Wednesday, May 18, 2016

मेस काकू

" काय ओ काकू ,मी तुम्हाला नेहमी आठवण करून देते माझा गुरुवार आहे म्हणून  एखाद्यावेळी मी विसरले तर इतके काय ओरडता मला ? "
माझ्या डोक्यात नाही राहत बाई ! कितीजणी तुम्ही मेसला प्रत्येकीचे वेग वेगळे नखरे मी कुणाचे म्हणून आणि काय काय लक्षात ठेवायचे ?  असा संवाद मी आणि आमच्या मेसच्या काकू आमच्यात महिन्यातून एखाद्यातरी गुरुवारी रंगायचाच . 
 मी  आदल्या दिवशी उद्या खिचडी म्हणून आठवण करून द्यायला विसरले कि ,  समजायचे उद्या रामायण…
आमच्या रुमच्या मागे  दोन खोल्यांचे एक छोटे कौलारू घर होते तिथे काकू त्यांच्या छोट्या मुला सोबत राहत . गळ्यात एक छोटी चेन , हातात  २-३ काचेच्या बांगड्या , कपाळावर एक नाजूक अशी उभी टिकली आणि थोडासा फुगवटा करून घातलेली केसांची वेणी  , जर घरातून बाहेर  जाणार असेल तर दोन्ही खांद्यावर पदर असे रूप काकुंचे , त्यांचा मुलगा ८-९ वर्षाचा असेल अल्लड , थोडासा हट्टी आणि  नेहमी आमच्यासोबत वाद घालयला तयार  अशा आवेशात  त्याच्या वयाला शोभेल असाच होता तो  !!!
आम्ही तिथे रहायला गेलो आणि त्याच वर्षी काकुनी नवीन मेस चालू केली ,  आम्ही सगळ्याच दहा -पंधरा जणी त्यांच्याकडेच जेवायला , प्रत्येक सेमला नवी मेस हे आमचे ब्रीदवाक्य असल्यासारखेच आम्ही मेस बदलत असू  अपवाद फक्त या काकूंच्या मेसचा तिथे जास्त दिवस आम्ही टिकलो कदाचित नवीन मेस , थोडीफार घरगुती जेवणासारखी चव , आणि त्या नवीन असल्यामुळे आमचे नखरेही चालवून घायच्या पहिले पहिले … कधी कधी सकाळी , संध्याकाळी  पोहे , उप्पीट , चहा  असे कधी ऐनवेळी सांगितले कि आधी त्यांचा दंगा  मग  अगदी मी आहे म्हणूनच तुम्ही खाताय असा चेहरा करून आम्हाला खायला  करून द्यायच्या .

एक दिवस मला बरे वाटत नव्हते म्हणून मी रुममध्येच थांबले होते  त्यावेळी कधी नाही ते त्यांच्या घरातून मोठ्याने बोलण्याचा आवज येत होता , खरे तर त्यांचा इतिहास आम्हाला तसा काहीच माहित नव्हता आणि आम्ह्लाही कधी तो जाणून घ्यायची गरज पडली नाही . मलाही कळेना जेवायला जाऊ कि नको थोड्यावेळाने आवाजही कमी झाला  मग काकुनीच बोलावले जेवायला .  मीही एकटीच होते त्यांचा मुलगा शाळेत गेला होता  त्यामुळे रात्रीच्या जेवणाची तयारी करत त्याही माझ्यासमोरच बसल्या .
मी असे कधी एकटी त्यांच्याकडे जेवण्याची वेळच आली नव्हती त्यामुळे मलाही थोडे अवघडल्या सारखेच झाले होते . पण त्यांनीच बोलायला सुरुवात केली .
श्वेता , अठराव्या वर्षी लग्न झाले माझे माझा नवरा एका गाडीवर ड्रायव्हर होता , शेती होती  घर भरलेले म्हणून  आई वडिलांनी लग्न करून दिले त्यानंतर  दोन वर्षांनी हा एक पोरगा झाला , अवघा  ८-९ महिन्याचा असताना याचा बाप एका अपघातात गेला , तो गेल्यावर सासरच्यांनी घरात राहून दिले नाही बाहेर काढले , माहेर गेले पण तिथे तरी किती दिवस राहणार ?  भावांच्या बायकांना मी जड झाले ,  आपला बोजा त्यांच्यावर नको म्हणून एका दुकानात नोकरी करू लागले , तर पोरग एकटे घरी  ,माझ्यामुळे माझ्या आई बापाला  म्हातारपणात त्रास देऊ लागल्या . तिथले काम सोडून इथे येउन राहिले पहिला पहिला एकटी बाई म्हणून घर मिळेना कसेतरी एक खोली मिळवली , एका कपड्याच्या दुकानात नोकरी मिळाली पहिला पोराला घेऊन जात होते ,परत त्या मालकाने सांगितल्यावर त्याला तिथल्याच एका अंगणवाडीत बसवू लागले . त्या बाईने ऐकले म्हणून झाल हे नाहीतर सगळी परिस्थिती अवघडच होती ,  पण या कामामुळे पोराकडे लक्ष द्यायला वेळ मिळेना , हातातून जावू नये यासाठी घरीच राहून काही करता येईल का बघत होते . पण आता होते तिथे काही करणे शक्य नाही म्हणून ओळखीने इकडची जागा मिळवली आणि आता या नव्या जागेत मेस सुरु केली , आता कुठे याचा जम बसायला लागला तोच , माझ्या सासरच्या लोकांचा मान  वर उफाळून आला  , हे असले उद्योग आमच्यात कुणी करत नाही म्हणून लागले सुनवायला , आमची अब्रू वेशीवर टांगायला निघाली वाटेल ते तोंडाला येईल ते बोलतात , तशी मी आहे ग खमकी पण कधी कधी नाही सहन होत , काय माहिती कधी पर्यंत जगते ते ? पोराला शिकून मोठे करायचे  इतकेच डोळ्यासमोर आहे तोपर्यंत टिकले तरी बास !!! असे म्हणेपर्यंत त्यांचे डोळे पाण्याने डबडबले .
 मलाही काय बोलावे समजेना तसाच हात घेऊन बसले होते , परत काकूच म्हणाल्या तुला काय वाटते ग काय असेल माझे वय ?  त्यांच्याकडे पाहून तरी आम्हाला सगळ्यांनाच त्या ४०-४५च्या वाटायच्या , पण त्या फक्त तिशीत होत्या हे ऐकून मला धक्काच बसला कारण खरेच काकूंकडे पाहून असे बिलकुल वाटत नव्हते कि त्या इतक्या लहान असतील आमच्या सगळ्यांपेक्षा ८-१० वर्षांनी मोठ्या !!!
परिस्थितीमुळे आलेले अकाली प्रौढत्व , त्या चेहऱ्या वरच्या सुरकुत्या , आणि डोळ्यातील करुणा  माणसाचे रुपडेच बदलून टाकते  याचे मूर्तिमंत उदाहरण होते .
त्या कधी खूप चिडायच्या , ओरडायच्या आम्हाला याचा खूप राग यायचा पण त्यामागे अशी कहाणी असेल असे कधी वाटले नव्हते ते कळाले तेव्हा सगळ्यांनाच खूप वाईट वाटले .
 आम्ही त्या ठिकाणाहून परत दुसरीकडे राहायला गेलो त्यामुळे त्या काकूंची मेस बंद केली ,
परत कधी संपर्कच नाही माहित नाही त्या कशा असतील ?
पण काही माणसे खरेच मनात राहतात  ……




