Tuesday, June 28, 2016

एक आजी इकडची आणि तिकडची




                          भारतातून अमेरिकेत येऊन आजीला ३-४ महिने झाले होते , आजीच्या स्वभावामुळे शेजारच्या जेनी आजीशी लगेच तिची गट्टी जमली . जेनी आजीला पण बोलायला खूप आवडायचे , आम्ही तिच्या घराशेजारी राहायला जायच्या आधीही तिथे एक भारतातीलच कुटुंब होते त्यांच्यामुळे आजीला थोडे थोडे हिंदी यायचे  . माझी आजी शुद्ध मराठी बोलणारी पण इतक्या लांब येऊन मैत्रीण मिळत आहे बघून तीही जेनी आजीशी  तोडके मोडके मराठी मिश्रित हिंदी बोलायची . दोघींचे बोलणे ऐकून बाकींच्याची छान करमणूक व्हायची .

जेनी आजी रोज सकाळी लवकर उठून  ताजा ब्रेड आणि भाजी आणायला बस मधून जात असे ,  तसे म्हणले तरी तिचे वय सत्तरीच्या पुढे असेल पण तिच्याकडे बघून अजिबात तसे वाटत नव्हते .  रोज ताजा मल्टिग्रेन ब्रेड , भाज्या , दूध यामुळे मी इतकी फ्रेश असते असे तीच म्हणत असे . तिच्या गोऱ्या लालसर गालावरच्या  सुरकुत्या ती हसल्यावर आणखीच गोड दिसत . कधी कधी ती माझ्या आजीलाही सोबत घेऊन जात असे आणि माझी आजी म्हणजे सगळे गूगल तिच्या सगळ्या घरादाराची माहिती हिला एका आठवड्यात कळाली . 
                        इतके दिवस आम्हाला माहीतही नव्हते की जेनी  आजीला दोन मुले आणि एक मुलगी आहे सगळे इथेच रहातात पण जरा दूर आहेत , कधी कधी ते येत असतात कधी आजी  तिकडे जात असते . 
तसे मुले असून एकटेच राहणे इकडे काही फार मोठी गोष्ट नाही. पण तरीही लहानपणापासून तसे संस्कार असलेल्या मनाला थोडे खटकतेच . 
उन्हाळा सुरू झाल्यावर तर या दोन मैत्रिणीचे संध्याकाळी फिरायला जाण्याचे प्लॅन बनू लागले , दोघी निवांत भटकून येत असत आणि जेनी आजीला सगळी माहिती होती त्यामुळे काळजीचे काही कारण नव्हते . 
ती आजीला इकडच्या रितीभाती सांगत असे तर आजी तिच्या ... 
माझ्या आजीने जेव्हा जेनी आजीला सांगितले की तिचे लग्न ती फक्त १५ वर्षाची असताना झाले होते तेव्हा तिला खूपच धक्का बसला होता . मग काय आजीने कॅसेट सुरू केली कशी तिची सासू होती , एकत्र कुटुंब , सगळ्याची खाणीपिणी आवड निवड .....  ती आज ती कशी आहे यावर येऊन संपली . 
जेनी आजीही काही कमीची नाही तिनेही तिचे बॉयफ्रेंड कसे होते परत तिचे लग्न कसे झाले हे सांगितले  अशाच त्यांच्या गप्पा नेहमी रंगलेल्या असत . दोघीनांही एकमेकींची खुप सवय झाली होती पण आता आजीला भारतात परत जावे लागणार होते त्यामुळे होता होईल तेव्हढा वेळ त्या दोघी एकत्रच  घालवत . 
जेनी आजीला माझ्या आजीचे खूप कौतुक वाटत असे  , ती तिच्या मुलांबरोबर राहते , सगळे गुण्यागोविंदाने राहतात . मुले आपल्या आईचा ,नातवंडे आजीचा मान ठेवतात . हे सगळे तिने आजीला एकदा बोलूनही दाखवले .
                त्यावेळी माझी आजी म्हणाली अग बाई दिसते तसे नसते , आता माझ्या पूर्वपुण्याईने म्हण किंवा आणी काही म्हण निघाली माझी मुल चांगली , ती आपल्या आई वडिलांचा मान  ठेवतात पण सगळीकडे असे आहेच असे नाही  . आमच्या इथेही  कमी वृद्धाश्रम  नाहीत , मुलांचे सुनेचे पटत नाही म्हणून वेगळे राहावे लागणारेही आहेतच  पण टाळी कधी एका हाताने वाजत नाही ना ग !!!!
 जेनी आजी म्हणाली , असेलही असे पण आमच्या इथे मुलांना लहानपणापासूनच स्वतंत्र आयुष्य जगायची मुभा दिली जाते त्याची स्पेस जपली जाते , पण इथे आम्हीच कुठेतरी कमी पडतोय ग असे वाटते पुढे जाऊन ....... संपूर्ण आयुष्य स्वतःच्या विचारानुसार घालवलेले असते पण कधी तरी यावेळी एकटी असे बसले असताना कुणाची तरी सोबत असावी असे मनापासून वाटते . 
 
मला वाटत होते की तुझे आयुष्य माझ्यापेक्षा किती सुरेख आहे कसली चिंता नाही फक्त आपण आणि आपले आयुष्य जगायचे , कुणी अडवणूक करायला नाही की विचारायला नाही  की ,  तुम्ही असे का करता ? इतका पैसा या वयात कशाला लागतो तुम्हाला ? आधी  सासरचे परत मुलांना शिंगे फुटली की ती !! सगळे त्यांच्या म्हणण्यानुसार जगायचे यात आपल्यासाठी म्हणून असा वेळच नाही कधी मिळाला ..... आजी बोलत असताना जेनी आजी मध्येच म्हणाली ,  हो खूप घेतला वेळ स्वतः साठी पण जेव्हा कधी अशी तुमच्या लोकांची एकत्र आई बाबा मुले आजी आजोबा अशी फॅमिली पहिली की वाटते आपण कधी का नाही बसू शकलो या फ्रेम मध्ये ?  लहानपणापासून आम्ही जे पाहिले तेच केले .. कधी आम्ही मुलांना वेळ दिला नाही की मुलांनी आम्हाला ... 

