Wednesday, May 18, 2016

मेस काकू

" काय ओ काकू ,मी तुम्हाला नेहमी आठवण करून देते माझा गुरुवार आहे म्हणून  एखाद्यावेळी मी विसरले तर इतके काय ओरडता मला ? "
माझ्या डोक्यात नाही राहत बाई ! कितीजणी तुम्ही मेसला प्रत्येकीचे वेग वेगळे नखरे मी कुणाचे म्हणून आणि काय काय लक्षात ठेवायचे ?  असा संवाद मी आणि आमच्या मेसच्या काकू आमच्यात महिन्यातून एखाद्यातरी गुरुवारी रंगायचाच . 
 मी  आदल्या दिवशी उद्या खिचडी म्हणून आठवण करून द्यायला विसरले कि ,  समजायचे उद्या रामायण…
आमच्या रुमच्या मागे  दोन खोल्यांचे एक छोटे कौलारू घर होते तिथे काकू त्यांच्या छोट्या मुला सोबत राहत . गळ्यात एक छोटी चेन , हातात  २-३ काचेच्या बांगड्या , कपाळावर एक नाजूक अशी उभी टिकली आणि थोडासा फुगवटा करून घातलेली केसांची वेणी  , जर घरातून बाहेर  जाणार असेल तर दोन्ही खांद्यावर पदर असे रूप काकुंचे , त्यांचा मुलगा ८-९ वर्षाचा असेल अल्लड , थोडासा हट्टी आणि  नेहमी आमच्यासोबत वाद घालयला तयार  अशा आवेशात  त्याच्या वयाला शोभेल असाच होता तो  !!!
आम्ही तिथे रहायला गेलो आणि त्याच वर्षी काकुनी नवीन मेस चालू केली ,  आम्ही सगळ्याच दहा -पंधरा जणी त्यांच्याकडेच जेवायला , प्रत्येक सेमला नवी मेस हे आमचे ब्रीदवाक्य असल्यासारखेच आम्ही मेस बदलत असू  अपवाद फक्त या काकूंच्या मेसचा तिथे जास्त दिवस आम्ही टिकलो कदाचित नवीन मेस , थोडीफार घरगुती जेवणासारखी चव , आणि त्या नवीन असल्यामुळे आमचे नखरेही चालवून घायच्या पहिले पहिले … कधी कधी सकाळी , संध्याकाळी  पोहे , उप्पीट , चहा  असे कधी ऐनवेळी सांगितले कि आधी त्यांचा दंगा  मग  अगदी मी आहे म्हणूनच तुम्ही खाताय असा चेहरा करून आम्हाला खायला  करून द्यायच्या .

एक दिवस मला बरे वाटत नव्हते म्हणून मी रुममध्येच थांबले होते  त्यावेळी कधी नाही ते त्यांच्या घरातून मोठ्याने बोलण्याचा आवज येत होता , खरे तर त्यांचा इतिहास आम्हाला तसा काहीच माहित नव्हता आणि आम्ह्लाही कधी तो जाणून घ्यायची गरज पडली नाही . मलाही कळेना जेवायला जाऊ कि नको थोड्यावेळाने आवाजही कमी झाला  मग काकुनीच बोलावले जेवायला .  मीही एकटीच होते त्यांचा मुलगा शाळेत गेला होता  त्यामुळे रात्रीच्या जेवणाची तयारी करत त्याही माझ्यासमोरच बसल्या .
मी असे कधी एकटी त्यांच्याकडे जेवण्याची वेळच आली नव्हती त्यामुळे मलाही थोडे अवघडल्या सारखेच झाले होते . पण त्यांनीच बोलायला सुरुवात केली .
श्वेता , अठराव्या वर्षी लग्न झाले माझे माझा नवरा एका गाडीवर ड्रायव्हर होता , शेती होती  घर भरलेले म्हणून  आई वडिलांनी लग्न करून दिले त्यानंतर  दोन वर्षांनी हा एक पोरगा झाला , अवघा  ८-९ महिन्याचा असताना याचा बाप एका अपघातात गेला , तो गेल्यावर सासरच्यांनी घरात राहून दिले नाही बाहेर काढले , माहेर गेले पण तिथे तरी किती दिवस राहणार ?  भावांच्या बायकांना मी जड झाले ,  आपला बोजा त्यांच्यावर नको म्हणून एका दुकानात नोकरी करू लागले , तर पोरग एकटे घरी  ,माझ्यामुळे माझ्या आई बापाला  म्हातारपणात त्रास देऊ लागल्या . तिथले काम सोडून इथे येउन राहिले पहिला पहिला एकटी बाई म्हणून घर मिळेना कसेतरी एक खोली मिळवली , एका कपड्याच्या दुकानात नोकरी मिळाली पहिला पोराला घेऊन जात होते ,परत त्या मालकाने सांगितल्यावर त्याला तिथल्याच एका अंगणवाडीत बसवू लागले . त्या बाईने ऐकले म्हणून झाल हे नाहीतर सगळी परिस्थिती अवघडच होती ,  पण या कामामुळे पोराकडे लक्ष द्यायला वेळ मिळेना , हातातून जावू नये यासाठी घरीच राहून काही करता येईल का बघत होते . पण आता होते तिथे काही करणे शक्य नाही म्हणून ओळखीने इकडची जागा मिळवली आणि आता या नव्या जागेत मेस सुरु केली , आता कुठे याचा जम बसायला लागला तोच , माझ्या सासरच्या लोकांचा मान  वर उफाळून आला  , हे असले उद्योग आमच्यात कुणी करत नाही म्हणून लागले सुनवायला , आमची अब्रू वेशीवर टांगायला निघाली वाटेल ते तोंडाला येईल ते बोलतात , तशी मी आहे ग खमकी पण कधी कधी नाही सहन होत , काय माहिती कधी पर्यंत जगते ते ? पोराला शिकून मोठे करायचे  इतकेच डोळ्यासमोर आहे तोपर्यंत टिकले तरी बास !!! असे म्हणेपर्यंत त्यांचे डोळे पाण्याने डबडबले .
 मलाही काय बोलावे समजेना तसाच हात घेऊन बसले होते , परत काकूच म्हणाल्या तुला काय वाटते ग काय असेल माझे वय ?  त्यांच्याकडे पाहून तरी आम्हाला सगळ्यांनाच त्या ४०-४५च्या वाटायच्या , पण त्या फक्त तिशीत होत्या हे ऐकून मला धक्काच बसला कारण खरेच काकूंकडे पाहून असे बिलकुल वाटत नव्हते कि त्या इतक्या लहान असतील आमच्या सगळ्यांपेक्षा ८-१० वर्षांनी मोठ्या !!!
परिस्थितीमुळे आलेले अकाली प्रौढत्व , त्या चेहऱ्या वरच्या सुरकुत्या , आणि डोळ्यातील करुणा  माणसाचे रुपडेच बदलून टाकते  याचे मूर्तिमंत उदाहरण होते .
त्या कधी खूप चिडायच्या , ओरडायच्या आम्हाला याचा खूप राग यायचा पण त्यामागे अशी कहाणी असेल असे कधी वाटले नव्हते ते कळाले तेव्हा सगळ्यांनाच खूप वाईट वाटले .
 आम्ही त्या ठिकाणाहून परत दुसरीकडे राहायला गेलो त्यामुळे त्या काकूंची मेस बंद केली ,
परत कधी संपर्कच नाही माहित नाही त्या कशा असतील ?
पण काही माणसे खरेच मनात राहतात  ……




No comments:

Post a Comment