Saturday, May 14, 2016

अबोल प्रीती

" मुग्धा , आहेस का ग घरी ?"  असे म्हणत शेजारच्या आजी त्यांच्या घराच्या पायरीवर येउन बसल्या .
 मुग्धा बाहेर आली ,  तिलाही रोजची सवय होती आजींची , संध्याकाळी तिची काकू बाहेर फिरायला जाई त्यावेळी आजी खास मुग्धाला भेटायला यायच्या हे तिला माहित होते . आजी आल्या कि तिलाही कुणीतरी आपले भेटल्या सारखे वाटे.
आजींनी  तिच्यासाठी कुंद्याची फुले आणली होती  तुला आवडतात ना  म्हणून खास तुझ्यासाठी काढून ठेवली होती , मुग्धाकडे फुले देत आजी बोलल्या .
कुंद्याचा वास घेताना मुग्धाला आईची आठवण आली आपण लहान होतो त्यावेळी आई नेहमी गजरा करून देत असे . मुग्धाचे डोळे आईच्या आठवणीने भरून आले . किती दिवस झाले तिला भेटून ?
तिच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून  आजीनी विचारले , का ग ? काय झाले ?
 तसे मुग्धा स्वतःला सावरत म्हणाली काही नाही सहजच असे म्हणत आत गेली , आजींसाठी तिने चहा ठेवला, स्वतःच्या विचारात  गुंगली .
  लहानपणापासून आई बाबांची लाडकी मुग्धा, शेजारीही खूप लाडकी होती . शाळेतही तिचा नेहमी पहिला नंबर असे  त्यामुळेच तिला पुढे खूप शिकवायची तिच्या  आई बाबांची इच्छा  होती , पण जिथे ती राहत होती तिथे चौथी पर्यंत शाळा होती , त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी तिला बाहेर जावे लागणार होते .  तिच्या घरी  पुढे शिक्षण कुठे सुरु ठेवावे याची चर्चा चालू असे , त्यावेळीच तिची काकू सुट्टीसाठी म्हणून गावी आली होती , काकूने हे ऐकताच ती मुग्धाच्या आईला म्हणाली , राहील मुग्धा आमच्या कडे , एकट्या मुलीला बाहेर ठेवण्यापेक्षा हे बरे नाही का ?
खरे तर त्यावेळी सगळ्यांचीच मनस्थिती  द्विधा होती  पण काकू स्वतः हून म्हणत आहे म्हणल्यावर आई बाबा तयार झाले मुग्धाला त्यांच्याकडे ठेवायला .
 काकुसोबतच मुग्धा शहरात आली , काकूला दोन मुले होती पण ती मुग्धापेक्षा लहान होती . मुग्धाची शाळा सुरु झाली  त्यासोबत तिची जबाबदारही वाढली , काकू हळू हळू तिला कामे सांगू लागली , आधी फक्त काकुच्या मुलांचे खायला प्यायला बघणे , त्यांचा अभ्यास असे होते . मुग्धाही आनंदाने करत असे , पण एकदा काकुच्या मोठ्या मुलाला परीक्षेत कमी मार्क मिळाले तेव्हा काकूने केलेला रुद्र अवतार पाहून मुग्धा खूप घाबरली होती .
सगळी चूक तिचीच आहे , तिने अभ्यास करून घेतला नाही असे मत होते काकूचे !!! तिने सांगूनही काकू काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती त्याचे सगळे खापर मुग्धावारच फुटले .
 सुट्टीमध्ये मुग्धाला आपल्या आईला भेटायला मिळत नसे , कधीतरी काकुसोबतच गेली तर आणि तिच्यासोबतच परत , काकूने असा धाक घातला होता कि मनात असूनही ती आपल्या आईशी बोलू शकत नव्हती .
मुग्धा जशी मोठी होऊ लागली सगळी घरातली कामेही तिच्यावरच पडू लागली , तिची काकूही इतकी हुशार कि घराबाहेरची सगळी कामे ती स्वतः करेल पण  आत मध्ये मात्र मुग्धा !! पण त्यातूनही मुग्धाने तिचा अभ्यास सुरु ठेवला आणि नुकतीच बारावीची तिने  परीक्षा दिली होती .
  मुग्धा हे कुणालाच बोलत नसली तरी आजींना हे सगळे माहित होते , म्हणूनच मुग्धाबद्दल त्यांना खूप जिव्हाळा होता .
आतून काहीतरी करपल्याचा वास येऊ लागला म्हणून आजींनी  मुग्धाला हाक दिली , " मुग्धा ,अग काय करत आहेस ? कसला वास येतोय ? "