जेनी , आमच्यातही असेच आहे ग लहानपणापासूनचे संस्कार जे आमच्या आई बापाने केले तेच आम्ही करत आहोत तेच चूल मुलं , रांधा वाढा ... सणवार ... मुली सुनांचे बाळंतपण .... सगळ्यांचे केले पण ....... !!!!
पण हा  असतोच ग शेवटी कुठे ना कुठे  ... नाहीतरी म्हणलेलेच आहे  , " जगी सर्वसुखी असा कोण आहे , विचारे मना शोधूनि पाहे ! "
जेनी आजीला काही कळाले की नाही ते माहीत नाही पण तिने मान डोलावली आणि हलकेच डोळे टिपले आणि आजीनेही ... !!!

 


 
 

Wednesday, June 22, 2016

भातुकली

" ए नाही ग ! आज माझा बाहुला आणि तुझी बाहुली .. नेहमी का म्हणून माझ्या बाहुलीने सासरी जावे कधीतरी येउदे ना तुझी बाहुली पण माझ्या घरी !"
नेहमी चित्रा माझ्या बाहुलीला घरी घेऊन जात असे म्हणून आज मी  तिचे काही एक ऐकायला तयार नव्हते . आज माझा बाहुला आणि तिची बाहुली असा हट्टच होता  माझा ...
मी आणि चित्रा नेहमी आमच्या गच्चीवर हा आमचा भातुकलीचा डाव मांडायचो . तिची थोडी खेळणी आणि माझी अशी मिळून आमची दुपार मस्त जायची कधी कधी घरचे ओरडायचे बास करा आता, खऱ्याखुऱ्या संसारावेळी नाकी नऊ येतील आता खेळताय लुटुपुटुचा खेळ !!!
तेव्हा हे कळण्याइतके ना ती मोठी होती ना मी आमचे आपले विश्वच होते त्यात रमलेल्या आम्ही दोघी ..

मला भातुकलीची खूप आवड कुठेही गेले तरी मी  घरी येताना घेऊन येत असे ,, अजूनही माझ्याकडे लाकडी , स्टील , चिनीमाती ,प्लास्टिक सगळ्या भातुकली आहेत .
 दुपारच्या वेळी माझा अन तिचा डाव रंगलेला असायचा कधी बाहुला बाहुलीचे लग्न , कधी बारसे , तर कधी एकमेकींचे वाढदिवस ...  वाढदिवसावेळी आम्ही मारीच्या बिस्किटाचा केक करायचो ..
दुपारी आई झोपली असताना हळूच एखादा बटाटा , कांदा , चिरमुरे , कच्ची मोहरी जिरे , तिखट सगळे गोळा करणार आणि आईने केलेल्या पोळ्यांचे छोटे छोटे घासाचे तुकडे करून ठेवायचे ...
जेव्हा आमची जेवायची वेळ असेल तेव्हा या कच्च्या भाज्या त्या पोळी सोबत खायच्या  आणि परत जसे मोठी माणसे जेवणानंतर गोळी घेतात म्हणून आम्हीही चिरमुऱ्याची गोळी घेत असू ....  किती निरागस विश्व असते बालपणाचे ...
जेवण झाल्यावर झोप मग परत खोट्या कपात खरे पाणी आणि  साखर  घालून तोच चहा म्हणून पिणार , संध्याकाळी  फिरायला बाहुला बाहुलीला घेऊन बागेत जायचे.
आमचा खेळ पूर्ण सुट्टीत रंगलेला असायचा आम्हाला दोघीनांही कधीही कंटाळा यायचा नाही . मला जितके आठवते त्याप्रमाणे आम्ही आठवी नववी पर्यंत आमचे हे उद्योग करत होतो .
नंतर भातुकली संपली आणि आम्ही शाळा सोडून कॉलेजला जायला लागलो , तिने जेमतेम बारावीची परीक्षा दिली असेल आणि तिच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवले  ... तेव्हा फक्त मला इतकेच कळत होते की ही आता माझ्या पासून दुरावणार ,माझ्या  लहानपणी आई सारखे एक गाणे म्हणायची

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी
 ज्यावेळी तिचे लग्न ठरले तेव्हा मला असे वाटले की हे गाणे आमच्या दोघींसाठीच आहे पण या गाण्याचा खरा अर्थ मला पुढे जाऊन समजणार होता हे तेव्हा कुठे माहीत होते ?
 ती तिच्या सासरी जाताना मी माझी बाहुली तिला दिली माझी आठवण म्हणून आम्ही दोघोही खूप रडलो शेवटी तिची पाठवणी झाली .
मीही माझ्या पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पडले . मी सुट्टीच्या दिवशी घरी जात असे तेव्हा कधीतरी ती आली असेल तर तिची माझी भेट होई लग्नानंतर फारच अबोल झाली होती ती .  मी तिला फोन करूनही बोलू शकत नव्हते , ती नवी नवरी तिकडे काय म्हणतील तिला म्हणून ... शेवटी सगळा काय तो समाज !!!!!

तसेही ती खूप सुखी असल्याचे मला सांगत होती पण एकदा तिची आई  बोलताना ऐकले होते की तिचा नवरा दारू पितो म्हणे !!!! आधी सगळ्यांना सांगितले होते नोकरी आहे पण तिच्या नवऱ्याने लग्न झाले आणि एक महिन्यात नोकरी सोडून दिली .. जणू काही फक्त लग्नासाठीच नोकरी करत होता , आता कसे होईल पॊरीचे या
विचाराने ती माउली अस्वस्थ होत होती ...
मला मात्र खूप राग येत होता याआधी सगळे नीट पाहता येत नव्हते का ? किती लवकर केले तिचे लग्न ? मी आईला म्हणत असताना आईने मलाच गप्प केले .... ??
 आता दिवाळी होती म्हणू मी घरीच होते तीही  येणार होतीच पहिला दिवाळी सण ...
ती आल्यावर मी तिला पाहून थक्कच झाले चक्क ती ५ महिन्याची गरोदर होती !! आणि मला कुणी काहीच सांगितले नाही अगदी आईनेही .....
आईचे मत पडले अशा गोष्टी लवकर उघड करत नाहीत ....  आता काय ती लवकर जाणार नाही हे माहितीच होते मला ... दिवाळी झाली मी कॉलेज साठी गेले तरी ती तिथेच होती आता म्हणे सगळे आवरून जाणार महाराणी !!! मला नेमका कुणाचा राग येत होता हेच कळत नव्हते ? एकतर हिचा नवरा स्थिर नाही त्यात हिची अवस्था!!!! या साध्या गोष्टी तिला कळू नयेत का ?
 एक दिवस दुपारीच आईचा फोन आला की चित्राला मुलगा झाला ,,, तरी बरे तिला मुलगा झाला म्हणून .... मुलगी असती तर परत तिच्या सासरचे काय म्हणाले  असते देव जाणे !!!!!

