरी आली हा मेसेज वाचून ती उभ्या उभ्या खाली कोसळली ..
पण तिला अनिकेतवर विश्वास होता तो नक्की तिला परत भेटेल .
सहा महिने झाले पण अनिकेतचा काहीच पत्ता नाही , तिने दिप्तीला कॉल केला तर तिचा नंबर लागत नाही , काय करावे ते तिला समजेना  !!! अशातच तिला एका दुसऱ्या जॉबची ऑफर आली , मुग्धासाठी ती नोकरी खूप काही देणारी होती त्यामुळे हि संधी वाया न जाऊ देता त्याचा उपयोग करायचा असे तिने ठरवले  . जे होईल ते होईल या विचाराने तिने घराची किल्ली आणि तिचा फोन नंबर शेजारच्या काकूंकडे देऊन ठेवला आणि सांगितले कि दीप्ती ,अनिकेत आले तर त्यांना इतके द्या , काकूंचा निरोप घेऊन ती निघाली .
आता जवळ जवळ वर्ष होत आले , मुग्धा अनिकेतला विसरली नव्हती , पण काळ हा सगळ्या गोष्टीवर औषध असतो असे म्हणतात तसे होत होते ...
आज मुग्धा जेव्हा बस स्टॉपवर उभी होती त्यावेळी तिला निरखून पाहणारी व्यक्ती म्हणजे तिला अनिकेतच वाटत होता पण खात्री होत नव्हती . ...
समोर बस येऊन थांबली आणि तिला कुणाचा तरी धक्का लागला तशी ती वास्तवात आली , आणि बस मध्ये चढली तर तो माणूस तिच्या मागोमाग त्याच बस मध्ये आला .
मुग्धा तिच्या ऑफिसच्या स्टॉपला उतरली तिच्या मागोमाग हाही उतरला ... आता मात्र मुग्धा जाम  वैतागली होती , ती त्याच्या जवळ गेली आणि त्याला बोलू लागली ," रोज पाहत आहे मी काय मागे मागे असता माझ्या सारखे ? मी कधी चढते उतरते काय खाते पिते याकडे अगदी बारीक लक्ष असते तुमचे .... "
त्याने शांतपणे गॉगल काढला आणि मुग्धाकडे पाहत हसला तो काही बोलणार इतक्यात त्याच्या नजरेत तिला आपली ओळख पटली .
अ.... अनिकेत !! तू हो अनिकेतच ..... !!!!
आज इथे कसा तू ? माझा पत्ता कसा मिळाला ? आणि आज सवड मिळाली तुला मला भेटायला ? आज का आला आहेस परत सोडून जाण्यासाठीच ना ? नुसती स्वप्ने दाखवायची .... मुग्धा इतक्या दिवसाचा राग त्याच्यावर काढू पाहत होती आणि तो मात्र हसत होता ....
मुग्धा ऐकून घे ना माझे बोलू आपण निवांत ....
अनिकेतला नाही म्हणणे मुग्धासाठी अशक्यच होते ...
शेवटी एकाठिकाणी दोघे बसले अनिकेत बोलत होता , " मुग्धा , माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे मला माहित आहे  पण काय करू वेळच अशी होती कि मी काहीच करू शकलो नाही , त्यावेळी मला माझ्या प्रोजेक्ट हेड कडून बोलावणे आले होते माझा  पार्टनर मी केलेल्या कामाचे सगळे क्रेडिट घेत परदेशी जात होता , तो घोळ मार्गी लावत होतो तोच , दिप्तीचा अपघात झाला ती दोन महिने कोमात होती , आता बरी आहे पण बोलताना , चालताना अजूनही तिला त्रास होतो ,
त्याच्या नंतर मला ५ महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर परदेशी जावे लागले मी नाही म्हणू शकत नव्हतो कारण पैशाची अडचण होती . तुला हे सगळे सांगावे म्हणून आलो होतो ते तू निघून गेली होतीस .... तुझा फोन नंबर मिळाला खूप लावून पहिला पण तो कधी लागलाच नाही , मागच्या आठवड्यात  आलो मी इकडे परत , तिकडे असतानाहि तुझी माहिती मिळवण्यासाठी माझ्या मित्रांच्या मागे लागलो होतो , तुझ्याच प्रोजेक्टमध्ये माझा एक अभि नावाचा मित्र काम करतो त्याच्यामुळे तुला भेटू शकलो .... आता बोल  तू ....
" अनिकेत , काय बोलू मी ? त्यादिवशी आपल्यात  जे काही झाले आणि परत तू लगेच निघून गेला मला खरेच समजत नव्हते कि मी काय करावे ? "
 " घरी तरी कोणत्या तोंडानी सांगणार होते ? घरचे मागे लागले आहेत लग्न कर लग्न कर पण कसे करू ? " त्यांना सांगितलेही असते तुझ्याबद्दल पण मलाच काही माहित नाही तर त्यांना काय सांगणार ? आणि नंतर तू मला असेच सोडून गेला तर ? काय करू मी ?
मुग्धा वेडी आहे का ? तुझ्या इतकेच मीहि वेडा होत होतो मलाही खूप इच्छा होती तुला भेटायची बोलायची पण ती वेळ आपली नव्हती ग ... कसे समजावू तुला .... ?? तू दीप्तीशी बोल मी तिला आपल्यातले सगळे सांगितले आहे  मग तर विश्वास बसेल तुझा ?
दीप्तीचे नाव घेताच मुग्धा शांत झाली

अनिकेत तुझ्यावर विश्वास होता म्हणूनच तर इतके दिवस मी तुझी वाट पहिली ना ? आणि तू आता असे म्हणत आहे का ?
अग वेडाबाई मजा केली तुझी , बरे डोळे झाक तुझे आता ....
का रे ?
अग झाक तर खरे ....
तिने डोळे झाकल्यावर अनिकेतने तिच्या हातात प्राजक्ताची फुले ठेवली ...
हातात गारवा जाणवला म्हणून मुग्धाने डोळे उघडले तर समोर परत एकदा प्राजक्त फुलला होता .... आणि रिमझिम पावसाची सुरुवात होत  होती  ....






