Friday, October 14, 2016

योगायोग

" मुग्धा , तू आज यायलाच हवे पार्टीला नाहीतरी आपली हि एकत्र अशी शेवटची पार्टी आहे "  तिच्या हॉस्टेलच्या मैत्रिणी मुग्धाला समजावत होत्या ..
कॉलेजचे हे त्यांचे शेवटचे वर्ष होते आणि दोन महिन्यांनी परीक्षा झाली कि सगळे आपापल्या घरी असणार होते, मुग्धाला पार्टीमध्ये जायला काही अडचण नव्हती पण पूर्ण रात्र बाहेर थांबावे लागणार होते .. यावेळी सगळ्यांनी मिळून नाईट आऊट पार्टी ठरवली होती आणि पार्टी फक्त  मुलींची होती त्यामुळे तिला जावे असे वाटत होते पण फक्त घरी कळाले तर खूप ऐकून घ्यावे लागणार होते त्यामुळे तिची व्दिधा मनस्थिती झाली होती . तसे तिच्या घरचे तिला नक्कीच नाही म्हणाले नसते पण पूर्ण रात्र बाहेर राहणे ,, हे पटण्यासारखे नव्हते फक्त मुलींची पार्टी असली तरीही ...
आधीच त्यांचे नातेवाईक तिच्या आई बाबांना बोल लावत असत कि शहरात राहून तुमची मुलगी बिघडली .. परंतु
सगळ्या मैत्रिणीचा आग्रह तिलाही  मोडवेना आणि शेवटी ती  पार्टीसाठी तयार झाली ...
तसेही हॉस्टेलवरून त्यांचा ७-८ जणींचा ग्रुप होता ,, एका मैत्रिणीच्या फ्लॅटवरच पार्टी होणार होती , आणि हॉस्टेलच्या दोघी ,तिघींकडे गाडी असल्यामुळे येण्याजाण्याचा काही प्रश्नच नव्हता , सगळ्याजणी तयार होऊन ७ वाजताच हॉस्टेलमधून बाहेर पडल्या .. आणि मैत्रिणीच्या म्हणजेच अर्पिताच्या फ्लॅटवर जमल्या .
गाणी , डान्स , खाणे पिणे , सगळे अगदी मस्त मजेत चालू होते . मुग्धा , अर्पिता आणि बाकी दोघी तिघी गप्पा मारत  बसल्या होत्या , तितक्यात अर्पिताचा मोबाईल वाजला नंबर पाहून अर्पिता बाजूला जाऊन बोलू लागली, त्यावरून सगळ्यानांच अंदाज आला कि हा नक्कीच अर्पिताच्या बॉयफ्रेंडचा कॉल आहे ..
मुग्धाचे सगळे लक्ष अर्पितावरच होते आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते कि ती कोणत्यातरी अडचणीत सापडली आहे ..थोडावेळ अर्पिता फोनवर बोलून सगळ्यांच्यात येऊन बसली पण तिचे तिथे लक्ष लागेना कुठल्या तरी विचारात ती गुंगली होती ..
" अग अर्पिता, काय झाले ते तरी सांग , कोणत्या विचारात इतकी गुंग आहे ?" मुग्धा तिला विचारत होती ..
तरीही अर्पिता काहीच बोलेना .. मुग्धा उठून तिच्या जवळ जाऊन बसली ,, आणि तिला विचारू लागली " अप्पू , आपण तर एकमेकींपासून काहीच लपवत नाही , मग काय झाले ते सांग ना .. काही अडचण आहे का ?"
आजूबाजूला कुणी नाही हे पाहून अर्पिता बोलू लागली , "  मुग्धा आज हि आपली पार्टी फक्त मुलींची आहे म्हणून मी अनिकेतला सांगितले होते .....
हो अर्पिता माहित आहे मला आणि म्हणूनच तर मी पार्टीला आले ना !!! मुग्धा तिला मध्येच तोडत म्हणाली ..
अरे हो ग पण पूर्ण ऐकून तरी घे ना माझे म्हणणे ... असे म्हणून अर्पिता बोलू लागली , अनिकेत मला म्हणत होता कि , तू मला पार्टीला नाही बोलावले मग बाकीच्या मुलांना कुणी बोलावले ते का येत आहेत ? मी तुला म्हणत होतो कि आपण पार्टी आपण एकत्र करू पण तू ऐकले नाही माझे ......

