Thursday, October 6, 2016

अबोली

अबोलीने इंजिनीरिंगची परीक्षा  नुकतीच पास केली आणि ती स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून पुण्यात आली .. पुण्यात एका हॉस्टेलमध्ये राहून ती कुठे एखादा पार्टटाइम जॉब मिळतो का हेही शोधत होती ..
मध्यमवर्गीय घरातील मुलगी ,तिच्यामागे अजून एक बहीण आणि भाऊ होता . आणखी घरच्यावर भार न होता तिला आपले करियर घडवायचे होते . 
अबोलीचे आई बाबा तिच्यापाठी नेहमीच होते , पण वयात आलेल्या मुलीची जशी सगळ्या पालकांना काळजी असते तशी त्यांनाही होती . अबोलीचा मामा तिच्यासाठी एक स्थळ घेऊन आला होता . मुलाचे शिक्षण अबोलीपेक्षा कमी होते पण घरची परिस्थिती उत्तम होती .. मामाच्या आग्रहामुळे अबोलीच्या घरच्यांनी बघण्याचा कार्यक्रम ठरवला आणि रीतसर तो पारही पडला .  तिच्या लग्नामुळे नाही म्हणले तरी आई वडिलांवरचा भार थोडासा का होईना पण कमी तर नक्कीच होणार होता त्यामुळे अबोलीच्या मनाची चलबिचलता होत होती ... ते आई बाबानी ओळखले आणि तिला सांगितले , 
" हे बघ बेटा , हे तुझे पहिलेच स्थळ आहे,  त्यामुळे आपण अजून मुले पाहू तुला याच मुलाशी लग्न करायला हवे असे काही  नाही " तिलाही ते पटले आणि ती परत पुण्याला निघून गेली . 
एक दिवस सकाळी क्लासला  जाताना एक मुलगा तिला तिथे बाहेर दिसला , ती जशी जवळ जाऊ लागली तशी तिची खात्री पटली अरे हा तर तोच , त्या दिवशी मला पाहायला आलेला राहुल !!!!"  हा इथे कसा ? "
स्वतःच्या मनातच विचार करत ती पुढे जात होती तर , राहुलने तिला थांबवले आणि तिला विचारू लागला 
," तू मला नाही का म्हणाली ? मी तुझ्यापेक्षा कमी शिकलो होतो म्हणून का ? " यावर तिला काय उत्तर द्यावे ते  समजेना तो तिला खूपच दमदाटी करू लागला , रस्त्यात तमाशा नको म्हणून तिने त्याला काहीतरी सांगितले आणि तो तिथून निघून गेला .. कशीतरी अबोली क्लासमध्ये पोहचली . 
होस्टेलला परत जाताना हा तिथेच होस्टेलच्या बाहेर उभा !!! तिला परत तेच प्रश्न .. आणि यावेळी तर त्याने तिला स्पष्ट सांगितले , " तू मला खूप आवडली आहेस त्यामुळे तू लग्नाला तयार होईपर्यंत मी तुझा असाच पाठलाग करणार .. "
हे ऐकून तर अबोली रडायलाच लागली तिच्या मैत्रिणी तिला तिथून घेऊन गेल्या .. पण राहुल रोजच तिच्या क्लास बाहेर , होस्टेलबाहेर थांबून तिला त्रास देऊ लागला .. 
एक दिवस तर त्याने कहरच केला ती सुट्टीसाठी घरी गेली होती त्यावेळी तो तिच्या घरी गेला आणि  तिच्या आईबाबांना म्हणू लागला कि आज मी एक फ्लॅट घेतला आहे आणि त्याची पूजा अबोलीनेच केली पाहिजे आणि तिने तसे नाही केले तर पुढे जे काही होईल ते तुम्हाला खूप त्रासदायक ठरेल .. आणि त्यांच्या घरासमोरच बसून राहिला बराच वेळ झाला तरी तो तिथून जाईना , सगळे शेजारी पाजारी गोळा होऊ लागले .. सगळ्यांसमोर दंगा नको म्हणून अबोलीचे बाबा तिला त्याच्या नवीन फ्लॅटमध्ये घेऊन गेले तिने पूजा केली .. आणि ते परत घरी आले . 
यांनतर अबोली मात्र थोडी बदलली तिला असे वाटू लागले कि आपल्यावर इतके वेड्यासारखे प्रेम  कोण करू शकते ? या विचाराने एकीकडे ती सुखावत होती ,पण मनात तिला त्याची भीती वाटत होती .. 
यानंतर त्यांचे रोजच फोनवर बोलणे सुरु झाले , तीही त्याला भेटायला जाऊ लागली .. कुणाशी तरी लग्न करायचे हा आपल्यावर  इतके प्रेम करतो मग यांच्यासोबतच का नको ? हा विचार तिने घरी सांगितला . 