त्यांच्या आवजाने मुग्धा एकदम भानावर आली तर समोर चहा उकळून बाहेर पडू पाहत होता , आजीसाठी चहा  घेऊन ती बाहेर आली , त्यांनी आणलेल्या फुलांचा गजरा करत त्यांच्याजवळ बसली .
 मग मुग्धा बारावी होशील यावर्षी तू , पुढे काय करायचा विचार आहे तुझा ? आजी तिला विचारत होत्या .
 आजी , मला पुढे खूप शिकायचे आहे  आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे . पण  …….   ,,,
 असे म्हणत ती अडखळली .
काकूला जेव्हा ती असे म्हणाली होती त्यावेळी  काकूने खूप दंगा केला होता , पैसे कोण तुझे आई बाप देणार का ? म्हणे पुढे शिकायचे … जेव्हापासून पोरगीला शिकायला ठेवली तेव्हापासून जणू काही त्यांचा तुझ्याशी काही संबध नाही असेच वागत आहे कि , तू त्यांना नकोच होती म्हणूनच आमच्या गळ्यात मारली तुला …. असे एक न अनेक तिला ऐकून घ्यावे लागले होते .
पण खरे पाहता तसे काही नव्हते  काका काकू घरातले मोठे होते त्यामुळे घराचा सगळा कारभार या दोघांकडे असे , आणि म्हणूनच तिला व तिच्या आई बाबांना  त्यांचे ऐकावे लागे . हे कळण्या इतके मुग्धा आता नक्कीच मोठी होती ……
पण  ……  पुढे काय मुग्धा ? आजींनी तिला परत स्वप्नातून जागे केले .
 पण आजी आता निकाल लागला कि मगच ठरवेन पुढे शिकायचे कि नाही ते ? मुग्धा . 
 " का ग ? अचानक विचार बदलला तो ? " आजी .
नाही आजी आई बाबा आले होते ना परवा तेव्हा तेच म्हणत होते , कि माझे लग्नाचे वय झाले आता ……
 मुग्धा  आई बाबा म्हणतात ते सगळे ठीक आहे पण तुझे काय ते सांग ? आजी तर तिच्या मागेच लागल्या होत्या  त्यांना समजावे पर्यंत तिच्या नाकी नऊ आले . पण मुग्धाने काकूचे नावही तिच्या तोंडून घेतले नाही .
 खरे तर आजींना कौतुक वाटत होते  इतके सगळे होऊन हि मुग्धा आपल्याला काहीच सांगत नाही …
ती रडवेली झाली आजीनं समजावताना ….
 तेव्हा आजीनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या , मुग्धे तुझे आई बाबा आले होते ना  ते मला भेटायला आले होते , मीच त्यांना बोलावून घेतले होते .
मुग्धा अविश्वासाने आजींकडे पाहत होती…
 अग आमचा श्रीधर माहित आहे न तुला ?  , श्रीधर म्हणजे आजींच्या मुलीचा मुलगा  तो नेहमी सुट्टीत आजींकडे यायचा .  मुग्धाची आणि त्याची तशी थोडीफार ओळख होती .
 श्रीधरचे नाव ऐकताच मुग्धा गोड हसली . आजींनी ते ओळखले पण त्या पुढे म्हणाल्या
यावर्षी आमचा श्रीचे शिक्षण पूर्ण झाले , एक दोन वर्षात त्याचे सगळे बस्तानही बसेल  . मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला होता आणि त्याने मला तुझ्याबद्दल सांगितले ,  मी तर खूप आधी पासून ओळखत होते हे पण तो काही बोलत नाही म्हणून शांत होते . त्यानेच मला सांगितले तुझ्याशी बोलायला  म्हणून आधी तुझ्या आई बाबांशी बोलले , त्यांना काही अडचण नाहीय  … आणि मी मघाशी श्रीचे नाव घेताच तू जे गोड हसलीस त्यावरून तुझे विचारही कळले मला असे म्हणत आजी मिश्किल हसू लागल्या .
मुग्धा हसत हसतच एकदम गंभीर झाली .
आजी , आई बाबा अन मी ठीक आहे पण काका काकुना कोण समजावणार ?
 मुग्धा ,  अग मी आहे ना  , तुझ्या काकुपेक्षा नक्कीच चार पावसाळे जास्त पाहिलेत मी !  तिचे बघू आपण परत… !! असे म्हणत आजींनी शेवटची दोन फुले  गाठीच्या गजऱ्यात बांधली  , आणि तो गजरा मुग्धाच्या केसात माळला . आणि तिला विचारले
" जायचे मग श्री ला फोन करायला ?" आजी असे म्हणताच मुग्धा लाजून आत मध्ये पळून गेली .