हे ऐकून मला काहीच समजेना म्हणून त्याला मी विचारले अरे असे कसे होईल जर मी तुलाच नाही बोलावले तर बाकीच्या मित्रांना कसे बोलवेन ? पण तो काही ऐकूनच घेईना ग !!! तो म्हणाला तुमच्या बाकीच्या मैत्रिणीनी बोलावले असेल त्यांना .. आणि बघ ते येत आहेत पण त्यांचा विचार मला काही चांगला दिसत नाही "
असे म्हणून अनिकेतने फोन ठेवला .... परत अर्पिता त्याला फोन लावत होती पण त्याचा फोन बंद होता ...
हे ऐकून मुग्धाही विचारात पडली .. तिलाही समजेना काय करावे ते ?
दोघीनी ठरवले कि सगळ्यांना विचारून बघायचे कि कुणी या मुलांना पार्टीमध्ये बोलावले ? त्याप्रमाणे त्या एक एकीला जाऊन विचारू लागल्या पण सगळ्याच नाही नाही म्हणत होत्या ....
मुग्धा अर्पिताजवळ आली तिच्या कानात तिने काहीतरी सांगितले आणि ती पटकन तिथून निघून गेली , मुग्धा जाऊन फक्त १० -१५ मिनिटेच झाली तेवढ्यात दारावरची बेल वाजली अर्पिताला वाटले आली असेल मुग्धा तर ... पुढे त्यांच्याच कॉलेजमधील चार पाच मित्र होते ,, अर्पितां आणि बाकीच्या दोघीजणी येऊन दारातच त्यांना थांबवले आणि विचारू लागल्या तुम्ही इथे काय करत आहात ?
तर त्यातील एक जण म्हणाला , हे बरे आहे अर्पिता एक तर   स्वतः मेसेज करते पार्टीला या आणि आता आलो तर दारातच आमची उलट तपासणी ??
काही काय मी कधी केला तुम्हाला मेसेज ? अर्पिता विचारत होती ...
त्यातील एकाने त्याचा मोबाइल दाखवला आणि त्यावरचा मेसेजपण .... be ready for party at ८:३० ...
आता उडायची वेळ अर्पिताची होती ... तिला काहीच माहिती नव्हते .. सगळ्याजणी अर्पितालाच बोलू लागल्या तू आम्हाला विचारत होती आता हे काय म्हणून ? अर्पिताला तर काहीच सुधरत नव्हते आणि मुग्धाही नाही ....
सगळेच आत आले  अर्पिता डोक्याला हात लावून विचार करत होती मी कधी पाठवला असेल हा मेसेज ??
पण तिला फक्त प्रश्नच दिसत होते त्याची उत्तरे नाहीच ...
अर्पिताने मुग्धला मेसेज केला ,, कुठे आहे ? लवकर ये !! पण मुग्धाचा काहीच रिप्लाय नाही .. तिने तिला फोन केला तर पलीकडून फोन कट केला त्यावरून अर्पिताला मुग्धाची आणखीच काळजी वाटू लागली..
मुग्धा गाडीवरून जात होती तर तिच्यापासून पाठीमागे काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून तिने गाडी थांबवून पहिले तर कुणाचा तरी ऍक्सीडेन्ट झाला होता तिने उतरून जवळ जाऊन पहिले तर ती गाडी अनिकेतची होती  !!! त्याला बराच मार लागला होता अनिकेत त्याचा पाय धरून जोरजोरात ओरडत होता ...
मुग्धाने पटदिशी तिथल्या लोकांच्या मदतीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले ... आणि अर्पिताला फोन केला आणि सगळे सांगितले ..
थोड्याचवेळात अर्पिता आणि बाकीचे सगळेच तिथे आले ,, अर्पिता  रडत रडतच मुग्धाच्या गळ्यात पडली .. सगळे बाहेर थांबले होते ..
त्याच हॉस्पिटलमध्ये दुसरी केस होती म्हणून इन्सपेक्टर अवि  आले होते .. या सगळ्याची गर्दी पाहून त्यांनी डॉक्टरांना विचारले काय झाले कसली गडबड आहे .. डॉक्टरांनी त्यांना सगळी परिस्थिती सांगतली ..