मुलाचे बारसे अगदी थाटामाटात केले त्यावेळीही मला आमच्या  भातुकलीचा डाव आठवत होता ... काल परवा पर्यंत खोटे  डाव मांडता मांडता आज ही खरी भातुकली उभीही झाली होती ....
 ती परत तिच्या सासरी राहायला गेली , आता तिचे येणे जाणे वाढले होते मुलामुळे ... ???
या सगळ्यात तिच्या चेहऱ्याचे हास्यच गायब झाले  होते  खूप चिडचिडी झाली होती !!!
पण दिवस नाही राहत कुणासाठी बघता बघता तिच्या मुलाचा पहिला वाढदिवस झाला .. आणि त्यानंतर एक दोन महिन्यातच तिच्या नवरा आजारी पडला अति दारूमुळे तिथून पुढचे पंधरा दिवसच सगळे आलबेल होते पण त्यानंतर सगळा खेळ संपला होता ......
त्यादिवशी प्रथमच ती लग्नानंतर  माझ्याजवळ खूप मनमोकळेपणाने रडली ... नियतीने तिची खूप परीक्षा घेतली होती अजूनही घेत आहे  कदाचित पुढे काहीतरी चांगले होईल तिच्यासोबत ....  पण त्यावेळी  मात्र  मला गाणे आठवत होते ....

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी ....

हुरहूर

आज ती ऑफिसमधून नेहमीपेक्षा जरा लवकरच आली , नुकताच पाऊस पडून गेला होता आकाश सगळे मोकळे होऊन मावळतीला जाणारा सूर्य त्याचे लाल ,केशरी रंग उधळत होता . हवेत थोडासा गारवा होताच हातात चहाचा काप घेऊन ती बाल्कनीत आली आणि त्या अस्ताला जाणाऱ्या लाल गोळ्याकडे पाहून तिच्या मनातील हुरहूर वाढू लागली ....
" का दिसला आज अचानक तो मला ? किती विसरायचा प्रयत्न करत होते मी त्याला ? आता कुठे त्याच्या शिवाय जगायची सवय होत होती आणि आज अचानक परत तो दिसावा ? "
त्याची आठवण नकोच म्हणून ती अशा या कातरवेळी कधीच एकटी राहत नसे , ती एकटी असली की  त्या दोघांनी एकत्र घालवलेल्या सायंकाळ , त्यांची ती स्वप्ने , सगळ्या सगळ्या गोष्टी तिच्या नजरेसमोरून अगदी सिनेमा सारख्या भरभर पळत .... 