Thursday, May 5, 2016

आता वाटली ना काळजी

आज  ऑफिसला जाण्यासाठी दोघांना गडबड होती म्हणून तो तिला म्हणाला कि आज डबा राहू दे बाहेरच खाऊ काहीतरी ! तसेही ती पण त्याच्या सोबत बाहेर पडत असल्यामुळे त्याला तिला त्रास द्यायला आवडायचे नाही पण त्याच्या साठी डबा बनवायला तिला खूप  आवडायचे , पण आज गडबडीमुळे दोघेही लवकर बाहेर पडले ,  त्याचे ऑफिस एकीकडे आणि तिचे एकीकडे त्यामुळे सोबत हि फक्त स्टेशन पर्यंत असे तिथून वेगळे रस्ते ..

 ती ऑफिसला पोहचली आणि त्याचा मेसेज आला, "reached n u ? " ती त्याला उत्तर देत होती तोच तिला client call आला त्यात ती बिझी झाली ,   मेसेज करायला विसरली . call झाल्यावर कोन्फारंस रूम मध्ये मीटिंग होती  त्यात ती तिचा मोबाईल डेस्क वरच विसरून गेली . आज अजून हि पोहचली कशी नाही म्हणून याने call  केला तर घेतलाच नाही म्हणून मेसेज केला r u der ? तरीही तिचा काही मेसेज नाही , आज त्या मीटिंग मध्ये तिला कळाले कि तिला ४ वाजता मीटिंग साठी client office   ला जावे लागेल  ,  तिला वाटले कि आता जेवण करून मगच डेस्कवर जावे तिने पटदिशी एक डोसा घेतला तो खात असतानाच  त्याला call करून सांगावे त्यावेळी तिच्या लक्षात आले कि आपण मोबाईल तर डेस्क वरच विसरून आलो ते  खाऊन  तिला डेस्कवर यायला २.३० वाजले आता आवरून निघाले तर वेळेत पोहचेन म्हणून तिने घाई घाईने डेस्क आवरायला घेतला ऑफिसच्या समोरच स्टेशन होते धावत पळत तिने ट्रेन पकडली आता पोहचेन वेळेत म्हणून  मोबाईल हातात घेतला  पण सगळ्या ट्रेन जमिनीखालून जात असल्याने नेटवर्क नाही आता पण call करू शकत नाही आता मात्र ट्रेन मधून बाहेर आले कि लगेच फोन करायला हवा सकाळपासून एकदाही बोलणे झाली नाही हे तिचे विचार ,,, तोपर्यंत त्याने हिला परत फोन केला तर आता तिचा फोन नेटवर्क मध्ये नाही असे सांगत होते त्यामुळे तर त्याला जास्तच काळजी  वाटू लागली तिला मेसेज करून ठेवले , तिच्या मैत्रिणीला फोन केला तर ती नेमकी आज सुट्टीवर , कुठे गेली असेल हि ? असे कधीच करत नाही ! काही अडचणीत असेल का ? असे एक न अनेक प्रश्न?  याचे कामात लक्ष लागेना झाले कदाचित घरी गेली असेल का ? असा विचार येउन त्याने आज घरी लवकर जायचे ठरवले  ….
 आजचा दिवस बहुदा तिचा नसावाच कारण ट्रेन लेट झाली त्यामुळे तिला client कडे पोहचायला लेट झाला गडबडीत तिने मीटिंग पूर्ण केली , तेव्हा घड्याळात ६. ३० झाले होते , तिने मोबाईल पहिला तर याचे २०-२५ misscall  आणि मेसेजस  ते पाहून हिने लगेच त्याला फोन केला तिचे नाव बघताच त्याने  झडप घालून फोन घेतला अग ए आहेस कुठे ? किती फोन किती मेसेज करायचे ? फोन वापरता येत नाही तर घ्यायचा कशाला ? तो तापलेलाच होता .
हिने शांतपणे सागितले कि पोहचते घरी मग बोलूच , हिच शांतपणा पाहून याला आणखीन राग आला पण हो म्हणून त्याने फोन ठेवला .
  एकतर आज खूप दमल्यामुळे हिची चिडचिड होत होती आणि घरी आल्यापासून त्याची धुसफूस ! ! तो काहीतरी बोलला ती आणखी चिडली आणि म्हणाली ,"मी काय लहान कुक्कुल बाळ आहे का ? कळत नाही का मला ? " याचा त्यालाही राग आला त्याने आत जाऊन जोरात बेडरूमचा दरवाजा आपटला आणि झोपला ,हिने पण जेमतेम आवराआवरी करून जाऊन झोपली . दोघेही जागे होते पण कुणीच बोलत नव्हते .
 सकाळी ती उठली तरी तो झोपलाच होता , तिला वाटत होते कि काल नाहीतर आपली चूक होतीच त्याला sorry म्हणायला हवे ! तो उठला कि पहिले काम तेच  असे म्हणून ती तिच्या कामाला लागली . तर हा पूर्ण तयार होऊनच बाहेर आला आज मला डबा  नको खातो बाहेरच , bye  म्हणून तो दाराकडे गेला ती काही बोलायच्या आधीच दार बंद झाल्याचा आवाज आला . मग तिनेही एक कॉफी करून घेतली आणि आवरून बाहेर पडली आज तिला कसेतरीच वाटत होते , ऑफिसमध्ये पोहचल्यावर तिने पहिला कि त्याचा मेसेज नाही आला म्हणून तिने पोहचले असा केला तर त्याला काहीच उत्तर नाही ,  बिझी असेल करेल परत या विचाराने ती कामाला लागली पण मेसेज टोन ऐकल्यावर लगेच बघत असे पण त्याचा नसला कि निराशा सगळी सकाळ यातच गेली तिने फोन केला तरी त्याने घेतला नाही .
आता १ वाजत आला त्याचा लंच टैम  म्हणून जेवण ? असा मेसेज केला तरी त्याने काहीच उत्तर पाठवले नाही , तिने फोन केला तर कट केला आणि मेसेज केला कि "बिझी" म्हणून , माझ्या प्रत्येक फोन ला मेसेज ला उत्तर देणारा हा आज असा का करतोय ? कदाचित त्याचा फोन हरवला असेल आणि दुसरेच कुणीतरी मेसेज करत असेल ? किंवा  त्याला काही झाले असेल का ? अरे देवा कसले कसले विचार येत आहेत माझ्या मनात ? कामात तिचे लक्ष लागेना  , मला बरे वाटत नाहीय , असे सांगून ती ऑफिस मधून बाहेर पडली ते थेट त्याच्या ऑफिस कडे जाण्यासाठीच .
त्याचे ऑफिस हे तिच्या ऑफिसच्या अगदी दुसऱ्या टोकाला ती तिकडे कधी जास्त गेलीही नाही तिला फक्त एरिया माहित होता . अर्धा पाऊण तास ट्रेन मध्ये काढल्यावर ती बाहेर आली पण तिला काहीच ओळखीचे वाटेना तिने याला फोन लावला पण त्याने तो घेतला नाही , आता शेवटचा उपाय म्हणत तिने मेसेज केला कि ,  तुझ्या ऑफिसच्या खाली मी थांबले आहे , हे वाचून मात्र दुसर्या मिनिटाला त्याचा call  आला , अग हि काय पद्धत आहे का ? कुठे आहेस? मी आलो खाली तू  दिसत नाहीय !
 ती , अरे तो एक स्मित स्ट्रीट  आहे न तिथे आहे मी !
कप्पाळ  म्हणत त्याने डोक्याला हात लावला , अहो madam तुम्ही एक stop आधीच उतरला आहात  , आता आहे तिथेच थांब मी पोहचतो १५-२० मिनिटात …. तोच पाऊस  सुरु झाला  , तसे हि पुटपुटली " इथला पाऊस पण कधी येईल नेम नाही ! "
यावर लगेच तो ," तो ही तुझ्यासारखाच लहरी वेडा "
 ती छत्री घेऊन उभी होती , तिची नजर त्यालाच शोधत होती आणि तितक्यात तो रोडच्या पलीकडच्या स्टेशन मधून बाहेर आला , पुढे ट्राफिकमुळे तिला पलीकडे जाता येईना , तसा तोच आला हिच्याकडे पळत तसे  दोघे किती  वर्षांनी एकमेकांना भेटत आहेत असे भेटले . !!!
 दोघे एकाच छत्रीतून चालत असताना त्याने फक्त तिला इतकेच विचारले , "आता  वाटली ना  काळजी ?"