असे होय म्हणत ते कसल्यातरी विचारात बाहेर गेले आणि रडणाऱ्या अर्पिताला पाहून जवळ बोलावले ,आणि तिला विचारू लागले खरा खरा हा प्रकार काय आहे ते सांगा ... अर्पिता खूप घाबरली होती आणि परत पोलीस पाहून तर जास्तच रडू लागली ...
मुग्धाने अर्पिताला शांत केले आणि सगळा प्रकार सांगितला ..
हे सर्व  ऐकून ते  अर्पिता आणि मुग्धाला घेऊन ज्या रूममध्ये अनिकेत होता तिथे  गेले .. अनिकेतचे सगळे मित्र तिथेच होते ,, अचानक मुग्धा आणि अर्पिता पोलिसांसोबत पाहून सगळ्याचे चेहरे पांढरे पडले ... सगळेच तिथून निघून जात होते पण दाराजवळ आणखी दोघे उभे होते त्यामुळे ते गपचूप आत येऊन उभे राहिले ..
अनिकेत तर तिथून उठूच शकत नव्हता .. त्यामुळे अवीनी त्याला काही विचारायच्या आधीच तो बोलू लागला....
सॉरी अर्पिता !!! मला हे असे करायचे नव्हते पण मला तुझा खूप राग आला म्हणून मग मी ......
अर्पिता त्याच्याकडे पाहतच होती तो हे सगळे काय बोलत आहे ?
" अनिकेत नीट सांग मला काहीच समजत नाहीय तुला काय म्हणायचे आहे ते ?" अर्पिता त्याला म्हणत होती ..
अर्पिता तुझ्या मोबाइलवरून मीच सगळयांना मेसेज केले होते ... पार्टीला या म्हणून ,, आणि सगळयांना सांगितले होते कि तिथे जाऊन दंगा घालून मगच परतायचे .. ..आणि हे सगळे माझ्यावर येऊ नये म्हणून मी तुला फोन केला सांगायला ,,  त्यानंतर अचानक मी मुग्धाला बाहेर पडताना पहिले मला सगळ्यात जास्त राग मुग्धाचाच आला होता , कारण तिच्यामुळेच तू मला पार्टीसाठी नाही म्हणाली होतीस ...  म्हणून मी मुग्धाच्या मागे मागे जाऊ लागलो .....
 "मुग्धा तू तर मला सांगूनच गेली होतीस ना कि मी १० मिनिटात जाऊन येते .. पण कुठे ते काहीच नाही सांगितले !!!" अर्पिता तिला विचारत होती ..
अग आपली गडबड चालुच होती आणि तितक्यात मला या अविकाकांचा फोन आला कि ते इकडे आले आहेत आणि आपलाही प्रॉब्लेम सुटेल म्हणून मी त्यांच्याकडे येत होते तर .. मी येत असताना मला असे जाणवले कि माझा पाठलाग कुणीतरी करत आहे !!! मी पुढे जाऊन थांबणार होते  तर मागे याची गाडी खड्डयात कोसळली मग इथे त्याला  घेऊन आले...
आणि अविकाकांना सगळे सांगितले ,, त्यांना असे वाटले कि यात काहीतरी गडबड आहे म्हणून त्यांनी मला सांगितले होते कि मी त्यांना ओळखते असे नाही दाखवायचे ...
आणि पुढचे सगळे तर तुला माहित आहेच .... इतक्या कमी वेळात इतके सगळे घडले अर्पिता कोसळतच होती तितक्यात मुग्धाने तिला सावरले .. आणि बाहेर घेऊन गेली
इकडे अनिकेत अवीची माफी मागत होता ,, असे कधीच परत करणार नाही म्हणून .... पण अविने त्याला सांगितले कि अर्पिताचे जे काही म्हणणे असेल त्यावर ठरेल तुझे काय करायचे ते .... !!!!
मुग्धा आणि अर्पिता बाहेर येऊन शांत बसल्या होत्या काहीच न  बोलत योगायोगाने एक अपघात घडता घडता टळला होता !!!