Friday, October 14, 2016

योगायोग

" मुग्धा , तू आज यायलाच हवे पार्टीला नाहीतरी आपली हि एकत्र अशी शेवटची पार्टी आहे "  तिच्या हॉस्टेलच्या मैत्रिणी मुग्धाला समजावत होत्या ..
कॉलेजचे हे त्यांचे शेवटचे वर्ष होते आणि दोन महिन्यांनी परीक्षा झाली कि सगळे आपापल्या घरी असणार होते, मुग्धाला पार्टीमध्ये जायला काही अडचण नव्हती पण पूर्ण रात्र बाहेर थांबावे लागणार होते .. यावेळी सगळ्यांनी मिळून नाईट आऊट पार्टी ठरवली होती आणि पार्टी फक्त  मुलींची होती त्यामुळे तिला जावे असे वाटत होते पण फक्त घरी कळाले तर खूप ऐकून घ्यावे लागणार होते त्यामुळे तिची व्दिधा मनस्थिती झाली होती . तसे तिच्या घरचे तिला नक्कीच नाही म्हणाले नसते पण पूर्ण रात्र बाहेर राहणे ,, हे पटण्यासारखे नव्हते फक्त मुलींची पार्टी असली तरीही ...
आधीच त्यांचे नातेवाईक तिच्या आई बाबांना बोल लावत असत कि शहरात राहून तुमची मुलगी बिघडली .. परंतु
सगळ्या मैत्रिणीचा आग्रह तिलाही  मोडवेना आणि शेवटी ती  पार्टीसाठी तयार झाली ...
तसेही हॉस्टेलवरून त्यांचा ७-८ जणींचा ग्रुप होता ,, एका मैत्रिणीच्या फ्लॅटवरच पार्टी होणार होती , आणि हॉस्टेलच्या दोघी ,तिघींकडे गाडी असल्यामुळे येण्याजाण्याचा काही प्रश्नच नव्हता , सगळ्याजणी तयार होऊन ७ वाजताच हॉस्टेलमधून बाहेर पडल्या .. आणि मैत्रिणीच्या म्हणजेच अर्पिताच्या फ्लॅटवर जमल्या .
गाणी , डान्स , खाणे पिणे , सगळे अगदी मस्त मजेत चालू होते . मुग्धा , अर्पिता आणि बाकी दोघी तिघी गप्पा मारत  बसल्या होत्या , तितक्यात अर्पिताचा मोबाईल वाजला नंबर पाहून अर्पिता बाजूला जाऊन बोलू लागली, त्यावरून सगळ्यानांच अंदाज आला कि हा नक्कीच अर्पिताच्या बॉयफ्रेंडचा कॉल आहे ..
मुग्धाचे सगळे लक्ष अर्पितावरच होते आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते कि ती कोणत्यातरी अडचणीत सापडली आहे ..थोडावेळ अर्पिता फोनवर बोलून सगळ्यांच्यात येऊन बसली पण तिचे तिथे लक्ष लागेना कुठल्या तरी विचारात ती गुंगली होती ..
" अग अर्पिता, काय झाले ते तरी सांग , कोणत्या विचारात इतकी गुंग आहे ?" मुग्धा तिला विचारत होती ..
तरीही अर्पिता काहीच बोलेना .. मुग्धा उठून तिच्या जवळ जाऊन बसली ,, आणि तिला विचारू लागली " अप्पू , आपण तर एकमेकींपासून काहीच लपवत नाही , मग काय झाले ते सांग ना .. काही अडचण आहे का ?"
आजूबाजूला कुणी नाही हे पाहून अर्पिता बोलू लागली , "  मुग्धा आज हि आपली पार्टी फक्त मुलींची आहे म्हणून मी अनिकेतला सांगितले होते .....
हो अर्पिता माहित आहे मला आणि म्हणूनच तर मी पार्टीला आले ना !!! मुग्धा तिला मध्येच तोडत म्हणाली ..
अरे हो ग पण पूर्ण ऐकून तरी घे ना माझे म्हणणे ... असे म्हणून अर्पिता बोलू लागली , अनिकेत मला म्हणत होता कि , तू मला पार्टीला नाही बोलावले मग बाकीच्या मुलांना कुणी बोलावले ते का येत आहेत ? मी तुला म्हणत होतो कि आपण पार्टी आपण एकत्र करू पण तू ऐकले नाही माझे ......

