Thursday, March 23, 2017

एक पत्र मनातले

                                                                   ।। श्री ।।
प्रिय ....
साष्टांग नमस्कार .. 
आज खूप दिवसांनी तुला पत्र लिहीत आहे , खूप दिवसांनी का तसे पाहायला गेले तर आज पहिलीच वेळ आहे तुम्हाला पत्र लिहायची .... फक्त प्रिय यासाठी लिहिले कि मला तुमच्या कुणा एका
बद्दल नाही लिहायचे , आणि तसेही तुम्ही सगळे एकच आहात  .. आपण सारी या एका देशाची बाळे !!
काय सांगू तुला देशा , इकडे परदेशात आले खरी पण तुझी आठवण मात्र अगदी प्रत्येक क्षणाला येत असते , इथे अगदी छोटी गोष्ट दिसली तरी त्याची तुलना  तुझ्यासोबत होतेच होते ...
इथे जेव्हा आले त्यावेळी सगळे खूप नवीन होते ,सगळीकडे शांतता , स्वच्छता होती आताही आहे आणि ते पाहून वाटते की हे सगळे तुझ्याकडे का नाही ? 
टापटीपपणा तुझ्यात का नाही , नेहमी इतका का तू  गरीब बिचारा दिसतो ? बघेल तिकडे सगळीकडे नुसता पैसा पैसा करणारी लोक ... इकडे आल्यापासून विचार करायला खूप वेळ मिळतो रे देशा म्हणून जास्तीत जास्त तुझाच विचार येत असतो ...
आता तू म्हणशील कि हे सगळे मी करतो का? तर नाहीच तू करत नाही ... तुझ्या आत लपलेली एक कीड आहे वाळवी आहे ती हे सगळे करते .. काहीतरी करायचे आहे रे हे कीड घालवण्यासाठी तूच सांग आता काय करू ते असेल तुझ्याकडे एखादा उपाय तर नक्की कळव ...
पण तुझ्याइथे माझा जन्म झाला हि माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे , तुझ्यासारखे स्वातंत्र्य , आपलेपणा , वेगवेगळेपणा  दुसरीकडे कुठे पाहायलाही मिळत नाही .. तुझ्यात हि माणसांना तुझ्याकडे धरून ठेवण्याची जी शक्ती आहे ना ती खरेच खूप अफाट आहे , माझ्यासारखे खुपजण आज तुझ्यापासून दूर असतील पण त्या सगळयांना तुझी ओढ खूप आहे ... खूप दिवसानी तुझ्या जमिनीवर पाय ठेवला कि आईच्या कुशीत गेल्यावर वाटते ना  तसे वाटते , सगळ्याच बाबतीत तू नेहमी आघडीवर असतो पण काहीना ते बघवत नाही म्हणून तुझी काळजीही वाटते पण हा विश्वास आहे कि तू सगळ्यांना नक्की पुरून उरणार !!! 
तुझं झाले रे सगळे विचारपूस करून आता महाराष्ट्रबद्दल काही नाही  विचारले  तर त्याला वाईट वाटेल .. 
अरे तो कसा आहे ? काय चालू आहे तिकडे , यावर्षी पण दुष्काळ का ? उन्हाळ्यात खूप हाल होतात रे !! 
पाणी , वीज सगळ्याचीच मग बचत कम कापाकापी चालू झाली असेल हो ना ? 
इकडे काय वीज कधी जात नाही बघ  , काय करून ठेवले आहे या लोकांना विचारायलाच हवं ... 
आणि पाणी तर इकडे विकत घ्यावे लागते , महिन्याला बिल येते त्याचे मग अगदी सांभाळून वापरते .. तसेही तुझ्यामुळे मला पाणी पहिल्यापासून जपून वापरायची सवय आहे तीच इकडे कामी येत आहे .. 
पण तुझ्याबद्दल मला एक खूप वाईट वाटते बघ इकडे कुणी जास्त मराठी बोलणारी मला मिळतच नाही ... कधी कधी तर वैतागून असे वाटते कि आपणच एक मराठी शाळा सुरु करावी .. त्यानिम्मिताने तरी मला कुणीतरी माझ्याशी आपल्या भारी शब्दांत बोलणारे मिळेल ... पण काय रे ऐकते ते खरे आहे का ? कि म्हणे तुझ्यातच मराठी शाळा कमी  होत जात आहेत ? का रे बाबा !!! त्यांना सांग कुठेही गेले तरी आपली ती आपलीच असते .... समजतील रे सगळे कारण ती आहेच तशी अमृताहुनी गोड .... !!!!
आता मला सांग माझी सांगली काय म्हणते खूप दिवस झाले तिलापण भेटून ... अरे आपली  कृष्णामाई आणि जिथे तासनतास वेळ घालवला तो गणपती बाप्पा काय कसा आहे ?  त्या सगळयांची पण खूप आठवण येते .. 
आणि ती भेळ , पाणीपुरी तर विचारूच नको कुठेही मिळाली नाही बघ अशी आजपर्यत !!!
कवठे महांकाळ रे जिथे आपण आपले बालपण घालवले ते कसे आहे रे !!! माझी जास्वदीं आहे ना तिथे फुले लागतात का रे तिला ? तुला आठवत ना उन्हाळ्यात किती लांबून पाणी आणून ती झाडे जगवली आहेत ... 
यावेळी तर तिकडे भरपूर पाऊसपाणी येउदे !!! माझी शाळा , मित्र मैत्रिणी कुणी दिसले तर सांग हं त्यांना मी आठवण काढत होते म्हणून !!! 
अजून खूप काही लिहायचे आहे पण काय आहे आंतरराष्ट्रीय पत्र आहे .. जास्त लांबले तर कुणीतरी फोडून मध्येच वाचेल  ... तुझ्यापर्यंत पोहचायला तरी हवे ... 
असो , तू मात्र तुझी आणि सगळ्याचीच काळजी घे , तशी मी मजेत आहे पण तुझी खूप आठवण येते ,, तुझ्या या लेकीला विसरू नको .. तुझा आशिर्वाद असुदे !!!

तुझीच लाडकी लेक ... !! 



No comments:

Post a Comment