Thursday, October 13, 2016

शेजारी शेजारी

आमच्या घराशेजारी एक काका काकू राहतात , म्हणजे  ज्यावेळी आम्ही आमचे मूळगाव सोडून कवठेमहांकाळला राहायला आलो त्यावेळी आम्ही त्यांच्या तिथे राहायला आलो  . मी  ३ वर्षाची असेन . 
त्यावेळी पासून हे काका काकू आमच्या ओळखीचे , शेजारचे आणि हळूहळू जशी  रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती जवळ होत जातात तसेच त्यांचे आणि आमचे सूर जुळत गेले .. 
आम्ही राहायला जाण्याआधी नुकतेच त्यांचे लग्न झाले होते , काकूही नवीन होत्या त्यांच्यासाठी ते सासर होते त्यामुळे कधी काही वाटले कि आईशी येऊन बोलत , त्यांचेही मन हलके व्हायचे तेवढाच त्यांना मोकळेपणा मिळत असे . 
 ते आणि आम्ही जास्त काही नाही पण ३-४ वर्ष त्याच गल्लीत एकत्र होतो परत आमचे स्वतःचे घर झाले आणि आम्ही थोडे दूर आलो त्या गल्लीपासून फार नाही पण ५-१० मिनिटाच्या अंतरावर ... 
फक्त घर दूर झाली मने नाही ... त्यामुळे येणे जाणे चालूच होते . 
पुढे काका काकू वेगळे राहायला लागले त्यांनाही दोन मुले झाली ,,, एका मोठ्या घरातून फक्त एका खोलीच्या घरात त्यांना संसार करावा लागत होता .. पण त्यातही ते इतके सुखी आणि आनंदाने राहत होते ,, कधीच त्यांनी कोणत्याही गोष्टीची  तक्रार नाही केली .. जे आहे त्यात समाधान मानले .. 
त्यात त्या दोघांचे शिक्षण फार नाही त्यामुळे कायमस्वरूपी अशी नोकरी नाहीच ,,काका  सारखे काही ना काही नवीन उदयॊग करत पण त्यातही यश असे नाहीच .. काकूही  जमेल तसे शेतात , कधी कुठे मिळतील ती कामे करत त्यांच्या संसाराला हातभार लावत .. विशेष म्हणजे त्यांची परिस्थिती नसून सुद्धा ते सगळ्याना इतकी मदत करतात आणि त्याचा कधीही कांगावा करत नाहीत ,, कधीही जा त्यांच्याकडे नेहमी हसतमुख मिळतील , 
आपल्या दुःखाचे कधीच भांडवल करणार नाहीत ... 
काकू अळूवड्या खूप छान करतात , आणि आमच्या घरी तर खूप फेमस आहेत त्यामुळे आमच्या तिघांपैकी कुणीजरी घरी गेले तरी वड्या घेऊन त्या स्वतः येतात अगदी न सांगता .. आईला जरा जरी बरे नसले कि नेहमी मदतीला असतात .. त्यांना कधीच काही बोलावे नाही लागत ... एखादी गोष्ट आपण कुणालातरी अधिकारवाणीने सांगू शकतो त्यातले हे कुटुंब आहे ... 
चांगले शेजारी मिळायलाही नशीब लागते ,, फक्त एक हाक मारली तर धावून येईल इतकी जवळची माणसे ,, मी आईला खूप वेळा विचारले कि हे दोघे आपल्यासाठी इतके का करतात ?  त्यांच्यासाठी आपण  खास असे काहीच केले नाही  तरीही  ?? फक्त वेळोवेळी त्यांच्या साथीला उभे राहतो इतकेच !!!!! 
"आपले बोलणे गोड़ , मन शुद्ध ,चांगले असले कि सगळे आपोआप होते आपण काहीच करावे लागत नाही " आमच्या आईचे उत्तर !!! 
खरेच ना काही नाती मनाने किती घट्ट जोडली जातात कळतच नाही ... कधी केव्हा कशी ???
आजही नियती त्यांची परीक्षा घेतच आहे पण तरीही ते ठामपणाने तिच्यासमोर उभे आहेत आणि नेहमीच राहतील ... 


Tuesday, October 11, 2016

सीमोल्लंघन

रोज विचार करत असते कि काहीतरी नवीन करायचे  ,, नवीन म्हणजे अगदी काही एव्हरेस्ट सर करायचा असले कि नाही ,, अगदी छोट्या छोट्या गोष्टी बदलायच्या .. नवीन काही ना काही वाचायचे , काहीतरी लिहायचे किंवा घरातून बाहेर पडून अगदी थोडा वेळ का भटकून यायचे ... पण  कितीतरी दिवस झाले यातले काहीच होत नाहीय .. माझा आळशीपणा कि आणखी काही ?
किती दिवस झाले एक मस्त पुस्तक घरी आणून ठेवले आहे रोज उद्या उद्या म्हणत वाचायचे होतच नाहीय....  सकाळी उठले लॅपटॉप चालू केला कि तिथेच संपले सगळे !!!! थोडा थोडा वेळ म्हणत फेसबुक , ब्लॉग , काही ना काही करत कसा दिवस या नेटवर जातो कळत नाही ... आणि सोबतीला असतेच माझी वामकुक्षी !!! एकदा झोपले कि नवरोबाचा कॉल आला कि मग उठायचे !!! हे रोजचेच आणि आज परत काही नवीन केले नाही म्हणून चिडचिड .... 
कळते आहे सगळे पण वळत काहीच नाही आहे त्याचा सगळं गोंधळ आहे !!! खरेच ना इतके कशी या सगळ्यात वाहून जाते  लक्षातच येत नाही .... सेल्फ कंट्रोलचा  अगदी बोऱ्या वाजलेला आहे . टेक्नॉलॉजी आडिक्ट म्हणतात त्यातला प्रकार आहे ... आता हेहि मला गूगल बाबानी सांगितले इथेही आली तीच परत  
 टेक्नॉलॉजी ... 
या काही तक्रारी नाहीत काळासोबत पुढे जायला तर हवेच पण सगळ्या गोष्टी प्रमाणात हव्यात नाही का ?  नाहीतर म्हणलेच आहे अति तेथे माती !! 
आज दसरा नवीन सुरुवात ,,, स्वतःला घालून दिलेल्या या सिमा , चौकटीतून बाहेर पडून नवीन सुरुवात करण्याचा दिवस ... किती जमेल माहिती नाही  , इतके दिवसाची झालेली सवय , स्वतःच आखलेली एक चौकट ,कंफर्ट झोन सोडणे जरा कठीणच असते ..  
पण तरीही प्रयत्न करायचा .. वर्तमानात जगण्याचा .... 
 असो ... 
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!!
सोने घ्या सोन्यासारखे राहा .... नेहमीच चमकत !!! 

