Thursday, October 13, 2016

शेजारी शेजारी

आमच्या घराशेजारी एक काका काकू राहतात , म्हणजे  ज्यावेळी आम्ही आमचे मूळगाव सोडून कवठेमहांकाळला राहायला आलो त्यावेळी आम्ही त्यांच्या तिथे राहायला आलो  . मी  ३ वर्षाची असेन . 
त्यावेळी पासून हे काका काकू आमच्या ओळखीचे , शेजारचे आणि हळूहळू जशी  रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती जवळ होत जातात तसेच त्यांचे आणि आमचे सूर जुळत गेले .. 
आम्ही राहायला जाण्याआधी नुकतेच त्यांचे लग्न झाले होते , काकूही नवीन होत्या त्यांच्यासाठी ते सासर होते त्यामुळे कधी काही वाटले कि आईशी येऊन बोलत , त्यांचेही मन हलके व्हायचे तेवढाच त्यांना मोकळेपणा मिळत असे . 
 ते आणि आम्ही जास्त काही नाही पण ३-४ वर्ष त्याच गल्लीत एकत्र होतो परत आमचे स्वतःचे घर झाले आणि आम्ही थोडे दूर आलो त्या गल्लीपासून फार नाही पण ५-१० मिनिटाच्या अंतरावर ... 
फक्त घर दूर झाली मने नाही ... त्यामुळे येणे जाणे चालूच होते . 
पुढे काका काकू वेगळे राहायला लागले त्यांनाही दोन मुले झाली ,,, एका मोठ्या घरातून फक्त एका खोलीच्या घरात त्यांना संसार करावा लागत होता .. पण त्यातही ते इतके सुखी आणि आनंदाने राहत होते ,, कधीच त्यांनी कोणत्याही गोष्टीची  तक्रार नाही केली .. जे आहे त्यात समाधान मानले .. 
त्यात त्या दोघांचे शिक्षण फार नाही त्यामुळे कायमस्वरूपी अशी नोकरी नाहीच ,,काका  सारखे काही ना काही नवीन उदयॊग करत पण त्यातही यश असे नाहीच .. काकूही  जमेल तसे शेतात , कधी कुठे मिळतील ती कामे करत त्यांच्या संसाराला हातभार लावत .. विशेष म्हणजे त्यांची परिस्थिती नसून सुद्धा ते सगळ्याना इतकी मदत करतात आणि त्याचा कधीही कांगावा करत नाहीत ,, कधीही जा त्यांच्याकडे नेहमी हसतमुख मिळतील , 
आपल्या दुःखाचे कधीच भांडवल करणार नाहीत ... 
काकू अळूवड्या खूप छान करतात , आणि आमच्या घरी तर खूप फेमस आहेत त्यामुळे आमच्या तिघांपैकी कुणीजरी घरी गेले तरी वड्या घेऊन त्या स्वतः येतात अगदी न सांगता .. आईला जरा जरी बरे नसले कि नेहमी मदतीला असतात .. त्यांना कधीच काही बोलावे नाही लागत ... एखादी गोष्ट आपण कुणालातरी अधिकारवाणीने सांगू शकतो त्यातले हे कुटुंब आहे ... 
चांगले शेजारी मिळायलाही नशीब लागते ,, फक्त एक हाक मारली तर धावून येईल इतकी जवळची माणसे ,, मी आईला खूप वेळा विचारले कि हे दोघे आपल्यासाठी इतके का करतात ?  त्यांच्यासाठी आपण  खास असे काहीच केले नाही  तरीही  ?? फक्त वेळोवेळी त्यांच्या साथीला उभे राहतो इतकेच !!!!! 
"आपले बोलणे गोड़ , मन शुद्ध ,चांगले असले कि सगळे आपोआप होते आपण काहीच करावे लागत नाही " आमच्या आईचे उत्तर !!! 
खरेच ना काही नाती मनाने किती घट्ट जोडली जातात कळतच नाही ... कधी केव्हा कशी ???
आजही नियती त्यांची परीक्षा घेतच आहे पण तरीही ते ठामपणाने तिच्यासमोर उभे आहेत आणि नेहमीच राहतील ... 


No comments:

Post a Comment