Saturday, April 30, 2016

आजोळ

साधारणपणे आमची परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपली कि आजोबा आम्हाला  घेऊन जाण्यासाठी आलेलेच असणार , उन्हाळ्याची सुट्टी म्हणले कि आमचे ठरलेले ठिकाण येळावी माझे आजोळ . कवठे महांकाळ ते येळावी दीड दोन तासाचा प्रवास , तासगाव मधून गाडी बदलावी लागत असे  मी एकीकडे आजोबा मध्ये आणि दीदी दुसरीकडे असा आमचा प्रवास .

गाव तसे लहान होते पण आजोबांना मानणारे लोक खूप , त्यामुळे जोशीबुवांची नातवंडे म्हणून आमचीही मजा असे . तिथे उतरले कि स्टेंड वरच ओळखीचे एक दुकान होते तिथून आम्हला खूप गोळ्या बिस्किटे मिळत , तोपर्यंत आजोबा त्यांची सायकल घेऊन यायचे आणि आमचा प्रवास आमच्या मळ्याकडे , गावापासून २-३ किलोमीटर आतमध्ये आमचा मळा , जाताना दोन्ही बाजूने झाडे त्यामुळे उन्हाळा आहे असे वाटतच नसे . 
 घर जवळ आले कि सायकलची घंटी वाजवून आजीला सांगणार कि आम्ही आलो , पण ती त्याआधीच दृष्ट काढायचे समान हातात घेऊन उभी असे . "किती वाळल्या ग माझ्या पोरी ?" संधी (माझी आई संध्या ) नेहमी पोरांच्या मागे असते नुसती , असे म्हणून गालावर मायेने हात फिरवायची . 
  गेल्या गेल्या चुलीत भाजलेल्या कैरीचे मस्त पन्हे  प्यायला मिळायचे , आम्ही येणार म्हणून आजीची तयारी खूप जोरदार असायची , त्यात खास कैरीची चटणी , बाटाचे आणि साधे लोणचे , मुरंबा ,साखरांबा  सगळी नुसती धमाल …
  आम्ही येणार म्हणून आधीच प्रत्येकासाठी झोपाळे बांधून तयार असायचे , गोष्टीची पुस्तके आणि सोबत अभ्यासही असे , याबाबतीत आजोबा खूप कडक होते त्यांना रोज पाढे  म्हणून दाखवावे लागत आणि शुद्धलेखनसुद्धा यात कोणतीही तडजोड नसे . 
 आमचे दुपारचे जेवण शक्यतो आमराईत असे  वरती लटकलेल्या कैऱ्या , आजूबाजूला जांभूळ ,आवळा, सोनचाफा , मोगरा , अशी कितीतरी झाडे यात आमचे जेवण … आमची दुपारची छोटी डुलकीही  तिथेच होई, 
तिन्हीसांजेला आजोबा आमच्याकडून शुभं करोति , अथर्वशीर्ष , रामरक्षा ,मारुती स्तोत्र म्हणून घेत . रात्रीची जेवणेसुद्धा अंगणात होत  …  चांदण्यात आजी जवळ  कुशीत झोपताना तिने शिवलेल्या गोधडीची ऊब जास्त कि तिच्या कुशीची ? या विचारात आणि गोष्टी ऐकत निद्रादेवी भूल घालत असे . 
 सकाळी उठले कि चुलीसमोर जाऊन बसायचे , आजीची धार काढणे यात हळूच कधीतरी जाऊन तिला मदत करायची , शेणाने सारवायचे  असे उद्योगधंदे , हे दुध तापवल्यावर खाली राहिलेली साय आजी साखर घालून खरवडून द्यायची काय लाजवाब चव तिची …  दुपारचे आजीचे काम झाले कि ती मातीची खेळणी करून द्यायची माझा आणि दिदीचा  भातुकलीचा डाव रंगायचा …  कधी कधी आजोबांसोबत सगळ्या शेतात भटकायचे . 
   हळू हळू कैरीला पाड येऊ लागतो मग आमच्या सगळ्याचे लक्ष तिकडे आजोबा स्वतः झाडावर चढून कैऱ्या उतरवायचे. आम्ही त्यांना मदत करत असू . घरात एक छोटी खोली होती तिथे पोती घालून त्यावर या कैऱ्या पिकायला ठेवायच्या  . सगळ्या घरात नुसता आंब्याचा वास दरवळत असे . आम्ही तर त्या खोलीच्या शेजारीच झोपत असू , रोज उठले कि आज किती आंबे पिकले याची मोजदाद .  आमरस साठी वेगळे , कापून खायचे वेगळे , चोखून खायला वेगळे असे त्यांचे वर्गीकरण  ……  असे करता करता मे महिना संपत आलेला असे आणि आई बाबा आम्हाला  घेऊन जाण्यासाठी येत , दिवस किती लवकर सरले याचे इतके वाईट  वाटायचे 
पण …… 
 आजी न चुकता सगळ्या बरण्या आईला द्यायची , आमची परत एकदा पाणावलेल्या  डोळ्यांनी दृष्ट काढून मग  आम्हाला निरोप  . 

मला या आंब्याच्या जातीमधले काही कळत नाही , हापूस , पायरी ,शेपू आणि कुठलाहि असो पण एक नक्की आहे कि आजही आंबे खाताना त्याला आजोबांनी उतरवलेल्या आंब्याची सर येत नाही  ……

Tuesday, April 26, 2016

SIX FLAGS

अमेरिकेत आल्यापासून शनिवार रविवार म्हणले कि एखादे म्युझियम , मॉल  आणि त्या उंच उंच इमारती पाहून खरेच खूप  कंटाळा आला होता , काहीतरी वेगळे करावे असे मनात होते पण हि थंडी !!!!!!!! पण या वसंत ऋतूच्या आगमनासमवेत नवरा बोलला कि आपण या रविवारी माझ्या ऑफिसच्या मित्रासोबत फिरायला जायचे. सिक्स  फ्लाग(six  flag ) आणि  अनिमल सफारी चा आपला प्लान आहे , हे सिक्स फ्लाग काय असते असे म्हणल्यावर नवरोबांनी त्याचे फोटो दाखवले ते पाहून मी उडालेच , ह्या हे काय आमची जत्रा !! म्हणून मी आपली लई खुश  , तर अहो म्हणतात कसे जत्रा कि " खतरा " कळेलच रविवारी !!! आणि इथे आल्यापासून आम्ही फक्त मराठी  लोक सोबत जाणार मग तर  दुधात साखर केशर सगळेच !!!!