Thursday, October 6, 2016

अबोली

अबोलीने इंजिनीरिंगची परीक्षा  नुकतीच पास केली आणि ती स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून पुण्यात आली .. पुण्यात एका हॉस्टेलमध्ये राहून ती कुठे एखादा पार्टटाइम जॉब मिळतो का हेही शोधत होती ..
मध्यमवर्गीय घरातील मुलगी ,तिच्यामागे अजून एक बहीण आणि भाऊ होता . आणखी घरच्यावर भार न होता तिला आपले करियर घडवायचे होते . 
अबोलीचे आई बाबा तिच्यापाठी नेहमीच होते , पण वयात आलेल्या मुलीची जशी सगळ्या पालकांना काळजी असते तशी त्यांनाही होती . अबोलीचा मामा तिच्यासाठी एक स्थळ घेऊन आला होता . मुलाचे शिक्षण अबोलीपेक्षा कमी होते पण घरची परिस्थिती उत्तम होती .. मामाच्या आग्रहामुळे अबोलीच्या घरच्यांनी बघण्याचा कार्यक्रम ठरवला आणि रीतसर तो पारही पडला .  तिच्या लग्नामुळे नाही म्हणले तरी आई वडिलांवरचा भार थोडासा का होईना पण कमी तर नक्कीच होणार होता त्यामुळे अबोलीच्या मनाची चलबिचलता होत होती ... ते आई बाबानी ओळखले आणि तिला सांगितले , 
" हे बघ बेटा , हे तुझे पहिलेच स्थळ आहे,  त्यामुळे आपण अजून मुले पाहू तुला याच मुलाशी लग्न करायला हवे असे काही  नाही " तिलाही ते पटले आणि ती परत पुण्याला निघून गेली . 
एक दिवस सकाळी क्लासला  जाताना एक मुलगा तिला तिथे बाहेर दिसला , ती जशी जवळ जाऊ लागली तशी तिची खात्री पटली अरे हा तर तोच , त्या दिवशी मला पाहायला आलेला राहुल !!!!"  हा इथे कसा ? "
स्वतःच्या मनातच विचार करत ती पुढे जात होती तर , राहुलने तिला थांबवले आणि तिला विचारू लागला 
," तू मला नाही का म्हणाली ? मी तुझ्यापेक्षा कमी शिकलो होतो म्हणून का ? " यावर तिला काय उत्तर द्यावे ते  समजेना तो तिला खूपच दमदाटी करू लागला , रस्त्यात तमाशा नको म्हणून तिने त्याला काहीतरी सांगितले आणि तो तिथून निघून गेला .. कशीतरी अबोली क्लासमध्ये पोहचली . 
होस्टेलला परत जाताना हा तिथेच होस्टेलच्या बाहेर उभा !!! तिला परत तेच प्रश्न .. आणि यावेळी तर त्याने तिला स्पष्ट सांगितले , " तू मला खूप आवडली आहेस त्यामुळे तू लग्नाला तयार होईपर्यंत मी तुझा असाच पाठलाग करणार .. "
हे ऐकून तर अबोली रडायलाच लागली तिच्या मैत्रिणी तिला तिथून घेऊन गेल्या .. पण राहुल रोजच तिच्या क्लास बाहेर , होस्टेलबाहेर थांबून तिला त्रास देऊ लागला .. 
एक दिवस तर त्याने कहरच केला ती सुट्टीसाठी घरी गेली होती त्यावेळी तो तिच्या घरी गेला आणि  तिच्या आईबाबांना म्हणू लागला कि आज मी एक फ्लॅट घेतला आहे आणि त्याची पूजा अबोलीनेच केली पाहिजे आणि तिने तसे नाही केले तर पुढे जे काही होईल ते तुम्हाला खूप त्रासदायक ठरेल .. आणि त्यांच्या घरासमोरच बसून राहिला बराच वेळ झाला तरी तो तिथून जाईना , सगळे शेजारी पाजारी गोळा होऊ लागले .. सगळ्यांसमोर दंगा नको म्हणून अबोलीचे बाबा तिला त्याच्या नवीन फ्लॅटमध्ये घेऊन गेले तिने पूजा केली .. आणि ते परत घरी आले . 
यांनतर अबोली मात्र थोडी बदलली तिला असे वाटू लागले कि आपल्यावर इतके वेड्यासारखे प्रेम  कोण करू शकते ? या विचाराने एकीकडे ती सुखावत होती ,पण मनात तिला त्याची भीती वाटत होती .. 