हे ऐकून मला काहीच समजेना म्हणून त्याला मी विचारले अरे असे कसे होईल जर मी तुलाच नाही बोलावले तर बाकीच्या मित्रांना कसे बोलवेन ? पण तो काही ऐकूनच घेईना ग !!! तो म्हणाला तुमच्या बाकीच्या मैत्रिणीनी बोलावले असेल त्यांना .. आणि बघ ते येत आहेत पण त्यांचा विचार मला काही चांगला दिसत नाही "
असे म्हणून अनिकेतने फोन ठेवला .... परत अर्पिता त्याला फोन लावत होती पण त्याचा फोन बंद होता ...
हे ऐकून मुग्धाही विचारात पडली .. तिलाही समजेना काय करावे ते ?
दोघीनी ठरवले कि सगळ्यांना विचारून बघायचे कि कुणी या मुलांना पार्टीमध्ये बोलावले ? त्याप्रमाणे त्या एक एकीला जाऊन विचारू लागल्या पण सगळ्याच नाही नाही म्हणत होत्या ....
मुग्धा अर्पिताजवळ आली तिच्या कानात तिने काहीतरी सांगितले आणि ती पटकन तिथून निघून गेली , मुग्धा जाऊन फक्त १० -१५ मिनिटेच झाली तेवढ्यात दारावरची बेल वाजली अर्पिताला वाटले आली असेल मुग्धा तर ... पुढे त्यांच्याच कॉलेजमधील चार पाच मित्र होते ,, अर्पितां आणि बाकीच्या दोघीजणी येऊन दारातच त्यांना थांबवले आणि विचारू लागल्या तुम्ही इथे काय करत आहात ?
तर त्यातील एक जण म्हणाला , हे बरे आहे अर्पिता एक तर   स्वतः मेसेज करते पार्टीला या आणि आता आलो तर दारातच आमची उलट तपासणी ??
काही काय मी कधी केला तुम्हाला मेसेज ? अर्पिता विचारत होती ...
त्यातील एकाने त्याचा मोबाइल दाखवला आणि त्यावरचा मेसेजपण .... be ready for party at ८:३० ...
आता उडायची वेळ अर्पिताची होती ... तिला काहीच माहिती नव्हते .. सगळ्याजणी अर्पितालाच बोलू लागल्या तू आम्हाला विचारत होती आता हे काय म्हणून ? अर्पिताला तर काहीच सुधरत नव्हते आणि मुग्धाही नाही ....
सगळेच आत आले  अर्पिता डोक्याला हात लावून विचार करत होती मी कधी पाठवला असेल हा मेसेज ??
पण तिला फक्त प्रश्नच दिसत होते त्याची उत्तरे नाहीच ...
अर्पिताने मुग्धला मेसेज केला ,, कुठे आहे ? लवकर ये !! पण मुग्धाचा काहीच रिप्लाय नाही .. तिने तिला फोन केला तर पलीकडून फोन कट केला त्यावरून अर्पिताला मुग्धाची आणखीच काळजी वाटू लागली..
मुग्धा गाडीवरून जात होती तर तिच्यापासून पाठीमागे काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून तिने गाडी थांबवून पहिले तर कुणाचा तरी ऍक्सीडेन्ट झाला होता तिने उतरून जवळ जाऊन पहिले तर ती गाडी अनिकेतची होती  !!! त्याला बराच मार लागला होता अनिकेत त्याचा पाय धरून जोरजोरात ओरडत होता ...
मुग्धाने पटदिशी तिथल्या लोकांच्या मदतीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले ... आणि अर्पिताला फोन केला आणि सगळे सांगितले ..
थोड्याचवेळात अर्पिता आणि बाकीचे सगळेच तिथे आले ,, अर्पिता  रडत रडतच मुग्धाच्या गळ्यात पडली .. सगळे बाहेर थांबले होते ..
त्याच हॉस्पिटलमध्ये दुसरी केस होती म्हणून इन्सपेक्टर अवि  आले होते .. या सगळ्याची गर्दी पाहून त्यांनी डॉक्टरांना विचारले काय झाले कसली गडबड आहे .. डॉक्टरांनी त्यांना सगळी परिस्थिती सांगतली ..
असे होय म्हणत ते कसल्यातरी विचारात बाहेर गेले आणि रडणाऱ्या अर्पिताला पाहून जवळ बोलावले ,आणि तिला विचारू लागले खरा खरा हा प्रकार काय आहे ते सांगा ... अर्पिता खूप घाबरली होती आणि परत पोलीस पाहून तर जास्तच रडू लागली ...
मुग्धाने अर्पिताला शांत केले आणि सगळा प्रकार सांगितला ..
हे सर्व  ऐकून ते  अर्पिता आणि मुग्धाला घेऊन ज्या रूममध्ये अनिकेत होता तिथे  गेले .. अनिकेतचे सगळे मित्र तिथेच होते ,, अचानक मुग्धा आणि अर्पिता पोलिसांसोबत पाहून सगळ्याचे चेहरे पांढरे पडले ... सगळेच तिथून निघून जात होते पण दाराजवळ आणखी दोघे उभे होते त्यामुळे ते गपचूप आत येऊन उभे राहिले ..
अनिकेत तर तिथून उठूच शकत नव्हता .. त्यामुळे अवीनी त्याला काही विचारायच्या आधीच तो बोलू लागला....
सॉरी अर्पिता !!! मला हे असे करायचे नव्हते पण मला तुझा खूप राग आला म्हणून मग मी ......
अर्पिता त्याच्याकडे पाहतच होती तो हे सगळे काय बोलत आहे ?
" अनिकेत नीट सांग मला काहीच समजत नाहीय तुला काय म्हणायचे आहे ते ?" अर्पिता त्याला म्हणत होती ..
अर्पिता तुझ्या मोबाइलवरून मीच सगळयांना मेसेज केले होते ... पार्टीला या म्हणून ,, आणि सगळयांना सांगितले होते कि तिथे जाऊन दंगा घालून मगच परतायचे .. ..आणि हे सगळे माझ्यावर येऊ नये म्हणून मी तुला फोन केला सांगायला ,,  त्यानंतर अचानक मी मुग्धाला बाहेर पडताना पहिले मला सगळ्यात जास्त राग मुग्धाचाच आला होता , कारण तिच्यामुळेच तू मला पार्टीसाठी नाही म्हणाली होतीस ...  म्हणून मी मुग्धाच्या मागे मागे जाऊ लागलो .....
 "मुग्धा तू तर मला सांगूनच गेली होतीस ना कि मी १० मिनिटात जाऊन येते .. पण कुठे ते काहीच नाही सांगितले !!!" अर्पिता तिला विचारत होती ..
अग आपली गडबड चालुच होती आणि तितक्यात मला या अविकाकांचा फोन आला कि ते इकडे आले आहेत आणि आपलाही प्रॉब्लेम सुटेल म्हणून मी त्यांच्याकडे येत होते तर .. मी येत असताना मला असे जाणवले कि माझा पाठलाग कुणीतरी करत आहे !!! मी पुढे जाऊन थांबणार होते  तर मागे याची गाडी खड्डयात कोसळली मग इथे त्याला  घेऊन आले...
आणि अविकाकांना सगळे सांगितले ,, त्यांना असे वाटले कि यात काहीतरी गडबड आहे म्हणून त्यांनी मला सांगितले होते कि मी त्यांना ओळखते असे नाही दाखवायचे ...
आणि पुढचे सगळे तर तुला माहित आहेच .... इतक्या कमी वेळात इतके सगळे घडले अर्पिता कोसळतच होती तितक्यात मुग्धाने तिला सावरले .. आणि बाहेर घेऊन गेली
इकडे अनिकेत अवीची माफी मागत होता ,, असे कधीच परत करणार नाही म्हणून .... पण अविने त्याला सांगितले कि अर्पिताचे जे काही म्हणणे असेल त्यावर ठरेल तुझे काय करायचे ते .... !!!!
मुग्धा आणि अर्पिता बाहेर येऊन शांत बसल्या होत्या काहीच न  बोलत योगायोगाने एक अपघात घडता घडता टळला होता !!!