 कॉलेजच्या शेवटच्या वर्षी हिच्या बाबांची अचानक बदली होऊन ते सगळे पुण्यात रहायला आले , अचानक तिचे सगळे विश्वच बदलले .. तिला एकटीला ठेवायची तिच्या बाबांची तयारी नव्हती त्यामुळे नाईलाजाने तिलाही सगळे सोडून यावे लागले होते , पण या नवीन कॉलेजमध्येही तिला खूप नवनवीन मित्र मैत्रणी मिळाले मुळातच ती खूप बोलकी तिचे सूर कुणाशीही पटकन जुळायचे . 
    यावेळी कॉलेज गॅदरिंग मध्ये तिने नाटकात भाग घेतला होता त्यांचे रोमँटिक नाटक  यात तो रोमिओ आणि ती ज्युलिएट इथूनच त्यांची खरी कहाणी सुरू झाली . नाटक करता करता कधी खऱ्या आयुष्यात ते एकमेकांचे रोमिओ ज्युलिएट बनले हे त्यांच्याही लक्षात नाही आले . नाटक प्रॅक्टिस करताना कधी कधी खूप उशीर होई त्यावेळी तो  तिला घरी सोडायला जाई , तिच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीही त्याच्या पटकन लक्षात येई त्याने त्यावर काही दाद दिली की हिने गोड स्माईल द्यावी .... 
असे हे चंदेरी दिवस पटकन सरतात तसेच झाले कॉलेजचे शेवटचे वर्ष संपले , दोघेही नोकरीच्या मागे लागली एकाच कंपनीत नसली तरी दोघानांही लवकरच चांगली नोकरी मिळाली .. रोज संध्याकाळी एकत्र भेटायचे टेकडीवर फिरायला जायचे मावळत्याला स्मरून खूप स्वप्ने रचायची आणि त्या स्वप्नांच्या इमल्यातूनच घरी परतायचे हेच त्यांचे रोजचे रुटीन .... 
तिच्या घरी याच्याबद्दल सगळे माहीत होते आणि तिच्या घरच्यांनाही काही अडचण नव्हती .. पण त्याच्या घरी अजून काहीच सांगितले नाही ... तसे म्हणायला त्याच्या आईला थोडी कुणकुण लागली होतीच पण तिने काही त्याला विचारले नव्हते .... त्याच्या बाबांना बिझनेस मधून सवड मिळेल तेव्हा खरे !! पण त्याच्या घरचे वातावरण जरा कडकच म्हणूनच तो सांगायला बिचकत होता ...... 
एक दिवस अचानक काय झाले माहीत नाही पण तो परदेशी उडून गेला हिला एकटीलाच मागे ठेवून काही न सांगता , काही न बोलता .... हिच्या मनाचा जराही विचार त्याने केला नाही ... मागे ही एकटीच सैरभैर झालेली....  कधी कधी टेकडीवर जाऊन बसे त्याच्या आठवणी काढत ,, 
किती दिवस ? किती रात्री ? शेवटी एके दिवशी तिने ठरवले आता जगायचे ते फक्त स्वतःसाठी आपल्या आई बाबांसाठी !!!!  आता कुठेतरी सगळे नीट होत होते आणि तो असा समोर अचानक !!!!
फोनचा आवाज ऐकून ती  तंद्रीतून बाहेर आली  रात्रीचे आठ वाजले होते हातातल्या कपात चहा तसाच होता  
त्याचाच फोन होता ... घेऊ का नको या विचारात असताना कधी कॉल रिसिव्ह झाला तिला समजेलच नाही 
 तो ........ 
ती .... 
अग बोल ना !
कॉल तू  केला आहेस तू बोल !!!
ऑफिस झाल्यावर भेटशील का मग बोलू ? 
तिच्या मनात नसतानाही तिच्या ओठांनी हो उत्तर दिले .... 
 आता वाट पाहायची ती उद्या संध्याकाळची ..... 
ऑफिसचा  तिचा दिवस लवकर संपेना तो काय सांगेल ? का माफी मागेल ? अजूनही त्याचे माझ्यावर तितकेच प्रेम असेल ? एक ना अनेक विचारांनी तिचे डोके भरून गेले होते . 
 शेवटी ते दोघे जिथे भेटायचे तिथे येऊन भेटले आणि आधीच्या त्यांच्या जागेवर जाऊन बसले ... आजही वातावरण तसेच होते मंद वारा , समोर तो लालबुंद गोळा , आजू बाजूला फिरायला येणारी माणसे ..... फक्त फरक होता तो त्यांच्या शांततेत .... नेहमी त्यांना हवी असणारी शांतात असायची त्यांच्यात पण आज असणारी ती वेगळीच होती .... 
त्यानेच विचारलॆ कशी आहेस ? 
बरी !!! एका शब्दात उत्तर .....  
मला माहीत आहे की तू माझ्यावर नाराज आहेस ते !! पण त्यावेळी माझा नाईलाज होता मला तसे वागावे लागले ... 
ह्म्म्म!!!! तिची नजर शून्यात होती ...
अग काहीतरी बोल ना ! तुला रागवायचे असेल तर रागाव ओरड माझ्यावर पण अशी शांत नको राहू ... 
ज्यावेळी मला खूप बोलायचे होते त्यावेळी  तू सोबत नव्हातास ,, ज्यावेळी खूप खूप ओरडायचे होते  रागावयाचे होते त्यावेळी मला आधार द्यायला तुझे खांदे नव्हते ... का ओरडू आता मी तुझ्यावर ? कशासाठी ?
तो .....  मला मान्य आहे ग !!! पण त्यावेळी बाबांनी मला अचानक परदेशी पाठवले , तुझ्याशी कोणताही संबंध नाही ठेवायचा असे सांगितले ... मी त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला पण ते काहीच ऐकत नाहीत हे पाहून मी हो म्हणालो आणि गेलो निघून मला वाटले थोड्या दिवसाने मी त्यांना समजावले तर ऐकतील माझे तिकडे असतानाही मी त्यांना खूप समजावत होतो पण काहीच फरक पडत नव्हता ... इतके दिवस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राहून त्याचे मन जिंकायचा प्रयत्न केला पण ते काही होईना म्हणून इकडे निघून आलो .... 

तुझे सगळे म्हणणे ठीक रे पण यात माझा विचार केलास का तू ? तुला वाटले गेलास सोडून तुला वाटले आलास परत ? यात मी आहे  का कुठे ? कधी एखादा फोन मेसेज मेल तरी करायचा ना मला ?
खूपवेळा वाटले ग  तुला फोन करावा पण काय करू धीरच होत नव्हता मला कसे बोलू तुझ्याशी नि काय बोलू ? आजही खूप हिम्मत करून आलो मान्य मला मी चुकलोय पण तू घेशील का मला समजावून ? 
ती ...... 
अग बोल ना काहीतरी ....  
मला खूप वाटतंय रे घ्यावे तुला समजावून , तुझ्या सगळ्या चुका माफ कराव्यात आणि एक नवीन आयुष्य सुरू करावे ... पण ...... 
तो पण  ...... ?? काय ... ? 
पण ते सारे इतके सोपे असते का ? या आठवणी पुसणे खरेच सोपे असते का ? आज हो उद्या नाही ? म्हणाले असते  तुला हो पण मी तिथून खूप पुढे आलीय .... खरेच तू सोडून गेलास याचे दुःख झाले मला , खूप रडले ,,, स्वतः बरोबर झगडलेही कधी कधी वाटलेही स्वतःला संपवून टाकावे ... पण परत खूप धीराने उभे केले आहे रे स्वतःला आता तिथून मला परत नाही जायचे मागे ...  परत कोसळले तर उभी राहीन याची खात्रीच नाही मला !! आज तू माफ कर मला ..... 
समोर सूर्य पूर्ण बुडाला होता तिची कातरवेळही संपत आली होती आणि आणि आता तिला याची कधी  हुरहूरही राहणार नव्हती आता कसे सगळे स्वच्छ झाले होते निरभ्र .....  



