Saturday, August 6, 2016

श्रावणसरी

रिमझिम सरीत श्रावणाची सुरुवात झाली , 
दिव्याच्या अवसमुळे तेजोमय प्रकाशात एक प्रसन्नतेची हलकीशी लकेर उमटून गेली.....
श्रावणातल्या कालच्या पहिल्या शुक्रवारी गौराई येऊन बसली... जिवतीच्या गोष्टीसंगे मुलाबाळांना उदंड आयुष्य देऊ केली  ....

  आज भावाचा उपवास  भाजणीचे थालीपीठ त्यासोबत वाटलेल्या डाळीची उसळ ,  नागोबाची पूजा दूध ,लाह्या आमच्या आईसाहेब अगदी यथासांग पूजा करून घेत आम्हा दोघी बहिणींकडुन , म्हणजे कोणतीही पूजा असो किंवा आणि काही प्रत्येक गोष्टीत perfection हवेच त्याचा आता खूप उपयोग होतोय म्हणा कुठे अडत नाहीय ,, पण खरेच हे करताना  खूप मज्जा असायची आणि यायची पण ,
   दुपारच्या वेळेला कुणी झोपाळा बांधला का हे बघायला जायचे ,हा माझा सगळ्यात आवडीचा छंद तासनतास झोपाळ्यावर डुलत तर कधी एखादे पुस्तक घेऊन  बसायचे ,  एका मोठ्या झाडाला बांधलेला झोपाळा , खूप मोठी जाड रस्सी त्याला खाली लाकडाची फळी लावून तयार केला असायचा ( त्याला काहीतरी नाव आहे मला आता नाही आठवत )  पण तो इतका उंच जायचा ना खुप भारी वाटायचे तेव्हा , आमच्या पेक्षा मोठ्या ताया ,काकू तर दोघी दोघी उभा राहून मोठे झोके घ्यायच्या , आम्ही आपले खाली उभे कधी आमचा नंबर येतो हे बघत  ...

             संध्याकाळी अंबाबाईच्या मंदिरात सगळेजण जमायचे फुगड्या ,झिम्मा यांच्या गर्दीत मंदिराचा आवार गजबजून जायचा ,  माहेरी आलेल्या ताया दीदीच्या  भेटीही मंदिरातच रंगायच्या , एखादी पावसाची सर यायची पण त्यातहि सगळे खेळातच गुंग असायचे पाऊसही अगदी हलकेच यायचा सोबत करायला , कदाचित सासुरवाशिणीचे अश्रू पुसायला ,,
     पण सगळ्यालाच एक वेगळा रंग होता कदचित तोच या श्रावणाचा संग असावा

No comments:

Post a Comment