यानंतर त्यांचे रोजच फोनवर बोलणे सुरु झाले , तीही त्याला भेटायला जाऊ लागली .. कुणाशी तरी लग्न करायचे हा आपल्यावर  इतके प्रेम करतो मग यांच्यासोबतच का नको ? हा विचार तिने घरी सांगितला . 
तिचे बाबा तिला परोपरीने समजावत होते कि नीट विचार कर मग निर्णय घे , कोणतीही घाई नको करू .. पण अबोली काही ऐकूनच घेत नाही म्हणल्यावर तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न लावून दिले . 
अबोलीला पुढे शिकायचे होते म्हणून राहुलने तिला पुण्यात राहा म्हणून सांगितले तोही तिला भेटायला येत असे.... 
थोडे दिवस गेले आणि राहुलचे खरे रूप तिला समजायला लागले ..... 
ती क्लासमध्ये गेली कि हा तिच्या मागे जाणार , ती मुलीसोबत बसते का ते बघणार ? मुले मुली सोबत बसत असतील तर त्या क्लासमध्येच दंगा घालणार ... अबोली तर शरमेनेच मरून जायची पण त्याच्यासमोर बोलण्याची तिची हिम्मत नव्हती . 
रस्त्यावरून जाताना मैत्रिणीसोबत बोलायचे नाही हसायचे नाही ... तिने स्वतः हुन कुणालाही फोन करायचा नाही , त्याचा फोन आला कि तो पहिल्या रिंग मध्येच उचलायला हवा नाहीतर तिची काही खैर नाही .. वेगवेगळ्या प्रकारे तिला धाकात ठेवायचे त्याने सुरु केले होते ... त्याच्या आई वडिलांचा त्याला पाठिंबा होता !!
एक दिवस अबोलीच्या बाबांनी त्याला समजवायचा प्रयत्न केला तर , त्याने त्यांना स्पष्ट सांगितले कि आज पासून तुम्ही अबोलीशी बोलायचे नाही .. आणि अबोलीलाही बजावले ...
याघटनेनंतर अबोलीचे आई बाबा तिला घटस्फोट घे म्हणून मागे लागले तर त्याने  अबोलीला सांगितले कि जर तू असा विचार जरी केलास तरी तुझ्या बहिणीचे आयुष्य उध्वस्त करेन .. 
अबोलीची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती आपल्याच हाताने आपले मरण ओढवून घेतले असे तिला राहून राहून वाटे .. 
राहुलचे कुणीही मित्र मैत्रीण आले कि हिने तो सांगेल तितकेच त्यांच्याशी बोलायचे ,, एक चालत बोलता कठपुतळी बनली होती तिची .. .. 
राहुलसोबतच ती त्याच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती त्यावेळी तिचा कुणीतरी एक मित्र तिथे आला होता तो अबोलीला पाहून तिच्याशी बोलायला आला ,, त्याला पाहून अबोली तिथून जात होती पण तो तिला हाक मारत आला हे पाहून राहुलला खूप राग आला त्याने तिथेच अबोलीच्या कानफटात मारली आणि त्या मित्राची कॉलर धरून त्याला मारू लागला ... तिथल्या लोकांनी राहुलला आवरले नाहीतर तो बिचारा तिथेच मेला असता ... 
एका वर्षात अबोलीला त्याने तिचे जगणे नकोसे केले होते .. जिथे ती जाईल तिथे बंधने ... !!! सगळे सोडून परतही जाऊ शकत नव्हती ... 
आणि शेवटी तिने निर्णय घेतला बस आता सगळे संपवायचेच ... 
पण त्यावेळीच तिला जाणीव झाली कि आता जगायला हवे सगळे संपवून नाही चालणार ... या छोट्या जीवासाठी तरी जगायला हवे ... 
इतकी गोड़ बातमी मिळूनही राहुलच्या वागण्यात तसूभरही फरक पडला नाही त्याला आणखीन एक नवीन विषयच मिळाला बोलायला .. त्याला तिच्या पोटातले बाळ कधीच त्याचे वाटले नाही .. 
यानंतर मात्र अबोलीचा संयम सुटला ... आणि ती राहुलाला बोलू लागली .,, इतके दिवसाचा राग , त्रास मनातील कोंडमारा सगळा बाहेर पडत होता ... पण याचा त्रास झाला तो त्या बाळाला आणि कळी जन्माला येण्याआधीच कोमेजून गेली .. 
हा आघात अबोलीसाठी खूप मोठा होता यात ती स्वतःला हरवत गेली ती कायमचीच ..... 