Tuesday, June 14, 2016

रेशीमधागा

तो असाच आहे झऱ्यासारखा अवखळ , नेहमीच प्रवाहात असणारा….  कधी अबोलच तर कधी कधी मनकवडा  काहीवेळा स्वतःत गुंग असणारा पण नेहमीच माझ्यकडे लक्ष देणारा …. आणि आता तो कसाही असला तरी माझा नवरा आहे .
कर्केचा तो हळवा अन धनुची  मी चिडकी तशी चंचलही … नेहमीच त्याने मला समजावून घ्यावे जरी तो चिडला तरी …. नेहमीच मी त्याला गृहीत धरत असते याची जाणीव आहे मला …. पण कसे समजावू या वेड्या मना ?
कधी कधी मी चिडते का ?  ते मलाच माहिती नसते पण तरीही त्यानेच येउन समजूत घालावी . त्या बिचाऱ्याला हेही माहित नसते कि काय झाले ? आणि त्याने कितीही विचारले तरी त्याचे उत्तर माझ्याकडे नसते !!! पण त्याने प्रेमाचे दोन शब्द बोलावे हि अपेक्षा असते … मलाही कळत असतो माझा वेडेपणा पण ती वेळच  असते वेडी  …
 मी वारा येईल तसा वाहणारी पण तो अचल पर्वत माझ्यासाठी नेहमीच स्थिर . या लहरी वाऱ्याने कधी कधी उठतात छोटी छोटी वादळे पण तीही आली तशीच शमून जातात … या वादळाची निर्मिती  हि अशीच असते , त्या नंतरची गोडी गुलाबी निराळीच असते … 
आज पर्यंत सगळ्याच गोष्टी न मागता मिळालेल्या यातील हि एक अनमोल भेट ….
साथ तुझी माझी  जन्मोजन्मीची
ओढ तुला अन मला एकमेकाच्या प्रीतीची
सहज गुंफला वीण हा रेशिमधाग्याचा
हाच आलेख आपल्या तीन वर्षाच्या सहजीवनाचा

रेशीमधागा 

Tuesday, June 7, 2016

माझे उद्योगधंदे

अमेरिकेत येउन २-३ महिनेच झाले असतील  नवीन असल्यामुळे बऱ्याच गोष्टी कळत होत्या  समजून घेणे चालूच होते . कधी कधी शनिवारी रविवारी अहो सोबत मॉल वारीही होत असे यावेळीही आम्ही दोघे मॉलमध्ये फिरायला गेलो होतो बरीच मैल पायपीट करून झाल्यावर दोघांनाही भूक लागली हल्ली आम्हाला  दोघांना एकमेकांकडे नुसते पहिले तरी कळते कि भूक लागली आहे ते !!! 
असो तर सगळ्यात वरती असेलल्या फूडकोर्ट मध्ये जाऊन मी आणि नवरा बसलो , ओर्डर करून खाण्यासाठी कोण घेऊन येणार ? यात आमचे तू तू मै मै चालू होते !!! शेवटी अहोंना भूक लागल्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली आणि रवाना झाले . 
मी आपली बसले होते आजू बाजूला पाहत , मी जिथे होते तिथे जागा होती ते पाहून एकजण तिच्या बाळाला स्ट्रोलर मध्ये घेऊन शेजारी येउन बसली . 
तिने माझ्याकडे पाहून एक स्माईल केले आणि " hi " करून बोलायला सुरवात केली . 
मीही आपली तिला : Hi  , how  r  u ? 
ती : I m gud thanks , btw I  m अमृता  व्हात्स युर नेम ? 
मी : श्वेताली . 
 ओह्ह स्वीट नेम !!! आय एम फ्रोम पुणे and यु ? 
मी : आय एम अल्सो फ्रोम पुणे कॅन यु स्पीक मराठी ?  
ती : एस   … 
मी किती खुश झाले !!! एक तर हि मराठी त्यात स्वतः हून बोलायला आली , किती छान !! इथे आल्यापासून मी बोलणारे पहिलेच नाहीत त्यात हि तर मराठी बोलणारी , चातक कसा पावसाची वाट पाहत असतो ,, त्याच्यासारखीच मी इथे मराठी बोलायला नेहमीच आसुसलेली असते , आत्ता इथले माझे मराठी भाषिक मित्र त्याचा अर्थ मला इंग्लिश बोलताच येत नाही असा लावत असतात का  तर मी त्यांच्याशी मराठीत बोलते म्हणून !!! जैसी जिसकी सोच !!! 
माझा हा स्वप्नविलास तिनेच तोडला  , कधीपासून आहेस इथे ? 
आम्ही आताच आलो २-३ महिनेच झाले . 
अरे म्हणजे अजून नवीनच आहात !! कुणी मित्र वैगरे आहेत कि नाहीत ? 
मी : नाही जास्त कुणी नाही … 
ती : काय करते जॉब ? 
मी : नाही H४ विसा त्यामुळे घरीच असते . वाचते , थोडेफार लिखाण करते , नवीन पदार्थ करून बघत असते ………   तिचा पुढचा प्रश्न ओळखून आधीच उत्तर दिले. 
ओह्ह thats grt !! 
तितक्यात नवरा खायचे घेऊन येतो म्हणून माझी त्या प्रश्नातून सुटका झाली .  
त्याच्याकडे बघूनही स्माईल … नवरा तर खुश होऊन लगेच  हाय आय एम विजय !! 
हाय मी अमृता ! 
मी आपली दोघांकडे आणि त्या खाण्याकडे बघत बसले . 
तिला काय वाटले माहित नाही पण माझा फोन नंबर घेऊन ती गेली . 
आम्हीही खाणे संपवले आणि परत घरी आलो . 
दुसऱ्या दिवशी नवरा ऑफिसला माझे चालू होते घरचे काम तितक्यात अमृताचा फोन आला . मी विचार करू लागले काळ तर हिला भेटले आज लगेच हिचा फोन ? थोड्याश्या आश्चर्यानेच तिला Hello केले . 
ती : disturb तर नाही न केला? 
मी  ( मनातल्या मनात हो म्हणले तर काय फोन ठ्वेणार आहेस का ?) तिला नाही ग बोल ना !
ती : इट्स रियली वेरी नाईस टू मिट यु अन्ड विजय ! 
मी : सेम हियर .
तिकडून तिचे अग तू खूप छान बोलतेस मी माझ्या नवऱ्याला पण सांगितले कि मला एक मराठी नवीन मैत्रीण मिळाली . म्हणून आज परत तुला कॉल केला . 
मी हो मला आणि विजयला पण खूप आनंद झाला तुला भेटून !!!! 
ती : अग माझा नवरा म्हणत होता कि आपण या शनिवारी भेटूया का ? कुठेतरी बाहेर जेवू !!! म्हणजे आपली परत भेट होईल !
मी: अग हो मस्त प्लान आहे भेटू आपण फक्त विजयला विचारते त्याचा काही प्लान असेल तर … 
ती : ओक चालेल बाय डियर !!