Thursday, October 13, 2016

शेजारी शेजारी

आमच्या घराशेजारी एक काका काकू राहतात , म्हणजे  ज्यावेळी आम्ही आमचे मूळगाव सोडून कवठेमहांकाळला राहायला आलो त्यावेळी आम्ही त्यांच्या तिथे राहायला आलो  . मी  ३ वर्षाची असेन . 
त्यावेळी पासून हे काका काकू आमच्या ओळखीचे , शेजारचे आणि हळूहळू जशी  रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती जवळ होत जातात तसेच त्यांचे आणि आमचे सूर जुळत गेले .. 
आम्ही राहायला जाण्याआधी नुकतेच त्यांचे लग्न झाले होते , काकूही नवीन होत्या त्यांच्यासाठी ते सासर होते त्यामुळे कधी काही वाटले कि आईशी येऊन बोलत , त्यांचेही मन हलके व्हायचे तेवढाच त्यांना मोकळेपणा मिळत असे . 
 ते आणि आम्ही जास्त काही नाही पण ३-४ वर्ष त्याच गल्लीत एकत्र होतो परत आमचे स्वतःचे घर झाले आणि आम्ही थोडे दूर आलो त्या गल्लीपासून फार नाही पण ५-१० मिनिटाच्या अंतरावर ... 
फक्त घर दूर झाली मने नाही ... त्यामुळे येणे जाणे चालूच होते . 
पुढे काका काकू वेगळे राहायला लागले त्यांनाही दोन मुले झाली ,,, एका मोठ्या घरातून फक्त एका खोलीच्या घरात त्यांना संसार करावा लागत होता .. पण त्यातही ते इतके सुखी आणि आनंदाने राहत होते ,, कधीच त्यांनी कोणत्याही गोष्टीची  तक्रार नाही केली .. जे आहे त्यात समाधान मानले .. 
त्यात त्या दोघांचे शिक्षण फार नाही त्यामुळे कायमस्वरूपी अशी नोकरी नाहीच ,,काका  सारखे काही ना काही नवीन उदयॊग करत पण त्यातही यश असे नाहीच .. काकूही  जमेल तसे शेतात , कधी कुठे मिळतील ती कामे करत त्यांच्या संसाराला हातभार लावत .. विशेष म्हणजे त्यांची परिस्थिती नसून सुद्धा ते सगळ्याना इतकी मदत करतात आणि त्याचा कधीही कांगावा करत नाहीत ,, कधीही जा त्यांच्याकडे नेहमी हसतमुख मिळतील , 
आपल्या दुःखाचे कधीच भांडवल करणार नाहीत ... 
काकू अळूवड्या खूप छान करतात , आणि आमच्या घरी तर खूप फेमस आहेत त्यामुळे आमच्या तिघांपैकी कुणीजरी घरी गेले तरी वड्या घेऊन त्या स्वतः येतात अगदी न सांगता .. आईला जरा जरी बरे नसले कि नेहमी मदतीला असतात .. त्यांना कधीच काही बोलावे नाही लागत ... एखादी गोष्ट आपण कुणालातरी अधिकारवाणीने सांगू शकतो त्यातले हे कुटुंब आहे ... 
चांगले शेजारी मिळायलाही नशीब लागते ,, फक्त एक हाक मारली तर धावून येईल इतकी जवळची माणसे ,, मी आईला खूप वेळा विचारले कि हे दोघे आपल्यासाठी इतके का करतात ?  त्यांच्यासाठी आपण  खास असे काहीच केले नाही  तरीही  ?? फक्त वेळोवेळी त्यांच्या साथीला उभे राहतो इतकेच !!!!! 
"आपले बोलणे गोड़ , मन शुद्ध ,चांगले असले कि सगळे आपोआप होते आपण काहीच करावे लागत नाही " आमच्या आईचे उत्तर !!! 
खरेच ना काही नाती मनाने किती घट्ट जोडली जातात कळतच नाही ... कधी केव्हा कशी ???
आजही नियती त्यांची परीक्षा घेतच आहे पण तरीही ते ठामपणाने तिच्यासमोर उभे आहेत आणि नेहमीच राहतील ... 


