Thursday, September 22, 2016

स्वयंभु

आपल्या आयुष्यात अशी काही माणसे येतात कि त्यांना कधी आठवावे लागतच नाही ,अशी एखादी गोष्ट , घटना घडते तीच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यासमोर येऊन ठाकते .
शामराव जोशी असेच एक छोट्या गावातील बडे प्रस्थ , सगळेच त्यांना काका म्हणून ओळखत कधी कुणी जोशी बुवाही म्हणत . शेतीवाडी  , दोन भरपूर पाणी देणाऱ्या विहरी , शांत सालस बायको . एक मुलगा आणि मुलगी . 
पांढरे शुभ्र धोतर , सदरा  डोक्यावर शुभ्र टोपी हा नेहमीच पेहेराव यात कधीच बदल झाला नाही , रस्त्यावरून जातानासुद्धा त्यांचा दरारा दिसून येत असे . कुठेही जायचे यायचे म्हणले कि सायकल आणि ते हेच समीकरण. कुणी म्हणाले , " चला सोडतो काका "  तरी यांचे आपले एकच उत्तर,  "नको बाबा !अजून हातापायात जीव आहे तर त्यांना हालचाल नको का द्यायला ? परत बंद पडले कि आहेच तुम्ही उचलायला "  आणि स्वतःच हसणार . पुढचा माणूस काही न बोलता निघून जायचा . 
आयुष्यात कधीच कुणावर अवलंबून ठेवू नको रे गणराया !!! हि प्रार्थना मात्र गजाननाने अगदी मनोमन ऐकली. का नाही ऐकणार तो ? लहानपणापासून गणपतीवर अगदी मनापासून श्रद्धा , भाद्रपदात एखादी जरी पत्री कमी मिळाली तर यांच्या जिवाला घोर .. आणि तोच घोर  परत यांच्या बायकोच्या मागे जमदग्नीच्या कोपासारखा  ... पण तिने वळलेले सुरेख मोदक पाहून त्या कोपावर अलगद शांतीची धार पडायची . 
सहस्रआवर्तने , गणपतीची आरती , उच्चार अगदी स्पष्ट आणि सुरेख , ऐकताना आपलीच तंद्री लागावी आणि डोळे उघडता क्षणी साक्षात त्याचे ते दिव्य रूप समोर यावे .....  असा एक निराळाच माणूस . 
शेतात राबणाऱ्या गडी माणसापासून ते अगदी गावातील प्रतिष्ठित लोकांची  नेहमीच काकांच्या घरी उठबस असायची . जरी शीघ्रकोपी असले तरी कधीच त्यांनी कुणाला दुखावले नाही . विशेषतः त्यांची मुलगी खूपच लाडकी त्यांची ... 
 सकाळी उठून नारळाच्या झावळ्या गोळा करून त्याच्या खराट्याने सगळे अंगण , गोठा स्वच्छ करणे हे त्यांचे पहिले काम , त्याच अंगणात काकू त्यांच्या नाजूक बोटानी रेखीव रांगोळी रेखाटत . सायकल वरून देव दर्शन करून येताना मुलांसाठी गोळ्या बिस्किटे याची नेहमीच सोबत . 
स्वतःच्या गोठ्यातील जनावरांवर आपल्या पोटच्या पोरांसारखे प्रेम करणारा माणूस किती वेगळाच ना ! त्यांच्या आजारपणात राञभर तिथेच बसून त्यांची काळजी घेणार अशा या माणसावर परमेश्वराने खरेच दया दाखवली . त्याची अन त्याच्या बायकोची आम्हाला उठता बसता मरण दे रे भगवंता !!! हि मनापासून दिलेली साद बरे झाले त्याने  ऐकली ....
आणि .... 
म्हातारपणी त्यांच्या रिकाम्या होत जाणाऱ्या मनात  आणखी एक जखम होता होता राहिली ... 

No comments:

Post a Comment