Wednesday, June 22, 2016

हुरहूर

आज ती ऑफिसमधून नेहमीपेक्षा जरा लवकरच आली , नुकताच पाऊस पडून गेला होता आकाश सगळे मोकळे होऊन मावळतीला जाणारा सूर्य त्याचे लाल ,केशरी रंग उधळत होता . हवेत थोडासा गारवा होताच हातात चहाचा काप घेऊन ती बाल्कनीत आली आणि त्या अस्ताला जाणाऱ्या लाल गोळ्याकडे पाहून तिच्या मनातील हुरहूर वाढू लागली ....
" का दिसला आज अचानक तो मला ? किती विसरायचा प्रयत्न करत होते मी त्याला ? आता कुठे त्याच्या शिवाय जगायची सवय होत होती आणि आज अचानक परत तो दिसावा ? "
त्याची आठवण नकोच म्हणून ती अशा या कातरवेळी कधीच एकटी राहत नसे , ती एकटी असली की  त्या दोघांनी एकत्र घालवलेल्या सायंकाळ , त्यांची ती स्वप्ने , सगळ्या सगळ्या गोष्टी तिच्या नजरेसमोरून अगदी सिनेमा सारख्या भरभर पळत .... 

 कॉलेजच्या शेवटच्या वर्षी हिच्या बाबांची अचानक बदली होऊन ते सगळे पुण्यात रहायला आले , अचानक तिचे सगळे विश्वच बदलले .. तिला एकटीला ठेवायची तिच्या बाबांची तयारी नव्हती त्यामुळे नाईलाजाने तिलाही सगळे सोडून यावे लागले होते , पण या नवीन कॉलेजमध्येही तिला खूप नवनवीन मित्र मैत्रणी मिळाले मुळातच ती खूप बोलकी तिचे सूर कुणाशीही पटकन जुळायचे . 
    यावेळी कॉलेज गॅदरिंग मध्ये तिने नाटकात भाग घेतला होता त्यांचे रोमँटिक नाटक  यात तो रोमिओ आणि ती ज्युलिएट इथूनच त्यांची खरी कहाणी सुरू झाली . नाटक करता करता कधी खऱ्या आयुष्यात ते एकमेकांचे रोमिओ ज्युलिएट बनले हे त्यांच्याही लक्षात नाही आले . नाटक प्रॅक्टिस करताना कधी कधी खूप उशीर होई त्यावेळी तो  तिला घरी सोडायला जाई , तिच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीही त्याच्या पटकन लक्षात येई त्याने त्यावर काही दाद दिली की हिने गोड स्माईल द्यावी .... 
असे हे चंदेरी दिवस पटकन सरतात तसेच झाले कॉलेजचे शेवटचे वर्ष संपले , दोघेही नोकरीच्या मागे लागली एकाच कंपनीत नसली तरी दोघानांही लवकरच चांगली नोकरी मिळाली .. रोज संध्याकाळी एकत्र भेटायचे टेकडीवर फिरायला जायचे मावळत्याला स्मरून खूप स्वप्ने रचायची आणि त्या स्वप्नांच्या इमल्यातूनच घरी परतायचे हेच त्यांचे रोजचे रुटीन .... 
तिच्या घरी याच्याबद्दल सगळे माहीत होते आणि तिच्या घरच्यांनाही काही अडचण नव्हती .. पण त्याच्या घरी अजून काहीच सांगितले नाही ... तसे म्हणायला त्याच्या आईला थोडी कुणकुण लागली होतीच पण तिने काही त्याला विचारले नव्हते .... त्याच्या बाबांना बिझनेस मधून सवड मिळेल तेव्हा खरे !! पण त्याच्या घरचे वातावरण जरा कडकच म्हणूनच तो सांगायला बिचकत होता ...... 
एक दिवस अचानक काय झाले माहीत नाही पण तो परदेशी उडून गेला हिला एकटीलाच मागे ठेवून काही न सांगता , काही न बोलता .... हिच्या मनाचा जराही विचार त्याने केला नाही ... मागे ही एकटीच सैरभैर झालेली....  कधी कधी टेकडीवर जाऊन बसे त्याच्या आठवणी काढत ,, 
किती दिवस ? किती रात्री ? शेवटी एके दिवशी तिने ठरवले आता जगायचे ते फक्त स्वतःसाठी आपल्या आई बाबांसाठी !!!!  आता कुठेतरी सगळे नीट होत होते आणि तो असा समोर अचानक !!!!
फोनचा आवाज ऐकून ती  तंद्रीतून बाहेर आली  रात्रीचे आठ वाजले होते हातातल्या कपात चहा तसाच होता  
त्याचाच फोन होता ... घेऊ का नको या विचारात असताना कधी कॉल रिसिव्ह झाला तिला समजेलच नाही 
 तो ........ 
ती .... 
अग बोल ना !
कॉल तू  केला आहेस तू बोल !!!
ऑफिस झाल्यावर भेटशील का मग बोलू ? 
तिच्या मनात नसतानाही तिच्या ओठांनी हो उत्तर दिले .... 
 आता वाट पाहायची ती उद्या संध्याकाळची ..... 
ऑफिसचा  तिचा दिवस लवकर संपेना तो काय सांगेल ? का माफी मागेल ? अजूनही त्याचे माझ्यावर तितकेच प्रेम असेल ? एक ना अनेक विचारांनी तिचे डोके भरून गेले होते . 
 शेवटी ते दोघे जिथे भेटायचे तिथे येऊन भेटले आणि आधीच्या त्यांच्या जागेवर जाऊन बसले ... आजही वातावरण तसेच होते मंद वारा , समोर तो लालबुंद गोळा , आजू बाजूला फिरायला येणारी माणसे ..... फक्त फरक होता तो त्यांच्या शांततेत .... नेहमी त्यांना हवी असणारी शांतात असायची त्यांच्यात पण आज असणारी ती वेगळीच होती .... 
त्यानेच विचारलॆ कशी आहेस ? 
बरी !!! एका शब्दात उत्तर .....  
मला माहीत आहे की तू माझ्यावर नाराज आहेस ते !! पण त्यावेळी माझा नाईलाज होता मला तसे वागावे लागले ... 
ह्म्म्म!!!! तिची नजर शून्यात होती ...
अग काहीतरी बोल ना ! तुला रागवायचे असेल तर रागाव ओरड माझ्यावर पण अशी शांत नको राहू ... 
ज्यावेळी मला खूप बोलायचे होते त्यावेळी  तू सोबत नव्हातास ,, ज्यावेळी खूप खूप ओरडायचे होते  रागावयाचे होते त्यावेळी मला आधार द्यायला तुझे खांदे नव्हते ... का ओरडू आता मी तुझ्यावर ? कशासाठी ?
तो .....  मला मान्य आहे ग !!! पण त्यावेळी बाबांनी मला अचानक परदेशी पाठवले , तुझ्याशी कोणताही संबंध नाही ठेवायचा असे सांगितले ... मी त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला पण ते काहीच ऐकत नाहीत हे पाहून मी हो म्हणालो आणि गेलो निघून मला वाटले थोड्या दिवसाने मी त्यांना समजावले तर ऐकतील माझे तिकडे असतानाही मी त्यांना खूप समजावत होतो पण काहीच फरक पडत नव्हता ... इतके दिवस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राहून त्याचे मन जिंकायचा प्रयत्न केला पण ते काही होईना म्हणून इकडे निघून आलो .... 