Tuesday, October 11, 2016

सीमोल्लंघन

रोज विचार करत असते कि काहीतरी नवीन करायचे  ,, नवीन म्हणजे अगदी काही एव्हरेस्ट सर करायचा असले कि नाही ,, अगदी छोट्या छोट्या गोष्टी बदलायच्या .. नवीन काही ना काही वाचायचे , काहीतरी लिहायचे किंवा घरातून बाहेर पडून अगदी थोडा वेळ का भटकून यायचे ... पण  कितीतरी दिवस झाले यातले काहीच होत नाहीय .. माझा आळशीपणा कि आणखी काही ?
किती दिवस झाले एक मस्त पुस्तक घरी आणून ठेवले आहे रोज उद्या उद्या म्हणत वाचायचे होतच नाहीय....  सकाळी उठले लॅपटॉप चालू केला कि तिथेच संपले सगळे !!!! थोडा थोडा वेळ म्हणत फेसबुक , ब्लॉग , काही ना काही करत कसा दिवस या नेटवर जातो कळत नाही ... आणि सोबतीला असतेच माझी वामकुक्षी !!! एकदा झोपले कि नवरोबाचा कॉल आला कि मग उठायचे !!! हे रोजचेच आणि आज परत काही नवीन केले नाही म्हणून चिडचिड .... 
कळते आहे सगळे पण वळत काहीच नाही आहे त्याचा सगळं गोंधळ आहे !!! खरेच ना इतके कशी या सगळ्यात वाहून जाते  लक्षातच येत नाही .... सेल्फ कंट्रोलचा  अगदी बोऱ्या वाजलेला आहे . टेक्नॉलॉजी आडिक्ट म्हणतात त्यातला प्रकार आहे ... आता हेहि मला गूगल बाबानी सांगितले इथेही आली तीच परत  
 टेक्नॉलॉजी ... 
या काही तक्रारी नाहीत काळासोबत पुढे जायला तर हवेच पण सगळ्या गोष्टी प्रमाणात हव्यात नाही का ?  नाहीतर म्हणलेच आहे अति तेथे माती !! 
आज दसरा नवीन सुरुवात ,,, स्वतःला घालून दिलेल्या या सिमा , चौकटीतून बाहेर पडून नवीन सुरुवात करण्याचा दिवस ... किती जमेल माहिती नाही  , इतके दिवसाची झालेली सवय , स्वतःच आखलेली एक चौकट ,कंफर्ट झोन सोडणे जरा कठीणच असते ..  
पण तरीही प्रयत्न करायचा .. वर्तमानात जगण्याचा .... 
 असो ... 
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!!
सोने घ्या सोन्यासारखे राहा .... नेहमीच चमकत !!! 