तिचे बाबा तिला परोपरीने समजावत होते कि नीट विचार कर मग निर्णय घे , कोणतीही घाई नको करू .. पण अबोली काही ऐकूनच घेत नाही म्हणल्यावर तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न लावून दिले . 
अबोलीला पुढे शिकायचे होते म्हणून राहुलने तिला पुण्यात राहा म्हणून सांगितले तोही तिला भेटायला येत असे.... 
थोडे दिवस गेले आणि राहुलचे खरे रूप तिला समजायला लागले ..... 
ती क्लासमध्ये गेली कि हा तिच्या मागे जाणार , ती मुलीसोबत बसते का ते बघणार ? मुले मुली सोबत बसत असतील तर त्या क्लासमध्येच दंगा घालणार ... अबोली तर शरमेनेच मरून जायची पण त्याच्यासमोर बोलण्याची तिची हिम्मत नव्हती . 
रस्त्यावरून जाताना मैत्रिणीसोबत बोलायचे नाही हसायचे नाही ... तिने स्वतः हुन कुणालाही फोन करायचा नाही , त्याचा फोन आला कि तो पहिल्या रिंग मध्येच उचलायला हवा नाहीतर तिची काही खैर नाही .. वेगवेगळ्या प्रकारे तिला धाकात ठेवायचे त्याने सुरु केले होते ... त्याच्या आई वडिलांचा त्याला पाठिंबा होता !!
एक दिवस अबोलीच्या बाबांनी त्याला समजवायचा प्रयत्न केला तर , त्याने त्यांना स्पष्ट सांगितले कि आज पासून तुम्ही अबोलीशी बोलायचे नाही .. आणि अबोलीलाही बजावले ...
याघटनेनंतर अबोलीचे आई बाबा तिला घटस्फोट घे म्हणून मागे लागले तर त्याने  अबोलीला सांगितले कि जर तू असा विचार जरी केलास तरी तुझ्या बहिणीचे आयुष्य उध्वस्त करेन .. 
अबोलीची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती आपल्याच हाताने आपले मरण ओढवून घेतले असे तिला राहून राहून वाटे .. 
राहुलचे कुणीही मित्र मैत्रीण आले कि हिने तो सांगेल तितकेच त्यांच्याशी बोलायचे ,, एक चालत बोलता कठपुतळी बनली होती तिची .. .. 
राहुलसोबतच ती त्याच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती त्यावेळी तिचा कुणीतरी एक मित्र तिथे आला होता तो अबोलीला पाहून तिच्याशी बोलायला आला ,, त्याला पाहून अबोली तिथून जात होती पण तो तिला हाक मारत आला हे पाहून राहुलला खूप राग आला त्याने तिथेच अबोलीच्या कानफटात मारली आणि त्या मित्राची कॉलर धरून त्याला मारू लागला ... तिथल्या लोकांनी राहुलला आवरले नाहीतर तो बिचारा तिथेच मेला असता ... 
एका वर्षात अबोलीला त्याने तिचे जगणे नकोसे केले होते .. जिथे ती जाईल तिथे बंधने ... !!! सगळे सोडून परतही जाऊ शकत नव्हती ... 
आणि शेवटी तिने निर्णय घेतला बस आता सगळे संपवायचेच ... 
पण त्यावेळीच तिला जाणीव झाली कि आता जगायला हवे सगळे संपवून नाही चालणार ... या छोट्या जीवासाठी तरी जगायला हवे ... 
इतकी गोड़ बातमी मिळूनही राहुलच्या वागण्यात तसूभरही फरक पडला नाही त्याला आणखीन एक नवीन विषयच मिळाला बोलायला .. त्याला तिच्या पोटातले बाळ कधीच त्याचे वाटले नाही .. 
यानंतर मात्र अबोलीचा संयम सुटला ... आणि ती राहुलाला बोलू लागली .,, इतके दिवसाचा राग , त्रास मनातील कोंडमारा सगळा बाहेर पडत होता ... पण याचा त्रास झाला तो त्या बाळाला आणि कळी जन्माला येण्याआधीच कोमेजून गेली .. 
हा आघात अबोलीसाठी खूप मोठा होता यात ती स्वतःला हरवत गेली ती कायमचीच ..... 





No comments:

Post a Comment