Tuesday, June 28, 2016

एक आजी इकडची आणि तिकडची




                          भारतातून अमेरिकेत येऊन आजीला ३-४ महिने झाले होते , आजीच्या स्वभावामुळे शेजारच्या जेनी आजीशी लगेच तिची गट्टी जमली . जेनी आजीला पण बोलायला खूप आवडायचे , आम्ही तिच्या घराशेजारी राहायला जायच्या आधीही तिथे एक भारतातीलच कुटुंब होते त्यांच्यामुळे आजीला थोडे थोडे हिंदी यायचे  . माझी आजी शुद्ध मराठी बोलणारी पण इतक्या लांब येऊन मैत्रीण मिळत आहे बघून तीही जेनी आजीशी  तोडके मोडके मराठी मिश्रित हिंदी बोलायची . दोघींचे बोलणे ऐकून बाकींच्याची छान करमणूक व्हायची .

जेनी आजी रोज सकाळी लवकर उठून  ताजा ब्रेड आणि भाजी आणायला बस मधून जात असे ,  तसे म्हणले तरी तिचे वय सत्तरीच्या पुढे असेल पण तिच्याकडे बघून अजिबात तसे वाटत नव्हते .  रोज ताजा मल्टिग्रेन ब्रेड , भाज्या , दूध यामुळे मी इतकी फ्रेश असते असे तीच म्हणत असे . तिच्या गोऱ्या लालसर गालावरच्या  सुरकुत्या ती हसल्यावर आणखीच गोड दिसत . कधी कधी ती माझ्या आजीलाही सोबत घेऊन जात असे आणि माझी आजी म्हणजे सगळे गूगल तिच्या सगळ्या घरादाराची माहिती हिला एका आठवड्यात कळाली . 
                        इतके दिवस आम्हाला माहीतही नव्हते की जेनी  आजीला दोन मुले आणि एक मुलगी आहे सगळे इथेच रहातात पण जरा दूर आहेत , कधी कधी ते येत असतात कधी आजी  तिकडे जात असते . 
तसे मुले असून एकटेच राहणे इकडे काही फार मोठी गोष्ट नाही. पण तरीही लहानपणापासून तसे संस्कार असलेल्या मनाला थोडे खटकतेच . 
उन्हाळा सुरू झाल्यावर तर या दोन मैत्रिणीचे संध्याकाळी फिरायला जाण्याचे प्लॅन बनू लागले , दोघी निवांत भटकून येत असत आणि जेनी आजीला सगळी माहिती होती त्यामुळे काळजीचे काही कारण नव्हते . 
ती आजीला इकडच्या रितीभाती सांगत असे तर आजी तिच्या ... 
माझ्या आजीने जेव्हा जेनी आजीला सांगितले की तिचे लग्न ती फक्त १५ वर्षाची असताना झाले होते तेव्हा तिला खूपच धक्का बसला होता . मग काय आजीने कॅसेट सुरू केली कशी तिची सासू होती , एकत्र कुटुंब , सगळ्याची खाणीपिणी आवड निवड .....  ती आज ती कशी आहे यावर येऊन संपली . 
जेनी आजीही काही कमीची नाही तिनेही तिचे बॉयफ्रेंड कसे होते परत तिचे लग्न कसे झाले हे सांगितले  अशाच त्यांच्या गप्पा नेहमी रंगलेल्या असत . दोघीनांही एकमेकींची खुप सवय झाली होती पण आता आजीला भारतात परत जावे लागणार होते त्यामुळे होता होईल तेव्हढा वेळ त्या दोघी एकत्रच  घालवत . 
जेनी आजीला माझ्या आजीचे खूप कौतुक वाटत असे  , ती तिच्या मुलांबरोबर राहते , सगळे गुण्यागोविंदाने राहतात . मुले आपल्या आईचा ,नातवंडे आजीचा मान ठेवतात . हे सगळे तिने आजीला एकदा बोलूनही दाखवले .
                त्यावेळी माझी आजी म्हणाली अग बाई दिसते तसे नसते , आता माझ्या पूर्वपुण्याईने म्हण किंवा आणी काही म्हण निघाली माझी मुल चांगली , ती आपल्या आई वडिलांचा मान  ठेवतात पण सगळीकडे असे आहेच असे नाही  . आमच्या इथेही  कमी वृद्धाश्रम  नाहीत , मुलांचे सुनेचे पटत नाही म्हणून वेगळे राहावे लागणारेही आहेतच  पण टाळी कधी एका हाताने वाजत नाही ना ग !!!!
 जेनी आजी म्हणाली , असेलही असे पण आमच्या इथे मुलांना लहानपणापासूनच स्वतंत्र आयुष्य जगायची मुभा दिली जाते त्याची स्पेस जपली जाते , पण इथे आम्हीच कुठेतरी कमी पडतोय ग असे वाटते पुढे जाऊन ....... संपूर्ण आयुष्य स्वतःच्या विचारानुसार घालवलेले असते पण कधी तरी यावेळी एकटी असे बसले असताना कुणाची तरी सोबत असावी असे मनापासून वाटते . 
 
मला वाटत होते की तुझे आयुष्य माझ्यापेक्षा किती सुरेख आहे कसली चिंता नाही फक्त आपण आणि आपले आयुष्य जगायचे , कुणी अडवणूक करायला नाही की विचारायला नाही  की ,  तुम्ही असे का करता ? इतका पैसा या वयात कशाला लागतो तुम्हाला ? आधी  सासरचे परत मुलांना शिंगे फुटली की ती !! सगळे त्यांच्या म्हणण्यानुसार जगायचे यात आपल्यासाठी म्हणून असा वेळच नाही कधी मिळाला ..... आजी बोलत असताना जेनी आजी मध्येच म्हणाली ,  हो खूप घेतला वेळ स्वतः साठी पण जेव्हा कधी अशी तुमच्या लोकांची एकत्र आई बाबा मुले आजी आजोबा अशी फॅमिली पहिली की वाटते आपण कधी का नाही बसू शकलो या फ्रेम मध्ये ?  लहानपणापासून आम्ही जे पाहिले तेच केले .. कधी आम्ही मुलांना वेळ दिला नाही की मुलांनी आम्हाला ... 

जेनी , आमच्यातही असेच आहे ग लहानपणापासूनचे संस्कार जे आमच्या आई बापाने केले तेच आम्ही करत आहोत तेच चूल मुलं , रांधा वाढा ... सणवार ... मुली सुनांचे बाळंतपण .... सगळ्यांचे केले पण ....... !!!!
पण हा  असतोच ग शेवटी कुठे ना कुठे  ... नाहीतरी म्हणलेलेच आहे  , " जगी सर्वसुखी असा कोण आहे , विचारे मना शोधूनि पाहे ! "
जेनी आजीला काही कळाले की नाही ते माहीत नाही पण तिने मान डोलावली आणि हलकेच डोळे टिपले आणि आजीनेही ... !!!

 


 
 

No comments:

Post a Comment