लगेच विजयला कॉल करून , अरे त्या अमृताचा कॉल आला होता भेटूया म्हणत होती ! माझ्या विषयी फारच गोड बोलत होती बुवा , काय कळेना मला तिचे पहिल्या भेटीत असे कसे काय ? 
तर त्याचे लॉजिक , अग टिपण एकटीच असेल म्हणून …. बर घरी आल्यावर बोलू ! फोन कट . 
माझ्या डोक्यात आपले किडे असे कुणी बोलते का इतके गोड गोड !! काहीतरी नक्की आहे !! नाहीतर इथे स्वतःहून ओळख देणारे फार कमी !! 
तो दिवस तसाच गेला .  
परत दुसऱ्या दिवशी  तेच तिचा कॉल हे ! काय प्लान तुमचा मग ? भेटायचे ना ? 
अरे देवा परत मी  आणी विजय यावर बोल्याचेच विसरलो !! आता काय ? 
तिला कसेतरी कटवले !! आणि परत त्याला फोन तर साहेब बिझी मीटिंगमध्ये !! 
तोही दिवस तसाच … 
परत सलग तिसऱ्या दिवशी तिचा कॉल यावेळी थेट प्रश्न विजयला विचारले का ? आहे का तो फ्री? 
मी गप्पच … आता मात्र पलीकडून धूर निघेल असे वाटत होते पण तिने ओके lets  talk tommrow !! फोन कट 
 आज मात्र विजयशी बोल्याचेच … तो घरी आल्यावर अरे काय सांगू तिला ? रोज कॉल करत आहे ती !!
तो : कोण ती (जरा घाबरून )
अमृता रे आणि कोण ? 
ती होय हा भेटू आपण !! 
हुश्श !!!! अपेक्षेप्रमाणे तिचा फोन आलाच 
यावेळी मात्र तिने खुश होऊन फोन ठेवून दिला …. 
शनिवारी आमचे निवांत आवरणे चालू होते तोच तिचा मेसेज ,, प्लान चेंज्ड  वी विल मिट अट युर होम .  डायरेक्ट आज्ञा !!! 
आम्हाला साधे विचारावेसे पण तिला वाटले नाही . पण असो आलिया भोगासी असावे सादर याप्रमाणे आम्ही दोघेही ओके म्हणून गप्प बसलो . 
थोड्या वेळात त्यांचे  सहकुटुंब आगमन  झाले . चहा पाणी होत असताना तिच्या नवऱ्यासोबत ओळख परेड चालू होती  आमच्या खानदानाची माहिती घेणे चालू होते . कोण काय करते ? कुठे असतात ? किती भाऊ ? बहिणी ? आम्ही आपले एकमेकांकडे पाहत उत्तरे देत होतो .

तिचा नवरा अनिकेत आमच्या डायनिंग टेबल वर आला आणि एक डायरी काढली आपण एक खुर्ची आणि मला आणि विजयला एक एक खुर्ची घेऊन बसायला लावले . त्याचा पहिला प्रश्न  विजयला तुला भविष्यात काय करायचे आहे ? कि नेहमीच नोकरी ? स्वतःचे असे काही करायचे आहे का ?
 विजय थोडा गोंधळून हो आहे विचार पण अजून काही केला नाही . तोच प्रश्न मला  माझेही उत्तर् तेच …
ते पाहून त्याने थेट मुद्द्यालाच हात घातला … आमचा असा एक बिझनेस आहे , आतापर्यंत मी खूप पैसे कमावले यात …. खूप फायदा आहे , आपले भविष्य अगदी सुरक्षित होते ,, (जसे कि आता आमच्या डोक्यावर तलवारच होती ) यात किती लोक यशस्वी झाले त्याचा आलेख मांडून दिला , माझा नवरा मन  लावून ऐकत होता . मी आपले अधून मधून हो हो नाही नाही चालू होते … खरे तर माझे लक्ष देवघरातल्या गणपतीसमोर तांडव करणाऱ्या उंदराकडे होते !!!!!  त्याची उडी पाहून मी ओरडणार इतक्यात त्याचे भाषण संपले …
 हुश्श अजून मी करत होते तितक्यात त्यांनीच मी आणि विजय उद्या त्यांच्या मोठ्या लोकांसोबत जी मीटिंग आहे तिथे येणार असे फायनल केले … (कसे असतात न हे लोक )  आत कुठे अंदाज येत होता कि हे काय आहे ते तर परत नवीन अध्याय …
काही पर्यायच नव्हता मग काय हो म्हणालो .
एक तर शनिवार वाया गेला होताच आता रविवारही  पाण्यात …
 रविवारी दोघे आम्हाला घेण्यासठी आले तर त्यांच्या गाडीत आधीच दोन बकरे दिसत होते बिचारे !!!!!
आम्ही सगळे पोहचलो . तिथे मी आणि विजय मागे बसलो तर ते दोघे जरा पुढे होते .
बापरे !! किती मोठ्यांनी टाळ्या देणे ! हसणे उगाचच सारखे एकमेकांना हायफाय देणे चालू होते . त्यानंतर कुणी किती प्रगती केली यात सुद्धा प्रत्येक दोन वाक्यानंतर टाळ्या !!!
काहीजण लिहून घेत होते ??? काय हा मला प्रश्नच होता ?
त्यात अमृता येउन विचारून गेली एन्जोय करत आहात ना ?
आता तिला काय सांगणार ? कात्रीत सापडल्यासारखी आमची अवस्था … हो खूप छान तिलाही बरे वाटले असावे ती गेली  .
मी आपली नवऱ्याला चल रे चल रे ! तर त्याचे आता आलोय ना मग थांब !!!!
कसे ३ तास घालवले एकटे त्या  मोबाईललाच ठाऊक !!! येताना हातात २ सीडी आणि एक पुस्तक दिले पूजेला आल्यावर प्रसाद कसा देतात तसे !! (ते परत द्यायचे असते हे मला नंतर समजले ) .
 रात्री उशिरा घरी आलो , आम्हाला वाटले होते तिथे असेल डिनर पण साधे पाणी कुणी विचारले नाही !!!
घरी येउन परत वरण भात कुकर झिंदाबाद ….   पूर्ण शनिवार रविवार बिझ्नेसात !! आणि जो कि करायचाही नव्हता !!
पण हि चतुर लोक तिथे जाईपर्यंत ताकास तूर लागून देत नाहीत नेमके काय आहे ते !!
सोमवारी नवरा परत ऑफिसात  मी आपली कामात आणि हिचा कॉल आता धूर माझ्याकडून यायचा बाकी होता .
कारण विजयने रात्रीच मेसेज केला होता आम्ही या उद्योगाला सध्यातरी तयार नाहीयोत असा .… तरी परत  ??
मी नाही घेतला तरी परत अनिकेतने विजयला केला कॉल आणि त्यांनी त्यांनाच आज रात्री आमच्या घरी भेटायचे आमंत्रण दिले कि घेतले !!!!
इतके सांगूनही परत हे दारात !!!! पण अतिथी देवो भव : शेवटी संस्कार आड आले ….  चहा पाणी झाले हा उद्योग किती फायद्याचा आहे हे पटवून झाले अजून उदाहरणे देऊन देऊन चालू होते …. आमचे भविष्य किती सुजलाम सुफलाम होईल  असे सांगून झाले ….  पण मी आणि विजय निश्चल दगडासारखे ….
फक्त मधूनच हलायचे काम करत होतो . त्यांनाही समजून चुकले किती डाळ शिजवायची ती झाली शिजवून आता ती तड्कयात पडण्यापूर्वी निघावे .
 आता मात्र कुणी कुठले आमंत्रण देण्यापूर्वी किंवा घेण्यापूर्वी  एकदा सोडून दहा वेळा विचार करतो !! कधी कधी भेटतात असे ,, तेव्हा नवरा डायरेक्ट म्हणतो अरे मी तुम्हाला ना त्या बिझनेस मीटिंग मध्ये पहिले आहे !!!
त्या बिचारयालाही कळते कि हा मासा गळाला लागणाऱ्यातला नाही .