कुठेही जायचे म्हणले कि हमखास उशिरा उठणारी मी यावेळी रविवार असून  देखील लवकर उठले ,  जत्रेत जायची हौस हो आणि त्यात दोन वर्षांनी जत्रा पाहायला मिळतीय म्हणल्यावर काय आमचे घोडे पुढेच पळत होते साधारण नऊच्या सुमारास आमचे प्रयाण सुरु झाले  तासा दीड तासाचा प्रवास , इथे प्रवास करताना आजूबाजूला उंच झाडे इमारती आणि मॉल दिसतात पण  लगेचच असे एखादे वळण येते कि आपण पाहतच राहतो …… तर अशा या झोकदार वळणानंतर आमचे ध्येय डोळ्यासमोर होते .
 आम्ही मोठे आठ जण आणि चिल्लीपिल्ली दोन असा लवाजमा घेऊन पावती फाडण्यासाठी गेलो , इथे सुरुवातीला पावती फाडली कि आत सगळे फोकट में ! पण पहिलीच पावती अव्वाच्या सव्वा असते पण आमचा ग्रुप होता आणि त्यात एका मैत्रिणीची कंपनी सवलत घेऊन मदतीला आली . सगळे सोपस्कार करून आत मध्ये गेल्या गेल्या फोटो फोटो करत मधमाशा कशा पोळ्याला येउन चिकटतात तसे सगळे मागे आणि परत त्याच फोटोचे पैसे उकळतात अर्थात आपण घेतले तर !!
 आम्ही पहिली जंगल भ्रमंती घेतली त्यासाठी तासभर रांगेत उभे राहून मग  ट्रक दिसला चलो पायपीट नाही म्हणून खुश वाघ सिंह असे प्राणी सोडले तर बाकी सगळे मोकळेच फिरत होते मजा वाटली , या भ्रमंती मध्ये एक छोटा थांबा होता जिराफाना  खायला घालण्यासाठी पण पैसे देऊन !! कुठे कसे पैसे उकळावेत ते न या लोकांकडून शिकावे …। 



इतक्या मोठ्या भ्रमंती नंतर सगळ्यांचाच भूक अग्नी प्रज्वलित झाला होता , पण शुध्द शाकाहारी म्हणले कि पिझ्झा , बर्गर आणि  sandwich  याशिवाय काही पर्याय नसतो , पिझ्झाची एक तुकडा पोटात गेल्यावर जरा उभारी आली आणि नव्या दमाने आमची ब्रिगेड सज्ज झाली खऱ्या  मजा मस्ती साठी ……. 

पहिली कोणती  राइड घ्यायची हे बघत बघत एका ठिकाणी येउन थांबलो आणि ठरवले आता श्रीगणेशा इथून त्या राइडचे नाव होते " एल टोरो " तिथे पोहचण्यासाठीही  आम्हला अर्धा पाउण तास वाट पहावी लागली तिथे  थोडे पुढे गेल्यावर एका कोंबडीचे चित्र दाखवून लिहिले होते " पळून जाण्यासाठी शेवटची संधी " !! असे करत आमची राईड मध्ये बसण्याची घटिका जवळ आली त्यावेळी पोटात सकाळी पाहिलेले सगळे प्राणी कत्थक करू लागले होते तसे या राईड मध्ये आपल्या सुरक्षितेची पूर्ण काळजी घेतली असते त्याच्या वेगामुळे …. अपवाद असतो तो आपल्या मनातील वेगाच्या भीतीचा !! 
राईडमध्ये बसल्यावर पहिला अगदी रेल्वेत बसल्यासारखे हळू हळू नंतर एक मोठा चढ जो को १७६ फुटावर जाऊन थांबत होता तिथे अगदी काही सेकंद थांबवले पण त्यानंतर १७६ फुटावरून खाली मुक्त पडणे ( free  fall )  तोही ७० मैल्स पर अवर (७० mph )  या वेगाने यावेळी मला ३३ कोटी देव सुद्धा आळवायला कमी पडले . 
हि राईड फक्त २ मिनिटे आणि ५ सेकंदची होती पण … ………  फक्त अनुभव !!!! 


खाली आल्यावर मी आहे न याची खात्री करून घेतली आणि कधी एकदा नवऱ्याचे तोंड पाहते असे झाले तो या अशा गोष्टींपासून दूरच असतो तसा !!! 
या नंतर एक छोटी राईड केली जी कि फन राईड होती . मग छोट्या मुलांच्या रेल्वेत मज मस्ती केली . यानंतर एका राईड कडे लक्ष होते निट्रो कि नायट्रो (nitro ) म्हणून होती त्यातही मी अगदी हौसेने बंसणार म्हणून गेले पण तिथे आपला नंबर यायची वाट पाहत असताना त्याचे सर्वोच्च टोक दिसले तो २३० फुटावर आणि तिथून खाली ८० मैल्स पर अवर या वेगाने !!!!!!!  त्या २३० फुटावर मला मघाशी जंगलात पाहिलेला रेडा यमाचा रेडा म्हणून दिसू लागला आणि माझ्या निश्चयाचा महामेरू ढासळला , त्यात नाही बसले यावरून टोमणे ऐकले पण  जान बची तो लाखो पाये !!!! 
  पण यानंतर मात्र एका राईड मध्ये बसायचे ठरवले होते ती म्हणजे वटवाघूळ(batman ) राईड त्यात आपण उलटे लटकून आपले पाय अधांतरीच याचे सर्वोच्च टोक १०५ फुटावर आणि वेग ५० मैल्स पर अवर यात इतके लटके झटके झाले माधुरीने सुद्धा आतापर्यंत कमी घेतले असतील ! त्यानंतर दोन दिवस मान हलवता येत नव्हती असे हाल  ,एकही राईड मध्ये डोळे उघडून  बघायची हिम्मत होत नव्हती आणि मी तर जाताना नवऱ्याला सांगून जात होते कि " जगले वाचले तर भेटू परत " !!! आणि सगळ्या राईडस २ मिनिटापेक्षा कमी होत्या पण  खतरा  राईडस होत्या या  ……. 