Sunday, October 2, 2016

आनंदी

" तुला आधीच सांगून ठेवतोय यावेळी पोरग झालं तर तू घरी येशील  नाहीतर कायमच तोंड काळ करशील समजल का ? " सविताचा नवरा तिला सांगत होता .
लग्न झाले तेव्हा सगळे गोड गोड असणारे वातावरण आंनदीच्या जन्मानंतर  बदलेले होते . आनंदी सविताची पहिली मुलगी .... 
लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आणि आणि तिला आपल्या आई होण्याची चाहूल लागली , सविताने नवऱ्याला सांगताच तो तर आनंदाने वेडा होऊन गेला  सासूपण अगदी आनंदाने कौतूकाने तिचे डोहाळे पुरवीत होती  .. 
आपले होणारे कौतुक पाहून सविताला तर स्वर्ग दोन बोटे उरला होता . 
भराभर दिवस जात होते , तशी सविताच्या माहेरची परिस्थिती बेताचीच पण लेकीचे पहिले बाळंतपण माहेरीच झाले पाहिजे म्हणून सविताची आई सातवा महिना लागल्यावर तिला घेऊन आली होती , सविताचे दिवस आनंदात जात होते म्हणता म्हणता नऊ महिने पूर्ण झाले आणि सविताने एक गोंडस मुलीला जन्म दिला .. मुलगी अगदी तिच्यावरच गेली होती ...
सविताच्या आईने तिच्या सासरी निरोप पाठवला एक दिवस गेला , दुसराही गेला पण कुणीच येईना तिला भेटायला .. बाळाच्या जन्मासाठी आतुर झालेली माणसे  कुणीच का येत नाही भेटायला ? सविताला कळत नव्हते कि बाळाच्या जन्माचा आनंद मानू का दुःख ? हि जन्माला आली आणि  माझी माणसे माझ्यापासून दूर गेली .. 
त्यावेळेपासूनच तिला तिची मुलगी नजरेसमोर नकोशी झाली .. 
यात त्या जन्माला आलेल्या लहानशा जिवाचा काय दोष होता ? हे तिला कळत होते पण ... 
एक दीड महिना माहेरी राहून छोट्या आनंदीला घेऊन सविता सासरी परत गेली पण ती आली काय किंवा गेली काय ? कुणालाच त्याचे काही नव्हते ... 
सविताला कळून चुकले कि आपल्याला पहिली मुलगी झाली म्हणूनच हे असे होत आहे .... 
सारखे सासूचे तिरकस बोलणे , नवऱ्याचे तिच्याशी नीट न वागणे याचा राग सर्वतोपरी त्या छोट्या आनंदीवर निघू लागला  तिलाही कळायचे नाही कि आपले काय चुकायचे !!!! 
परंतु वेळ सारखीच नसते  आणि परत एकदा सविताला आपल्या आई होण्याची चाहूल लागली ... पण यावेळी तिच्या सासूने आई नवऱ्याने तिला सांगितलेच होते मुलगा झाला तर घरी यायचे.. 
आनंदी तशी लहानच होती , आपल्यासोबत काय होते ? आजी, बाबा आपल्यासोबत नीट का नाही बोलत ? सारखे  का रागवतात ? हे तिला कळत नसे ... आणि सविताही कधी कधी तिच्यावर राग काढत असे त्यामुळे आनंदी शांतच होत होती . तिला आता फक्त इतकेच माहिती होते आपल्या आईला एक छोटे बाळ होणार आहे त्यामुळे तिला त्रास द्यायचा नाही . मुळातच शांत असणारी आनंदी यामुळे आणखी शांत होत गेली . 
नवऱ्याने आधीच सांगितल्यामुळे तिच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार होती , कितीतरी देवांना नवस बोलून तिने पाण्यात ठेवले होते आणि अखेर ते तिच्या कामाला आले आणि सविताला मुलगा झाला ... 
यावेळी तिच्या नवऱ्याने,  सासूने मोठ्या थाटामाटात बाळाचे बारसे केले , सविताचे थोडेसे कौतुक होऊ लागले यात सवितालाहि आनंद होत होता पण या सगळ्यात आनंदी कुठेतरी मागे पडत होती , तिच्या बालमनावर  आतापासूनच एक मुलगी असण्याचे ओरखडे उमटत होते .. 
अभि आनंदीचा लहान भाऊ सगळ्याचा खूप लाडका ,, आनंदीचासुद्धा   ,... 
अभि आणि आनंदी मोठे होत होते .. सगळे अभिचे लाड करत त्याला काय हवे ते नको बघत पण अभिला मात्र त्याची ताई खूप प्रिय होती त्याचे सगळ्यात जास्त प्रेम आपल्या ताईवर होते .. त्यालाही समजत होते आई सोडले तर जास्त कुणी ताईशी बोलत नाही , तिचे लाड कुणी करत नाही .