Friday, June 3, 2016

POCONOS MOUTAIN

रोज रोज तेच करून कंटाळा आल्यानंतर वेगळे काम , कुठेतरी बाहेर फिरायला जाणे किती सकारात्मक उर्जा देणारे असते . गेल्यावर्षी मी आणि नवरा दोघेच बोस्टोनला कुणीच ओळखीचे नाही त्यामुळे जिथे जाईल तिथे दोघेच !!! पण आता इकडे न्यू जर्सीला आल्यापासून थोडे  माणसात आल्यासारखे वाटते .
आता उन्हाळा सुरु झाला , इकडे या दोन्ही गोष्टीचा अतिरेकच आहे थंडी म्हणली तर खूप आणि उन्हाळाही तसाच , २-३ महिन्यातून कधीतरी एकदा मिळणारा long weekend सोबत मित्र मंडळी  …. दंगा , मजा मस्ती याचा खूप दिवसांनी अनुभव घ्यायला मिळाला .
शुक्रवार संध्याकाळपासून आमची सुट्टी सुरु झाली , सगळे ऑफिसमधून येउन जमा होऊन निघायला ७ वाजले पण सूर्यास्तच आता खूप उशिरा होतो त्यामुळे तसेही खूप लवकर निघाल्यासारखे वाटत होते . साधारणपणे ७ वाजता आमची गाडी poconos moutain  साठी रवाना झाली . यावेळी आम्ही सगळे मिळून १३ लोक्स  , त्यात ३ बच्चे कंपनी …
एका मागे एक अशा तीन गाड्या …  सगळ्या अगदी लयबद्ध ओवरटेकची मजा नाहीच . जर कुणी केला आगाऊ पणा तर असतातच पुढच्या एक्झिट ला पोलिस मामा भेटायला . दोन तासाची सफर झाली आणि एका सुंदर वळणावरून गाडी जंगलात … इतकी झाडे हिरवीगार ,मस्त थंडगार वारा , आम्ही ३ दिवस राहण्यासाठी एक  Camel Ski Resort बुक केले होते अगदी घरासारखे . त्याच्या  सगळ्या बाजूनी उंच उंच झाडे  अगदी टिपिकल जंगलात  राहायचे फिलिंग .
इथे ३-४ दिवस बाहेर राहायचा माझा पहिलाच अनुभव , आम्ही तिथे पोहचलो होतो तेव्हा १० वाजत आले होते आणी असे कुठे बाहेर असले कि जरा जास्तच भूक लागते नै का ?  कुणी काय आणायचे आहे ते  आधीच ठरले होते . पुलाव , भरून वांग्याची भाजी , उसळ ,चटणी , लोणचे , कितीतरी प्रकार सगळ्यांना कधी एकदा जेवतो असे झाले , सगळे सामान गाडीतून फक्त आत आणून ठेवले  . आणि लगेच सगळे जेवण टेबल वर तयार कुणाला काय हवे ते घ्या !!! छोट्यांचा दंगा होताच पण मोठेही कमी नाहीत , इतक्या सगळ्यांमध्ये जेवताना वाटत होते कि किती दिवस झाले जेवून ?  कितीही खाल्ले तरी पोट भरतच नव्हते मन मात्र तृप्त झाले होते .
   जेवून झाल्यावर सगळ्याचेच डोळे झोपेला आले होते काम आणि प्रवासचा थकवा …
आम्ही बरेच लोक हॉल मध्ये एकत्र झोपलो  हा प्रकार ना मला खूप  आवडतो निवांत झोप लागेपर्यंत गप्पा उगीच हसणे , सकाळी निवांत उठणे ,लग्न घराची आठवण करून देणारा …
 
सकाळी ६ वाजले असतील तरी ८ वाजून गेले असतील इतका उजेड बाहेर … तरी ८ पर्यंत लोळणे चालूच होते हा जगातील सगळ्यांच्याच आवडीचा छंद पण आयांश आणि अनया हे  दोघे झोपून देतील तर कसले ? यांना सगळ्यांना झोपेतून उठवायचे contract दिल्यासारखे चालू होते . आमच्या जगी सर्वसुखी असा कोण आहे ? या विचारांवर पाणी पडण्याचे काम ते बरोबर करत होते  !!