यानंतर मात्र छोट्या छोट्या म्हणजे कार डाशिंग  उर्फ दे धक्का  यात मात्र माझी कार जास्त वेळ स्वतः भोवती गोलगोल फिरत होती !!! आणि मला आवडलेली राईड sky screamer २४२ फुटावर फक्त गोलगोल  फिरून आजूबाजूचा सुंदर परिसर पाहणे आणि खास म्हणजे यात आम्ही सूर्य मावळतीला जात असताना बसलो होतो ती सांजवेळ आणि दिव्यांची उघडझाप पाहून तर त्याला चार चांद लागल्यासारखे वाटत होते …. सलग दोन वेळा बसूनही तोच आनंद 


 आता निघायची वेळ झाली होती पण अजून खूप काही बाकी होते पण पानात वाढलेले सगळे एकदम संपवायचे  नसते ना  हळूहळू  चवीने खायचे असते , त्यामुळे सिक्स फ्लागला अजून भेटायचे आश्वासन देऊन काढता पाय घेतला …….    
  

Tuesday, April 19, 2016

एक नवी ओळख

आरुषीचा संसार मांडून आता ४-५ वर्ष झाली . सगळ्याच आयांप्रमाणे मलाही माझ्या नातवंडाची तोंड पहायची घाई होतीच पण लेकीचे करिअर त्यात आधी  तिला जम बसवायचा होता त्यामुळे मीही थोडी शांतच होते . पण आज लेकीचा फोन आला आणि कधी एकदा तिला जाऊन भेटते असे झाले . जवळ असते तर गेले असते लगेच पण परदेशी ?
आज आरुषीचा फोन आल्यापासून नुसती माझी गडबड चालू होती, पण तिचे बाबा मात्र  अगदी शांत  आनंद झाला नाही असे नाही पण ठेविले अनंते  तैसेचि राहावे हि वृत्ती ….  आनंद आणि दुःख कशाचाच बाऊ करायचा नाही . तसेही लेकीने फोनवरून बाबांना तुम्हीही याच  असे सांगितले होते आणि मलाही कडक शब्दात सांगितले होते काहीही कर पण त्यांना घेऊन ये . म्हणजे तुमचे दुसरे हनिमून होईल ग !! आणि खळखळून हसली , 
दुसरे ?
          तसा  मनात विचार आला आपण कधीतरी गेलो होतो का असे दोघे बाहेर ? एकत्र कुटुंब , सासू सासरे दीर जाऊ  मुल यातच सरले नव्याचे नऊ  दिवस . … त्यामुळे लेकीने हनिमून म्हणताच नाही म्हणली तरी गालावर खळी  फुलली होतीच , पण परदेशी लेकीच्या घरी ५-६ महिने राहावे लागणार होते ते यांना किती रुचेल म्हणून जरा घाबरतच विचारले काय विचार आहे तुमचा ?  रिटायर झाल्यापासून पेपर मधून तोंड न वर काढता उत्तर देतात तसेच आजही आले  आणि तेही चक्क हो म्हणून !!!  जाऊया दोघे असे !!! 
तसेही आधी मला एकटी जायचे म्हणजे थोडी भीती होतीच , तिथले नियम , कायदे कानून सगळे वेगळे मला एकटीला कसे जमणार ? पण लेकीचे बाळंतपण म्हणजे आईच्या जिव्हाळ्याइतकाच जबाबदारीचा प्रश्न !!!  आणि त्यात आज स्वारी मूड मध्ये मग काय माझे पाय तर जमिनीवर ठरेना झाले .  मी तर अगदी दिवस मोजू लागले विमान प्रवास पहिलाच जोडीने , विमानतळवर पोहचल्यावर तिथली लोक , झगमग पाहून माझीच मला मी एक ध्यान वाटत होते ,पण फक्त तिथे तुम्ही होतात म्हणून  …….   
 विमान उडते वेळी माझी झालेली अवस्था पाहून हातात घेतलेला हात तुम्ही विमानातून उतरेपर्यंत धरून ठेवला होता , तिथली बाई जेव्हा विचारत होती Is  there any rice or liquid in ur bag ? मी आपली तिला समजावत होते येस येस  देअर आर सम मसालाज  !!! पण तिला माझे ओ कि ठो  कळत नव्हते आणि तुम्ही तिला सांगितले she means some spices are there ... आणि ती हसली त्यावेळी असा राग आला होता न त्या भवानीचा ! पण ……… 

सगळे सोपस्कार पार पाडून  बाहेर आलो त्यावेळी लेकीचा चेहरा उजळलेला पाहून कोण काय जाणे  आंनद होता , पण आज प्रथमच तुमच्यातला आजोबा जावयाशी बोलताना पहिला . लेकीच्या घरी मी लवकर रुळले पण  तुम्ही ?  तरीही क्षणोक्षणी मला आधार देत तुम्ही माझ्याजवळ होतात …  
 आपली लेक  दवाखान्यात असताना  आणि बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून एकाचवेळी खारट आणि गोड  अश्रू तुमच्या डोळ्यात……  कधी अपेक्षाच नाही असे वेगळे रूप तुमचे , इतक्या लहान मुलाला घ्यायची सवय नसताना त्यासाठी केलेली धडपड  तेव्हा आपल्या नातीइतकेच निरागस दिसत होता तुम्ही ,  आणि ती घरी आल्यावर माझी उडणारी तारांबळ पाहून रात्रीच्या जागरणात केलेली सोबत !!