Thursday, October 6, 2016

अबोली

अबोलीने इंजिनीरिंगची परीक्षा  नुकतीच पास केली आणि ती स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून पुण्यात आली .. पुण्यात एका हॉस्टेलमध्ये राहून ती कुठे एखादा पार्टटाइम जॉब मिळतो का हेही शोधत होती ..
मध्यमवर्गीय घरातील मुलगी ,तिच्यामागे अजून एक बहीण आणि भाऊ होता . आणखी घरच्यावर भार न होता तिला आपले करियर घडवायचे होते . 
अबोलीचे आई बाबा तिच्यापाठी नेहमीच होते , पण वयात आलेल्या मुलीची जशी सगळ्या पालकांना काळजी असते तशी त्यांनाही होती . अबोलीचा मामा तिच्यासाठी एक स्थळ घेऊन आला होता . मुलाचे शिक्षण अबोलीपेक्षा कमी होते पण घरची परिस्थिती उत्तम होती .. मामाच्या आग्रहामुळे अबोलीच्या घरच्यांनी बघण्याचा कार्यक्रम ठरवला आणि रीतसर तो पारही पडला .  तिच्या लग्नामुळे नाही म्हणले तरी आई वडिलांवरचा भार थोडासा का होईना पण कमी तर नक्कीच होणार होता त्यामुळे अबोलीच्या मनाची चलबिचलता होत होती ... ते आई बाबानी ओळखले आणि तिला सांगितले , 
" हे बघ बेटा , हे तुझे पहिलेच स्थळ आहे,  त्यामुळे आपण अजून मुले पाहू तुला याच मुलाशी लग्न करायला हवे असे काही  नाही " तिलाही ते पटले आणि ती परत पुण्याला निघून गेली . 
एक दिवस सकाळी क्लासला  जाताना एक मुलगा तिला तिथे बाहेर दिसला , ती जशी जवळ जाऊ लागली तशी तिची खात्री पटली अरे हा तर तोच , त्या दिवशी मला पाहायला आलेला राहुल !!!!"  हा इथे कसा ? "
स्वतःच्या मनातच विचार करत ती पुढे जात होती तर , राहुलने तिला थांबवले आणि तिला विचारू लागला 
," तू मला नाही का म्हणाली ? मी तुझ्यापेक्षा कमी शिकलो होतो म्हणून का ? " यावर तिला काय उत्तर द्यावे ते  समजेना तो तिला खूपच दमदाटी करू लागला , रस्त्यात तमाशा नको म्हणून तिने त्याला काहीतरी सांगितले आणि तो तिथून निघून गेला .. कशीतरी अबोली क्लासमध्ये पोहचली . 
होस्टेलला परत जाताना हा तिथेच होस्टेलच्या बाहेर उभा !!! तिला परत तेच प्रश्न .. आणि यावेळी तर त्याने तिला स्पष्ट सांगितले , " तू मला खूप आवडली आहेस त्यामुळे तू लग्नाला तयार होईपर्यंत मी तुझा असाच पाठलाग करणार .. "
हे ऐकून तर अबोली रडायलाच लागली तिच्या मैत्रिणी तिला तिथून घेऊन गेल्या .. पण राहुल रोजच तिच्या क्लास बाहेर , होस्टेलबाहेर थांबून तिला त्रास देऊ लागला .. 
एक दिवस तर त्याने कहरच केला ती सुट्टीसाठी घरी गेली होती त्यावेळी तो तिच्या घरी गेला आणि  तिच्या आईबाबांना म्हणू लागला कि आज मी एक फ्लॅट घेतला आहे आणि त्याची पूजा अबोलीनेच केली पाहिजे आणि तिने तसे नाही केले तर पुढे जे काही होईल ते तुम्हाला खूप त्रासदायक ठरेल .. आणि त्यांच्या घरासमोरच बसून राहिला बराच वेळ झाला तरी तो तिथून जाईना , सगळे शेजारी पाजारी गोळा होऊ लागले .. सगळ्यांसमोर दंगा नको म्हणून अबोलीचे बाबा तिला त्याच्या नवीन फ्लॅटमध्ये घेऊन गेले तिने पूजा केली .. आणि ते परत घरी आले . 
यांनतर अबोली मात्र थोडी बदलली तिला असे वाटू लागले कि आपल्यावर इतके वेड्यासारखे प्रेम  कोण करू शकते ? या विचाराने एकीकडे ती सुखावत होती ,पण मनात तिला त्याची भीती वाटत होती .. 
यानंतर त्यांचे रोजच फोनवर बोलणे सुरु झाले , तीही त्याला भेटायला जाऊ लागली .. कुणाशी तरी लग्न करायचे हा आपल्यावर  इतके प्रेम करतो मग यांच्यासोबतच का नको ? हा विचार तिने घरी सांगितला . 
तिचे बाबा तिला परोपरीने समजावत होते कि नीट विचार कर मग निर्णय घे , कोणतीही घाई नको करू .. पण अबोली काही ऐकूनच घेत नाही म्हणल्यावर तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न लावून दिले . 
अबोलीला पुढे शिकायचे होते म्हणून राहुलने तिला पुण्यात राहा म्हणून सांगितले तोही तिला भेटायला येत असे.... 
थोडे दिवस गेले आणि राहुलचे खरे रूप तिला समजायला लागले ..... 
ती क्लासमध्ये गेली कि हा तिच्या मागे जाणार , ती मुलीसोबत बसते का ते बघणार ? मुले मुली सोबत बसत असतील तर त्या क्लासमध्येच दंगा घालणार ... अबोली तर शरमेनेच मरून जायची पण त्याच्यासमोर बोलण्याची तिची हिम्मत नव्हती . 
रस्त्यावरून जाताना मैत्रिणीसोबत बोलायचे नाही हसायचे नाही ... तिने स्वतः हुन कुणालाही फोन करायचा नाही , त्याचा फोन आला कि तो पहिल्या रिंग मध्येच उचलायला हवा नाहीतर तिची काही खैर नाही .. वेगवेगळ्या प्रकारे तिला धाकात ठेवायचे त्याने सुरु केले होते ... त्याच्या आई वडिलांचा त्याला पाठिंबा होता !!
एक दिवस अबोलीच्या बाबांनी त्याला समजवायचा प्रयत्न केला तर , त्याने त्यांना स्पष्ट सांगितले कि आज पासून तुम्ही अबोलीशी बोलायचे नाही .. आणि अबोलीलाही बजावले ...
याघटनेनंतर अबोलीचे आई बाबा तिला घटस्फोट घे म्हणून मागे लागले तर त्याने  अबोलीला सांगितले कि जर तू असा विचार जरी केलास तरी तुझ्या बहिणीचे आयुष्य उध्वस्त करेन .. 
अबोलीची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती आपल्याच हाताने आपले मरण ओढवून घेतले असे तिला राहून राहून वाटे .. 
राहुलचे कुणीही मित्र मैत्रीण आले कि हिने तो सांगेल तितकेच त्यांच्याशी बोलायचे ,, एक चालत बोलता कठपुतळी बनली होती तिची .. .. 
राहुलसोबतच ती त्याच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती त्यावेळी तिचा कुणीतरी एक मित्र तिथे आला होता तो अबोलीला पाहून तिच्याशी बोलायला आला ,, त्याला पाहून अबोली तिथून जात होती पण तो तिला हाक मारत आला हे पाहून राहुलला खूप राग आला त्याने तिथेच अबोलीच्या कानफटात मारली आणि त्या मित्राची कॉलर धरून त्याला मारू लागला ... तिथल्या लोकांनी राहुलला आवरले नाहीतर तो बिचारा तिथेच मेला असता ... 
एका वर्षात अबोलीला त्याने तिचे जगणे नकोसे केले होते .. जिथे ती जाईल तिथे बंधने ... !!! सगळे सोडून परतही जाऊ शकत नव्हती ... 
आणि शेवटी तिने निर्णय घेतला बस आता सगळे संपवायचेच ... 
पण त्यावेळीच तिला जाणीव झाली कि आता जगायला हवे सगळे संपवून नाही चालणार ... या छोट्या जीवासाठी तरी जगायला हवे ... 
इतकी गोड़ बातमी मिळूनही राहुलच्या वागण्यात तसूभरही फरक पडला नाही त्याला आणखीन एक नवीन विषयच मिळाला बोलायला .. त्याला तिच्या पोटातले बाळ कधीच त्याचे वाटले नाही .. 
यानंतर मात्र अबोलीचा संयम सुटला ... आणि ती राहुलाला बोलू लागली .,, इतके दिवसाचा राग , त्रास मनातील कोंडमारा सगळा बाहेर पडत होता ... पण याचा त्रास झाला तो त्या बाळाला आणि कळी जन्माला येण्याआधीच कोमेजून गेली .. 
हा आघात अबोलीसाठी खूप मोठा होता यात ती स्वतःला हरवत गेली ती कायमचीच ..... 