सकळी चहा आणि पोहे झाल्याशिवाय आपली सकाळच झाली आहे असे वाटतच नाही . मस्त गरम गरम पोहे आणि  चहा आणि त्यासोबत फ्री गप्पा दिवसभर आज करायचे याच्या !
 adventure rides ला सगळ्याचे  अनुमोदन मिळाले . तिथे खूप काही करण्यासारखे होते पण वेटिंग खूप … camelback moutain coaster ride केली  त्यामध्ये पूर्ण त्याचा सगळा कंट्रोल तुमच्याकडे आणि  फिरत आजू बाजूला डोंगर दर्यातून फिरायचे  सुंदर मनमोहक त्या पर्वताचा नजारा … यावेळी खूप काही डोळ्यात साठवले फोटोपेक्षा !!!! ४००० फिट zip flyer पाऊस पडल्याने कॅन्सेल करावी लागली .
 दुसऱ्या एका राईड मध्ये खूप उड्या मारल्या .  थोडावेळ badminton खेळण्यात घालवला
  शेवटी Go Karting बापरे !! सही होती हि कार गोल गोल घुमो … आवडली म्हणून तीनवेळा केलेली राईड !!! यात सगळ्यात जास्त वेळ तुमचा नंबर लावण्यातच जातो … पण काही दुसरा पर्यायही नाही … इथे paintball ला खूप मजा आली .
पहिला दिवस संपवून ९च्या आसपास घर वापसी .
परत घरी येउन जेवण गरम करणे खाणे आणि गप्पांचा फड  रात्री २ पर्यत … आपल्या घरातल्या लोकांसोबत  नेहमीच बाहेर जात असतो , पण  ज्यांना आपण ओळखतो त्यांच्यासोबत आणखी सुंदर धागे दोरे गुंफण्यासाठी   या सहली , एकमेकासोबत वेळ घालवणे अशाने सहज साध्य होतात . यात आपल्याही काही कमी कळतात नवीन लोकांना समजून घेण्याची संधी मिळते . जे अबोल असतात त्यानाही वाटते आपण बोलावे …

दुसरा दिवस हा सगळ्यांसाठीच खास होता … पाणी पाणी आणि पाणी
घरातून निघताना सगळ्या पुरुष कंपनीने मिळून लिंबू सरबत केले होते तिथे उनामध्ये फिरताना त्रास होऊ नये किती काळजी आमची !!!!!
water rides खूप धमाल … मला लहानपणपासून घसरगुंडीची खूप भीती आहे आणी या पाण्यात खेळायचे म्हणजे सगळ्यावरून घसरत खाली !!! पण ज्यात tube मध्ये बसून खाली यायचे होते त्या म्हणजे सोन्याहून पिवळे !! पाण्यात खेळायला कुणाला आवडत नाही ? lazy river मध्ये tube मध्ये आरामात बसून गोल गोल फिरणे इतके आळशी कि मागून कुणीतरी येउन धक्का देतेच तुम्ही आपोआप पुढे ….
मला त्याचे नाव नाहीय आठवत पण आम्ही त्यात बसून पर्वतच्या टोकावर गेलो होतो जाताना आणि परत खाली येताना काय सुंदर नजारा आणि हरीण बागडताना इतके दिसत होते कि बस्स !!! तिथून परत यायलाच नको वाटत होते .
इतकी लोक पण स्वच्छता आणी टापटीपपणा …
तुमच्या जीवाची तुम्हला जितकी काळजी नाही तितके इथले security वाले करतात !!!!
बाहेर थोडे थोडे पावसाचे वातावरण … तुम्ही जंगलात आणि भेळ काय सही आहे ना ?
घरी परत येउन पत्त्याचा डाव रंगला ७-८ ,,५-३-२ ,, challenge बापरे इथे इतकी फसवा फसवी हसून हसून पोट दुखायला लागले . हा मजा मस्तीचा वेळ खूप लवकर जातो !!!
तितक्यात जोरात पाऊस सुरु झाला आणि आमच्या सुंदर घरामध्येच टीप टीप बरसा पाणी चालू झाले आणि त्या पावसाने आमच्या तिथल्या शेवटच्या मुक्कामी लग्न घराच्या मनसुब्यावर पाणी फिरवले .
शेवटचा दिवस सगळेच कंटाळलेले उद्या ऑफिस या विवंचनेत …
तरीही पहिल्या दिवशी पावसामुळे कॅन्सेल झालेली आमची ride ४०००फिट zip  flyer आज पूर्ण करायचीच होती . नशीब आज जोरावर होते त्यामुळे लवकरचे तिकीट मिळाले , तिथे खाली रेडी होऊन गाडीत बसून पर्वतच्या टोकावर गेलो , तिथे फोटो सेशन करून fb ला टाकून आमची सेना खाली येण्यासाठी तयार … दोन दोन च्या जोडीने !! हा अनुभव पण डोळ्यात मनात साठवून ठेवावा असाच ….
यानंतर १००० zip line हि राईड फक्त अन फक्त त्या सुंदर जंगलात फिरण्यासाठी आणि फोटोसाठी केली …
यावेळेचा अनुभव खरेच खूप सुंदर होता ३ दिवस घरापासून दूर पण तरीही जवळ सगळेच आपले आणि सगळेच वेगळे ,
प्रत्येकजण  आधीपासून ओळखीचा असूनदेखील अनोळखीच वाटत होता खूप नवीन रूपे पहायला मिळाली , रोजच्या आयुष्यापेक्षा माणूस निसर्गात अधिक खुलतो .
अशावेळी माणसातला माणूस कळतो का ते माहित नाही … पण निसर्गातल्या माणसाला तो स्वतः नक्कीच कळतो .
सगळी आवरा आवर करून आम्ही तिथून निघालो , आणि एक मस्त इंडिअन हॉटेल मध्ये जेवायला पोहचलो . तिथे जास्त कुणाला काही बोलायचा मूड नव्हताच . सगळ्यांना एक वेगळेच समाधान होते जे कि पुढच्या काही दिवसासाठी tonic  होते .
 जेवणानंतर प्रत्येकाच्या वाटा  वेगवेगळ्या होत्या पण तरीही त्या एकमेकात अडकल्या होत्या .