तुझे सगळे म्हणणे ठीक रे पण यात माझा विचार केलास का तू ? तुला वाटले गेलास सोडून तुला वाटले आलास परत ? यात मी आहे  का कुठे ? कधी एखादा फोन मेसेज मेल तरी करायचा ना मला ?
खूपवेळा वाटले ग  तुला फोन करावा पण काय करू धीरच होत नव्हता मला कसे बोलू तुझ्याशी नि काय बोलू ? आजही खूप हिम्मत करून आलो मान्य मला मी चुकलोय पण तू घेशील का मला समजावून ? 
ती ...... 
अग बोल ना काहीतरी ....  
मला खूप वाटतंय रे घ्यावे तुला समजावून , तुझ्या सगळ्या चुका माफ कराव्यात आणि एक नवीन आयुष्य सुरू करावे ... पण ...... 
तो पण  ...... ?? काय ... ? 
पण ते सारे इतके सोपे असते का ? या आठवणी पुसणे खरेच सोपे असते का ? आज हो उद्या नाही ? म्हणाले असते  तुला हो पण मी तिथून खूप पुढे आलीय .... खरेच तू सोडून गेलास याचे दुःख झाले मला , खूप रडले ,,, स्वतः बरोबर झगडलेही कधी कधी वाटलेही स्वतःला संपवून टाकावे ... पण परत खूप धीराने उभे केले आहे रे स्वतःला आता तिथून मला परत नाही जायचे मागे ...  परत कोसळले तर उभी राहीन याची खात्रीच नाही मला !! आज तू माफ कर मला ..... 
समोर सूर्य पूर्ण बुडाला होता तिची कातरवेळही संपत आली होती आणि आणि आता तिला याची कधी  हुरहूरही राहणार नव्हती आता कसे सगळे स्वच्छ झाले होते निरभ्र .....  



No comments:

Post a Comment