Sunday, October 2, 2016

आनंदी

" तुला आधीच सांगून ठेवतोय यावेळी पोरग झालं तर तू घरी येशील  नाहीतर कायमच तोंड काळ करशील समजल का ? " सविताचा नवरा तिला सांगत होता .
लग्न झाले तेव्हा सगळे गोड गोड असणारे वातावरण आंनदीच्या जन्मानंतर  बदलेले होते . आनंदी सविताची पहिली मुलगी .... 
लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आणि आणि तिला आपल्या आई होण्याची चाहूल लागली , सविताने नवऱ्याला सांगताच तो तर आनंदाने वेडा होऊन गेला  सासूपण अगदी आनंदाने कौतूकाने तिचे डोहाळे पुरवीत होती  .. 
आपले होणारे कौतुक पाहून सविताला तर स्वर्ग दोन बोटे उरला होता . 
भराभर दिवस जात होते , तशी सविताच्या माहेरची परिस्थिती बेताचीच पण लेकीचे पहिले बाळंतपण माहेरीच झाले पाहिजे म्हणून सविताची आई सातवा महिना लागल्यावर तिला घेऊन आली होती , सविताचे दिवस आनंदात जात होते म्हणता म्हणता नऊ महिने पूर्ण झाले आणि सविताने एक गोंडस मुलीला जन्म दिला .. मुलगी अगदी तिच्यावरच गेली होती ...
सविताच्या आईने तिच्या सासरी निरोप पाठवला एक दिवस गेला , दुसराही गेला पण कुणीच येईना तिला भेटायला .. बाळाच्या जन्मासाठी आतुर झालेली माणसे  कुणीच का येत नाही भेटायला ? सविताला कळत नव्हते कि बाळाच्या जन्माचा आनंद मानू का दुःख ? हि जन्माला आली आणि  माझी माणसे माझ्यापासून दूर गेली .. 
त्यावेळेपासूनच तिला तिची मुलगी नजरेसमोर नकोशी झाली .. 
यात त्या जन्माला आलेल्या लहानशा जिवाचा काय दोष होता ? हे तिला कळत होते पण ... 
एक दीड महिना माहेरी राहून छोट्या आनंदीला घेऊन सविता सासरी परत गेली पण ती आली काय किंवा गेली काय ? कुणालाच त्याचे काही नव्हते ... 
सविताला कळून चुकले कि आपल्याला पहिली मुलगी झाली म्हणूनच हे असे होत आहे .... 
सारखे सासूचे तिरकस बोलणे , नवऱ्याचे तिच्याशी नीट न वागणे याचा राग सर्वतोपरी त्या छोट्या आनंदीवर निघू लागला  तिलाही कळायचे नाही कि आपले काय चुकायचे !!!! 
परंतु वेळ सारखीच नसते  आणि परत एकदा सविताला आपल्या आई होण्याची चाहूल लागली ... पण यावेळी तिच्या सासूने आई नवऱ्याने तिला सांगितलेच होते मुलगा झाला तर घरी यायचे.. 
आनंदी तशी लहानच होती , आपल्यासोबत काय होते ? आजी, बाबा आपल्यासोबत नीट का नाही बोलत ? सारखे  का रागवतात ? हे तिला कळत नसे ... आणि सविताही कधी कधी तिच्यावर राग काढत असे त्यामुळे आनंदी शांतच होत होती . तिला आता फक्त इतकेच माहिती होते आपल्या आईला एक छोटे बाळ होणार आहे त्यामुळे तिला त्रास द्यायचा नाही . मुळातच शांत असणारी आनंदी यामुळे आणखी शांत होत गेली . 
नवऱ्याने आधीच सांगितल्यामुळे तिच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार होती , कितीतरी देवांना नवस बोलून तिने पाण्यात ठेवले होते आणि अखेर ते तिच्या कामाला आले आणि सविताला मुलगा झाला ... 
यावेळी तिच्या नवऱ्याने,  सासूने मोठ्या थाटामाटात बाळाचे बारसे केले , सविताचे थोडेसे कौतुक होऊ लागले यात सवितालाहि आनंद होत होता पण या सगळ्यात आनंदी कुठेतरी मागे पडत होती , तिच्या बालमनावर  आतापासूनच एक मुलगी असण्याचे ओरखडे उमटत होते .. 
अभि आनंदीचा लहान भाऊ सगळ्याचा खूप लाडका ,, आनंदीचासुद्धा   ,... 
अभि आणि आनंदी मोठे होत होते .. सगळे अभिचे लाड करत त्याला काय हवे ते नको बघत पण अभिला मात्र त्याची ताई खूप प्रिय होती त्याचे सगळ्यात जास्त प्रेम आपल्या ताईवर होते .. त्यालाही समजत होते आई सोडले तर जास्त कुणी ताईशी बोलत नाही , तिचे लाड कुणी करत नाही .