आज आपली लेक ३-४ महिन्याच्या विश्रांतीनंतर आजपासून कामावर जायला लागली , घरात मी न आपली नात …… पण जायच्या आधी लेकीने शिकवले हा laptop वापरायला आणि लिहायला , पहिला प्रयत्न केला लिहायचा तुम्हालाच  , कामासाठी म्हणून तुम्ही आधी गेलात पण जाताना मात्र मला परत तुमची एक नवीन ओळख देऊन गेलात  …… 

Monday, April 4, 2016

तेवणारी वात

         "शुभमंगल सावधान " असे शब्द ऐकले आणि रमा काकुंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणखी एका जबाबदारीतून त्यांना मोकळीक मिळाली . अंजूचे लग्न थाटामाटात पार पडले तिचा जोडीदार तिने शोधला म्हणून काकू थोड्या नाराज होत्या पण होणाऱ्या जावयाला आणि त्याच्या घरच्यांना भेटल्यावर त्यांचा विरोध मावळला . अमित आणि अंजली रमा काकूंची दोन मुले अमितचे लग्न ४ वर्षापूर्वी झाले अपर्णा त्याची बायको आणि आकांक्षा काकूंची  लाडकी नात असा सुखी परिवार .
    आज रमा काकू सगळ्या जबाबदारीतून मुक्त झाल्या होत्या , वयाच्या अठराव्या वर्षी देशमुखांच्या घराचा उंबरठा ओलांडला होता त्यावेळी दिसायला बारीक सावळी ,नाक अगदी धारदार ,घारे डोळे आणि मंजुळ आवाजाच्या रमेने सगळ्यांना आपलेसे केले होते अपवाद होता तो फक्त विनायकरावांचा म्हणजे रमा काकूंच्या नवऱ्याचा !!

विनायक रावांना घरात जास्त अडकून राहायला आवडायचे नाही . चंचल स्वभावामुळे त्यांचा पाय घरात ठरत नसे लग्न झाल्यावरहि तसेच वागणे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना समज दिली पण त्यांचे वागणे तात्पुरते बदलायचे परत जैसे थे परिस्थिती असायची . रमा काकुना हळू हळू या सगळ्याची सवय झाली पण त्यांच्या डोळ्यतील वेदना मात्र त्यांना ओळखणाऱ्याला कळे.
 अशातच एक दिवस गोड बातमी रमा काकुना दिवस गेल्याची त्यामुळे रमा काकुना एक नवीन उमेद मिळाली जगण्याची अर्थात झालेल्या जखमा पूर्ण भरून येणाऱ्या नक्कीच नाहीत पण कुठेतरी वाळवंटात पाउस ….!  पहिला मुलगा झाल्यावर विनायकरावहि जरा आनंदले लाडाने त्याचे नाव अमित ठेवले . रमा काकुना आता दिवसही  कमी पडू लागला . अमितच्या बाललीला बघण्यात त्या रमून जात . विनायकरावांच्या वागण्यातील बदल खूप कमी काळ टिकला . अमितला दोन वर्ष पूर्ण झाली बघता बघता आणि आणि अंजली घरी आली
आपल्या दोन मुलांमधून काकुना आता वेळ मिळेना झाला .काकुना वाट्त होते कि आता संसार परत मार्गी लागेल पण एके दिवशी कामानिम्मित परगावी गेलेले विनायकराव परतलेच नाहीत .
 अमित अवघा चार वर्षाचा आणि अंजू दोन वर्षाची काकू तर खूपच खचून गेल्या सासू  सासर्यांनी त्यांना धीर दिला . बाहेरच्या जगाला तोंड द्यायची हिम्मत काकुना त्यांच्याकडूनच मिळाली .काकुना स्वतः च्या पायावर उभे केले सासर्यांच्या ओळखीने कुठल्या तरी पतसंस्थेत नोकरी मिळाली . पण ते दोघे तरी किती दिवस पुरणार होते ?  काकुनी स्वतःला सावरल  त्यांच्या मुलांसाठी आता फक्त त्याच होत्या . हळू हळू मुले मोठी होत होती अमित खूप समंजस आणि हुशार होता ,त्याच्या मानाने अंजू थोडी चंचल पण तिचा  आईवर खूप जीव  होता .

काकुनी दोन्ही मुलांना शिकवून स्वतःच्या पायावर उभे केले . अमित साठी मुली बघायला चालू केल्यावर तर त्यांचे चित्त थाऱ्यावर नसे . त्यांना कसलीतरी खूप भीती वाटत असे पण काही बोलायच्या नाहीत म्हणून एकदा त्यांच्या नणंदेने विचारलेही , वाहिनी " आजकाल खूप काळजीत असता ? मुली बघताना सुद्धा इतका का ओ विचार ? " तेव्हा त्या म्हणल्या ," वन्स , दुध पोळले कि ताकही फुंकून प्यावे हो " यापुढे कुणीच काही बोलले नाही फक्त निरव शांतता …… त्यांच्या डोळ्यातील भावना फक्त त्यांचीच दोन मुले वाचू शकली

पण त्यांच्या सुदैवाने अमितचा संसार सुखात चालू होता आकांक्षा सारखी एक गोंडस मुलगी होती. आता अंजुही मार्गी लागेल तिची पाठवणी केली कि मी मोकळी असे म्हणत त्या एकदम भानावर आल्या . आजूबाजूला गोंधळ चालू होता अंजूच्या लग्नाचा , कितीवेळ मी अशीच बसले होते कुणास ठाऊक म्हणत त्या तिथून उठू लागल्या तितक्यात अमितही त्यांना शोधत तिथे आला .

काकुना घेऊन तो एका टेबलजवळ आला तिथे केक त्यांच्या आवडीचे पदार्थ सगळे होते ते पाहून त्यांना काहीच कळेना . अमितने सांगितले कि परवा आत्या बोलता बोलता म्हणाली कि ,तुझ्या आईला आता या घरत येउन ४२-४३ वर्ष होतील आली,तेव्हा फक्त १८-१९ वर्षाची होती . मग त्या अंदाजानी तुला एकसष्ठ वर्ष पूर्ण झाली म्हणून आज तुझी एकसष्ठी … यावर काय बोलवे काकुना कळेना लग्नापासूनचा सगळा प्रवास त्यांच्या डोळ्यासमोरून तरळू लागला .

अंजू आणि अपर्णा एकसष्ठ दिवे घेऊन आल्या ,अमितने आईला बसवले अंजू आणि अपर्णा त्यांचे औक्षण करताना   ते पाहून काकुना लहानपणी मुलांना दिवाळी,शुक्रवार, त्यांच्या वाढदिवसादिवशी केलेली औक्षण आठवू लागली , समोरच्या तेवणाऱ्या वातीमध्ये जणू त्या स्वतःलाच पाहत होत्या सगळेच धुसर झाले होते .
 आज त्यांना या एका क्षणात कधीच काही न मिळून खूप काही मिळाल्यासारखे झाले होते .