त्याने एकदा ताईला विचारले होते ताई हे सगळे असे का वागतात , त्यावेळी नेमकी तिथे आजी आली आणि तो विषय तिथेच थांबला . 
आनंदी शाळेत खूप हुशार होती , अभिला अवघड वाटणारे विषयही ती अगदी सोपे करून सांगायची त्यामुळे अभिला आपल्या ताईचा आणखीच अभिमान होता .. 
सविताला असे आपल्या दोन्ही मुलांना एकत्र पहिले कि समाधान वाटत असे जे ती तिच्या मुलीसोबत मोकळेपणाने बोलू शकत नाही याचे तिचे दुःख थोडेतरी कमी होई .. 
अभिला आता कळू लागले होते कि एक मुलगी आहे म्हणून आपल्या ताईला इतकी बंधने आहेत , ती मुलगी आहे म्हणून आजीला , बाबांना ती आवडत नाही .. त्यानंतर तर तो आपल्या ताईची जास्त काळजी घेऊ लागला...
आनंदीचे यावेळी बारावीचे वर्ष होते , त्यानंतर तिला शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार होते ... प्रश्न होता तो तिच्या घरच्यांचा ते तिला शिकण्यासाठी पुढे पाठवतील का ? तिच्या आजीने तर आतापासूनच तिच्यासाठी स्थळे पाहायला सुरुवात केली होती .. या सगळ्याची कुणकुण अभिला लागली तसाच तो आजीकडे गेला आणि तिला सांगितले कि जर ताईला तुम्ही पुढे नाही शिकवले तर मीहि उद्यापासून शाळा सोडेन घरीच राहीन ...
आजीने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण अभि काही ऐकून घेईना शेवटी त्याच्या ताईने समजावले तरी तो ऐकेना म्हणल्यावर आजीचा नाईलाज झाला , पुढच्या शिक्षणासाठी आंनदीला बाहेर पाठवले .
 आनंदी मुळातच हुशार आणि लाघवी त्यामुळे कॉलेजच्या वातावरणात लगेच मिसळून गेली .  आनंदी नव नवीन यशाची शिखरे गाठत होती ..  त्यातूनच तिला जॉबचा कॉल आला ...
तिने हि बातमी सगळ्यात आधी अभिला फोन करून सांगितली , तसा अभि खुश होऊन तिला भेटण्यासाठी म्हणून येऊ लागला आणि येताना त्याच्या बाइकचा अपघात झाला ..
त्याला तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी दवाखान्यात ऍडमिट केले , आणि घरी फोन करून सांगितले तसे सविताला काही सुचेना  ... सगळा दोष परत आनंदीच्या माथ्यावर आला होता  सविता , तिचा नवरा , आणि सासू दवाखान्यात पोहचले पण त्याच्या आधीच आनंदी तिथे होती ...
इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपले कसे होणार याच्या विचारानेच सविता आणि तिचा नवरा कावरा बावरा झाला होता पण आनंदी सगळे अगदी मोठ्या हिमतीने करत होती , अभिला लागणारे रक्त यासाठी  तिने तिच्या मित्र मैत्रीणीना बॊलवून घेतले होते , औषधे , सगळ्या टेस्ट यासाठी तिला सगळेच खूप मदत करत होते.
हे सगळे पाहून तिच्या आजीला आणि बापाला काय बोलावे हे कळत नव्हते , सविताला मात्र आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटत होता .  सगळे मार्गी लागल्यावर आनंदी आजीजवळ आली आणि म्हणाली , " आजी काही झाले तरी माझ्यामुळे मी अभिला काही होऊ देणार नाही , आजवर त्याने माझ्यासाठी खूप केले पण आता माझी वेळ आहे ." इतके सगळे आजीशी बोलण्याची आनंदीची पहिलीच वेळ होती ...

अभिला बरे होण्यासाठी दोन महिने लागले पण त्यासाठी आंनदीने तिचा जीव ओतला ... अभि बरा झाला त्यावेळी त्याने पहिला प्रश्न हाच विचारला , " ताई ?"
 त्यावेळी हसरी आनंदी तिच्या आजीसोबत त्याच्याजवळ आली ...
ते पाहून अभि चक्रावला इतके सगळे अचानक ?
आनंदीची वेगवेगळी रूपे तिच्या आजी आणि वडिलांना पाहायला मिळाली होती तीच कि जी एक मुलगीही करू शकते , आनंदीने त्यांना दिलेला आधार , अभिची काळजी ... आणि बरेच काही
अभिच्या आजरपणामुळे का होईना पण आनंदींच्या आयुष्यात आज खरेच आनंदी फुलली होती ..