त्याने एकदा ताईला विचारले होते ताई हे सगळे असे का वागतात , त्यावेळी नेमकी तिथे आजी आली आणि तो विषय तिथेच थांबला . 
आनंदी शाळेत खूप हुशार होती , अभिला अवघड वाटणारे विषयही ती अगदी सोपे करून सांगायची त्यामुळे अभिला आपल्या ताईचा आणखीच अभिमान होता .. 
सविताला असे आपल्या दोन्ही मुलांना एकत्र पहिले कि समाधान वाटत असे जे ती तिच्या मुलीसोबत मोकळेपणाने बोलू शकत नाही याचे तिचे दुःख थोडेतरी कमी होई .. 
अभिला आता कळू लागले होते कि एक मुलगी आहे म्हणून आपल्या ताईला इतकी बंधने आहेत , ती मुलगी आहे म्हणून आजीला , बाबांना ती आवडत नाही .. त्यानंतर तर तो आपल्या ताईची जास्त काळजी घेऊ लागला...
आनंदीचे यावेळी बारावीचे वर्ष होते , त्यानंतर तिला शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार होते ... प्रश्न होता तो तिच्या घरच्यांचा ते तिला शिकण्यासाठी पुढे पाठवतील का ? तिच्या आजीने तर आतापासूनच तिच्यासाठी स्थळे पाहायला सुरुवात केली होती .. या सगळ्याची कुणकुण अभिला लागली तसाच तो आजीकडे गेला आणि तिला सांगितले कि जर ताईला तुम्ही पुढे नाही शिकवले तर मीहि उद्यापासून शाळा सोडेन घरीच राहीन ...
आजीने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण अभि काही ऐकून घेईना शेवटी त्याच्या ताईने समजावले तरी तो ऐकेना म्हणल्यावर आजीचा नाईलाज झाला , पुढच्या शिक्षणासाठी आंनदीला बाहेर पाठवले .
 आनंदी मुळातच हुशार आणि लाघवी त्यामुळे कॉलेजच्या वातावरणात लगेच मिसळून गेली .  आनंदी नव नवीन यशाची शिखरे गाठत होती ..  त्यातूनच तिला जॉबचा कॉल आला ...
तिने हि बातमी सगळ्यात आधी अभिला फोन करून सांगितली , तसा अभि खुश होऊन तिला भेटण्यासाठी म्हणून येऊ लागला आणि येताना त्याच्या बाइकचा अपघात झाला ..
त्याला तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी दवाखान्यात ऍडमिट केले , आणि घरी फोन करून सांगितले तसे सविताला काही सुचेना  ... सगळा दोष परत आनंदीच्या माथ्यावर आला होता  सविता , तिचा नवरा , आणि सासू दवाखान्यात पोहचले पण त्याच्या आधीच आनंदी तिथे होती ...
इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपले कसे होणार याच्या विचारानेच सविता आणि तिचा नवरा कावरा बावरा झाला होता पण आनंदी सगळे अगदी मोठ्या हिमतीने करत होती , अभिला लागणारे रक्त यासाठी  तिने तिच्या मित्र मैत्रीणीना बॊलवून घेतले होते , औषधे , सगळ्या टेस्ट यासाठी तिला सगळेच खूप मदत करत होते.
हे सगळे पाहून तिच्या आजीला आणि बापाला काय बोलावे हे कळत नव्हते , सविताला मात्र आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटत होता .  सगळे मार्गी लागल्यावर आनंदी आजीजवळ आली आणि म्हणाली , " आजी काही झाले तरी माझ्यामुळे मी अभिला काही होऊ देणार नाही , आजवर त्याने माझ्यासाठी खूप केले पण आता माझी वेळ आहे ." इतके सगळे आजीशी बोलण्याची आनंदीची पहिलीच वेळ होती ...

अभिला बरे होण्यासाठी दोन महिने लागले पण त्यासाठी आंनदीने तिचा जीव ओतला ... अभि बरा झाला त्यावेळी त्याने पहिला प्रश्न हाच विचारला , " ताई ?"
 त्यावेळी हसरी आनंदी तिच्या आजीसोबत त्याच्याजवळ आली ...
ते पाहून अभि चक्रावला इतके सगळे अचानक ?
आनंदीची वेगवेगळी रूपे तिच्या आजी आणि वडिलांना पाहायला मिळाली होती तीच कि जी एक मुलगीही करू शकते , आनंदीने त्यांना दिलेला आधार , अभिची काळजी ... आणि बरेच काही
अभिच्या आजरपणामुळे का होईना पण आनंदींच्या आयुष्यात आज खरेच आनंदी फुलली होती ..